कामगंध सापळेएकात्मिक कीड व्यवस्थापनाचे प्रभावी साधन

विवेक मराठी    17-Aug-2024
Total Views |
@डॉ. प्रमोद मगर 7757081885
एकात्मिक कीड नियंत्रणात कामगंध सापळ्यांचा वापर अत्यंत प्रभावी मानला जातो. या सापळ्यांच्या वापरामुळे किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लवकर समजते, शिवाय योग्य वेळी किडीवर नियंत्रण मिळवता येते. प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक कामगंध सापळ्यांचा शेतकर्‍यांनी वापर केला पाहिजे.
 
krushivivek
 
कीटक आपल्या स्वजातीयांशी संबंध किंवा संपर्क, सुसंवाद साधण्यासाठी स्वतःच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडत असतात. यालाच कामगंध किंवा प्रलोभन (फेरोमोन) असे म्हणतात. हे रासायनिक गंध कीटकांमध्ये विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करून संदेशवहनाचे काम करत असतात. या गंधामुळे स्वजातीय कीटकांवर होणारे परिणाम व प्रतिक्रिया यावरून त्यांचे विविध प्रकार पडतात. त्यामध्ये ऐक्य, मार्गदर्शन, विखुरणे, लिंगविषयक प्रतिक्रिया, अंडी घालणे किंवा भीती इत्यादी प्रकार आहेत. लिंगविषयक कामगंध सापळे हा प्रकार जास्त प्रभावी आहे, असे अभ्यासाअंती दिसून आले आहे. वेगवेगळ्या किडींचा (कीटकांचा) कामगंध हा वेगवेगळा असतो. लिंगविषयक कामगंधामुळे कीटक एकमेकांकडे आकर्षित होतात व समागमासाठी योग्य उमेदवार मिळवू शकतात. काही कीटकांमध्ये मादी कीटक नराला, तर काहींमध्ये नर कीटक मादीला आकर्षित करण्यासाठी त्यांच्या शरीरातून विशिष्ट कामगंध सोडतात. कीटकांच्या या सवयींचा किंवा वागणुकीचा अभ्यास करून कृत्रिम कामगंध (फेरोमोन/प्रलोभन) तयार करून त्यांचा उपयोग एकात्मिक कीड व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. अशा प्रकारचे लिंग कृत्रिम रासायनिक कामगंध शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. आजपर्यंत शास्त्रज्ञांनी जवळपास 100 पेक्षा जास्त कीटकांचे लिंग कामगंध शोधून काढले आहेत; परंतु त्यापैकी केवळ 20 कामगंध कृत्रिमरीत्या तयार करण्यात यश आले आहे. लैंगिक कामगंधाचे हळूहळू बाष्पीभवन होऊन ते हवेत पसरतात. संबंधित नरामध्ये किंवा मादीमध्ये संदेशवहनाचे कार्य सुरू होऊन नर/मादी समागमासाठी उत्तेजित होतात आणि लैंगिक प्रलोभनाकडे आकर्षित होतात व सापळ्यात अडकून मारले जातात.
 
 
कीड व्यवस्थापनासाठी प्रभावी साधन
 
पीकनिहाय क्षेत्रामध्ये कीड नियंत्रणाची कोणती कार्यवाही कधी सुरू करावी, हे कळण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर केला जातो. कामगंध सापळ्यांचा वापर कीड सर्वेक्षणासाठी आणि पीक संरक्षणासाठी केला जातो. सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्रासाठी फक्त पाच सापळे लागतात. पीक संरक्षणाचे उपाय करण्यासाठी सापळ्यात कमीत कमी किती पतंग सापडायला पाहिजे यांची संख्या ठरलेली असते, यालाच पीकनिहाय संबंधित किडीची आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) असे म्हणतात. या पातळीनुसार कीड व्यवस्थापनाची उपाययोजना केली जाते.
 

krushivivek 
 
जेव्हा किडीचे प्रमाण अत्यल्प असते अशा वेळी पतंग पकडण्यासाठी कामगंध सापळ्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. यासाठी जास्त प्रमाणात कामगंध सापळे बसवल्यास मोठ्या प्रमाणात पतंग पकडले जाऊन परिणामी पुढील प्रजनन कमी करण्यास मदत होते. यामुळे कीटकाच्या मीलनात अडथळा आणणारे लिंग प्रलोभन रसायनाचे कण वातावरणात सोडल्यामुळे मीलनासाठी किडींना आपला जोडीदार शोधणे कठीण जाते. जोडीदारांचा संदेश व वातावरणातील कृत्रिम रसायनांच्या संदेशामधील फरक कळेनासा होऊन त्यांचा गोंधळ उडतो. त्यामुळे त्यांचे मीलन होत नाही आणि पुढील पिढी जन्माला येत नाही. अशा प्रकारे किडींच्या संख्येत लक्षणीय घट होते. किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवण्यासाठी तसेच सर्वेक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी ही प्रलोभने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात वापरणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांनी या कामगंध सापळ्यांच्या उपलब्धतेसाठी आणि माहितीसाठी राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्था हैदराबाद, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विद्यापीठे यांच्याशी संपर्क साधावा.
 
 
krushivivek
 
विविध कामगंध सापळे
 
वेगवेगळ्या किडींच्या व्यवस्थापनाकरिता जाक्सन सापळा, मेकफेल सापळा- द्रवरूप प्रथिनयुक्त आमिष, बहुआमिष सापळा, मोकळ्या बुडाचा शुष्क सापळा, पिवळा चिकट सापळा, कूक आणि कानीन्घम सापळा, चाम सापळा, टेफ्री सापळा, स्टेनर सापळा, बाटली सापळा, फनेल सापळा, सौर ऊर्जेवर चालणारा सापळा, विद्युतचालित झेड कामगंध सापळा, फसवा सापळा असे सापळे आहेत.
 
 
कामगंध सापळे वापरताना घ्यावयाची काळजी
 
कीटकनिहाय सापळ्यांची निवड करावी, सापळ्यात अडकलेले कीटक 2-3 दिवसांनी काढून नष्ट करावेत. सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकांसाठी हेक्टरी 5 सापळे वापरावेत; परंतु किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी हेक्टरी 15 ते 20 सापळे वापरावेत. सापळ्यांमधील लिंग प्रलोभने 15 ते 20 दिवसांत बदलावेत. याशिवाय सापळा हा साधारणपणे पिकांच्या उंचीनुसार जमिनीपासून 2 ते 3 फुटांपर्यंत राहील याची काळजी घ्यावी. तसेच सापळा वार्‍याच्या दिशेला समांतर असावा, ज्यामुळे लिंग प्रलोभन रसायनाचे सूक्ष्म कण शेतात पसरून जास्तीत जास्त पतंग सापळ्याकडे आकर्षिले जातील.
 
 
कामगंध सापळ्याचे फायदे
 
फेरोमोन सापळ्यांच्या वापरामुळे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून योग्य त्या वेळी कीड व्यवस्थापन पद्धती ठरविता येते तसेच आवश्यक त्या कीटकनाशकांची निवड करून फवारणी करता येते. एकत्रित प्रलोभन सापळ्यांच्या वापरांमुळे कीटकनाशकांच्या किमतीचा व फवारणीचा खर्च टाळता येतो. याखेरीज सापळ्यातील रसायनामुळे पर्यावरणावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी झाल्यामुळे परोपजीवी कीटक व मिश्र कीटक सुरक्षित ठेवण्यास मदत होते. कीड व्यवस्थापनांची ही पद्धत वापरण्यास अगदी सोपी व स्वस्त आहे. सापळ्यांचा खर्च कीटकनाशकांच्या खर्चापेक्षा कमी आहे. सापळ्यांच्या वापरामुळे मानव, पशुपक्षी, प्राणी यांना कुठल्याही प्रकारचा धोका नसतो.
 
 
लेखक यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्रात विषय विशेषज्ञ (कीटकशास्त्र) म्हणून कार्यरत आहेत.