जयाचा जगी जन्म नामार्थ झाला

विवेक मराठी    18-Jul-2024
Total Views |
@परिमल देशमुख
 

vivek 
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचे व्यक्तिमत्त्व, कार्यकर्तृत्व, उपदेश, त्यांची रामभक्ती याचे अभ्यासपूर्ण विवेचन ‘श्री ब्रह्मचैतन्य महाराज- गोंदवले’ या पुस्तकात वाचायला मिळतात. प्रसंगवश गुरू तुकाराम चैतन्य यांचाही थोडक्यात इतिहास पुस्तकात आला आहे. साध्यासोप्या, पण अर्थपूर्ण भाषाशैलीत महाराजांच्या घराण्याचा पूर्वेतिहास, रामभक्ती व विठ्ठलभक्ती, पूर्वापार भजन-पूजनाचे संस्कार यातून त्यांनी हरिहर ऐक्य कसे साधल, याचे दर्शन या पुस्तकानिमित्त होते.
नाव : श्री ब्रह्मचैतन्य महाराज-गोंदवले
लेखिका : प्रा. शरयू जाखडी
प्रकाशक : विजया प्रकाशन (9821307501)
पृष्ठे : 188
मूल्य : रु. 200
प्रा. शरयू जाखडी यांनी गोंदवलेकर महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकाच्या निमित्ताने...
संसारतापाने त्रस्त लोकांना सद्भावना, सदोपचार, रामनाम, नामस्मरण याद्वारे समाधान मिळवून देणारे गोंदवलेकर महाराज महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहेत. त्यांचा शिष्य व अनुयायांचा मोठा वर्ग आहे. समर्थ रामदासस्वामींप्रमाणे महाराजांना लहान वयात आपल्या जीवितकार्याची जाणीव झाल्याने त्यांनी 12व्या वर्षी इ.स. 1858 साली गुरुशोधार्थ आपले घर सोडले. भारतभर भ्रमण करून महाराजांनी अनेक साधू, संतमहात्म्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्याकडून अनेक विद्या आत्मसात केल्या; पण अखेरीस मराठवाड्यातील तुकाराम चैतन्यांचे शिष्यत्व त्यांच्या येहळेगावी जाऊन स्वीकारले. त्यांच्या कठोर परीक्षांना उतरून ब्राह्मसाक्षात्कार करून घेतला.
 
 
प्रा. शरयू जाखडी यांनी लिहिलेले ‘श्री ब्रह्मचैतन्य महाराज- गोंदवले’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. महाराजांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचे व्यक्तिमत्त्व, कार्यकर्तृत्व, उपदेश, त्यांची रामभक्ती याचे अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात आहे. प्रसंगवश गुरू तुकाराम चैतन्य यांचाही थोडक्यात इतिहास पुस्तकात आला आहे. साध्यासोप्या, पण अर्थपूर्ण भाषाशैलीत महाराजांच्या घराण्याचा पूर्वेतिहास, रामभक्ती व विठ्ठलभक्ती, पूर्वापार भजन-पूजनाचे संस्कार यातून हरिहर ऐक्य साधले, हे लेखिकेने दाखवून दिले आहे. या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे लेखिकेने वर्णन केलेले महाराज व त्यांची पत्नी सरस्वती यांचे शिव-पार्वतीसदृश असलेले नाते, तसेच महाराजांचे आईवरील निरतिशय प्रेम, ही दोन्ही नाती लेखिकेने ओघवत्या भाषेत हळुवारपणे उलगडली आहेत. आपली पत्नी सरस्वती हिला ऐहिक मोहमायेच्या पाशातून सोडवून तिला आत्मोद्धारासाठी संन्यस्त वृत्ती धारण करायला लावणारे महाराज विरळाच!
 
गुरुकृपेने महाराजांच्या ठिकाणी संन्यास, योग, भक्ती, प्रेम यांचा अपूर्व समन्वय साधलेला दिसून येतो. महाराजांची रामभक्ती सर्वश्रुत आहे. राम, लक्ष्मण, सीता यांच्या अप्रतिम देखण्या मूर्ती आपणहून महाराजांकडे कशा आल्या हा सारा कथाभाग लेखिकेने ओघवत्या भाषेत मांडला आहे. पुढे याच रामाच्या मूर्तीच्या डोळ्यांतून, महाराजांचा विरह या कल्पनेने, तीन वेळा अश्रुपात झालेला आहे. या अद्भुत प्रसंगामागची कारणपरंपरा सांगताना भौतिकशास्त्राचे नियम अतींद्रिय ज्ञानाच्या वेळी चालत नाहीत, असा निष्कर्ष लेखिकेने काढला आहे. लेखिका संतवाङ्मयाच्या अभ्यासक आहेत.
 
महाराजांनी आयुष्यभर रामनामाचा प्रसार करून रामनामाचे व नामस्मरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवले. ‘जेथे नाम तेथे माझे प्राण। ही सांभाळावी खूण।’ असे सांगून भक्तांना आश्वासित केले. पुस्तकाच्या अखेरच्या भागातील महाराजांचा निरोप वाचताना मन भारावून जाते.
 
पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील महाराजांचे चित्र मनमोहक आहे. पुस्तकाची छपाई व बांधणी दर्जेदार आहे. महाराजांच्या भक्तांनी तसेच सर्वांनी वाचावे, असे हे पुस्तक आहे.