स्वामी विवेकानंदांचे नेतृत्व

विवेक मराठी    04-Jul-2024
Total Views |
@नचिकेत नित्सुरे
 
स्वत:च्या आयुष्याच्या पलीकडेही काम करायला पुरेल असे ध्येय स्वतःला सापडणे, ते इतरांना दाखवता येणे व असे काम करणार्‍यांची संघटना बांधणे याला ध्येयदर्शन असे म्हणतात. कोणत्याही नेत्यासाठी असे ध्येयदर्शन होणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. विवेकानंदांना झालेल्या अशा ध्येयदर्शनातून आज हजारो संन्यासी भारत व जगभरही सेवाकार्ये करत आहेत, ही विवेकानंदांच्या नेतृत्वगुणांची सर्वात मोठी पावती आहे.
swami vivekananda

महान व्यक्तिमत्त्वांच्या चरित्राचे परिशीलन खूप वेगवेगळ्या अंगांनी झाले पाहिजे. अमुक प्रसंगात अमुक व्यक्ती कशी वागली होती ते पाहून आणि नव्याने एखादा गुण त्यात सापडतो का ते शोधून चरित्रांचा अभ्यास झाल्यास, त्यातून जबाबदार चिकित्सेचे वातावरण वाढीला लागेल, या दृष्टीने विवेकानंदांच्या चरित्रातील ‘नेतृत्व’ या पैलूविषयी अभ्यास मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्ही ईश्वर पाहिला आहे का, हे विवेकानंद विविध तत्त्वज्ञानांचा अभ्यास करून बंडखोरपणे सर्वांना विचारत, याची अनेकांना कल्पना आहे. या गोष्टीतील उत्तरार्धाकडे आपले लक्ष कमी जाते. ईश्वर पाहिलेल्या व्यक्तींबद्दल विवेकानंदांचा अयशस्वी शोध चालू असताना विवेकानंदांच्या व भारताच्या सुदैवाने त्यांना त्यांच्याहून बंडखोर गुरू मिळाला.
 
 
गुरूकडे हे बंडखोर स्वामी विवेकानंद गेले व त्यांनी नेहमीचा प्रश्न विचारला की, तुम्ही देव पाहिला आहे का? रामकृष्णांनी तितक्याच शांतपणे ‘हो’ असे उत्तर दिले. माझ्या मते तरी रामकृष्णांच्या या आत्मविश्वासामुळेच विवेकानंदांना आपला गुरू आपल्याला सापडला असे वाटले असावे. कोणत्याही नेत्यासाठी कधी तरी कोणाचा तरी काही काळासाठी अनुयायी बनणे हा गुण महत्त्वाचा असतो. विवेकानंदांनी पाच वर्षे रामकृष्णांचे शिष्यत्व अनुभवले. रामकृष्णांनी प्रत्येक माणसामध्ये देव आहे व त्याची सेवा करणे (म्हणजे ‘शिवभावे जीवसेवा’) हाच खरा धर्म असे महत्त्वाचे तत्त्वज्ञान मांडले.
 
ध्येयदर्शन
‘शिवभावे जीवसेवा’ या अशा तत्त्वज्ञानाचेच आचरण विवेकानंदांनी जन्मभर केले. या सेवेची तत्त्वे काय असावीत, ही सेवा कशी करावी, या प्रश्नांच्या उत्तरासाठी विचार करत असतानाच विवेकानंदांना आपण संघटना केली पाहिजे असे वाटले. लक्षात घ्या, अमेरिकेत जाण्यापूर्वीच त्यांना हे सुचले होते - एका पत्रात त्यांनी संन्याशांनी करायच्या कामाबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मते धर्माच्या शिक्षणाआधी पोटापुरते मिळवण्याचे आणि पराक्रम करण्याचे शिक्षण संन्याशांनी सर्वत्र दिले पाहिजे. खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, जगात सर्वत्र काय चालले आहे, अशा सर्व गोष्टींचे ज्ञान संन्याशांनी सर्वत्र पोहोचवले पाहिजे. प्रत्येक मनुष्याने आत्मसन्मान मिळवला पाहिजे व इतरांसाठी उपयोगी ठरले पाहिजे. हे घडावे यासाठी विविध प्रकारची कामे करणारी संघटना बांधायची, असे विवेकानंदांनी ठरवले.

स्वत:च्या आयुष्याच्या पलीकडेही काम करायला पुरेल असे ध्येय स्वतःला सापडणे, ते इतरांना दाखवता येणे व असे काम करणार्‍यांची संघटना बांधणे याला ध्येयदर्शन असे म्हणतात. कोणत्याही नेत्यासाठी असे ध्येयदर्शन होणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. विवेकानंदांना झालेल्या अशा ध्येयदर्शनातून आज हजारो संन्यासी भारत व जगभरही सेवाकार्ये करत आहेत, ही विवेकानंदांच्या नेतृत्वगुणांची सर्वात मोठी पावती आहे.

 
प्रगल्भ युवक मानसिकता व
ध्येयदर्शनानंतर संघटनेची बांधणी
 
अर्थातच अशी संघटना बांधण्याचे काम सोपे नव्हते. विशेषतः रामकृष्ण जेव्हा परलोकी गेले, तेव्हा विवेकानंद हे फार फार तर बाविशीचा युवक होते; परंतु त्याही वयात बारा ते पंधरा गुरुबंधूंना नुसते एकत्र जोडून ठेवणे एवढेच न करता त्यांच्या जडणघडणीसाठी विवेकानंदांनी खूपच काम केलेले दिसते. हे खरे त्यांच्या नेतृत्वाचे वेगळेपण आहे. अतिशय तुटपुंज्या साधनसामग्रीत मठाचा पूजा-हवनादी नित्य कार्यक्रम तर चालू असेच; परंतु तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, वाङ्मय, विज्ञान अशा सकल विद्यांचा परामर्श तिथे घेतला जाई. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत या षट्दर्शनांचे व बौद्धदर्शन, मिल्ल, स्पेन्सर, कांट, हेगेल अशा अन्य तत्त्वग्रंथांचेही मंथन केले जाई. विविध दर्शनांची एकमेकांशी तुलना केली जाई. आश्रमातील जीवनाच्या कठीण काळातही गुरुबंधूंनी संकुचित न राहता आपले ज्ञान विस्तारावे, हा उद्देश वरील उपक्रमांमधून दिसून येतो. याबरोबरच आणखी व्यापक विचार गुरुबंधूंकडून व्हावा वस्वतःच्याही जाणिवांचा विस्तार व्हावा याकरिता गुरुबंधूंना विविध ठिकाणी प्रवासाकरिता पाठवले व स्वतः तेदेखील प्रवासास बाहेर पडले. ‘नेत्याने स्वतःच्या अनुयायांसाठी शिक्षणाचा व त्यांच्या घडणीचा खूप विचार करायचा असतो’ हे विवेकानंदांच्या या सर्व वागण्यावरून आपल्याला दिसून येते.
 
 
swami vivekananda
 
कर्तृत्व आणि संघटनेची समाजाभिमुखता
 
विवेकानंदांनी शेकडो किलोमीटर फिरून सुमारे 3-4 वर्षांमध्ये काशी, अयोध्या, दिल्ली, मुंबई, म्हैसूर, त्रिवेंद्रम अशा निदान चाळिसेक महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रवास केला. एवढ्या प्रवासानंतर कोणत्याही नेत्याचे भारताच्या समस्यांबद्दलचे व तेथील लोकांबद्दलचे आकलन उत्तम होणारच होते. या आकलनाचा अनेकांना फायदा करून देणे, भारताविषयीचे चिंतन इतरांनाही सांगणे, व्याख्याने देणे, चर्चा करणे इत्यादी माध्यमांतून अनेक संस्थानिकांशी आणि विद्वान लोकांशी त्यांनी स्नेह जोडला. याचा परिणाम म्हणूनच विवेकानंदांना पुढील काळामध्ये भारतव्यापी कार्य उभारणे शक्य झाले यात शंका नाही. नेत्याने करावयाचा दांडगा जनसंपर्क, हा गुण विवेकानंदांच्या या प्रवासातून दिसून येतो. विवेकानंदांकडून प्रेरणा घेऊ इच्छिणार्‍यांनी विवेकानंदांच्या विविध प्रवासांचे बारकाईने संशोधन करून, कुठे गेले, काय बोलले, कोणाला त्याबद्दल पत्राद्वारे काय सांगितले, असा अभ्यास करायला हवा. अनेक ठिकाणी ते प्रवास करून व्याख्याने देत होते. नेत्याकडे असावे लागते असे व्याख्यानांमध्ये ओघवत्या भाषेमध्ये श्रोत्यांचा ठाव घेणारे, अंगावर रोमांच उभे करणारे आणि हलवून टाकणारे प्रभावशाली वक्तृत्व त्यांच्याकडे होते; पण वक्ता म्हणून जाणे आणि कीर्ती व पैसा कमावणे एवढ्या संकुचित उद्देशाने त्यांनी हे प्रवास केले नाहीत. मनुष्यघडणीसाठी संपर्क आणि सहवासाची खूप गरज असते. पाश्चिमात्य आणि पौर्वात्य शिष्यांना घडविण्यासाठी स्वामीजींनी विलक्षण कष्ट घेतलेले दिसतात.
 
प्रौढ वयातील नेतृत्व, तसेच पुनर्निर्माण
म्हणजेच नवीन नेतृत्वाची निर्मिती
 
 
अशा शिष्यांपैकी मद्रासेत आलासिंह पेरुमल नावाचा युवक स्वामीजींचा शिष्य बनला होता. अमेरिकेला जाताना स्वामीजींना निधी जमवून देण्यासाठी त्याने व त्याच्या मित्रमंडळींनी खूपच कष्ट घेतलेले दिसतात. स्वामीजींनी आग्रहाच्या, टोचण्याच्या, प्रवृत्तपर भाषेमध्ये अनेक पत्रे लिहिली आहेत, आपले भावविश्व संपूर्णपणे खुले करून ठेवले आहे आणि काही वेळा आपल्या व्यथा, आग्रह आणि चिंताही मोकळेपणाने लिहिल्या आहेत. स्वामीजींच्या खूप प्रसिद्ध अशा 225 पत्रांपैकी सर्वाधिक (जवळपास) 25 पत्रे ही आलासिंहाला उद्देशून आहेत. नित्याचा संपर्क ठेवणारी, ‘वन्ही तो चेतवावा रे, चेतविताची चेततो’ अशा प्रकारे उठून काम करण्याची तीव्र प्रेरणा देणारी ही पत्रे आहेत. ‘प्रचारकार्य व शिक्षणाचे काम करा’, असे स्वामीजींनी वारंवार आलासिंह व मित्रपरिवाराला सांगितले आहे. स्वामीजींनंतरचे मठाचे अध्यक्ष ब्रह्मानंद, भगिनी निवेदिता आणि अन्य अनेक शिष्यांना स्वामीजींनी प्रत्येकी 15-20 पत्रे अतिशय हृद्यपूर्वक लिहिलेली आहेत. ही पत्रे इतकी सुंदर आहेत, तर त्यांचा या सर्वांशी नित्याचा संवाद किती मोकळा, महत्त्वाचा आणि प्रेरक असेल?
 
 
खरोखरच आपल्याला दिसलेले ध्येय आपल्यास्वतःशी जोडलेल्या महत्त्वाच्या शिष्यांना स्पष्टपणे दिसावे याकरिता स्वामीजींनी कडू, गोड, तिखट, सर्व प्रकारच्या भावभावनांचा आणि शब्दांचा उपयोग केलेला दिसतो. अनेकदा माझ्या बोचर्‍या शब्दांकडे लक्ष देऊ नका, भाव समजून घ्या, असेही त्यांनी वारंवार सांगितले आहे. एखाद्याला स्वतःचे अंतरंग पूर्णपणे देऊन टाकल्याशिवाय असे बोलता येत नसते. विवेकानंदांनी स्वतःला भगिनी निवेदिता, अखंडानंद, रामकृष्णानंद, सारदानंद, धीरामाता, हेल भगिनी, आलासिंह आणि ब्रह्मानंद अशा अनेक शिष्यांकडे सोपवून टाकलेले दिसते आणि म्हणून पूर्ण समर्पित भावनेने ही व यांच्यासारखी अनेक मंडळी विवेकानंदांचे काम पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली. जसा गुरुबंधूंसाठी स्वामीजींनी प्रचंड वेळ दिला, शिकवलं, संवाद केले, कामं केली, त्यांच्याबरोबर फिरले, तसंच पाश्चिमात्य शिष्यांबरोबरही विवेकानंदांनी पुष्कळ वेळ दिला. आपल्या शिष्यांची, अनुयायांची जडणघडण होण्याकरिता दिनक्रम, त्यांनी काय वाचावं, कशाचा अभ्यास करावा, लोकांना कसं भेटावं, कामं कशी उभी करावीत, यासाठी बारीक सूचना करणं, धीराचे शब्द सांगणं आणि प्रसंगी रागे भरणं असं सर्व प्रकारचं काम स्वामीजींनी केलं. अनेकदा वाद होऊनही या शिष्यांची स्वामीजींवरील निष्ठा वाढतीच राहिली. नेत्याच्या गुणांपैकी अशी कर्मप्रेरणा दुसर्‍यांपर्यंत पोहोचवता येणं, हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे.
 
अंतिम टप्प्यातील संघटना बांधणी
आणि कार्यपद्धतीची पायाभरणी
 
तथापि कोणाचा असा समज होऊ नये की, स्वामीजी त्यांच्या शिष्यांकडे फक्त वैयक्तिक लक्ष देत होते. संन्याशांनी प्रचारकार्य, मोठमोठी सेवाकार्ये उभी करावी, भारत देश हलवून टाकावा यासाठी मोठी संघटना उभारण्याचे काम त्यांनी सुरू केले होतेच. या कामाचा आवाका खूप मोठा आहे. आलमबाजार मठातील आपल्या शिष्यांना उद्देशून लिहिलेल्या एका विस्तृत पत्रात स्वामीजींनी मठाचे स्वरूप कसे असावे, त्यात संन्याशांनी कसे राहावे, लोकशिक्षण कसे चालवावे याबद्दल अतिशय बारकाव्याने सूचना केल्या आहेत. रामकृष्ण मठाचे काम आजही शेकडो ठिकाणी या सूचनांप्रमाणे चालते. मठांमध्ये एकमेकांवर दोषारोप होऊ नयेत, चांगला अभ्यास चालू राहावा, इतरांसाठी प्रवचने चालावीत, सेवाकार्यासाठी काम चालावे, मठाचे पदाधिकारी कसे निवडावेत या ना त्या अशा विविध बाबींमध्ये त्यांनी अतिशय जागरूक राहून लक्ष घातले. मात्र, नियम तयार केले आणि ते इतरांना पाळावयास सोडून देऊन आपण वेगळे राहिले, असा प्रकार विवेकानंदांनी केला नाही. स्वामीजी दौर्‍यावर नसताना जेव्हा मठात असत तेव्हा ते स्वतः या नियमांचे आचरण कठोरपणेच करत व दुसर्‍यांकडूनही करवून घेत. एखादी संघटना जेव्हा एखादा नेता उभारतो, तेव्हा ती दीर्घकाळ चालू राहण्यासाठी भक्कम पायाभरणी करावी लागते.
 
 
एकदा काम सुरू झाल्यानंतर ते एकखांबी राहू नये याचीही विवेकानंदांनी काळजी घेतलेली आहे. प्रसंगी “मी रामकृष्णांचा अथवा अन्य कोणाचाच सेवक नाही; पण जे स्वतःच्या मुक्तीची पर्वा न करता दुसर्‍यांची सेवा करतात त्यांचा मी सेवक आहे.” इतके टोकाचे उद्गार काढून त्यांनी आपले ध्येयदर्शन किती सुस्पष्ट असले पाहिजे, याचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे.
 
 
नवीन युवकांनी संन्यास घेण्यासाठी मठात येणे, त्यांचे अनेक वर्षं प्रशिक्षण होणे, प्रशिक्षित स्वामींनी धर्मप्रचार, सेवा व शिक्षणासारखी कार्ये या नवयुवकांच्या मदतीने अंगावर घेणे याची इतकी उत्तम घडी आजही शेकडो मठांमध्ये बसलेली आहे, की स्वामीजींच्या त्या सूचनांचा व त्यामागील भविष्यवेत्त्या दृष्टीचा आपल्याला अचंबाच वाटतो; परंतु नियम आणि संघटनेचे असे चित्र उभे केले की, या कामातील उत्स्फूर्तता व प्रतिभा हरवली आहे, असे दिसत नाही. कामाचे इतके विविध प्रकार आणि मार्ग मठातील संन्याशांनी स्वीकारले आहेत, की त्यामुळे देशात अनेक ठिकाणी सार्वजनिक जीवन रसरशीत बनलेले दिसते. अनेक स्वामींनी आपल्या प्रतिभेने स्वामीजींच्या मूळच्या योजनेत भरही घातलेली आढळते.

खरोखर 125 वर्षांनंतरही या संघटनेचा सामाजिक व आर्थिक प्रभावही (प्रभाव टाकणे हा मूळ उद्देश नसला तरी) दिसून येतो. रामकृष्ण संघाची ग्रामविकसन, समाजबांधणी, रुग्णसेवा, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल व अब्जावधी रुपयांचा कार्यप्रभाव आहे. फक्त तथाकथित सेवाकार्यातच ही प्रतिभा व्यक्त होत आहे असे नाही. मठातील एखाद्या संन्याशाला भटनागर पारितोषिकासारखा संशोधनातील सर्वोच्च सन्मानही मिळालेला दिसतो. उच्च बुद्धिमत्तेची, अनन्यनिष्ठेची, अतिशय सत्त्वशील कार्यक्षम माणसे समाजात असणे हे समाजासाठी भूषण आहे. प्रतिभा आणि संघटनशक्तीच्या अपूर्व योगाने समाजाच्या, देशाच्या जीवनावर उत्तुंग परिणाम घडवता येणे, हे नेत्याच्या आंतरिक शक्तीचे सर्वात स्पष्ट रूप नव्हे काय?