आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष कुणालाही चुकलेला नाही; पण संघर्षात संधी दडलेली असते आणि संघर्षकाळात कर्तृत्वही उजळून निघतं. अशी कामगिरी करणारा आणि संधीची वाट न बघता, निकाल स्वत: घडवून आणणारा हॉकीपटू पी. आर. श्रीजेश. ऑलिम्पिकमध्ये त्याची कामगिरी इतकी भक्कम होती की, ‘भारतीय हॉकी संघाची भिंत’ असं दुसरं नावच त्याने मिळवलं.
क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माची जी ओळख आहे किंवा जसा चाहता वर्ग आहे तसा परट्टू रवींद्रन श्रीजेशचा नाही. भारतीय हॉकी म्हटलं की, चटकन कुणाला त्याचं नाव आठवत नाही; पण हॉकी संघाचं त्याच्याशिवाय पान हलत नाही, कारण तो फक्त संघात नसतो, तर संघासाठी यादगार क्षण घडवतोही. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष कुणालाही चुकलेला नाही; पण संघर्षात संधी दडलेली असते आणि संघर्षकाळात कर्तृत्वही उजळून निघतं. हे ज्याला समजतं तो संघर्षरूपी संधीचं सोनं करतो आणि मग संघासाठी यादगार निकाल घडवून आणतो.
श्रीजेशसाठी हे वर्णन चपखल बसतं. ते सिद्ध करण्यासाठी स्पष्टीकरण नको, तर दोन उदाहरणं पुरेशी आहेत.
भारतीय संघात श्रीजेशचं आत-बाहेर सुरू होतं. म्हणजे अँड्रियन डिसुझा आणि भरत छेत्री हे अनुभवी गोली नसतील, तरच निवड समितीला त्याची आठवण यायची आणि संघात स्थान मिळालं तरी नियमितता नव्हती. असं सहा वर्षं चाललं होतं. ज्युनिअर स्तरावरील भारताचा तेव्हाचा सर्वोत्तम गोली राष्ट्रीय स्तरावर मार खात होता. अशा परिस्थितीत आपण गोली म्हणून आपल्याबरोबर काय घेऊन येतो, हे श्रीजेशने पहिल्यांदा दाखवून दिलं ते 2011 मध्ये.
2011 चा आशिया चषकातील पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा सामना! निर्धारित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर सामना पेनल्टी शूटआऊटवर गेलेला आणि नवख्या श्रीजेशने चक्क दोन पेनल्टी स्ट्रोक अडवून भारताला हा सामना 4-2 असा जिंकून दिला. त्याचं धैर्य, तंदुरुस्ती, चपळता सगळ्यांना मग मान्य करावीच लागली. तेव्हा तो 23 वर्षांचा होता आणि भारतीय संघाला पहिलावहिला आशिया चषक जिंकून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. तिथेच तो संघाचा नियमित गोली असणार हेही स्पष्ट झालं.
तिथून पुढे त्याला फारसं आव्हान कुणी दिलं नाही आणि या पठ्ठ्याने आपली खेळाप्रति निष्ठाही कधी सोडली नाही.
आता दुसर्या उदाहरणाकडे येऊ या. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा पहिला बाद फेरीचा सामना. समोर ग्रेट ब्रिटनचं आव्हान आणि पहिल्या 18 मिनिटांतच भारताच्या मुख्य बचावपटू अमित रोहिदासला रेड कार्डमुळे मैदान सोडावं लागलेलं. असं असताना पुढचा पाऊण तास 10 खेळाडूंसह खेळताना गोली म्हणून श्रीजेशची झालेली दमछाक सगळ्यांनी टीव्हीवर पाहिली आणि नंतर इथंही पेनल्टी शूटआऊटमध्ये पुन्हा एकदा दिसला तो पी. आर. श्रीजेशचा निर्धार. दोन गोल अडवून त्याने भारताला हा महत्त्वाचा विजय मिळवून दिला.
तिथून पुढे भारताने कांस्य पदकापर्यंतही मजल मारली. असा आहे पी. आर. श्रीजेश. संधीची वाट न बघता, निकाल स्वत: घडवून आणणारा हॉकीपटू म्हणजे श्रीजेश. खरं तर 36 व्या वर्षी हे आपलं शेवटचं ऑलिम्पिक असेल, असं श्रीजेशने आधीच जाहीर केलं होतं. त्यामुळे त्याला फक्त पदकाची नाही, तर सुवर्णपदकाची आस होती आणि त्यासाठी तो संधीची वाट पाहत नव्हता, तर ती घडवत होता.
या ऑलिम्पिकमध्ये त्याची कामगिरीच अशी भक्कम होती की, ‘भारतीय हॉकी संघाची भिंत’ असं दुसरं नावच त्याने मिळवलं. जर्मनीविरुद्ध उपांत्य फेरीत अगदी शेवटच्या क्षणी त्याला एक कठीण गोल थांबवता आला नाही. त्याव्यतिरिक्त त्याची कामगिरी अगदी चोख होती. अगदी कांस्य पदकाच्या सामन्यातही स्पेनने सात पेनल्टी कॉर्नर मिळवले; पण यातील एकावरही त्यांना गोल करता आला नाही तो श्रीजेशमुळेच.
हॉकी आणि फुटबॉलसारख्या खेळांत गोलीला ‘शापित गंधर्व’ म्हटलं जातं. म्हणजे असं की, सामना जिंकला तर तो गोल करणार्या खेळाडूंमुळे आणि हरला तर तो गोलीने सोडलेल्या गोलमुळे, अशी कहाणी आधीच रचून तयार असते. गोली गोलजाळ्यापाशी बसून हवा खातो, असं खेळातील जाणकारही कधी कधी खासगीत चिडवताना मी ऐकलं आहे. अशा वेळी गोली या भूमिकेप्रति अक्षरश: आपली निष्ठा अर्पण करण्याची प्रेरणा श्रीजेशला कुठून मिळाली असेल?
खरं तर निष्ठा हा त्याचा स्थायिभाव आहे. समर्पण ही त्याची वृत्ती आहे आणि सदैव सकारात्मक राहून आनंद साजरा करणं हा त्याचा स्वभाव आहे. म्हणूनच जेव्हा ‘गोलजाळं हे माझं दुसरं घर आहे. हॉकी सोडल्यानंतर पुढच्याच दिवशी सकाळी मी काय करेन, मला आताच सांगता येणार नाही,’ असं तो म्हणतो तेव्हा सगळं शब्दश: खरं वाटतं.
केरळमध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला मुलगा लहानपणापासूनच मैदानात रमायचा. कॉन्व्हेंट शाळेत शिकताना त्याला खेळायची संधीही मिळत गेली; पण सुरुवातीला त्याचा ओढा लांब उडी, धावण्याची शर्यत आणि पुढे व्हॉलीबॉलकडे होता. लांब उडीतच त्याला त्याची आयुष्याची जोडीदार अनिष्या मिळाली; पण बाराव्या वर्षी थिरुअनंतपुरम इथं त्याने जी. व्ही. राज क्रीडा शाळेत प्रवेश घेतला तेव्हा हॉकीशी त्याची तोंडओळख झाली आणि तिथल्या प्रशिक्षकांनी त्याला गोली होण्याचा आग्रहच धरला. श्रीजेशनेही त्यांचा विश्वास मोडला नाही. सांघिक खेळांकडे त्याचा ओढा होताच. त्यामुळे हॉकीशी त्याने पटकन जुळवून घेतलं आणि हॉकीत ज्युनिअर स्तरावर वर वर चढत गेला.
2004 मध्ये राष्ट्रीय ज्युनिअर संघात वर्णी लागल्यानंतर 2006 मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय संघापर्यंत त्याने झटपट मजल मारली आणि मग वर सांगितल्याप्रमाणे त्याच्या कारकीर्दीत पहिला संघर्षाचा क्षण आला; पण सहा वर्षांत श्रीजेशने मेहनत आणि चिकाटीने त्यावर मार्ग शोधलाही आणि 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये नियमित गोली भरत छेत्रीची कामगिरी काहीशी ढिसाळ झाली, तेव्हापासून श्रीजेशच संघाचा नियमित आणि भरवशाचा गोली झाला.
तेव्हापासून आजतागायत तो संघाचा तारणहार आणि कठीण काळात उत्तरं शोधणारा गोली आहे. हॉकी हा खरं तर भारताचा राष्ट्रीय खेळ; पण एके काळी ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्णपदकं जिंकलेल्या या खेळात जशी आधुनिकता आली तशी नवीन हॉकीशी जुळवून घेण्यात भारतीय खेळाडू कमी पडायला लागले. 1980 च्या शेवटच्या सुवर्णपदकानंतर भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये बाद फेरीत पोहोचणंही मुश्कील झालं आणि नेमका भारतीय हॉकीच्या या संघर्षाच्या काळातच श्रीजेशने हॉकीला जवळ केलं. हॉकीतील वेग वाढला होता आणि पेनल्टी कॉर्नरमुळे गोलही झटपट होत होते. एकीकडे भारतीय हॉकीपटूंना पेनल्टी कॉर्नरवर गोल करणं जमत नव्हतं आणि दुसरीकडे पेनल्टी कॉर्नरवर जवळच्या अंतराहून येणारे जोरकस फटके अडवणं गोलींना जमत नव्हतं.
पण, श्रीजेशकडे अॅथलेटिक्स खेळांच्या पार्श्वभूमीमुळे अंगात असलेली चपळता होती आणि चेंडू सूर मारून अडवण्यासाठी लागते ती नजर आणि नैसर्गिकता होती. या अंगभूत गुणांमध्ये सातत्य, शिस्त आणि निष्ठा मिसळली की, गोलीसाठी आवश्यक परिपूर्ण रसायन तयार होणार होतं आणि हे श्रीजेशला वाढत्या वयाबरोबर लगेच कळून आलं. म्हणून तर 25 व्या वर्षी घरी त्याच्याच लग्नाची तयारी सुरू असताना तो भारतासाठी सामने खेळत होता आणि लग्न लागल्यावर काही दिवसांतच राष्ट्रीय शिबिरासाठी निघून गेला. हॉकीला त्याने आयुष्यात इतकं महत्त्व दिलं! खेळात होत असलेले बदल टिपले आणि हॉकीसाठी बदलत्या काळात तो भारतीय संघात चपखल बसला.
2010 च्या दशकात भारतीय हॉकीत आवश्यक स्थित्यंतर सुरू झालं. देशांतर्गत हॉकी लीगही उभी राहिली आणि खेळाडूंमध्ये व्यावसायिकता आली. त्याचा परिणाम खेळावर आणि स्पर्धांमध्ये जिंकण्यामध्ये होऊ लागला. 2014 च्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतरच्या जकार्तामध्ये कांस्य आणि 2022 मध्ये होआंगझाओमध्ये पुन्हा सुवर्ण. चॅम्पियन्स करंडक या महत्त्वाच्या हॉकी स्पर्धेत या दरम्यान भारतीय संघ दोनदा रौप्य पदकाचा मानकरी ठरला होता. सरदार सिंग, हरमनप्रीत, मनप्रीत, हरेंद्र सिंग अशी आघाडीची फळी या दरम्यान तयार होत गेली आणि संघाचा अभेद्य बचाव करत होता पी. आर. श्रीजेश. 2014 आणि 2018 च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत तो सर्वोत्तम गोलीच्या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
2020 मध्ये भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून 41 वर्षांचा स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपवला तेव्हाही श्रीजेश संघाचा मुख्य शिलेदार होता. आपल्याला अनुकूल निकालाची वाट न बघता ते घडवून आणणारी ही पिढी आहे आणि श्रीजेश या पिढीचा एक नायक आहे.
आता निवृत्तीनंतर तो म्हणतो, ‘हॉकीनंतर नेमकं काय करेन मलाच माहीत नाही. इतकी वर्षं फक्त आणि फक्त राष्ट्रीय शिबिरं, सराव, आंतरराष्ट्रीय सामने, खेळादरम्यान सहकार्यांबरोबर दंगामस्ती, कधी कधी भांडणं आणि शिव्याशाप इतकंच केलंय. आता जेव्हा हे बंद होईल, तेव्हा काय करायचं ते आताच कळत नाहीए.’
श्रीजेशचं भारतीय हॉकीला दिलेलं आतापर्यंतचं योगदान पाहता त्याने युवा खेळाडूंना प्रशिक्षण द्यावं, असं हॉकी फेडरेशनला वाटणं स्वाभाविक होतं, कारण खेळासाठी आपलं सर्वस्व वेचणारे खेळाडू मिळतात कुठे? पण, श्रीजेशनेच सध्या तरी हा निर्णय राखून ठेवलाय. इतक्या धावपळीनंतर कुटुंबीयांना थोडा वेळ द्यावा, असं कदाचित त्याला वाटत असेल. प्रशिक्षक म्हणूनही श्रीजेश किती महत्त्वाचा आहे याचा विचार केला तर मला इथं श्रीजेशची तुलना राहुल द्रविडशी करावीशी वाटते. दोघं खेळत असताना संघासाठी भिंत म्हणूनच उभे होते. संघासाठी ते महत्त्वाचे खेळाडू होते; पण स्टार कधीही झाले नाहीत. फटकेबाजी करणारे सेहवाग, सचिन, सौरव चाहत्यांना जास्त प्रिय होते. त्यांना अगदी नेतृत्वापासून ते महत्त्वाची सगळी पदं मिळाली. श्रीजेशलाही 2017 मध्ये पद्मश्री आणि 2021 मध्ये ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं; पण त्याचं संघातील स्थान इतर स्टार खेळाडूंच्या खालोखाल राहिलं; पण आज नवीन संघ घडवायचा झाला तेव्हा बीसीसीआयलाही राहुलच आठवला आणि श्रीजेशकडूनही हॉकी फेडरेशन त्याच सहकार्याची अपेक्षा करत आहे.
आता राहुल द्रविडने बीसीसीआयच्या क्रिकेट अकादमीचा प्रमुख आणि भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून टी-20 विश्वचषकात आपली योग्यता दाखवून दिली आहे. तसंच कार्य इथून पुढे श्रीजेशकडून व्हावं, हीच अपेक्षा. हॉकीवरील त्याचं प्रेम, निष्ठा आणि समर्पण पाहता भारतीय ड्रेसिंग रूमला भूमिका बदलली तरी श्रीजेश हवाच असणार आहे आणि श्रीजेशनेही काही काळाच्या विश्रांतीनंतर याचा विचार करावा.