कचरा व्यवस्थापनाची पुढील दिशा

विवेक मराठी    01-Jul-2024   
Total Views |
Waste Management in Ratnagiri
एकंदर कचर्‍यामुळे शहरांचं आणि गावांचं होणारं बकालीकरण पाहता ‘कचरा संकलन आणि पुनर्चक्रीकरण’ हे कार्य रत्नागिरीत मोठ्या पातळीवर कसं करता येईल या दृष्टीने दिशादर्शन म्हणून या क्षेत्रात कार्य करणार्‍या तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींना एकत्र आणून यावर एक चर्चा घडवून आणावी, अशा विचाराने रत्नागिरीत ‘कचरा व्यवस्थापनाची पुढील दिशा’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं होतं.
 
दि. 13 जून 2024 रोजी रत्नागिरीत ’कचरा व्यवस्थापनाची पुढील दिशा’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं होतं. कार्यक्रमाचे आयोजक होते UNBOX: YOUR DESIRE या अ‍ॅॅपचे सर्वेसर्वा गौरांग आगाशे. प्लास्टिक, ई-कचरा आणि जुने कपडे या मुख्यतः तीन प्रकारच्या कचर्‍याच्या संकलन आणि पुनर्चक्रीकरणाची मोहीम राबवणार्‍या पुण्यातील ’पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन’ संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. राजेश मणेरीकर, चिपळूण शहर आणि आजूबाजूच्या परिसरांत अलीकडे प्लास्टिक संकलन करणार्‍या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, ’करो संभव’ या ई-कचरा संकलन करणार्‍या कंपनीच्या प्रतिनिधी आसावरी पाटील, प्लास्टिकपासून इंधन तयार करणार्‍या ‘रुद्र एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स’ कंपनीच्या संचालक डॉ. मेधा ताडपत्रीकर, रत्नागिरी शहर आणि आजूबाजूच्या परिसरांत कंपोस्टिंग युनिट्सचा प्रसार करणार्‍या ’रत्नाग्रीन टेक्नो सर्व्हिसेस’चे मनीष आपटे हे या चर्चासत्राला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. गेली दहा-पंधरा वर्षं किंवा त्याहूनही जास्त काळ कचरा संकलन आणि पुनर्चक्रीकरण या क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव या मंडळींनी सांगितले. खासगी पातळीवर कचरा संकलनाचं जाळं अधिकाधिक कसं विस्तारता येईल याबाबतही चर्चा झाली.
 

Waste Management in Ratnagiri
2008 पासून आम्ही ’झिरो वेस्ट कम्युनिटी’ या संस्थेच्या माध्यमातून दक्षिण रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या संस्थांच्या आणि प्रशासनाच्या सहयोगाने कचरा व्यवस्थापनावर जनजागरण करून सुका कचरा पुनर्चक्रीकरणासाठी देण्याचं आवाहन केलं. त्याचप्रमाणे ओल्या कचर्‍याचं घरच्या घरी खत आणि बायोएन्झाइम्स बनवण्यासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केलं. दर महिन्याला आमची गाडी महाड, पोलादपूर आणि माणगाव (दक्षिण रायगड) या तालुक्यांमध्ये फिरून सुका कचरा संकलन करते. यामध्ये प्लास्टिक, काच, चप्पल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, जुने कपडे अशा सगळ्या प्रकारच्या कचर्‍याचा समावेश होतो. आजमितीस दर महिन्याला सुमारे एक ते दीड टन सुक्या कचर्‍याचं संकलन या माध्यमातून होतं आणि गोळा केलेला सर्व कचरा वर्गीकरण करून पुनर्चक्रीकरणासाठी जातो. सुक्या कचर्‍याच्या पुनर्चक्रीकरणातून रोजगारनिर्मितीच्या मोठ्या संधी भारतात उपलब्ध आहेत आणि शून्य कचरा व्यवस्थापनातील व्यवसाय आणि रोजगार संधी याचाही प्रसार आणि प्रचार या माध्यमातून होत आहे.

kokan

ममता विजय मेहता,
झिरो वेस्ट प्रॅक्टिशनर, महाड, जि. रायगड
mamtamehta977gmail.com
 
हे चर्चासत्र आयोजित करण्यामागची पार्श्वभूमी अशी की, रत्नागिरी शहरात गेले पाच महिने UNBOX: YOUR DESIRE या ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅपच्या माध्यमातून प्लास्टिक कचरा प्रत्यक्ष घरी जाऊन संकलित करण्याचा उपक्रम सुरू आहे. UNBOX: YOUR DESIRE हे अ‍ॅप रत्नागिरीतील युवक गौरांग आगाशे याने 2020 साली तयार केलेलं. स्विगी-झोमॅटोप्रमाणेच या अ‍ॅपवरून हॉटेलातून खाद्यपदार्थ घरी मागवता येतात. संपूर्ण रत्नागिरी शहरात UNBOXचे सुमारे 36,000 डाऊनलोड्स आणि 12,000 अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. UNBOX चे डिलिव्हरी बॉइज दिवसभर रत्नागिरी शहरभर सोसायट्यांमध्ये फिरत असतात. एक कल्पना अशी सुचली की, जी यंत्रणा फूड डिलिव्हरीसाठी निर्माण केलेली आहे तीच यंत्रणा वापरून लोकांच्या घरचा प्लास्टिक कचरा एकत्र करता येईल का? गौरांगने ही गोष्ट मनावर घेतली. UNBOX अ‍ॅपमध्ये त्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण केल्या आणि जानेवारी 2024 पासून हा उपक्रम सुरू झाला. आपल्या घरातला प्लास्टिक कचरा कोरडा करून एका पिशवीत भरून ठेवावा, त्यात पातळ पिशव्या आणि बाटल्यादी कडक प्लास्टिक वेगळं ठेवावं, असं आवाहन समाजमाध्यमांमधून लोकांना करण्यात आलं.UNBOX - YOUR DESIRE या अ‍ॅपवर Dispose Plastic Waste and Earn Rewards या लिंकवर क्लिक करून आपल्या घरातल्या साठवलेल्या प्लास्टिक कचर्‍याचा फोटो तिथे अपलोड करण्याची सोय आहे. हा फोटो अपलोड केल्यानंतर दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला ’अनबॉक्स’तर्फे माणूस येऊन प्लास्टिक कचरा घेऊन जातो. यात गोळा केलेल्या प्लास्टिक कचर्‍याचं पुढे काय करायचं? तो कुठे पाठवायचा? हा एक प्रश्न होता; परंतु रत्नागिरीचेच प्लास्टिक इंजिनीअर असलेले उद्योजक मल्हार मलुष्टे यांनी आपल्या रिसायकलिंग कारखान्यात हे प्लास्टिक स्वीकारण्याची जबाबदारी घेतली.
 

‘केशव सीता ट्रस्ट’तर्फे गेली 11 वर्षं पुणे शहर परिसरात प्लास्टिक कचर्‍याबाबत जनजागृतीचं काम सुरू आहे. कचर्‍याचं घरातच वर्गीकरण करण्याबाबत खूप जनजागृती केल्यामुळे आमच्याकडे जे काही प्लास्टिक येतं त्यातलं 98% स्वच्छ-कोरडं असतं. Whatsapp groups च्या माध्यमातून लोकांशी संपर्क करून पुणे शहर परिसरात महिन्यातून एकदा किंवा दोनदा आम्ही गाडी फिरवून घरोघरी जाऊन प्लास्टिक संकलन करतो. कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई या शहरांतही आम्ही काही प्लास्टिक कलेक्शन सेंटर्स केली आहेत. जमा केलेल्या प्लास्टिकचं Thermocatalytic Depolymerization या प्रक्रियेने आम्ही पुन्हा पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनात रूपांतर करतो. साधारणपणे 100 किलो प्लास्टिकपासून 50 ते 70 लिटर इंधननिर्मिती होते. यात जो साका राहतो तो रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वापरला जातो.

kokan

- डॉ. मेधा ताडपत्रीकर,
रुद्र एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स - पुणे
medhat235gmail.com 
Waste Management in Ratnagiri

 
गेल्या पाच महिन्यांच्या अनुभवानंतर आणि एकंदर कचर्‍यामुळे शहरांचं आणि गावांचं होणारं बकालीकरण पाहता ’कचरा संकलन आणि पुनर्चक्रीकरण’ हे कार्य रत्नागिरीत मोठ्या पातळीवर कसं करता येईल याबाबत विचार करायला हवा असं वाटलं. या दृष्टीने दिशादर्शन म्हणून या क्षेत्रात कार्य करणार्‍या तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींना एकत्र आणून यावर एक चर्चा घडवून आणावी, असा विचार आला आणि 13 तारखेचं हे चर्चासत्र पार पडलं. सर्व सहभागी वक्त्यांनी आपापल्या कार्याचं अनुभवकथन केलं आणि पुढच्या वाटचालीबाबतही चर्चा झाली.
 
Waste Management in Ratnagiri 
या चर्चासत्रात ज्या काही मुद्द्यांची चर्चा झाली त्याचं सार सांगायचं झालं तर, काही बाबींवर विचार आणि त्या दृष्टीने कृती होणं आवश्यक आहे. कचरा संकलनाची पक्की यंत्रणा गावांमध्ये आणि शहरांमध्ये असणं आणि त्याचा संसाधन म्हणून वापर करून रिसायकलिंग करणं याची मोठी गरज आहे, कारण शेकडो प्रकारचा कचरा अवाढव्य प्रमाणात निर्माण होतोय. कचरा व्यवस्थापनासाठी निर्माण केलेली सरकारी यंत्रणा (काही सन्माननीय अपवाद वगळता) बर्‍याच अंशी या कार्यात अपयशी ठरताना दिसते. अलीकडे सर्व ग्रामपंचायतींनी आपापल्या गावात ठिकठिकाणी प्लास्टिक आणि इतर कचर्‍याच्या संकलनासाठी लोखंडी पिंजरे बसवले आहेत. काही सुजाण नागरिक त्या पिंजर्‍यांमध्ये कचरा टाकतातही; पण तो टाकलेला कचरा पुढे योग्य ठिकाणी घेऊन जाण्याची कुठलीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे हे पिंजरे भरतात, पावसाने ओले होतात आणि आणखी घाण होते हे वास्तव चित्र आहे. त्यामुळे खासगी क्षेत्राने कचरा व्यवस्थापनात लक्ष घालण्याला पर्याय नाहीये. आज एक फार मोठी सुदैवाची गोष्ट अशी की, कुठल्याही प्रकारच्या कचर्‍याचं पुनर्चक्रीकरण करण्याचं तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे विकसित होतंय आणि त्यात अनेक उद्योजक आणि स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. प्रश्न आहे तो अतिशय विखुरलेल्या ठिकाणांवरून प्लास्टिक आणि इतर अविघटनशील कचरा एकत्र एका ठिकाणी वाहून आणणं, त्याचं वर्गीकरण करणं आणि पुनर्चक्रीकरण कारखान्यांपर्यंत तो
 
 Waste Management in Ratnagiri
 
 

'करो संभव’ या कंपनीतर्फे 2017 पासून आम्ही भारतात सर्वत्र इलेक्ट्रॉनिक कचरा संकलनाचं काम सुरू केलं. ई-कचरा पुनर्चक्रीकरण करणार्‍या कंपन्यांपर्यंत हा संकलित केलेला कचरा पोहोचवण्याचं काम ही कंपनी करते. दुकानं, शाळा-कॉलेज, ऑफिसेस, अशी ठिकाणं, जिथे अनेक लोक एकत्र जमतात, त्या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही संकलन उपक्रम राबवतो. ई कचर्‍यातल्या प्रत्येक घटकाचं योग्य रीतीने पुनर्चक्रीकरण होतंय की नाही यावर काटेकोरपणे लक्ष ठेवणारी तांत्रिक व्यवस्था आम्ही निर्माण केली आहे. 2020 साली उत्तर प्रदेशमधील मोदीनगरमध्ये आमचा पहिला ई-कचरा पुनर्चक्रीकरण कारखाना सुरू झाला. याची वार्षिक पुनर्चक्रीकरण क्षमता सुमारे 7500 मेट्रिक टन एवढी आहे. दुसरा कारखाना नाशिकमध्ये सुरू होत आहे. ई-कचर्‍याच्या पुनर्चक्रीकरणासाठी लागणारा प्रचंड निधी हे यातलं एक मोठं आव्हान आहे.


kokan

- आसावरी पाटील,
करो संभव - मुंबई
asawari.patilkarosambhav.com

 
पोहोचवण्याची यंत्रणा निर्माण करणं याचा. हे काम मात्र खर्चीक आहे. ज्या स्वयंसेवी संस्था वा व्यक्ती खासगी पातळीवर हे काम करतात त्यांना यासाठी सीएसआर फंड्स किंवा देणग्यांवरच अवलंबून राहावं लागतं. या यंत्रणेला स्वतःचं असं उत्पन्न प्रारूप (Revenue Model) तयार करता आलेलं नाही. त्याचं कारण कच्चा माल म्हणून घेतल्या जाणार्‍या प्लास्टिक आणि इतर कचर्‍याला फारशी किंमत नाहीये. त्यामुळे मोठ्या पातळीवर हे कार्य करायचं झाल्यास ते परवडणार कसं, हा प्रश्न आहे. यातलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे लोक घरातच कचर्‍याचं वर्गीकरण करून देत नाहीत. सॅनिटरी नॅपकिन्स, मुलांचे डायपर्स, इलेक्ट्रिक बल्ब्ज, उरलेलं अन्न आणि प्लास्टिकच्या बाटल्या हे सगळं लोक एकाच डस्टबिनमध्ये भरून टाकतात. त्यामुळे संकलन केल्यावर वर्गीकरणाचा खर्च खूप वाढतो आणि काम करणार्‍या माणसांनाही स्वाभाविकपणे किळस वाटते. कचर्‍याचं वर्गीकरण हे घरातच होणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा पुढचा मार्ग सोपा होतो; पण सध्याची एकंदर परिस्थिती पाहता ही जागरूकता यायला पुढच्या किती पिढ्या जाव्या लागतील न जाणे! यासाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवणं आवश्यक आहेच; पण केवळ त्यावर अवलंबून न राहता प्राप्त परिस्थितीत एका ठिकाणी वर्गीकरणाची व्यवस्था उभी करणं यालाही पर्याय नाही. चर्चासत्रात जमलेल्या मंडळींनी हीच खंत व्यक्त केली की, कचरा वर्गीकरण केलेला नाही म्हणून स्वीकारायचा नाही, असं ठरवलं तर मग लोक द्यायचेच बंद होतील! असा हा पेचप्रसंग आहे.
 
 
'रत्नग्रीन टेक्नो सर्व्हिसेस’ या आमच्या संस्थेतर्फे आम्ही मुख्यतः शहरातील सोसायट्यांमध्ये बसवण्यासाठी कंपोस्टर्स तयार करतो. आत्तापर्यंत सुमारे 800 कंपोस्टर्स बसवले आहेत. यामुळे सोसायटीतील ओला कचरा एकत्र करून त्याचं कंपोस्ट खत बनवणं सोपं जातं. याशिवाय सोसायट्यांमधून प्लास्टिक कचरा संकलनही केलं जातं. जमा केलेलं प्लास्टिक पुण्याला पुनर्चक्रीकरण कारखान्यात पाठवतो. घरातच कचर्‍याचं व्यवस्थित वर्गीकरण होत नाही, ही यातली मुख्य अडचण आहे. संकलन आणि वाहतूक खर्च कसा भागवायचा, हेही आव्हान आहे.


vivek
 
- मनीष आपटे,
रत्नग्रीन टेक्नो सर्व्हिसेस, रत्नागिरी
ratnagreentechnogmail.com

 
 
  
 Waste Management in Ratnagiri
  
 
चर्चासत्र उत्तम रीतीने पार पडलं; पण तरीही एक खंत जाहीरपणे व्यक्त करावीशी वाटते. कार्यक्रमाच्या चार-पाच दिवस आधीपासून समाजमाध्यमांवरून रत्नागिरीतल्या भरपूर लोकांना निमंत्रण पाठवलं होतं; पण प्रत्यक्ष कार्यक्रमाला अवघी 10 ते 12 माणसं उपस्थित होती. विषय अतिमहत्त्वाचा होता, खूप मोठ्या पातळीवर काम करणारे लोक प्रत्यक्ष भेटत होते; पण तरीही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत फार उदासीनता दिसली. व्यावहारिक अडचणींमुळे लोक आले नाहीत, की लोकांना या विषयाचं फारसं गांभीर्य वाटत नाही, हा प्रश्न पडतो; पण तरीही जी मंडळी तिथे उपस्थित राहिली ती या विषयात काम करण्याची तळमळ असणारी होती. त्यामुळे अशा विचारमंथनातून रत्नागिरी शहरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात खासगी पातळीवर कचरा व्यवस्थापनाचं काही तरी कार्य उभं राहील याबाबत विश्वास आहे.
 

हर्षद तुळपुळे

मूळचा अणसुरे,जि. रत्नागिरी रहिवासी. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चौदावीपर्यंत शिक्षण, मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून बी.ए. (अर्थशास्त्र) पदवी संपादन. शेती, पर्यावरण विषयांची विशेष आवड.