डॉ. मधुकर बाचूळकर
9730399668
पर्यावरण प्रदूषणाच्या शुद्धीकरणासाठी वनस्पती संपदा सहकार्य करते. महाराष्ट्रातून प्राण्यांच्या 5460 प्रजाती आणि सपुष्प वनस्पतींच्या 3025 प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. इतकी विपुल जैवविविधता महाराष्ट्रात आढळते; पण राज्यातील राखीव वनक्षेत्रातही मानवी अतिक्रमणे वाढली आहेत. बेकायदेशीर वृक्षतोड, जंगलतोड, चोरट्या शिकारी, तस्करी वाढल्याने तेथील जैवविविधताही संकटात आली आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
’सजीव’ हा पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. सजीव सृष्टीत मोठ्या प्रमाणात विविधता आढळून येते. सजीवांतील विविधतेस ‘जैवविविधता’ म्हणतात. जैवविविधतेत वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्म जीवांचा समावेश होतो. मानव हासुद्धा जैवविविधतेचाच एक महत्त्वाचा घटक आहे. मानवी जीवनात जैवविविधता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पृथ्वीतलावर जैवविविधता निर्माण होण्यास निसर्गास कोट्यवधी वर्षांचा कालावधी लागला आहे. जैवविविधतेचे सर्वाधिक प्रमाण (70% जैवविविधता) पृथ्वीतलावरील उष्ण कटिबंध प्रदेशात आढळते. उष्ण कटिबंध प्रदेशातील वर्षावने जैवविविधतेने सर्वात जास्त समृद्ध आहेत; पण ही वर्षावने पृथ्वीवरील एकूण जमिनीच्या फक्त सात टक्के जमिनीवर पसरली आहेत. शीत कटिबंध प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जैवविविधता असून, ध्रुवीय प्रदेशात जैवविविधता अति अल्प प्रमाणात आहे.
जैवविविधतेची समृद्धता
पृथ्वीवरील एकूण सर्व देशांपैकी सतरा देश जैवविविधतेने अत्यंत समृद्ध असून, त्यांना ’महाजैवविविधता देश’ असे संबोधिले जाते. सर्वात अभिमानाची बाब म्हणजे, या सतरा देशांत आपल्या देशाचा, भारताचा समावेश आहे. भारत उष्ण कटिबंध प्रदेशातील महत्त्वाचा देश असून, जैवविविधतेने समृद्ध आहे. भारतातून 94 हजार प्राण्यांच्या प्रजाती आणि 52 हजार वनस्पतींच्या प्रजाती नोंदविल्या गेल्या आहेत. भारतातील हिमालय भूप्रदेश, पश्चिम घाट व अंदमान-निकोबार या भूप्रदेशांतील वनक्षेत्रात विपुल प्रमाणात जैवविविधता आढळून येते. हे तिन्ही भूप्रदेश जैवविविधतेने अत्यंत समृद्ध आहेत. यापैकी हिमालय भूप्रदेश व पश्चिम घाट हे ’जागतिक अतिसंवेदनशील भूप्रदेश’ (ग्लोबल हॉट स्पॉट रीजन) म्हणून ओळखले जातात, कारण हे भूप्रदेश जैवविविधतेने समृद्ध तर आहेतच; पण येथे दुर्मीळ प्रजाती, तसेच ’इंडेमिक’ (प्रदेशानिष्ठ) प्रजाती मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच भूप्रदेशांत मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असल्याने, येथील जैवविविधता धोक्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि जैवविविधता
भारताच्या दक्षिण पश्चिमेला असणारे महाराष्ट्र राज्यही जैवविविधतेने संपन्न आहे. महाराष्ट्रातील सुमारे 61939 चौ.कि.मी. क्षेत्र जंगल-वनांनी व्यापलेले आहे. महाराष्ट्राच्या 20.13 टक्के भूक्षेत्रावर वने पसरलेली आहेत. यामध्ये तुलनेने विरळ वनांची टक्केवारी जास्त आहे, तर दाट वनांची टक्केवारी अवघी सहा-सात टक्के इतकीच आहे. दाट वने जैवविविधतेने जास्त समृद्ध असतात. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रापैकी पाच टक्के वनक्षेत्र हे संरक्षित वनक्षेत्र आहे. उर्वरित वनक्षेत्र हे राखीव वनक्षेत्र किंवा खासगी वनक्षेत्र आहे. संरक्षित आणि राखीव वनक्षेत्रे शासनाच्या अमलाखाली येतात. यामुळे या वनक्षेत्रांवर वन विभागाचा अधिकार असतो. संरक्षित वनक्षेत्रात प्रामुख्याने राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्पे यांचा समावेश होतो. संरक्षित वनक्षेत्रातील जैवविविधतेस संपूर्ण शासकीय संरक्षण असते. महाराष्ट्रात आज सहा राष्ट्रीय उद्याने, 42 अभयारण्ये आणि सहा व्याघ्र प्रकल्प आहेत.
विविध हवामानांनुसार आणि इतर काही नैसर्गिक घटकांमुळे जंगलनिर्मितीवर प्रभाव पडून त्यांचे निरनिराळे प्रकार निर्माण होतात. भारतातील हवामानात, भौगोलिक स्थितीत आणि रचनेत मोठे वैविध्य असल्यानेच, आपल्या देशात विविध वनांचे प्रकार आढळतात. या सर्व विविधतेमुळेच जंगलातील जैवविविधतेतही मोठा वेगळेपणा दिसून येतो. भारतात जंगलांचे 18 प्रमुख प्रकार आहेत. यापैकी खालील सात प्रकारची जंगले महाराष्ट्रात आढळतात. दमट सदाहरित जंगले, निम सदाहरित जंगले, दमट पानझडी जंगले, शुष्क पानझडी जंगले, काटेरी रुक्ष वने, शुष्क झुडपी वने आणि सागरतटीय खारफुटीय जंगले. जंगलांच्या प्रकाराप्रमाणे तेथील जैवविविधता बदललेली दिसून येते. गवताळ प्रदेश, ओसाड प्रदेश, पठारे, सडे, नद्या, ओढे, जलाशय, पाणवठे, बागा व शेती या ठिकाणीही वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता आढळून येते.
महाराष्ट्रातील जंगलांमध्ये विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, अमरावती हे जिल्हे तसेच सह्याद्री पर्वतरांगांतील जिल्हे व कोकण विभागातील जिल्हे या ठिकाणी उत्तम जंगले पाहावयास मिळतात. तसेच मेळघाट, किनवट, चोपडा या भागांतदेखील बर्यापैकी जंगले आहेत. या सर्व ठिकाणी विपुल प्रमाणात जैवविविधता आढळते. अनुकूल हवामानामुळे जंगलांची होणारी कमाल वाढ म्हणजेच नैसर्गिक जंगल. नैसर्गिक जंगले म्हणजे वृक्षवल्लीचा आणि विविध प्राणी, पक्ष्यांचा समूह. असे समूह ठिकठिकाणच्या हवामानानुसार तयार होतात. जमीन, पाऊस, वारे, सूर्यप्रकाश यांचादेखील परिणाम जैवविविधता समूह तयार होण्यासाठी होतो. नवीन वृक्षहीन जागेत जंगल, जैवविविधता तयार होण्यास हजारो वर्षांचा कालावधी लागतो. अनुकूल हवामान, सुरक्षित वातावरण, मानवाचा किमान संपर्क व हस्तक्षेप अशा स्थितीत जंगल व जैवविविधता तयार होऊ शकते. नवीन जागेत प्रथम गवत, लहान रोपटी यांची वाढ होते आणि हळूहळू, कालांतराने त्या जागेत नवीन रोपटी, झुडपे, वेली आणि वृक्ष यांची वाढ होत जाते. विविध प्राणी, पशू, पक्षी त्या जागेत येऊन तेथे जैवविविधता तयार होऊ लागते. ठिकठिकाणच्या हवामानाच्या विविधतेमुळे जंगलातील वनस्पती व प्राण्यांच्या विविधतेत वेगळेपणा येतो. कोकणातील व पश्चिम घाटातील दमट हवामानात सदाहरित, निम सदाहरित जंगले तयार होतात, तर देशावरील कोरड्या, उष्ण हवामानात व कमी पर्जन्यमानाच्या जागेत पानझडी, काटेरी शुष्क जंगले तयार होतात. वनांच्या प्रकाराप्रमाणे जैवविविधतेतही फरक दिसतो.
विपुल जैवविविधता
महाराष्ट्रातील जैवविविधता अनेक विषयतज्ज्ञांनी अभ्यासलेली आहे. प्रत्येक अभ्यासकाने त्या त्या जिल्ह्यांच्या प्राणी, वनस्पती संपदेचा सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला आहे. मी स्वत: वनस्पतीतज्ज्ञ असून सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या वनस्पती संपदेचा अभ्यास केला आहे. महाराष्ट्रातून प्राण्यांच्या 5460 प्रजाती आणि सपुष्प वनस्पतींच्या 3025 प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. इतकी विपुल जैवविविधता महाराष्ट्रात आढळते. भारतात सपुष्प वनस्पतींच्या सुमारे 5000 प्रजाती इंडेमिक (प्रदेशानिष्ठ) आहेत. यापैकी 694 प्रजाती महाराष्ट्रात आढळतात. विशेष म्हणजे यातीलही 157 प्रजाती फक्त महाराष्ट्रातील वनक्षेत्रात असून, या प्रजाती जगाच्या पाठीवर इतरत्र कोठेही आढळत नाहीत. यावरून महाराष्ट्राच्या जैवविविधतेचे महत्त्व लक्षात येईल. आपल्या राज्यात ऑर्किड्सच्या 118 प्रजाती वनक्षेत्रात आढळून आल्या आहेत. यापैकी 46 प्रजाती इंडेमिक असून त्यातील तीन प्रजाती फक्त महाराष्ट्रातच आढळतात. महाराष्ट्रातून ‘सिरोपेजिया’ (कंदील फूल) वनस्पतींच्या 26 प्रजातींची नोंद असून, यापैकी 21 प्रजाती इंडेमिक असून, यातील 15 प्रजाती फक्त महाराष्ट्रातील वनक्षेत्रातच आढळतात.
प्राण्यांची विविधता
आपल्या राज्यातील प्राणी विविधताही महत्त्वाची व विपुल प्रमाणात आहे. राज्यात सस्तन प्राण्यांच्या 85 प्रजाती, पक्ष्यांच्या 500 प्रजाती, सरपटणार्या प्राण्यांच्या 100, उभयचरांच्या 29 व माशांच्या 600 प्रजाती आढळतात. आपल्या राज्यात कीटकांच्या सुमारे 30 हजार प्रजाती असाव्यात असा अंदाज आहे. शेकरू, गवे हे सस्तन प्राणी, मलबार पीट व्हायपर, लार्ज स्केल्ड शिल्ड टेल हे साप, फ्लाइंग लिझार्ड आणि सुमारे 17 प्रकारचे पक्षी महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील जंगलात दिसून येतात. महाराष्ट्रात वाघ विदर्भ आणि दक्षिण पश्चिम भागात असून, त्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी येथे ‘व्याघ्र‘ प्रकल्प आहेत. मलबार क्रेस्टेड लार्क, मलबार ग्रेहॉर्नबिल, पन्टेड बुश क्वेल, सह्याद्री येलो ब्राऊड बुलबुल हे काही दुर्मीळ पक्षी महाराष्ट्रात आढळतात. आपल्या राज्यात सर्वात जास्त वनक्षेत्र विदर्भ आणि पश्चिम घाट परिसरात आहे; पण विदर्भापेक्षा जास्त जैवविविधता पश्चिम घाट परिसरातील वनक्षेत्रात आहे. धुळे, नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्र राज्यातील जिल्हे पश्चिम घाटात वसलेले असून, येथे समृद्ध जैवविविधता आढळते. महाराष्ट्रात पसरलेल्या पश्चिम घाटास ‘सह्याद्री’ असे संबोधले जाते. सन 2003 मध्ये ‘युनोस्को’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि जैवविविधतेने नटलेल्या कास पुष्प पठारास आणि राधानगरी, चांदोली व कोयना अभयारण्यांना ‘नैसर्गिक वारसा स्थळे’ हा बहुमान देऊन सन्मानित केले होते.
सह्याद्री परिसरातून अनेक लहान-मोठ्या नद्या उगम पावतात, कारण या परिसरात भरपूर पाऊस पडतो. येथील बहुतांश नद्यांवर धरणे बांधलेली आहेत, जलविद्युत प्रकल्प उभारलेले आहेत व त्यातून वीजनिर्मिती केली जाते. पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील शेती, कारखानदारी आणि विविध उद्योगधंदे पूर्णपणे सह्याद्रीतील पाण्यावर आणि तेथे तयार होणार्या विजेवर अवलंबून असल्यानेच, सह्याद्री हा महाराष्ट्राच्या ‘अर्थकारणाचा कणा’ समजला जातो. शिवकालीन काळात सह्याद्री हा ‘स्वराज्याचा रक्षणकर्ता’ होता. हाच सह्याद्री आज आपल्या सर्वांचा ‘तारणहार’ आहे.
जैविक भांडवल
अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्यदायी पर्यावरण या मानवाच्या महत्त्वाच्या मूलभूत गरजा असून, त्या पूर्ण करण्यासाठी माणूस पूर्णपणे निसर्गाने तयार केलेल्या जैवविविधतेवर अवलंबून आहे, कारण उद्योगधंद्यासाठी लागणारा कच्चा माल आपणांस वनसंपदेकडून मिळतो. जैवविविधता हे मानवाचे ‘जैविक भांडवल’ आहे. सह्याद्री परिसरातील वनक्षेत्रात भात, ऊस, तूरडाळ, ताग, मिरी, जायफळ, दालचिनी इ. यांसारख्या पिकांचे जंगली वाण आढळतात. कृषी संशोधनात, जंगली वाणांच्या मदतीने पिकांचे नवीन संकरित वाण तयार केले जाते. आकर्षक जंगली वनस्पतींपासून बागेसाठी सुंदर वनस्पती, वृक्ष तयार केले जातात. जैव तंत्रज्ञानशास्त्र पूर्णपणे जैवविविधतेच्या नैसर्गिक स्रोतांवरच अवलंबून आहे. जैवविविधता हे जैवतंत्रज्ञानाचे ‘प्रमुख अस्त्र’ आहे. जैवविविधता हे सजीवांच्या जनुकांचे ‘नैसर्गिक भांडार’ आहे. हे भांडार म्हणजे सजीवांच्या नवनवीन जाती, प्रजाती तयार करणारा ‘नैसर्गिक कारखाना’ आहे. जैवविविधता समूहात असंख्य वनौषधी आहेत. महाराष्ट्रात सुमारे 450 औषधी वनस्पती जंगलात आढळतात. शेळ्या, मेंढ्या व गुरांना चारा म्हणून उपयुक्त असणार्या अनेक वनस्पती, वृक्ष आपल्या वन परिसरात आहेत. माणसांसाठी उपयुक्त असणार्या अनेक रानभाज्या, जंगली खाद्यफळे वनक्षेत्रात मुबलक प्रमाणात आहेत. पर्यावरण प्रदूषणाच्या शुद्धीकरणासाठी वनस्पती संपदा सहकार्य करते. म्हणून जैवविविधता ही सजीवांच्या ‘प्रगतीचा आधारस्तंभ’ मानली जाते.
आव्हाने आणि भवितव्य
मानवी जीवनात जैवविविधता महत्त्वाची असूनही, विकासाच्या हव्यासापोटी सर्व स्तरांवर वनांचा, जैवविविधतेचा र्हास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भारतात दरवर्षी सरासरी दहा लाख हेक्टर जंगलांचा नाश केला जातो. ‘वर्ड वॉच इन्स्टिट्यूट’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालाप्रमाणे जगातील पहिल्या दहा देशांत, ज्या ठिकाणी जंगल र्हासांचा आणि जैवविविधता विनाशाचा वेग सर्वात जास्त आहे, यामध्ये भारताचा समावेश असून, तो आज क्रमवारीत दुसर्या क्रमांकावर आहे. आपल्या देशात दरवर्षी सरासरी सात अब्ज वृक्षांची विविध प्रकल्पांसाठी तोड केली जाते. जैवविविधतेच्या संरक्षण-संवर्धनासाठी कायदे व नियम आहेत; पण त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने वनांचा, वन्यजीवांचा आणि जैवविविधतेचा झालेला र्हास आणि सुरू असणारा विनाश अत्यंत चिंताजनक आहे. सजीवांच्या अनेक जाती-प्रजाती, दुर्मीळ, अतिदुर्मीळ व संकटग्रस्त बनल्या आहेत, तर काही नामशेष झाल्या आहेत. जैवविविधतेच्या विनाशाची अनेक कारणे आहेत. अनियंत्रित वाढती लोकसंख्या, वाढत्या अमर्यादित गरजा, जंगल-वनांचा अतिरेकी विनाश, वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण, वाढते उद्योगधंदे, खाणकामे, विविध विकास प्रकल्प, रस्ते व धरणांचा विकास, शेतीचे अतिक्रमण, विदेशी तणांचा शिरकाव, विदेशी वृक्षांची एकसुरी लागवड, विदेशी पिकांची लागवड, वनक्षेत्रातील अतिक्रमणे, वन्यप्राण्यांची चोरटी शिकार, वन्यजीवांची तस्करी, वनउपजांची अनियंत्रित उचल, नियमबाह्य वाढते वन पर्यटन, वनक्षेत्र परिसरात पंचतारांकित शहरांची निर्मिती, वनक्षेत्रातील वाढती हॉटेल्स व रिसॉर्ट्स, जैवविविधतेबाबतची उदासीनता ही सर्व जैवविविधतेच्या विनाशाची महत्त्वाची कारणे आहेत.
पर्यावरण संतुलनासाठी व जैवविविधतेच्या विकासासाठी 33% वनक्षेत्र आवश्यक असताना आज आपल्या देशात, राज्यात फक्त 20% वनक्षेत्र शिल्लक आहे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात दोन लाख 35 हजार वृक्षांची बेकायदेशीरपणे तोड करण्यात आली आहे. यामुळे जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राखीव वनक्षेत्रातही मानवी अतिक्रमणे वाढली आहेत. बेकायदेशीर वृक्षतोड, जंगलतोड, चोरट्या शिकारी, तस्करी वाढल्याने तेथील जैवविविधताही संकटात आली आहे. पुणे येथील भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या मते देशातील चार हजारांहून अधिक वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि यातील 30 टक्के प्रजाती महाराष्ट्रातील आहेत. गिधाडे व माळढोक हे पक्षी महाराष्ट्रातून नामशेष होत आहेत. त्यासाठी वन विभाग व पर्यावरण विभागाने ठोस उपाययोजना करून जैवविविधतेचे जतन व संवर्धन केले पाहिजे.
लेखक कोल्हापूर येथील वनस्पतीतज्ज्ञ व
निवृत्त प्राचार्य आहेत.