वायनाडमध्ये मदतकार्यात दोन संघ स्वयंसेवकांचे बलिदान

विवेक मराठी    06-Aug-2024
Total Views |

rss
 
 
वायनाडमध्ये मदतकार्य सुरू असताना- नागरिकांना वाचवत असताना - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रजीश आणि सरथ या दोन स्वयंसेवकांना आपले प्राण गमवावे लागले. हे दोन्ही स्वयंसेवक वायनाडमध्ये झालेल्या पहिल्या भूस्खलनानंतर आपदाग्रस्त क्षेत्रात वयस्कर व्यक्तींना आणि बालकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते.
 
 
दरड कोसळताक्षणी प्रजीश हे जीप घेऊन डोंगरावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आले. त्यांनी अनेकांना वाचवले आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. पहिल्या दोन वेळा टेकडीवर चढून त्यांनी लोकांना खाली आणले. मात्र भयभीत लोक मदतीची वाट पाहात डोंगरावर उभे होते. ते तिसर्‍यांदा बचावकार्यासाठी डोंगराच्या माथ्यावर गेले. त्यांच्या मित्रांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मित्रांना सांगितले, की डोंगरमाथ्यावर बरेच लोक अडकले आहेत. मला थांबवू नका.
 
 
प्रजीश पुन्हा जीप घेऊन टेकडीवर गेले. त्यांनी लोकांना जीपमध्ये बसविले. मात्र दुर्दैवाने ते चोरमलमाला पुलापर्यंत पोहोचू शकले नाही. परतत असताना तिसर्‍या भूस्खलनाने माती आणि पाण्यासह जीपला कवेत घेतले. त्यानंतर ते दिसेनासे झाले.
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी 
गुरुजी गोळवलकर जीवनचरित्र
@रंगा हरी
गोळवलकर कुलवृत्तांतापासून त्यांच्या पूर्णाहुतीपर्यंत विस्तृत माहिती या जीवनचरित्रात वाचायला मिळते.
 
 त्याचप्रमाणे संघ स्वयंसेवक सरथ यांनीही भूस्खलनादरम्यान विलक्षण धैर्य आणि शौर्य दाखवले. सरथ हेही पहिल्या भूस्खलनानंतर अडकलेल्या लोकांना वाचवण्यात गुंतले होते. त्या अंधारात लोकांना शोधण्यासाठी ते टेकडीवर गेले. पुढच्या भूस्खलनात सरथ यांनाही जीव गमवावा लागला. चढावरून आलेल्या माती आणि पाण्याने त्याचा जीव घेतला.
 
 
 
संघाचे स्वयंसेवक देशहितासाठी आपल्या जिवाचीही चिंता करत नाहीत, हे सरथ आणि प्रजीश यांनी आपल्या बलिदानातून दाखवून दिले आहे.
 
  
वायनाडच्या मुंडक्काई आणि चूरलमला या गावांतील संपूर्ण वस्तीच ढिगार्‍याखाली गाडली गेली आहे. एनडीआरएफच्या मदतीने सेवा भारतीकडून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. मृतदेहांचा शोध आणि अंत्यविधीसाठी सेवा भारतीच्या वतीने 12 मोबाइल शववाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 37 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शोध आणि बचावाच्या पलीकडे रुग्णवाहिका, अन्न वितरण, वैद्यकीय साहाय्य आणि रक्तदानासाठी सेवा भारती कार्यरत आहे. यासाठी 651 स्वयंसेवक कार्यरत असून, भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या 10 ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. वायनाडच्या गोडल्लाइकुन्नू, कारिया बिल्डिंग, कलपेट्टा येथे मदत संकलन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर प्रांत सेवा प्रमुख एम.सी वाल्थसन आणि सेवा भारतीचे जिल्हा कार्यकर्ता देसीया तसेच स्थानिक स्वयंसेवक आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
@देविदास देशपांडे