लोकमान्य टिळक आणि रायगडावरील शिवसमाधी

विवेक मराठी    16-Sep-2024
Total Views |

tilak
 
- सुधीर थोरात : 
 
रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार व (मेघडंबरी) निर्मितीच्या संदर्भात काही तथाकथित इतिहासकारांनी “लोकमान्य टिळकांचा या समाधी स्मारकाच्या निर्मितीशी काहीही संबंध नाही,” असे सांगून त्यांच्या कार्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संदर्भात वस्तुस्थिती येथे देत आहे. 129 वर्षांपूर्वी म्हणजेच 1895 मध्ये लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना केली. याच मंडळाच्या माध्यमातून रायगडावरील शिवसमाधीचाजीर्णोद्धार करण्यात आला. टिळकांचे या मंडळाच्या स्थापनेमागचे उद्देश रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार, शिवजन्मोत्सव, शिवपुण्यतिथी तसेच शिवचरित्राचा प्रचार, प्रसार करणे असे होते.
 

Raigad Shivaji Maharaj Samadhi 
सन 1818 मध्ये ब्रिटिशांनी रायगड किल्ला जिंकल्यानंतर जाणीवपूर्वक रायगडावरच्या वास्तूंचा विध्वंस केला. तसेच सामान्य लोकांना रायगडावर जाण्यास मनाई केली. शिवतीर्थ रायगडाच्या दर्शनाने येथील जनतेमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होऊ शकते व इंग्रजी राज्याविरुद्ध उठाव होऊ शकतो, हा धोका टाळण्यासाठीच त्यांनी असे केले होते. त्यामुळे 1818 ते 1883 या कालावधीत गडावर पिढ्यान्पिढ्या राहणार्‍या धनगर समाजातील कुटुंबांशिवाय कोणीही गेल्याची अधिकृत नोंद नाही. जातींमध्ये फूट पाडू इच्छिणार्‍या काही मंडळींनी खोटे किंवा कल्पनेवर आधारित व्हिडीओ बनवून महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवसमाधीचा शोध लावल्याचा दावा केला आहे. महात्मा फुले यांच्याबद्दल आदर व्यक्त करीत असताना ही गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे की, त्यांनी असा शोध लावल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. ब्रिटिश सरकारच्या काळात रायगड पूर्णतः दुर्लक्षित होता. गडाचे भग्नावशेष शिल्लक होते तसेच महाराजांच्या समाधीची पडझड व दुरवस्था झाली होती. जेम्स डग्लसचे ‘बुक ऑफ बॉम्बे’ पुस्तक आणि गोविंद बाबाजी जोशीकृत ‘रायगड किल्ल्याचे वर्णन’ (लेखनकाळ जुलै 1885, प्रकाशन 1887) ही दोन पुस्तके आणि 1885 च्या मे महिन्यात हिराबागेत भरलेली सभा या तिन्हींचा मुख्यतः संकलित परिणाम म्हणजे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धार चळवळीचा आरंभ होय.
 
 
’राजधानी रायगड’ (वि. वा. जोशी, शके 1841, सन 1921) या एका महत्त्वाच्या पुस्तकात 1885च्या प्रयत्नांचा थोडा आणखी तपशील मिळतो. गॅझेटियरसाठी काम करणारे रावबहादूर पु. बा. जोशीकृत ’समाधी शतकावली’ हे काव्य आणि ’टाइम्स ऑफ इंडिया’त त्यांनी लिहिलेले पत्र यामुळे जीर्णोद्धाराच्या प्रश्नाला वाचा फुटली आणि त्याचेच फलित म्हणजे रानडे, कुंटे, तेलंग इ. धुरीणांच्या पाठिंब्याने भरलेली हिराबागेतील सभा. या सभेत ’समाधी शतकावली’ हे काव्य वाचण्यात आले. जीर्णोद्धारासाठी फंड गोळा करण्याची आवश्यकताही बोलून दाखविण्यात आली.
 
 
शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळकांनी पाहिलेली स्वप्नं आणि आजचा भारत या विषयी चिकित्सक लेखांचा संग्रह असलेला शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक पुस्तक आहे.
 
https://www.vivekprakashan.in/books/book-on-lokmanya-tilak/
 
 
सन 1883 मध्ये जेम्स डग्लस नावाचा एक इतिहासप्रेमी इंग्रज शिवचरित्र वाचून जिज्ञासेपोटी रायगडावर गेला. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरवस्थेविषयी त्याने आपल्या ’बुक ऑफ बॉम्बे’ या पुस्तकात ब्रिटिश सरकारवर टीका केली. डग्लसने लिहून ठेवले की, समाधीचा अंतर्भाग झाडाझुडपांनी व्याप्त केला आहे. त्याच्या फरसबंदीतून मोठाले वृक्ष वाढले आहेत. त्याजवळील देवालयाची दुरवस्था झाली असून त्यातील मूर्ती विखुरलेल्या आहेत. या शूरवीर राजाच्या स्मारकासाठी त्या वेळच्या संस्थानिक, सरदार व सामान्य जनतेने ढिलाई सोडून समाधीच्या जीर्णोद्धाराच्या हेतूने जागोजाग सभा भरवून फंड जमा करण्याची तजवीज करून जगाला या राजापायी आपली कृतज्ञता दाखविली पाहिजे. डग्लसचे हे वर्णन वाचून त्या वेळच्या मराठी माणसांच्या मनात अस्वस्थता पसरली. त्याचा परिणाम म्हणून सन 1885 साली लोकमान्य टिळक यांच्या पुढाकारातून न्यायमूर्ती रानडे, रावबहादूर जोशी, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती कुंटे इत्यादी तत्कालीन समाजधुरीणांनी पुण्यातील हिराबागेत एका सभेचे आयोजन केले. त्यात समाधी जीर्णोद्धारासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली तसेच रायगड आणि समाधीच्या दुरवस्थेविषयी ब्रिटिश सरकारकडे एक निवेदन पाठविण्यात आले. त्याचा परिणाम ब्रिटिश सरकारने सालाना फक्त पाच रुपये नेमणूक केली.
 
 
 
एप्रिल 1895 पासून ’केसरी’त शिवाजी उत्सव, समाधीजीर्णोद्धार आणि त्यासाठी फंड या तीन विषयांसंबंधी आवाहनात्मक तळमळीचे लेख येऊ लागले. इतकेच नव्हे, तर या कार्यासाठी एखादी स्मारक कमिटी नेमण्याचा मनोदय लोकमान्यांनी व्यक्त केला आणि मे महिन्यापासून लागलीच ‘केसरी’कडे फंडासाठी रकमा येऊ लागल्या. त्यांची अर्थातच नावानिशी पोच येऊ लागली. टिळकांनी तळेगावचे खंडेराव बाबूराव दाभाडे सेनापती यांच्या आणि स्वत:च्या सहीने 29 मे 1895 रोजी छापील पत्रक वाटून समाधीजीर्णोद्धाराची कल्पना साकार करण्यासाठी कमिटी व सेक्रेटरी नेमण्याचा निश्चय जाहीर केला 30 मे 1895 रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत पुन्हा एकदा भव्य सभेचे आयोजन केले. या सभेला अनेक सरदार, जहागीरदार आणि पुण्यातील नामवंत नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, सेनापती दाभाडे, बापूसाहेब कुरुंदवाडकर, सरदार पोतनीस इ. नामवंत मंडळींचा समावेश होता. या सभेमध्ये लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोद्धाराची भावी योजना मांडून त्यासाठी निधी देण्याचे आवाहन केले. या कार्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे ’श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ होय. दाजी आबाजी खरे यांची मंडळाचे अध्यक्ष म्हणून व लोकमान्य टिळकांची चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली.
 
 
 
लोकमान्य टिळकांनी ’केसरी’, ’मराठा’च्या माध्यमातून समाधीच्या जीर्णोद्धारासाठी देणग्यांचे आवाहन केले. या सगळ्या कार्याकडे लक्ष वेधणे व जनजागृती करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवजन्मोत्सव व पुण्यतिथी सोहळा करण्याची योजना आखली. टिळकांच्या उपस्थितीत दि. 24 व 25 एप्रिल 1896 असे दोन दिवस रायगडावरील पहिला शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला.
 
 
रायगडाचा ताबा ब्रिटिश सरकारकडे असल्याने लोकमान्य टिळकांनी मंडळाच्या वतीने शिवस्मारकाच्या जीर्णोद्धाराची परवानगी मागितली; परंतु ब्रिटिश सरकारने ती नाकारली. तेव्हा लोकमान्य टिळक आणि दाजी आबाजी खरे यांनी 1906 साली ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टनकडे एक निषेध पत्र पाठवून त्यात सुनावले की, शिवाजीराजांच्या प्रति आम्हां सर्व प्रजेला सार्थ अभिमान आहे. राजांच्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. त्या राजाला शोभेल अशी स्मारकाची जीर्णोद्धारित समाधीची वास्तू उभी करण्याचा संकल्प मंडळाने योजला आहे याला मान्यता देणे आपणास भाग आहे.
 
 
लोकमान्य टिळकांच्या आवाहनातून अनेक शिवभक्तांनी उदारहस्ताने समाधी जीर्णोद्धार कार्यासाठी दिलेला निधी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने डेक्कन बँकेमध्ये साठविला होता. दुर्दैवाने ही डेक्कन बँक 1913 साली बुडीत निघाली. त्याविरुद्ध टिळक आणि खरे यांनी पुणे फर्स्ट क्लास कोर्टात दावा दाखल करून व्याजासह रु. 33,911/- किमतीचे हुकूमनामे मिळविले; परंतु त्याची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी बँक लिक्विडेशनमध्ये निघाली. त्यामुळे मंडळाच्या या कार्याचे फार नुकसान झाले. लोकमान्य टिळकांनी डगमगून न जाता पुनश्च हरी ओम म्हणत निधी जमविण्याच्या कार्याला सुरुवात केली व तब्बल बारा हजार रुपयांचा निधी जमा केला. याचबरोबर टिळक ब्रिटिश सरकारकडे समाधीच्या जीर्णोद्धाराची परवानगी मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करीत होते. दरम्यान लोकमान्य टिळकांचे 1920 सालीदुःखद निधन झाले. टिळकांच्या पश्चात हा संघर्ष चालूच राहिला. लोकमान्यांनी सुरू केलेल्या या संघर्षाला 30 वर्षांनंतर यश प्राप्त झाले. त्या वेळचे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सचिव न. चिं. केळकर यांना जीर्णोद्धाराची परवानगी देणे ब्रिटिश सरकारला भाग पडले. टिळकांच्या निधनानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 6 फेब्रुवारी 1925ला ब्रिटिश सरकारने समाधीच्या जीर्णोद्धाराची परवानगी दिली.
 
 
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे रु. 12 हजार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रु. 5 हजार आणि पुरातत्त्व विभागाचे रु. 2,043/- असे 19,043/- रुपये एकत्रित निधीतून समाधीच्या जीर्णोद्धारास सुरुवात झाली. रत्नागिरीच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या वतीने व रायगड मंडळाच्या देखरेखीने प्लॅन तयार करून कामाला सुरूवात झाली.
 
 
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने सादर केलेल्या आराखड्याप्रमाणे मंडळाच्या देखरेखीखाली पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, रत्नागिरी विभागाच्या माध्यमातून सन 1926 साली आज आपण पाहतो ती शिवाजी महाराजांची जीर्णोद्धारित समाधीची वास्तू उभी राहिली. समाधीचे बांधकाम कंत्राटदार सुळे यांनी केले, तर त्यावरील शिल्प प्रसिद्ध शिल्पकार विनायकराव करमरकर यांनी तयार केले. समाधीचा लोकार्पण सोहळा 3 एप्रिल 1926 रोजी शिवपुण्यतिथीदिनी पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरकर राजे श्रीमंत लक्ष्मणराव भोसले, मंडळाचे अध्यक्ष सीतारामपंत टिळक, चिटणीस न. चिं. केळकर, डॉ. बा. शि. मुंजे इ. मान्यवर उपस्थित होते. समाधी निर्मितीचा अहवाल सर्व पुराव्यांनिशी महाराष्ट्र सरकारने 1974 साली'Shivaji Memorials : The British Attitude, A.D. 1885-1926'’ या ग्रंथात प्रसिद्ध केला आहे. त्याचे संकलन तत्कालीन पुरातत्त्व आणि पुराभिलेखागार संचालक व्ही. जी. खोबरेकर यांनी केले आहे.
 
 
ज्या लोकमान्य टिळकांनी रायगडावरील शिवसमाधीच्याजीर्णोद्धाराचा ध्यास घेऊन आयुष्यभर कार्य केले तसेच शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी संघर्षाची प्रेरणा दिली त्या लोकमान्यांवर जातीय द्वेषातून आरोप करून त्यांचे श्रेय नाकारणे यासारखे दुर्दैव दुसरे नाही!
 
 
संदर्भ :
 
1) Shivaji Memorials : The British Attitude, A.D. 1885-1926, Editor : V. G. Khobrekar, Director of Archives Archaeology, Published by Maharashtra State Government 1974.
2) ब्रिटिश सरकारने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाला समाधी जीर्णोद्धाराच्या परवानगीसाठी 6 फेब्रुवारी 1925 रोजी Duggan E.M. (under Secretary to Government) यांच्या सहीने पारित केलेला G. R. No. 7023. लेखक श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह आहेत.