@स्नेहा शिनखेडे 9823866182
काळ बदलला, माणसे बदलली, शहरांचा चेहरामोहरा बदलला; परंतु काही शहरे भाग्यवान असतात. त्यांच्यावर दैवी कृपाछत्र असते. तसेच सोलापूर शहर आहे. सडा-सारवण, रांगोळ्या, धूपदीप, नैवेद्य, मंगल वेश आणि संस्कृती जोपासणारी कुटुंबे हे या शहराचे वैभव. पिढ्या दर पिढ्या हा वैभवशाली वारसा ते सुजाणतेने नव्या पिढीकडे सोपवत आहेत. अशीच वैभवशाली सोलापूरच्या श्रावणाची परंपरा.

सोलापूर हे मठ आणि मंदिरांनी वेढलेले, समृद्ध भक्तिभाव असणारे शहर आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर ही शक्तिपीठे जवळ आहेत. शिवाय मराठी, तेलुगु आणि कानडी लोक इथे एकोप्याने राहतात, एकत्र उपासना करतात, हे सोलापूरचे वैशिष्ट्य आहे. खरे सांगायचे तर उपासना, कीर्तन-प्रवचन-भजन हा सोलापूर शहराचा प्राण आहे. श्रावण महिन्याचे आगमन होण्यापूर्वीच त्याच्या स्वागताची सिद्धता झालेली असते. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर म्हणजे ऊर्जास्थान आहे. श्री सिद्धेश्वरांनी शहरात आणि शहराच्या वेशीवर एकूण 68 शिवलिंगांची स्थापना केली. त्यांची पूजा नेहमी होत असते. श्रावणात त्याचे विशेष महत्त्व आहे. मुख्यतः शिवआराधना असल्याने श्रावण महिन्यात सिद्धेश्वर मंदिर भक्तांनी फुललेले असते. श्री सिद्धेश्वरांच्या संजीवन समाधीला दर श्रावण सोमवारी फुलांची मेघडंबरी असते. विविध रंगांची निरनिराळी फुले ट्रक भरून कर्नाटक, हैदराबाद येथून मागवतात. कुशल कारागीर मनोवेधक, आकर्षक सजावट करतात. ही लक्षवेधी कलाकुसर बघण्यासाठी दूरदुरून भक्तमंडळी येतात. रुद्राभिषेक आणि धान्यपूजा तसेच नागवेलीच्या पानांनी बांधलेली श्री सिद्धेश्वरांची पूजा मन प्रसन्न करते. प्रसादालयातील प्रसादाची चव अमृततुल्य असते. बेलफुले आणि पूजेचे साहित्य यांनी परिसर फुललेला असतो. सर्व भाविकांची श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा एकत्र होते, तसेच प्रत्येकाच्या मनात तिथे गेल्यावर कामनेशिवाय निरागस आनंदलहरी उसळू लागतात.
सोलापूर शहरात जागृत देवता असणारे अनेक मठ आहेत. तिथे श्रावणात रोजच काही ना काही धर्मकार्य सुरू असते. श्रावण सोमवारी दिवसा सामूहिक शिवलीलामृत वाचन, पार्थिव लिंग तयार करणे, लघुरुद्र, जप आणि संध्याकाळी पांढर्या पदार्थांचा नैवेद्य म्हणजे दहीभात, श्रीखंड, बासुंदी वगैरे असा असतो. आरतीनंतर हा प्रसाद घेऊन भक्त उपास सोडतात. या महिन्यात मंगळागौरीचा उत्सव करण्याची पद्धत तर आहेच; परंतु ठिकठिकाणी असणार्या देवींची उपासनादेखील स्त्रिया करतात. दहीभात, हिरव्या खणानारळाने देवीची ओटी भरतात. श्री अक्कलकोट आणि गाणगापूर ही श्री दत्तप्रभूंची जागृत देवस्थाने जवळ असल्यामुळे सोलापुरात दत्त उपासनाही मोठ्या प्रमाणात आहे. श्रावणात श्री गुरुचरित्राचे चक्रीपारायण आणि भजन गुरुवारी अनेक देवळांमध्ये तसेच घरोघरी होत असते. सोलापूर हे अनेक दृष्टींनी भाग्यवान शहर आहे. मोठमोठ्या विभूतींचा सहवास शहराला लाभला आणि शहर समृद्ध झाले. श्री ज्ञानेश्वरीचे लेखकू सच्चिदानंद बाबा यांचे वंशज वै. श्री. दा. का. तथा भाऊ थावरे यांनी विविध भाषिक भाविकांना श्री ज्ञानेश्वरीची गोडी लावली. सोलापुरातील अनेक भागांत धार्मिक उत्सव नित्यनेमाने समूहाला घेऊन केले. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण श्रावणात देवळांमध्ये होते. श्रीमद्भागवत ग्रंथाचे आणि भागवत गीतापठणाचे पक्के बीज रोवले ते वेदमूर्ती वै. डॉ. रा. ल. जोशी यांनी. भागवत सप्ताह आणि गीतापठण श्रावणात असते. अलीकडे श्रीविष्णू सहस्रनाम पठणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आणि बहुसंख्येने शहराच्या विविध भागांमध्ये होत असतात.
सोलापूरच्या भगिनी नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावाच्या स्वास्थ्यासाठी, उन्नतीसाठी उपवास करतात. भावाच्या प्रेमासाठी ही प्रार्थना घरोघरी होते. नागपंचमी हा सण येतोय हे कळते ते जागोजागी झाडांना बांधलेल्या झुल्यांवरून. गल्लीगल्लीत झुले झुलू लागतात. जुनी गाणी, ओव्या यांचे दरवर्षी आवर्तन होते आणि हा मौखिक वारसा पुढील पिढीकडे सोपवला जातो. नागपंचमीला मुली माहेरी येतात. त्यांच्या स्वागतासाठी घर सज्ज असते. गरीब कुटुंब ऋण काढून मुलींना साडीचोळी, बांगड्या आणि जोडवी यांचा आहेर करते. बांगड्यांची दुकाने गर्दीने गच्च भरलेली असतात. नागपंचमीला पुरणाची दिंडं झालीच पाहिजेत. नागदेवतेची पूजा लाह्या-दुधाने होते. शहरात नागदेवतेची मंदिरं आहेत. संध्याकाळी मठात, देवळात मुली, बायका फेर धरून गाणी म्हणतात. ही प्रथा आजही सुरू आहे. एकत्र कुटुंबामध्ये शितला सप्तमी आवर्जून साजरी होते. स्वयंपाक बनवण्याच्या साधनांची पूजा होते.
श्रावणी पौर्णिमेला सकाळी ब्रह्मवृंदांची ठिकठिकाणी असलेल्या मठांत, मंदिरांत गर्दी असते. ताम्हण, पळी, पंचपाळे आणि यज्ञोपवीत घेऊन ब्राह्मण तयार असतात. श्रावण पौर्णिमेला जानवे बदलून भगवंताच्या कार्यासाठी ब्रह्मवृंद प्रार्थना करतात. हा यज्ञोपवीत बदलण्याचा उत्सव आज बदलत्या काळातही सोलापुरात टिकून आहे. रक्षाबंधनाला नारळी भाताचा नैवेद्य आणि देवाला राखी बांधण्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडतो.
सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात कलायोगी शुभराय महाराजांचा मठ आहे. हे फक्त देऊळ नाही तर सामाजिक कार्य करणारी ध्येयवेडी माणसे येथे आहेत. मठाधिपती सुश्री शुभांगीताई बुवा म्हणजे एक ऊर्जास्रोत आहे. तिथे श्री शंकर महाराजांबरोबरच श्री विठ्ठलाचे अधिष्ठान आहे. तिथे गोपाळकृष्ण कालियामर्दन करतोय अशी मोठी देखणी मूर्ती आहे. तिला रोज अभिषेक असतो. ही मूर्ती मठाला ज्यांनी प्रदान केली त्या श्री. राळेरासकर यांच्या घरी ती श्रावणात प्रतिपदा ते एकादशीपर्यंत माहेरपणाला जाते. हा एक अनोखा उत्सव आहे. तिथे तिचे कोडकौतुक होते. रोज नवा नैवेद्य होतो. ही प्रथा-परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. नंतर मूर्ती मठात परतल्यावर गोकुळाष्टमीचा उत्सव थाटात होतो. रात्री 12 वाजता जन्म झाला की भजन करून श्रीकृष्ण निद्राधीन होतो.
सोलापूरला असलेले जुने विठ्ठल मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर पेशवेकालीन आहे. या मंदिराचे पुजारी हे समस्त ग्रामजोशी वहिवाटदार पुजारी आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवान बदलत्या काळाचा स्पर्श न होता येथील जुन्या परंपरा त्याच पवित्र भावनेने आणि निष्ठेने सुरू आहेत. इथे श्री गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भजन-प्रवचनांनी उत्सव सुरू होतो. नेत्रदीपक अशी आरास असते. कीर्तन होऊन गोपाळकाल्याने उत्सवाची सांगता होते.
श्रीक्षेत्र तुळजापूर हे शक्तिपीठ सोलापूरजवळ असल्यामुळे देवी उपासनाही शहरात खोलवर रुजली आहे. जवळपास प्रत्येक
घरात देवीची आराधना होते. श्रावणामध्ये शुक्रवारी देवीला पुरणावरणाचा नैवेद्य करून सवाष्ण जेवू घालतात. ही घरोघरी पिढ्यान्पिढ्या चालत आलेली परंपरा आहे. काळ बदलला, माणसे बदलली, शहरांचा चेहरामोहरा बदलला; परंतु काही शहरे भाग्यवान असतात. त्यांच्यावर दैवी कृपाछत्र असते. तसेच सोलापूर शहर आहे. सडा-सारवण, रांगोळ्या, धूपदीप, नैवेद्य, मंगल वेश आणि संस्कृती सांभाळणार्या स्त्रिया या शहराच्या धरोहर आहेत. आपला वैभवशाली वारसा त्या सुजाणतेने नव्या पिढीकडे सोपवत आहेत.