@स्नेहा शिनखेडे 9823866182
नामस्मरण भक्तीमध्ये आत्मसाक्षात्कार शक्य आहे हेच संत गोरा कुंभार यांचे चरित्र आणि अभंगांतून लक्षात येते. नामस्मरणात तल्लीन झालेल्या गोरोबाकाकांना देहभान उरले नाही. पांडुरंग आणि गोरोबा एकरूप झाले. म्हणूनच तर संत गोरा कुंभारांचे स्थान विठोबाच्या मांडीवर आहे. देह प्रपंचाचा दास असला तरी देहबुद्धी नाहीशी करून आत्मबुद्धीकडे जाणारे संत गोरा कुंभार म्हणजे सर्वसामान्य मनुष्यासाठी असामान्य साधक होण्याकरिता उजळत जाणारी प्रकाशमय पाऊलवाट आहे.
स्त्रियांना माहेरची ओढ जन्मजात असते. सद्यकाळातदेखील गावामधल्या मुली जगभरात कुठेही गेल्या तरी त्यांना माहेरच्या गंधओल्या सुगंधी आठवणींची सोबत असते. केवळ स्मरणांनी त्यांचे डोळे भिजतात. मग जुन्या काळातल्या सासुरवाशिणींबद्दल काय बोलावे? त्यातल्या त्यात त्यांचे माहेर ही जर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असेल, तर त्यांचे मन अभिमान आणि प्रेमाने भरून येते. संत गोरा कुंभार हे तेर-ढोकीचे राहणारे होते. आजूबाजूला बारा छोट्या वाड्या आणि मध्ये तेरावे म्हणून तेर. तेथे वाहणारी तेरणा नदी. जात्यावर दळण दळणार्या मायबहिणींनी गहिवरून आपल्या माहेरच्या भूमीत नांदत गावाचे नाव अजरामर करणार्या गोरोबाकाकांवर ओव्या रचल्या आहेत. एक मालन म्हणते- विठ्ठल म्हणीतो भर रुक्मिणी केर। आले वाळवंटी भक्त माझे तेरकर॥ गोरोबाकाका जेव्हा चंद्रभागेच्या कडेकडेने पंढरीपर्यंत आले तेव्हा मोराने केका देऊन त्यांचे स्वागत केले. चंद्रभागेच्या कडेने बाका वाजतो मोराचा। विठ्ठलाचा भक्त आला गोरोबा तेरचा॥ गोरोबांचे तेर हे गाव पंढरपूरपासून 60-70 किलोमीटरवर आहे. पंढरीला जाताना येवली हे गाव लागते म्हणून ओवी अशी आहे- पंढरीला जाता आडवी लागली येवली। काका माझ्या गोरोबाची दिंडी मळ्यात जेवली ॥
तेरणा नदीचे आणि गोरोबाकाकांचे नाते ओव्या गाणार्या मालनच्या दृष्टीने जगावेगळे, अनोखे आहे. काय झाले? तर- दोन प्रहरी रात्र झाली, तेरणा झोपी गेली। काका माझ्या गोरोबांनी, शेला टाकुनी जागी केली॥ तेरणा नदी काळोखात गुडूप झोपली तेव्हा माझे गोरोबाकाका साक्षात सूर्यरूप घेऊन आकाशात अवतरले आणि रामप्रहरी तांबूस, भगवा-लाल शेल्याचा लालिमा तिच्या अंगावर टाकून त्यांनी तिला जागे केले. मालनची प्रतिभा येथे बहरून येते. तेरणा जिथे वाकड्या वळणाने वळते तिथे- तेरणाबाईचं हिचं वाकडं वळण। काका माझ्या गोरोबाचं डगरी दुकान॥ डगरी म्हणजे उंचावर वास्तव्य आहे या अर्थाने. एक सासुरवाशीण तेर या आपल्या माहेरच्या गावाच्या भरभराटीचे गुपित सांगते. ती म्हणते, शिवच्या शेतामधी हाय पाचुंद्याचा हरि। गोरोबाकाका माझा तुम्हाला दैवाचा शेजारी॥ जिथे गावाची सीमा असते तेथील शेतामध्ये पाचुंद्याचा हरि आहे म्हणजे शेतामध्ये उगवून आलेले संपत्तीरूप जे धान्य आहे त्यांच्या पाच पेंड्या करून उभ्या केल्या आहेत. ही समृद्धी म्हणजे जणू विठ्ठलच आहे. भूमीने भरभरून हे दान कुणामुळे दिले?- तर तिथे भाग्याने गोरोबाकाका विठ्ठलनाम घेत नांदत आहेत.
ऐतिहासिक वारसा लाभलेले तेर हे गोरोबाकाकांचे समाधिस्थळ. हे जागृत आहे. तेर या गावाची थोरवी सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात, सत्यपुरी ऐसे म्हणती तेरेसी। हरिभक्तराशी कुंभार गोरा। नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल। भक्तिभाव सबळ हृदयामाजी॥ संत जनाबाई यांचा ’विठू माझा लेकुरवाळा’ हा अभंग म्हणजे संतांची जणू मोक्षवाटेवरची यात्रा आहे. विठुराया आपल्या अंगाखांद्यावर संतमंडळींना घेऊन प्रेमाने मिरवतो आहे. त्यात संत गोरा कुंभारांचे स्थान विठोबाच्या मांडीवर आहे. ’गोरा कुंभार मांडीवरी’ असे संत जनाबाई म्हणतात. परमात्म्याच्या मांडीवर बसलेले गोरोबाकाका काय बरे सुचवतात? मांडी या अवयवाचे विशेष गुण कोणते? स्वामी माधवानंद म्हणतात, स्नेह आणि गुणविकासांचा वारसा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे दिला जाताना ममत्वासाठी मांडी हे माध्यम आहे. पुढील पिढ्यांप्रति स्नेह, ममता आणि संस्कृती यांचे संक्रमण म्हणजे मांडी. संत, थोर मंडळी, विभूती यांच्या मांडीवर लहान मुलाला बसवणे हा आयुष्यातला मोठा भाग. भगवंताच्या मांडीवर शक्तिस्थान आहे. श्री रामरक्षेत म्हटले आहे- सीता शक्ती: प्रभू रामचंद्रांची शक्ती ही सीतामाता आहे. सीता आदिशक्ती आहे. ही शक्ती श्रीरामांच्या डाव्या अंकावर अर्थात मांडीवर आरूढ झाली आहे. ’वामाङ्कारूढ सीता’. श्रीदत्तप्रभूंची शक्ती अनघारूपामध्ये मांडीवर स्थित आहे. श्री गोरोबाकाका हे समाजाचे शक्तिस्थान आहे म्हणून विठोबाने त्यांना मांडीवर बसवले आहे. एकाग्रता, संयम आणि निष्ठा यांचे प्रतीक म्हणजे संत गोरोबाकाका. गोरोबाकाकांनी विठुरायाच्या मांडीवर बसून स्नेह, ममता व संस्कृतीचा दिलेला वारसा म्हणजे अखंड नामस्मरण आणि त्यातूनच होणारा देहबुद्धीचा विनाश होय. कलियुगामध्ये आचारशुद्धी संभवत नाही, त्यामुळे योगमार्ग साधणे फार कठीण आहे. साधेसोपे परमेश्वराचे नाम कधीही, कुठेही सोवळेओवळे न बाळगता अखंड घेतल्याने परमेश्वर प्रसन्न होतो आणि भक्ताभोवती व्यापून उरतो. याची प्रचीती गोरोबाकाकांचे चरित्र वाचताना येते.
संत नामदेव महाराजांनी संत गोरा कुंभार यांचे चरित्र लिहिले आहे. रसाळ, गोड शब्दांचा रस त्यातून स्रवतो आहे. ओज आणि भक्ती यांचे अनोखे दर्शन त्यातून होते. प्रेम अंगी सदा वाचे भगवंत। प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा। असे गृहस्थाश्रमी करीत व्यवहार। न पडे विसर विठोबाचा॥ असे संत नामदेव महाराज म्हणतात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर असे म्हणतात की, संतांचा अधिकार खूप मोठा असूनसुद्धा त्यांनी आपला व्यवहार सोडला नाही. चरितार्थाचा दैनंदिन व्यवसाय करीत असतानाच ते लोकांना अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन करीत होते. मुमुक्षुजनांना काही सांगत होते. सांसारिक, पारमार्थिक उपदेश करीत होते. त्याबरोबरच आपण सामान्य माणसांमधील एक अशीस्वतःची भूमिका घेत व्यवसायामध्ये देवाला पाहत होते. ’देवा, तुझा मी कुंभार’ म्हणणारे गोरोबाकाका मातीमध्ये विठ्ठलाला स्मरत होते. विठ्ठलनामात देहबुद्धीचा विसर पडल्यामुळे त्यांनी अजाणतास्वतःच्या बाळाला माती-चिखलात तुडवले. रक्तामांसाचा चिखल बघून त्यांच्या पत्नीने जो आक्रोश केला तो एका सामान्य स्त्रीचा आहे. संत नामदेव महाराज त्यांच्या कांतेचे बोल सांगतात. ती म्हणाली, पिटियेले तेव्हा आपुले वदन। जळो हे भजन तुझे आता। डोळे असोनिया जाहलासी आंधळा। कोठोनी कपाळा पडलासी॥ नंतर ती आपल्या पतीला वेड लावणार्या विठोबावर संतापते. त्याला वाटेल ते बोलते. निर्दय, अधर्मी, अन्यायी, चांडाळ असे काहीबाही बोलते. एका आईचे जळते हृदय संत नामदेव व्यक्त करतात. विठोबाला गांजल्यामुळे गोरा कुंभार पत्नीच्या अंगावर धावून जाताच तिला स्पर्श न करण्याची ती त्यांना विठोबाची शपथ घालते. त्या क्षणी काय झाले? राहिला उगाची गोरा तेव्हा। न करी तो काही तयासी भाषण। वर्जियेली तेणे कांता तेची॥ आधीच विरक्त, त्यात विठोबाची आण. गोरोबा पुरते विठोबाच्या नामस्मरणात स्वतःला विसरून गेले. गोरा कुंभारांचा एक अभंग आहे- ब्रह्म मूर्तिमंत जगी अवतरले। उद्धरावया आले दीन जना। ब्रह्मादिक ज्याचे वंदिती पायवणी। नाम घेता वदनी दोष जाती। हो का दुराचारी विषयी आसक्त। संतकृपे त्वरित उद्धरती। अखंडित गोरा त्याची वाट पाहे। निशिदिनी ध्याये संतसंग॥ संत गोरोबांना केशवाचे पिसे लागून त्यांचे देहभान हरपले.
संत गोरोबाकाकांच्या कांतेने आपल्या विठुप्रेमी नवर्याचे लग्न स्वतःच्याच लहान बहिणीशी लावून दिले. अखंड विठोबामय असलेल्या गोरोबांनी ’दोघींना एकसमान वागवा’ या सासर्यांच्या शब्दाचा अर्थ स्वभावानुसार अनुकूल लावून घेतला. यात पुन्हा त्यांची भक्ती आणि विरक्ती दिसते. दोघी बहिणींनी गोरोबा निद्रावस्थेत असताना त्यांना स्पर्श केला. ज्यांच्या रोमारोमांत अंतर्बाह्य विठोबा रुजला आहे तिथे काम कसा राहणार? त्यामुळे झाले भलतेच. दोघींनी त्यांचे हात आपल्या ऊरस्थळी ठेवले म्हणून गोरोबांनीस्वतःच्या हातांनाच शिक्षा दिली आणि स्वतःचे दोन्ही हात तोडून टाकले. संत नामदेवांनी लिहिलेले चरित्र वाचताना त्यांनी वर्णन केलेले स्वभावचित्र मन अंतर्मुख करते. गोरोबांची कांता स्वाभाविकपणे विठोबावर चिडते. ती काय म्हणाली संतापाने? तर, पुरविली पाठी विठोबाने। वंश बुडविला या मेल्या काळ्याने। जळो थोरपण याचे आता। वेडे येले लोक घेती दरुशन। नसावे भाषण यासी काही। परंतु जेव्हा तिला आपला भक्त, निश्चयी नवरा खर्या अर्थाने कळतो तेव्हा ती विठोबाला शरण जाते. हा संतांच्या संगतीचा परिणाम आहे. ती म्हणते, शरण जाऊ तया पांडुरंगा आता। करील तो चिंता आमुचीये। शरणागता हरी नेदीच अंतर। वर्णिताती शास्त्रे मोठी मोठी। संत हे गाताती बाई सदोदित। पाहू तो अनंत कैसा असे॥ - हा त्या दोघींच्या अंतरात झालेला बदल आहे. एका स्त्रीचे हृदय स्त्रीशिवाय कुणाला कळणार? म्हणून गोरोबाच्या दोन्ही कांता रुक्मिणी मातेजवळ गेल्या. तिचे वचन विठोबा ऐकणार नाही असे कसे होईल? रुक्मिणीला त्या म्हणतात, करी माते आम्हा एवढा उपकार। न पडे विसर जन्मोजन्मी॥ रुक्मिणीमातेने विठोबाला सांगून पुनश्च गोरोबाला प्रपंचात आणले.

हात या शब्दाचे अनेक अर्थ, वाक्प्रचार रूढ आहेत. उगीचच एखाद्या गोष्टीत नाक खुपसणे म्हणजे न पेलवणार्या, न सांभाळता येणार्या गोष्टीत हात घालणे, तर भानावर येताच एखाद्याचा हात काढून घेणे. संत गोरोबांनी प्रपंचातून हात काढून घेतले तेव्हा चिंता कुणाला? अर्थात विठोबाला. गोरोबांचे अखंड नामस्मरण आणि विठूचा ध्यास त्यामुळे त्याचा प्रपंच विठूला सांभाळणे ओघाने आले. ‘संत गोरा कुंभार’ चरित्रात एक गोष्ट आहे, की विठोबा, रखुमाई, गरुड, सुदर्शन चक्र आणि शंख हे पाच जण वेश पालटून गोरोबाकाकांच्या गावी आले. विठुराया कुंभार, रखुमाई कुंभारीण, गरुड, गाढव, सुदर्शन चक्र मडके बनवण्याचे चाक झाले आणि शंख चाक फिरवण्याचा मधला दांडा झाला. गोरोबाकाकांच्या दारी जाऊन ते म्हणाले, ओळखले का आम्हाला? आम्ही तुमचे अमुक तमुक नातेवाईक. आमच्या गावी दुष्काळ पडला म्हणून इथे पडेल ते काम करायला, पोट भरायला आलो. गोरोबाकाका म्हणाले, राहा इथेच. नंतर परमात्मा गोरोबाकाकांच्या कुटुंबाचा योगक्षेम चालवू लागला. एक दिवस काही संत मंडळी विठोबाला शोधत गोरोबांच्या घरापर्यंत आली. त्यांना येताना बघून आपले बहुरूपी व्यक्तिमत्त्व सार्यांनी आवरते घेतले आणि ते अदृश्य झाले. विठोबा गेला कुठे? विठोबाला संत नामदेवांनी कीर्तन करीत हाक मारली. सगळे जण भजन करीत होते. देहभान विसरलेल्या गोरोबांनी आपल्या थोट्या हातांनी टाळी वाजवण्याचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य!!! गोरोबांना नवे हात फुटले. गोरोबांच्या कांतेच्या मनावरही विठोबाने फुंकर घातली आणि तिचे बाळ विठोबाच्या पायातून रांगत रांगत आले. या कथेचा असा अर्थ घ्यायचा आहे की, प्रपंचाविषयी गोरोबाकाकांना आसक्ती नव्हती. त्यांची वृत्ती निर्लेप होती. त्यांच्या भक्तिसामर्थ्यामुळे त्यांच्या दोन्ही कांताही उद्धरल्या. त्यांचा प्रपंच सुरू झाला, कारण रुक्मिणीला वंदन करताच ती म्हणाली, रुक्मादेवी म्हणे न करा काही चिंता। शपथ सर्वथा मुक्त होय॥ संत एकनाथ महाराज म्हणतात, ऐसे भक्तचरित्र ऐकता कान। होतसे नाशन महापापा। एका जनार्दनी पुरले मनोरथ। रामनामी गर्जत आनंदेसी॥
नामस्मरण भक्तीमध्ये आत्मसाक्षात्कार शक्य आहे हेच संत गोरा कुंभार यांचे चरित्र आणि अभंग वाचताना लक्षात येते. नामस्मरणात तल्लीन झालेल्या गोरोबाकाकांना देहभान उरले नाही. पांडुरंग आणि गोरोबा एकरूप झाले. ‘आधुनिक वाल्मीकी’ अशी ज्यांची ख्याती ते ग. दि. माडगूळकर यांनी ‘गोरा कुंभार’ चित्रपटात अप्रतिम गीत लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा, नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठयाम... अष्टौप्रहर संत गोरा कुंभार नामस्मरणात दंग असत. संत नामदेव महाराज म्हणतात, कैसे येणे ऋणी केला पंढरीनाथा। आहे सदोदित याचे हृदयी॥ संत एकनाथ महाराज म्हणतात, नाम निरंतर वदतसे वाचे। प्रेम मी तयांचे काय वानू? देह प्रपंचाचा दास असला तरी देहबुद्धी नाहीशी करून आत्मबुद्धीकडे जाणारे संत गोरा कुंभार म्हणजे सर्वसामान्य मनुष्यासाठी असामान्य साधक होण्याकरिता उजळत जाणारी प्रकाशमय पाऊलवाट आहे हे निश्चित!