मंदिर हे समाजाचे सेवा केंद्र, संस्कार केंद्र आणि शक्ती केंद्र व्हावे - अरुणजी नेटके

विवेक मराठी    04-Jul-2024
Total Views |

vivek
 
संभाजीनगर : जगाच्या तुलनेत मंदिरांची संख्या भारतात अधिक आहे. हिंदू समाजाला संघटित करण्याची फार मोठी ताकद मंदिरांमध्ये आहे; पण त्यासाठी मंदिर हे समाजाचे प्रबोधन केंद्र होण्यासाठी मंदिराच्या माध्यमातून मंदिरातच मंदिराच्या भाविकांसाठी दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे मंदिर अर्चक पुरोहित आयामाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख माननीय अरुणजी नेटके यांनी केले.
 
ते संभाजीनगर येथे दिनांक 30 जून रोजी अशोकजी सिंहल सभागृहात देवगिरी प्रांताच्या कार्यकर्ता अभ्यास वर्गात समारोपप्रसंगी बोलत होते.
 
या वेळी व्यासपीठावर क्षेत्रप्रमुख अनिलजी सांबरे, राजीव जहागीरदार उपस्थित होते. नेटके पुढे म्हणाले, हिंदू आहारशास्त्रांचा प्रचार-प्रसार होण्याची फार मोठी आवश्यकता आहे. संपूर्ण जगात हिंदू आहारशास्त्र हे सर्वांत उत्तम आहारशास्त्र आहे. आमच्या तब्येती खराब होण्याचे कारण म्हणजे नेमके काय खावे आणि कधी खावे याची आम्हास माहिती नाही. हे मंदिराच्या माध्यमातून भाविकांना व्याख्यानमालेच्या रूपाने सांगितले, तर मंदिर हे समाजाचे प्रबोधन केंद्र बनू शकेल.
 
vivek 
 
अभ्यास वर्गात सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. मंदिर अर्चक पुरोहित व्यायामाचे देवगिरी प्रांत संपर्कप्रमुख राजीव जहागीरदार यांनी प्रास्ताविक केले. विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांताध्यक्ष संजय आप्पा बारगजे यांनी उद्घाटनपर भाषणात देवगिरी प्रांतातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची माहिती दिली. दुसर्‍या सत्रात मंदिर अर्चक पुरोहित आयोगाचे क्षेत्रप्रमुख अनिल सांबरे यांनी आयामाची भूमिका आणि कार्यपद्धती या संदर्भात सविस्तर विवेचन केले. मंदिर विश्वस्तांच्या नियमित संपर्काची योजना तयार करावी तसेच हिंदू समाजाच्या सर्व जातिपंथांतील अर्चक पुरोहितांच्या संपर्काची योजना तयार करून त्यांच्या माध्यमातून मंदिरात विविध उपक्रम राबवावेत.
 
 
अभ्यास वर्गाचे सूत्रसंचालन आनंदीदास रहाटीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन योगेश पाठक यांनी केले. अभ्यास वर्गाच्या यशस्वितेसाठी रवि कुलकर्णी, ज्ञानेश्वर जाधव, अजय पाटील, हृषीकेश घोटी, संदेश साबळे यांनी मेहनत घेतली.