अरुणाचलातले नागमंदिर

विवेक मराठी    05-Jul-2024
Total Views |
 
प्रा. सुहास द. बारटक्के -  9423295329
अरुणाचल प्रदेशात 1966 साली ग्रेफचे अधिकारी के. रामस्वामी (मेजर-GREF) यांच्या पुढाकाराने टेकडीवर नागमंदिर बांधले. मंदिराच्या मागच्या बाजूस हिमालयीन रांगा व त्यामधून वाहणार्‍या नदीचं विहंगम दर्शन होतं.
vivek
 
‘आषाढ’ संपला की ‘श्रावण’ येतो. सोबत घेऊन येतो विविध सण आणि उत्सव... त्यातही श्रावणाच्या प्रारंभीच येतो तो ‘नागपंचमी’चा सण... नागराजाची पूजा म्हणजे साक्षात निसर्गदेवतेचीच पूजा. ही पूजा केवळ हिंदू धर्मीयांमध्येच आहे का?
 
नाही. नागदेवतेला ‘देवता’ मानणारे सर्वधर्मीय लोक जगभर आहेत. अरुणाचलमधले ‘नागमंदिर’ हे एका हिंदू अधिकार्‍याने पुढाकार घेऊन बांधले असले तरी त्याला इतरही धर्मांचे लोक दरवर्षी भेट देतात व नागराजाचे आशीर्वाद घेतात.
 
 
अरुणाचल प्रदेशातल्या ‘बोमदिला’ शहराकडून परत ‘भालुकपोंग’ बॉर्डरकडे निघालं की, वाटेत तेंगा मार्केट (तेंगा हाट) लागतं. तेंगापासून थोडं पुढे गेलं की, जाताना उजवीकडे एका छोटेखानी टेकडीवर पाहायला मिळतं ते नागमंदिर! अत्यंत अवघड अशा चढउताराच्या रस्त्यानं आपण प्रवास करत असताना हे अचानकपणे अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण गवसतं आणि आपण मनोमन हरखून जातो. अर्थात, ‘बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन’नं (BRO) हिमालयात आज जागोजागी रस्ते बांधल्यामुळेच आपल्याला अशा अनेक ठिकाणांना भेटी देता येतात; परंतु डोंगरी पहाड खोदून रस्ते काढणं अत्यंत जिकिरीचं काम होतं ते 1960-65च्या सुमारास. तेव्हा ना मोठी यंत्रे होती ना तंत्रज्ञान. मनुष्यबळावरच कामे पूर्ण केली जायची. हजारो मजूर राबायचे तेव्हा कुठे काही किलोमीटरचा रस्ता बनायचा. साठाव्या दशकात अरुणाचलकडे येणारी बॉर्डर ‘भालुकपोंग’ बॉर्डरपासून ‘तवांग’ (बोमदिलामार्गे)पर्यंतच्या 99 किलोमीटरच्या सडक रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. टस्कर परियोजनेतून हाती घेण्यात आलेले हे रस्त्याचे काम पुढे वर्तक योजना म्हणून ओळखले जाऊ लागले. हे काम तेंगा गावाच्या अलीकडच्या एका वळणापर्यंत आले आणि थांबले. ते कायमचे थांबते की काय, अशी भीतीही निर्माण झाली आणि याला कारणीभूत ठरले होते ते सर्पराज!
 
vivek
 
रस्त्याच्या कामी पहाड तोडण्याचे काम सुरू असताना काम करणार्‍या इंजिनीअर्सना, मजुरांना अनेकदा एक नाग व नागिणीची जोडी दिसे. ही जोडी रस्ता क्रॉस करून पलीकडच्या टेकडीवर जायची. तिथे बहुधा पाण्याचा स्रोत असावा. काही मजूरही त्या टेकडीवर पाणी आणायला जायचे, त्यांनाही ती जोडी हमखास दिसे. एकदा टेकडीच्या पायथ्याशी काम करणार्‍या एका कर्मचार्‍यांच्या तुकडीने ही जोडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यातील नर नागाला त्यांनी मारले. नागीण मात्र पळून गेली. त्यानंतर मात्र अनर्थ घडू लागला. ती नागीण उग्र रूप धारण करून अनेकांना दंश करू लागली, तर त्याच वेळी अनेकदा भूस्खलन होऊन त्याखाली माणसे गाडली जाऊ लागली. कर्मचार्‍यांच्या मनात एक प्रकारची दहशत निर्माण झाली. एकीकडे नाग चावून मजुरांचे मृत्यू होऊ लागले, तर दुसरीकडे अंगावर पहाड कोसळल्याने माणसे मरू लागली. काम सुरू झाले की, असाच एखादा प्रसंग घडायचा व काम थांबायचे. आता हे काम पूर्ण होणारच नाही असे वाटू लागले होते. क्रोधाने पेटलेली नागीणच हे सर्व करते आहे, असा विश्वास कर्मचार्‍यांत बळावला. म्हणून 1966 साली के. रामस्वामी (मेजर - GREF) यांनी मादी नागाचा राग शांत करण्यासाठी टेकडीवर मंदिर बांधायचं ठरवलं. त्यांच्या पुढाकाराने हे छोटेखानी सुंदर नागमंदिर बांधण्यात आलं आणि काय आश्चर्य, गेले अनेक महिने घडणारे अघटित प्रकार तात्काळ थांबले. नागराजाला वंदन करून कर्मचारी कामाला लागत व रोड भराभर पुढे जाई.
 
vivek 
 
तेव्हापासून या परिसरातल्या लोकांची श्रद्धा या नागमंदिरावर बसली व लोक भक्तिभावाने नागराजाच्या भेटीला येऊ लागले. नागबाबाचे आशीर्वाद घेतले की, मनोकामना पूर्ण होते व मनाला शांती लाभते, अशी लोकांची भावना असल्याने तवांग, बोमदिलापासून ते तेजपूर, गुवाहाटी व थेट कलकत्त्यापर्यंतचे भाविक इथे मोठ्या संख्येने येत असतात. नागपंचमीला इथं मोठी अर्चना केली जाते. जत्रा भरते. एका मोठ्या भंडार्‍याचं आयोजन केलं जातं. अक्षरश: हजारो लोक नागबाबाचा आशीर्वाद घ्यायला इथं जमतात. ग्रेफमार्फत या देवस्थानची देखभाल केली जाते. अगदी चाळीस-पन्नास पायर्‍या चढल्यावर आपण थेट मंदिरात पोहोचतो. वाटेत थांबून फोटो काढावेत अशी तीन-चार ठिकाणं आहेत. तिथं थांबून आपण मंदिरात पोहोचलो की, नागराजाच्या जोडीचं दर्शन होतं. अर्थात, याच ठिकाणी भगवान शंकराची (नागधारी) पिंडीही आहे. मुख्य नागराजाची मोठी रंगीत मूर्ती पाहायला मिळते. नागराजाला विश्रांतीसाठी एक घटही उभा केलेला दिसतो.
 
मंदिराच्या मागच्या बाजूस हिमालयीन रांगा व त्यामधून वाहणार्‍या नदीचं विहंगम दर्शन होतं. इथंच नवग्रह स्थापना केली आहे. शनिदेव व बाजूला राहू-केतू यांच्या मूर्ती आहेत. मंदिरमार्गावर घंटा बांधण्यात आल्याने घंटानाद करूनच आपण बाहेर पडतो. त्या वेळी आपल्या डोक्यात तो नाद भरलेला असतो, तर डोळ्यात ते अप्रतिम सुंदर असे निसर्गदृश्य!
 
स्वच्छ, शांत, अनुपम सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या या ठिकाणाला येत्या नागपंचमीला नक्की भेट द्या. नागदेवतेचं एक अविस्मरणीय रूप तुम्हाला पाहायला मिळेल याची गॅरंटी!