विशाळगडावरील अतिक्रमण आणि त्यातून सुरू झालेले आंदोलन ही आजची घटना नाही. राज्यकर्ते, प्रशासन आणि समाज या सर्वांचे हे अपयश आहे. धोरण आणि अंमलबजावणी यामधली विसंगती विशाळगडाच्या आंदोलनामुळे ठळक झाली आहे.
महाराष्ट्रात सुमारे चारशे किल्ले आहेत. यातील बहुतांशी किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले आहेत, तर काही मोजके किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासूनचे आहेत. अशाचपैकी एक किल्ला म्हणजे विशाळगड. अकराव्या शतकामध्ये राजा भोज दुसरा याने हा किल्ला बांधला, असा दाखला मिळतो. त्याने या किल्ल्याला खेळणा असे नाव दिले. याचे कारण हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगररांगांना एका चिंचोळ्या वाटेने जोडला गेला आहे. त्यामुळे हा किल्ला अंतराळी असल्यासारखा भासतो. एखादे खेळणे ठेवावे तसा दिसतो. त्यामुळे विशाळगडाला पहिल्यांदा खेळणा नाव मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची व्याप्ती पाहून त्याला विशालगड असे नाव दिले. पुढच्या काळात विशाळगड हे नाव दृढ झाले. हा किल्ला वनदुर्ग या प्रकारात मोडतो. किल्ल्यावर आणि भोवती अत्यंत गर्द असे जंगल आहे. गजापूर या गावातून सुमारे अडीच-तीन किलोमीटरची चाल करून गडाच्या पायथ्याला पोहोचता येते. आता गडावर जाण्यासाठी जिना आणि पायर्या उपलब्ध आहेत. पूर्वी अडीच-तीन किलोमीटरची चाल केल्यानंतर एका टेकडीवर पोहोचता यायचे. तेथून पुन्हा काही अंतर खाली दरीत उतरून मग पायवाटेने किल्ल्यावर जायला लागायचे. दोन्ही बाजूला दरी अशी त्या पायवाटेची रचना होती. अत्यंत दुर्गम असणारा हा किल्ला भूसामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या किल्ल्यावरून कोकणातून घाटमाथ्यावर येणार्या आंबा घाटावर नियंत्रण ठेवता येत होते. तसेच किल्ल्यावरून राजापूर वखारीपर्यंत जाणारी वाटही टाकळी होती. कोकण आणि घाटमाथा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला उपयुक्त होता. सुरुवातीला हा किल्ला भोज सत्तेकडे होता. चौदाव्या शतकात हा किल्ला बहामई सत्तेकडे गेला. स्वराज्य स्थापनेनंतर किल्ल्याचा समावेश हिंदवी स्वराज्यात झाला. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज या सर्वांचा दीर्घकाळ सहवास विशाळगडाला लाभला आहे. महाराणी ताराराणी यांनीदेखील विशाळगडावर स्वराज्याचा संघर्ष सुरू ठेवला. सिद्धी जोहर याच्या वेढ्यातून कौशल्याने सुटका करून घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावर आले. याच वेळी पावनखिंडीचा रणसंग्राम झाला ज्यामध्ये वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजीप्रभू देशपांडे यांना हौतात्म्य आले. इतका मोठा ऐतिहासिक वारसा विशाळगडाला लाभला आहे. गडावरती सध्या काही बुरूज, दरवाजे, मंदिरे आहेत. याशिवाय मलिकरीहान यांचा दर्गा आहे. हा दर्गा नेमका कधी बांधला याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. मात्र पूर्वीपासून दर्गा असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवले आहे. काही अभ्यासकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हा दर्गा होता असे आहे.
कोल्हापूर शहरापासून सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर विशाळगड आहे. घनदाट जंगल आणि जाण्याचा अवघड मार्ग यामुळे या परिसरालाच दुर्गमता लाभली आहे. स्वातंत्र्यानंतर किल्ल्यावर हौशी पर्यटक, दुर्गाभ्यासक यांचे येणे-जाणे होते. याव्यतिरिक्त या गडाकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही.
गडावर असणार्या दर्ग्यामध्ये आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कोंबडी कापण्याची प्रथा होती. अगदी पाच वर्षांपाठीमागे ही प्रथा सुरू होती. यामुळे गडावरील परिसर अत्यंत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त बनला होता. आता किल्ल्यावर पशुहत्याबंदी करण्यात आली आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा तसा जुनाच आहे. 1982 च्या सुमारास कोल्हापुरातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा पन्हाळा ते विशाळगड अशी पदभ्रमंती केली. त्यानंतर अतिक्रमणांचा मुद्दा पुढे आला. 1985 पासून विश्व हिंदू परिषदेने गडावरती महाशिवरात्रीचा उत्सव सुरू केला. दर महाशिवरात्रीला गडावर जाऊन तेथील भगवंतेश्वराच्या मंदिरात पूजा केली जायची. माधवराव साळुंखे, पी.एस. कुलकर्णी, राजाभाऊ भालेकर, मामा प्रभावळकर यांचा यामध्ये पुढाकार होता. त्या वेळचे विशाळगडावरील चित्र अत्यंत विदारक होते. मंदिरांची पडझड झाली होती. काही मंदिरांत मूर्तीच नव्हत्या. मंदिराकडे जाणार्या वाटेवर कोंबड्यांची पिसे, सांडपाणी, कचरा पडलेला असायचा. ही सर्व घाण स्वच्छ करून विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महाशिवरात्र साजरी करायचे. विशाळगडाशी अधिकाधिक लोक जोडले जावेत यासाठी विश्व हिंदू परिषद किल्ल्यावर तरुणांच्या धावण्याच्या स्पर्धाही घेत होती. पुढे काही वर्षांनी सुधीर जोशी, संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे, कर सल्लागार शिंदे यांच्या प्रयत्नातून भगवंतेश्वराच्या मंदिराचाजीर्णोद्धार झाला. एकूणच विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या तीन दशकांपासून नेहमीच ऐरणीवर आहे. या पाच-सहा वर्षांमध्ये मलकापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते महेश विभुते यांनी या प्रश्नावर प्रशासकीय मार्गाने लढाई सुरू केली. विशाळगडावरील अतिक्रमणे आणि त्याच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे त्यांनी संकलित केली आणि प्रशासकीय पाठपुरावा केला. विश्व हिंदू परिषदेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी माहितीच्या अधिकारात या प्रश्नाची अनेक कागदपत्रे मिळवली. राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून अतिक्रमण पाडण्यासाठीचा निधीदेखील प्रशासनाला मिळवून दिला. त्यानंतरही प्रशासनाने फारशा काही हालचाली केल्या नाहीत. 7 डिसेंबर 2022 मध्ये संभाजीराजे यांनी अतिक्रमणाबाबत प्रशासनासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाने तीन महिन्यांत अतिक्रमणे काढली जातील, असे आश्वासन दिले. मात्र गडाच्या पायथ्याशी असणारी एक झोपडी काढण्याव्यतिरिक्त फारसे काही झाले नाही. दरम्यान काही अतिक्रमणधारक न्यायालयात गेले आणि न्यायालयाने अतिक्रमण काढण्यासाठीच्या मोहिमेला स्थगिती दिली. ही स्थगिती केवळ सहा अतिक्रमणांना होती. मात्र प्रशासनाने सर्वच अतिक्रमणे काढण्याची मोहीम थांबवली.
गडावरील अतिक्रमणे हा मोठा रंजक विषय आहे. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार विशाळगडावर 588 लोकसंख्या आहे. त्यामध्ये 84 लहान मुलांचा समावेश आहे. म्हणजे सज्ञान लोकांची संख्या 504 आहे आणि रहिवासी घरांची संख्या 255 आहे. म्हणजे विशाळगडावरील प्रत्येक घरात केवळ दोनच माणसे राहतात का? ही विसंगती प्रशासनाच्या लक्षात का येत नाही? घर म्हणून बांधायचे आणि लॉजिंग सुरू करायचे, हा गोरखधंदा विशाळगडावर सर्रास सुरू आहे. विशाळगडावर अतिक्रमणधारकांची संख्या 136 आहे. त्यातील केवळ 65 जणांची नोंद येथील मतदार यादीत आहे. मग उरलेले अतिक्रमणधारक कुठले आहेत? त्यांनी विशाळगडावर अतिक्रमण कसे केले? या बाबीदेखील प्रशासनाने तपासल्या पाहिजेत. सध्या प्रशासनाच्या लेखी 158 अतिक्रमणे असून त्यातील सहा अतिक्रमणधारक न्यायालयात गेले आहेत. विशाळगडावर मद्यपान, जुगार असे प्रकार खुलेआमपणे सुरू आहेत. ही अतिक्रमणे काढा म्हणून तीन दशकांपासून लढा सुरू आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी सातत्याने हा प्रश्न लावून धरला आहे. 7 जुलै रोजी तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडाच्या पायथ्याशी महाआरती करण्यात आली. यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. त्याच दिवशी संभाजीराजे यांनी 13 जुलै रोजी ’चलो विशाळगड’ अशी हाक दिली. नंतर शिवभक्तांच्या विनंतीवरून ही तारीख 14 जुलै करण्यात आली. त्याप्रमाणे 14 जुलै रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हिंदुत्ववादी कार्यकर्ते विशाळगडाच्या पायथ्याशी एकत्र आले. प्रशासनाने त्यांना त्याच ठिकाणी अडवले. तुमच्यापैकी केवळ दहा जणांना गडावर पाठवले जाईल, असे सांगितले. त्यानुसार दहा कार्यकर्ते गडावर गेले. त्यांनी तेथे ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. त्या वेळी गडावरील स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. स्थानिकांनी दगडफेक तर केलीच; पण त्यांच्या हातामध्ये तलवारी होत्या. स्थानिकांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. कार्यकर्त्यांनाही मारहाण झाल्याचे प्रशासनाने संभाजीराजे छत्रपती यांना सांगितले. जखमी झालेले कार्यकर्ते त्याच अवस्थेत खाली आले. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राग मनात धरून कार्यकर्ते अडीच किलोमीटर लांब असणार्या गजापूर गावातील मुसलमानवाडी येथे आले. त्यांनी येथील घरांची आणि वाहनांची मोडतोड केली. सकाळी 8 ते दुपारी 11 पर्यंत हे सर्व चालू होते. त्यानंतर दुपारी 12 वाजता संभाजी राजे छत्रपती आणि त्यांचे कार्यकर्ते गजापुरात पोचले. त्यांना पोलिसांनी वाटेतच अडवले. त्यानंतर संभाजीराजे आणि कार्यकर्ते गजापुरातून चालत विशाळगडावर गेले. दरम्यान त्यांच्यासोबत असणार्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा मुसलमानवाडी येथील घरांची मोडतोड केली. गडाच्या पायथ्याला संभाजी राजे यांनी ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी उद्यापासून अतिक्रमण काढतो, असे आश्वासन दिल्यानंतर संभाजीराजे यांचे आंदोलन थांबले. दुसर्या दिवशीपासून अतिक्रमण काढायला सुरुवात झाली. 100 पेक्षा जास्त अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. मात्र पुन्हा न्यायालयाने सप्टेंबरपर्यंत अतिक्रमणे काढू नयेत, असा आदेश दिला आणि अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबली.
प्रशासनाच्या माहितीनुसार गजापुरातील मुसलमानवाडीमध्ये झालेल्या मोडतोडीत 40 ते 45 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 30 ते 35 वाहनांची मोडतोड झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार केवळ घरांच्या नुकसानीची रक्कम 2 कोटी 86 लाखांच्या घरात आहे.
इतक्या मोठ्या संख्येने जमाव घरांवर हल्ला करत असताना घरातील लोक कोठे होते? याबाबत माहिती घेतली असता, प्रशासनाने त्यांना आधीच अन्य ठिकाणी हलवले असल्याचे समजते. याबाबतची माहिती संभाजीराजे छत्रपती यांना प्रशासनाने दिली असल्याचे त्यांनी वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवले होते; पण गजापुरात अशी घटना घडेल याची कल्पना प्रशासनाला आली नाही. या प्रशासनाच्या दाव्यात विसंगती दिसते. तसेच कार्यकर्त्यांनी आम्हाला मारण्याची धमकी दिली, आमच्या अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला, ही विधानेदेखील संशयास्पद वाटतात. एकूणच विशाळगडावरील अतिक्रमणे आणि गजापुरात झालेली घरांची मोडतोड याचा सखोल तपास करण्याची गरज वाटते.
गजापुरात झालेली हिंसक मोडतोड ही विशाळगडावरील अतिक्रमणांचे चिंतन करण्याचे निमित्त ठरले आहे. 1985 मध्ये गडावर 48 घरे होती. 2023 मध्ये ती 255 झाली आहेत. या तुलनेत तेथील लोकसंख्या किती वाढली? मुळात गडावर अतिक्रमण का करू दिले? स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी याकडे का दुर्लक्ष केले? विशाळगडावर बेकायदेशीर कृत्ये कशी चालतात? याचाही विचार केला पाहिजे. इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेचा प्रमुख आणि जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी यासीन भटकळ हा विशाळगडावर राहायला होता, असा आरोप होतो. याची सत्यता तपासून वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे. ही बाब खरी असेल तर जंगलाने वेढलेला, शहरापासून लांब आणि दुर्गम असणारा, कोकणात जाण्यासाठी सुरक्षित वाट असलेला विशाळगड कोणत्या कारणासाठी उपयोगात येऊ शकतो, याचा विचारही पोलीस प्रशासनाने केला पाहिजे.
दुर्ग संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत दुर्ग संवर्धन समिती स्थापन केली. मात्र गेल्या पाच वर्षांत या समितीच्या केवळ दोन बैठका झाल्या. दुर्ग संवर्धन हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. विशाळगडावर दरवर्षी धुवाधार पाऊस पडतो आणि धुक्याच्या दुलाईत गड हरवून जातो. यंदा मात्र विशाळगडावर संशयाचे धुके अधिक दाटले आहे.