अखंड सावधान असावे...

विवेक मराठी    03-Jul-2024
Total Views |
@वैद्य ज्योत्स्ना पेठकर -9764995517
 
Gender Dysphoria असो, मुलांची सोशल मीडियाची व्यसनाधीनता असो अथवा नैराश्य असो, वाढते आत्महत्येचे प्रमाण असो, हे सगळं वाढण्यासाठी एक ‘अनुकूल’ परिस्थिती आपल्या नकळत निर्माण होतेय. त्यासाठी आपण पालक म्हणून, शिक्षक म्हणून आणि समाजातील जबाबदार घटक म्हणून भानावर येणे आणि सावध राहणे गरजेचे आहे. स्वत:च्या लैंगिकतेबद्दलचे प्रश्न पडणे खरेच नैसर्गिक आहे की ‘शंका विष’ हे वारंवार पडताळून बघायला हवे, त्यासाठी निर्माण झालेली अनुकूलता नष्ट करण्यासाठी ‘अखंड सावधान असावे’!
vivek
 
सा. विवेकच्या मागील अंकात प्रकाशित झालेला गौरी साळवेकर यांचा ‘ओळख - एक प्रश्नचिन्ह’ हा लेख फार अस्वस्थ करून गेला. आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊ घातलेल्या Gender Dysphoria नामक वादळाची गंभीरता फक्त पालक म्हणूनच नाही, तर एक वैद्य आणि एक शिक्षक म्हणून मी चांगलीच जाणून आहे.
 
 
वंशसातत्यासाठी स्त्री आणि पुरुषातील आकर्षण निसर्गनिर्मित आहे. या कामात महत्त्वाचे योगदान देणार्‍या हॉर्मोन्सची निसर्गत: क्वचित काही तरी गडबड होऊन स्त्री-पुरुषव्यतिरिक्त वेगळ्याच लैंगिकतेची व्यक्ती जन्मास येऊ शकते. फार प्राचीन काळापासून याची उदाहरणे आपल्याकडे सांगितलेली आहेत, स्वीकारलेली आहेत.
 
 
निसर्गत: स्वत:च्या लैंगिकतेबद्दल प्रश्नचिन्ह असलेली प्रजा असू शकतेच; पण त्याचे अनैसर्गिक वाटावे असे वाढते प्रमाण आणि विविधता शंका घेण्यासारखी आहे. गेल्या काही काळात एलजीबीटीक्यूआयए+ या कम्युनिटीचे मीडियाद्वारे या ना त्या पद्धतीने वाढते प्रमोशन लक्षात घेता हे प्रकरण निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित, हे नीट पारखून घ्यायची गरज भासू लागली आहे.
 
 
‘वयात येताना’ हा आकाशवाणीवरचा कार्यक्रम करत असताना, विविध जिल्ह्यांतील अनेक मुलामुलींशी बोलायला, त्यांच्यासोबत प्रत्यक्ष काम करायला मिळाले. स्वत:च्या शरीरात होणार्‍या बदलांबद्दल कमालीचा गोंधळ आणि कुतूहल एकत्रित बघायला मिळाले होते. आश्वस्त करून, शास्त्रीयदृष्ट्या सगळं वारंवार समजावून सांगितल्यावर त्यांचे निवळलेले चेहरे मला आजही स्पष्ट आठवतात. मात्र यापैकी एकालाही स्वत:च्या लिंग ओळखीबद्दल प्रश्न नव्हते.
 
 
हे चित्र अंदाजे 10 वर्षांपूर्वीचे होते. आता सध्या काम करताना मात्र एलजीबीटीक्यूआयए+ बद्दल, ही मंडळी सेक्स कशी करतात, त्यांचे जननेंद्रिय (genital) कसे असते? असे अनेक प्रश्न विचारले जातात.
 
 
हे कुतूहल असणे खूप स्वाभाविक आहे. सेन्सॉरचा अंकुश नसलेल्या वेब सीरिज, त्यात समलिंगी संबंध दाखवण्याची त्यांच्या कथेची निकड (?), ट्रान्सजेंडर अथवा लिंग परिवर्तन केलेल्या पात्रांचा गौरव करून दाखवणे, मुलांना वेब सीरिज पाहण्याची सहज उपलब्धी, स्टँडअप कॉमेडी शोला लाभलेली प्रसिद्धी, त्यातूनदेखील वारंवार हे विषय बिंबवले जाणे कुतूहल चाळवायला पुरेसे आहे. पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर शोधताना नेटवर मिळते ती फक्त ‘माहिती’ आहे, ज्ञान नाही याचे भान राहत नाही. चिल मारायला हेच विषय मग सवंगपणे आपापसात बोलले जातात. या सगळ्यातून या प्रकाराकडे बघण्याची एक ‘मानसिकता’ तयार होत जाते जी मला एक डॉक्टर म्हणून महत्त्वाची वाटते.
 
 
स्वत:च्या लैंगिकतेविषयी भान येण्याच्या वयात मुलांच्या वागण्यात बदल होत जातो, त्यांना स्वत:ची मते मांडावीशी वाटतात, अभिव्यक्तिस्वातंत्र्य पदोपदी वापरण्याची खुमखुमी येऊ लागते, अन्याय होतोय किंवा नाही याची शहानिशा न करता अन्यायाविरुद्ध लढण्याचे मोठे आकर्षण निर्माण होते, नियमांच्या चौकटीत बसणे अन्यायकारक वाटते, चौकट मोडून काढणे त्यांना क्रांतिकारी वाटते, तेे योग्य असो नसो, त्यांचा आत्मविश्वास दुणावत असते, बेफिकिरीत त्यांना कूल अ‍ॅटिट्यूड जाणवत असतो, आपण काही तरी भारी करतोय, आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत, ही भावना त्यांना सुखावत असते. अशातच जर ‘कुटुंबव्यवस्था’ डळमळीत असली, वैचारिक आणि भावनिक जडणघडण झालेली नसली तर ‘भरकटणे’ अगदी स्वाभाविक असते.
 
‘पौंगडावस्थेतील मुलांचा बुद्धिभेद’ हा पद्धतशीरपणे टार्गेट केला जातोय हे लक्षात घ्यायला हवे.
 
पौगंडावस्थेतील अशीच एक वेगळ्या बाबतीतली केस आठवते आहे - Leonora Messing नावाची जर्मनीतल्या Saxony Anhalt मधली एक केवळ सोळा वर्षांची मुलगी तिकडे दूर देशात सीरियात कुठल्या तरी कम्युनिटीवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपले कुटुंब, आपला देश सोडून एक दिवस अचानक इसिसला (ISIS) जॉइन होते. दोन वर्षे भयंकर अनुभवातून जात, वास्तवाचे चटके खात भानावर येत एके दिवशी आपल्या वडिलांना संपर्क करते आणि पुढे पाच वर्षे लढा देत शेवटी अत्यंत सुरक्षित वातावरणात म्हणजे स्वत:च्या घरी परत येते. तिच्या वडिलांच्या अथक प्रयत्नाने आज ती पुन्हा आपल्या कुटुंबात परत येऊ शकली. एका गाफील क्षणी कुठल्या तरी ‘कैफात’ हा निर्णय घेतला गेल्याचे ती आवर्जून सांगते.
 
 
या सत्य घटनेतून ‘पौंगडावस्थेतील मुलांचा बुद्धिभेद’ हा पद्धतशीरपणे टार्गेट केला जातोय हे लक्षात घ्यायला हवे. असाच काहीसा बुद्धिभेद 'identity crisis' अथवा ’सशपवशी 'gender crisis' च्या बाबतीत केला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्यथा इतक्या केसेस अचानक वाढीस कशा लागत आहेत? असे काय जनुकीय बदल गेल्या 20 ते 25 वर्षांत होऊ लागलेत, की अशी कम्युनिटी वाढीस लागावी? यावर काही संशोधन झालेय का? एक डॉक्टर म्हणून मला हे प्रश्न पडतात.
 
 
vivek
 
सध्या ज्या देशात Gender Dysphoria चे प्रमाण जास्त आहे, तिथे ही लक्षणे वाटणार्‍या मुलाला/मुलीला आधी मानसिक/ भावनिक स्तरावर तपासले जाते आहे का? त्यांचे हे वाटणे कुठल्या नैराश्यातून, कुठल्या आकर्षणामधून तर नाही ना, हे तपासले जातेय का? याचे उत्तर शोधताना लिंग सुधारणा करण्यासाठी हॉर्मोन्सचा पर्याय अगदी सहज उपलब्ध करून देण्यासाठी जणू काही फार्मा अस्तन्या सावरूनच बसलेल्या दिसल्या, तर कौन्सेलिंगसुद्धा स्वत:त होणारे बदल स्वीकारहार्य कसे करायचे याबाबतीत भर देणारे दिसले.
 
 
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ट्रान्सजेंडर सेंटर, सेंट लुईस हॉस्पिटल इथे काम केलेल्या जेमी रीड यांनी मांडलेले वास्तव तर थक्क करणारे आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार Gender dysphoria च्या केसेसमध्ये आत्मकेंद्रीपणा, द्विध्रुवीय व्यक्तिमत्त्व, अमली पदार्थाचे व्यसन, नैराश्य, चिंता, लक्ष तूट अतिक्रियाशीलता विकार (ADHD), खाण्यासंबंधीचे विकार, लठ्ठपणा, अशी लक्षणे जास्त प्रमाणात होती. यातूनही पुन्हा ‘मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य’च अधोरेखित होते.
 
 
त्यांच्या लेखातील GD च्या पेशंटच्या अनुभवातील एक कथा चटका लावून गेली. तिच्या बाबतीत जे काही घडलं त्याची पार्श्वभूमी लक्षात घेणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. एका अस्थिर कुटुंबातून आलेली, अगदी कोवळ्या वयात ड्रग्सच्या आहारी गेलेली, कशाचीही शाश्वती/ आधार नसलेली केवळ 16 वर्षांची मुलगी, तिला स्वत:च्या लैंगिकतेच्या बाबतीत प्रश्न पडायला लागले आणि तिच्या मानसिक अवस्थेेचे विश्लेषण करून निदान करण्याच्या भानगडीत न पडता सरळ उपचार उपलब्ध करून देण्यात आले. मुलगा दिसण्याच्या नादात या मुलीने mastectomy करून बाई म्हणून असलेले शरीरसौष्ठव- स्तन काढून टाकले. काही वर्षांनी ती भानावर आली आणि आता तिला तिचे स्तन परत हवे आहेत, कारण ती आता आई होणार आहे. हे सगळं वाचतानादेखील पोटात तुटत होतं. एकदा जरी सगळ्या बाजूने विचार करून निदान केले गेले असते आणि योग्य समुपदेशन झाले असते, तर आज एक आयुष्य वाचवता आले असते.
 
 
स्त्री आणि पुरुष यांच्यात असलेला निसर्गनिर्मित भेद नीट जाणून न घेता, कुठे समानता असावी हे समजून न घेता, ‘आम्ही लिंगभेद मानतच नाही’ किंवा 'Gender WTF' अशा चळवळी बाहेरील देशांत सुरू झालेल्या दिसतात. यातून साध्य काय होणार, याचा जराही ‘सारासार’ विचार करावासा न वाटणे हे शिक्षण क्षेत्राचे अपयश आहे. शिक्षणातून मुलांना ‘काय योग्य - काय अयोग्य’ ओळखता येणे अपेक्षित आहे.
 
 
अगदी कालपरवा घडलेल्या एका गोष्टीने हे वादळ आपल्या उंबरठ्यावर नाही, तर उंबरठा ओलांडून आत आल्याचे जाणवले. आपल्या आठ वर्षे वयाच्या मुलाच्या प्रवेशासाठी एक पालक भेटायला आले होते. त्यांचे मूल आधीच एका मुक्त शिक्षण पद्धतीत होते, तरी त्यांना आता बदल का करावेसे वाटतायत, असे विचारल्यावर आलेले उत्तर धक्कादायक होते. गेल्या काही दिवसांपासून मूल घरी येऊन सांगत होते की, ‘बाबा, मी मुलगा नाही आणि मुलगीपण नाही, मी कुणी तरी वेगळाच आहे.’ हे वाक्य त्याने कुठल्या चर्चेदरम्यान ऐकले, कुठल्या संदर्भात ऐकले, हे काही त्याला सांगता येत नव्हते; पण हे शाळेतल्या चर्चेत ऐकले हे मात्र तो ठामपणे सांगतो.
 
 
ज्याला स्त्री-पुरुष भेद म्हणजे आई-बाबा किंवा आजोबा- आजी हेच माहिती आहे, ज्याला लैंगिकता म्हणजे काय याची पुसटशी कल्पना नाही, त्याला ‘अजाणत्या’ वयात काय ‘फीड’ केले जातेय, त्याची मानसिकता नकळतपणे काय तयार होत जाणार याची कल्पनासुद्धा करवत नाही. Gender Dysphoria चे बीज अशा पद्धतीने रोवले जात आहे आणि म्हणूनच हे सर्व प्रकरण शंका घेण्याजोगे आहे.
 
 
एखादी खरी केस असली तर गोष्ट निराळी; पण ‘मला असे वाटतेय’ म्हणून जर कुणी स्वत:त बदल करून घेतले आणि नंतर भानावर आले, तर ‘परतीचा’ मार्ग उपलब्ध नसणार. अशा वेळी स्वत:ची लैंगिक ओळख शोधायला निघालेले जीव ओळखच हरवून बसतील.
 
 
आयुर्वेदात एका अतिशय सोप्या सूत्राद्वारे कुठलाही रोग होण्याचे कारण सांगितले आहे. त्यानुसार जोवर तुम्ही रोगवाढीसाठी/संसर्ग होण्यासाठी अनुकूल स्थिती उपलब्ध करून देत नाही तोवर तुम्हाला काहीही होत नाही. ही अनुकूलता उपलब्ध न करून देणे तुमच्या हातात आहे आणि सहज साध्यदेखील आहे.
 
 शिक्षक म्हणून आणि समाजातील जबाबदार घटक म्हणून भानावर येणे आणि सावध राहणे गरजेचे आहे.
 
हे सूत्र सगळ्याच स्तरांवरच्या अनारोग्यासाठी लागू पडते. सध्या फोफावत चाललेला Gender crisis असो, मुलांची सोशल मीडियाची व्यसनाधीनता असो अथवा नैराश्य असो, वाढते आत्महत्येचे प्रमाण असो, हे सगळं वाढण्यासाठी एक ‘अनुकूल’ परिस्थिती आपल्या नकळत निर्माण होतेय. त्यासाठी आपण पालक म्हणून, शिक्षक म्हणून आणि समाजातील जबाबदार घटक म्हणून भानावर येणे आणि सावध राहणे गरजेचे आहे.
 
 
या सर्व गोष्टी वाढू द्यायच्या नसतील तर कुटुंब, समाज आणि शाळा या तिन्ही स्तरांवर होणारी जाणिवांची, विचारांची समृद्ध जडणघडण ही आपली खरी प्रतिकारक्षमता आहे. कुटुंबव्यवस्था आपल्या शारीर-मानसस्वास्थ्याचा आणि समाजस्वास्थ्याचा मूलाधार आहे.
 
 
vivek
 
काळानुरूप विभक्त कुटुंब पद्धती आपण स्वीकारली आहे; पण त्या विभक्त कुटुंबातील तिघेचौघेसुद्धा संवादाने, भावनिक बंधातून विभक्त आहेत. हे एकाकीपण आपण छोट्या छोट्या गोष्टींतून सहजपणे घालवू शकतो, कुटुंबाला एकत्र बांधू शकतो, जिथे मुलांना आश्वस्त वाटेल, एक आदरयुक्त भीती राहील, आवश्यक तो धाक राहील. वेळ देणे म्हणजे वीकएंड मॉल शॉपिंग किंवा outing नाही, तर घरातली कामे एकत्रितपणे करणे, एकमेकांसाठी करणे, छोट्या छोट्या कामांची जबाबदारी घेणे - ती पूर्ण करणे अशा अनेक गोष्टींतून आपण कुटुंबातील एक सदस्य आहोत, ही जाणीव घट्ट होत जाते, जी अत्यंत आवश्यक आहे.
 
 
आपले सण एकत्रितपणे साजरे करणे; लग्न, मुंज, बारसे, दहावा, तेरावा अशा समाज एकत्र येणार्‍या प्रसंगी मुलांना सामावून घेणेदेखील गरजेचे आहे. यातून समाजभान नकळत बिंबत जाते.
 
 
या गोष्टी गावाकडच्या मुलांमध्ये नकळत रुजत जातात. नातीगोती, चालीरीती सांभाळत ते समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून वाढत असतात. म्हणून की काय सो कॉल्ड कूल, चिल अशा गोष्टींचे आकर्षण तिथल्या मुलांमध्ये सहसा आढळत नाही.
 
 
अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि परीक्षा घेणे एवढेच ध्येय शाळांतून नसावे. मुलांशी चालू घडामोडींवर (
current affairs 
) साधकबाधक चर्चा घडवून त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान देणे, ही काळाची गरज आहे. भुलवणार्‍या, ट्रॅकपासून दूर नेणार्‍या काय काय गोष्टी आजूबाजूला आहेत हे त्यांना कळायला हवे. विविध मार्गाने त्यांना आपल्या मुळाशी जोडून ठेवणे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे.
 
 
खूप पर्याय उपलब्ध असणे हे खूप मोठे आव्हान झाले आहे. घरीदारी जेवायला अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत; पण तृप्ती कशात आहे ते कळत नाही. मनोरंजनासाठी टीव्हीवर खूप खूप पर्याय उपलब्ध आहेत; पण कशातूनही निखळ आनंद मिळत नाही. जोडीदार भरपूर आहेत, मुक्त संबंधांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत; पण समाधान कुठेही नाही. कुठेही स्थिरता, शांतता लाभत नाही. मग सातत्याने नावीन्याच्या अथवा हॅपनिंग गोष्टी शोधण्याकडे कल झुकतो. हा विषय जितका साधा वाटतोय तितकाच महत्त्वाचा आहे, कारण स्थिर आणि आनंदी चित्त ‘सृजनाकडे’ वळते आणि गोंधळलेले मन अस्थिरता, चंचलता, उथळपणास कारणीभूत होते.
 
 
आपल्याकडे ‘शंका विष’ संकल्पना सांगितली आहे जी या बाबतीतही लागू पडते. स्वत:च्या लैंगिकतेबद्दलचे प्रश्न पडणे खरेच नैसर्गिक आहे की ‘शंका विष’ हे वारंवार पडताळून बघायला हवे, त्यासाठी निर्माण झालेली अनुकूलता नष्ट करण्यासाठी ‘अखंड सावधान असावे’!
 
 
(वैद्यकीय व्यवसाय तसेच शिक्षण क्षेत्र या दोन्ही विषयांत लेखिकेचा दीर्घ अनुभव आहे.)