@धीरज वाटेकर 9860360948
कोकणातलं कौलारू घर, निसर्गानं बहरलेला परिसर, आंब्या-फणसाच्या, माड-पोफळीच्या बागा, शेणानं सारवलेलं अंगण, माड-पोफळींच्या झावळ्यांचा अंगणातला मंडप, घराच्या मागे किंवा पुढे झुळुझुळु वाहणारा पाण्याचा पाट हा कोकणी थाट देशभरातील पर्यटकांच्या हृदयापर्यंत पोहोचायला हवा आहे. यासाठी ‘कोकण’ देशभर पोहोचवू शकेल अशा ‘प्रभावी मार्केटिंग’ची आवश्यकता आहे. त्याचबरोबर कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे, कारण पर्यटक येऊन पाहतात त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. त्यासाठी कोकणला आम्हाला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे. 27 सप्टेंबर, जागतिक पर्यटन दिन पार्श्वभूमीवर कोकणातील पर्यटन विकासाबद्दल माहिती देणारा लेख.
मागच्या वर्षीची गोष्ट आहे. पाच दिवसांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन करून कोकणी चाकरमानी मुंबईला परतू लागले होते. इंदौर-कोचुवेली एक्स्प्रेसने (19332) आम्ही ‘इंदोर’हून चिपळूणला परतत होतो. दुपारचे दोनेक वाजलेले. मंगळवारी (6 सप्टेंबर 2022) रात्री 9 वाजता इंदोरहून निघालेली कोचुवेली एक्स्प्रेस ट्रेन पनवेलनंतर थेट चिपळूणला थांबा असताना सिग्नलमुळे ‘खेड’ स्टेशनला थांबली. समोरच्या प्लॅटफॉर्मवर मुंबईला जाणार्या प्रवाशांची तुफान गर्दी लोटलेली. इतकी गर्दी की प्लॅटफॉर्मवर उभं राहायलाही जागा नसावी. अर्थात हा परिणाम कोकणात टिकून असलेल्या ‘उत्सवसंस्कृती’चा होता. गर्दीकडे पाहात असताना अचानक मुंबईच्या दिशेने जाणारी ट्रेन आली आणि जागा पकडायला प्रवाशांची उडालेली झुंबड आपापल्या मोबाइलमध्ये टिपायला इकडे ट्रेनमधील प्रवाशांची झुंबड उडाली होती. ‘पर्यटन’ अंगाने विचार करता ते दृश्य अफलातून होते. खरं तर ट्रेनच्या डब्यात शिरण्यातली गर्दी भारताला अजिबात नवीन नाही; पण या ट्रेनमधील पावसाळ्याच्या दिवसांतील, ही गर्दी पाहून आमच्या ट्रेनमधील प्रवाशांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. मागील पंधराएक वर्षांत कोकण पर्यटनात प्रचंड वेगाने बदल झालेत. येत्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यानंतर एखादं धरण फुटावं तसं पब्लिक या मार्गावरून प्रवास करताना दिसणार आहे. या महामार्गावरून प्रवास करणार्या पब्लिकला अधिकाधिक संख्येने कोकणातल्या गावागावांत आणणं, त्याला इथली वैशिष्ट्यं जगायला देणं या क्षेत्रात खूप मोठी पर्यटन संधी दडलेली आहे. तिला पूर्णपणे कॅश करण्यासाठी ‘कोकण’ देशभर पोहोचवू शकेल अशा ‘प्रभावी मार्केटिंग’ची आवश्यकता आहे.
मानवी भांडवल विकासाच्या दृष्टीने भारताची युवाशक्ती ही मौलिक संपत्ती उपयोगात आली आणि आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनलो. 1990 ते 2018 दरम्यान भारतासह दक्षिण आशिया हा सर्वाधिक वेगाने विकास होणारा प्रदेश राहिला. स्पर्धेच्या काळात माणसाकडे जसजसा पैसा वाढत गेला तसतसा भौतिक प्रगती आणि सोयीसुविधांचा विकास होत गेला. यातून आलेल्या तणावामुळे आपलं जीवन आनंदी बनविण्यासाठी, परिपूर्ण जीवनाचा ध्यास घेऊन माणूस वावरू लागला. भौतिकदृष्ट्या झालेल्या मानवी प्रगतीच्या मर्यादा माणसाच्या जसजशा लक्षात येऊ लागल्या तसतसा माणूस आनंदी जीवन जगण्याकडे वेगाने आकर्षित होत गेला. शंभरेक वर्षांपूर्वी कोकणची मानवी गती ही समुद्रकिनार्यालगतच्या बंदरांना बिलगून होती. बंदरांतून बोटीने प्रवास चालायचा. पुढे ती गती मुंबई-गोवा हमरस्त्यावर आली. कालांतराने ती कोकण रेल्वेकडे आणि आता मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासह चिपी विमानतळाच्या माध्यमातून झेपावते आहे. जगात कालानुरूप व्यवहार्य बदल होत असतात. तसे ते कोकणातही होताहेत. मागील पंधरा वर्षांच्या कालखंडात त्याचा काहीसा परिणाम स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या निसर्गरम्य कोकण पर्यटनावरही झालेला पाहायला मिळतो. याच काळात कोकणात हॉटेल, कृषी पर्यटन आणि निवास, न्याहारी व्यवस्था प्रचंड वाढल्यात. मात्र अपवाद वगळता कोकणातील हायवेवरील असंख्य हॉटेलांत स्थानिक वैशिष्ट्यांचे जेवण आजही मिळत नसल्याचे चित्र आहे. बहुतांशी हॉटेलांत टिपिकल ग्रेव्हीतील चव चाखायला मिळते. अर्थात कोकणी घरगुती चव मिळत नाही असं नाही; पण ती सर्वदूर पोहोचलेली नाही, हे वास्तव आहे. कोकणात प्रत्येक गावची चव वेगळी आहे. पेण, रत्नागिरी, मालवण येथे टप्प्याटप्प्याने जेवणाच्या चवी बदलतात. हे पर्यटकांना कळणार कधी? आणि कसे? यासाठी प्रयत्न व्हायला हवे असून पर्यटन म्हणून कामाची इथे संधी आहे. कोकणभूमीत आनंदप्राप्तीसाठी येणार्या पर्यटकांना जेवणही कोकणातील रीतिरिवाजानुसार मिळायला हवं आहे. किमान तसे पर्याय हॉटेलच्या ‘मेनू कार्ड’वर उपलब्ध असायला हवेत. यासाठी कोकणातील कॅटरिंग, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काम करणार्या महाविद्यालयांनी संघटितपणे प्रयत्न करायला हवेत. त्यांच्या प्रयत्नांना कोकणातील हॉटेल व्यवस्थापनाकडून रोजगार संधी मिळायला हव्यात. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील विविध समाजांची जेवण बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. वापरल्या जाणार्या मसाल्यांची लज्जत न्यारी आहे. ती पर्यटकांपर्यंत पोहोचायला हवी आहे. आपल्या सावंतवाडीतील लाकडी वस्तूंचे मार्केट जवळ-जवळ शंभर वर्षांपूर्वीचं आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे यातली काही दुकाने मुख्य मार्गावर दिसताहेत. ही लाकडी खेळणी जगप्रसिद्ध असली तरी अजूनही यांचं म्हणावं तितकं मार्केटिंग डिजिटल स्तरावर झालेलं नाही. चिपी एअरपोर्टच्या उद्घाटनानंतर कोकण पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात भविष्यात खूप मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हे बदल कोकण भूमीला विकासाच्या दिशेने नेऊ शकतात. इथल्या भूमिपुत्रांची पावले परत कोकणात वळविण्यातही आपले योगदान देऊ शकतात.
येत्या काही वर्षांत साकारणारे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, जलवाहतूक, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि रत्नागिरी विमानतळ अशा प्रयत्नांतून कोकण पर्यटन बदलाच्या दिशेने जाऊ पाहाते आहे. कोणत्याही विकासाची प्रक्रिया ही स्थानिक लोकांच्या सहभागावर अवलंबून असते. त्यामुळे कोकणातील लोकांचा या प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा आहे. तो ‘डिजिटल मार्केटिंग’मध्ये असल्यास विकास प्रक्रियेला अधिक वेग घेता येईल. नियमित पर्यटन, कातळखोदचित्रे, साहसी पर्यटन, ट्रेकिंग, जंगलसफर, सह्याद्री, जैवविविधता, वाइल्ड लाइफ, पक्षीनिरीक्षण, निसर्ग, बॅकवॉटर, क्रोकोडाइल सफारी, मासेमारी, कांदळवन, सागरसफर, गड, किल्ले, कोकणी हेरिटेज यांसह भविष्यात योगा, मेडिटेशन, मेडिकल टुरिझम, वॉटर पार्क, थीम पार्क आणि सर्वात महत्त्वाचे एरोस्पोर्ट्स आणि हेलिकॉप्टर राइडसारखे पर्यटनातील वैविध्य जपणारे प्रकल्प कोकणात सक्रिय करून पर्यटन समृद्धी आणणे शक्य आहे. आपल्या देशात आजही पाच दिवसांचा आठवडा असं वर्क कल्चर नाही आहे. आपल्याकडे सुट्ट्या अधिक असल्या तरी त्या आम्हाला पुरत नाहीत. कामचुकार वृत्तीमुळे आमच्याकडे त्याचे नीटसे नियोजन झालेले नाही. आपल्याकडे कार्यालयीन वेळेनंतर खासगी आयुष्य जगायची पद्धत कमी आहे. यामुळेच कोकणात किती टक्के लोक ‘सेकंड होम’ एन्जॉय करतात हे अभ्यासायला हवं आहे. याचा प्रभाव वाढविण्याची आपल्याला संधी आहे. आपली संस्कृती ‘अतिथी देवो भव’ म्हणत असल्याने जाहिरातीमुळे प्रभावित होऊन आपल्याकडे येणार्या पर्यटकाला अवाच्या सवा किमती सांगून भांबावून सोडणे आपण थांबवायला हवे आहे. भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या टूर लिस्टमध्ये कोकण दिसायला हवे आहे. काही कंपन्यांच्या लिस्टमध्ये तारकर्ली (स्नॉर्कलिंग) आणि गणपतीपुळे दिसते; पण तारकर्लीसह कोकणातील सर्वाधिक पर्यटन व्यवसाय हंगाम सहा ते आठ महिन्यांचा आहे. याकडे आम्ही कसे पाहातो? बदलत्या काळात कोकणात असंख्य पर्यटन प्रकल्प सुरू झाले असले तरी अख्खे कुटुंब आनंद मिळवू शकेल अशा व्यवस्था आपल्याला कोकणात अधिकाधिक उभाराव्या लागणार आहेत. आपल्याकडे येणारा पर्यटक हा अधिकाधिक समुद्र आणि निसर्गाच्या ओढीने येत आहे. त्यामुळे याच दोन विषयांत लक्ष देऊन अधिकाधिक काम करायची आवश्यकता आहे. उपलब्ध साधनसामग्री विचारात घेऊन मोठाले पर्यटन प्रकल्प उभे राहतात. कोकणला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. कातळखोदचित्रांसारखे कोकणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला झेंडा फडकवायची संधी देणारे प्रकल्प पुढे येत आहेत. तशी क्षमता इथल्या समुद्री किल्ल्यात आणि अश्मयुगीन वैशिष्ट्यांत आहे. जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची संधी इथे आहे. कोकणात दरवर्षी होणार्या विविध सांस्कृतिक उत्सवांच्या तारखा ‘पंचांग संस्कृती’मुळे आपल्याला वेळेपूर्वी माहिती असतात. त्याचा उपयोग करून कोकणच्या प्रथा-परंपरा-सांस्कृतिक उत्सव-जत्रा-यात्रा- आदींचे वार्षिक पूर्वनियोजित कॅलेंडर प्रकाशित करणे आपल्याला शक्य आहे ज्याचा सर्वाधिक उपयोग पर्यटन हंगामात कोकणात येणार्या पर्यटकांना आपल्या आवडीनिवडीनुसार नियोजन करायला होऊ शकेल. केरळमधील नौकानयन शर्यतीप्रमाणे कोकणात गौरी-गणपती, शिमगा हे खूप मोठे पर्यटन वैशिष्ट्य आहे. त्याचे मार्केटिंग व्हायला हवे आहे.
कोकण पर्यटनासाठी मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक आपणहून आपली टूर प्लॅन करताना दिसतात. स्वतःच्या गाड्या काढतात किंवा एखादी टेम्पो ट्रॅव्हलर ठरवतात. समुद्रकिनार्याचे हॉटेल बघतात. दिवसा भ्रमंती करतात. रात्रीच्या निवांतपणासाठी मद्यपानाला जवळ करतात. आजही अशी कोकण सहल होते. तिकडे कोकणच्या दक्षिणेकडे अनेक नामवंत आणि नवोदित टूर कंपन्या, टूर मॅनेजर्स हे हॉटेल बुकिंगसह पाहाण्याच्या प्रेक्षणीय स्थळांचे प्लॅनिंग पर्यटकांना देतात. त्या त्या ठिकाणचे गाडीचालक पर्यटकांना पिकअप करून प्लॅनिंगप्रमाणे टूर घडवतात. हे कोकणात होण्यासाठी आम्हाला कोकण पर्यटन महाराष्ट्राबाहेर न्यावे लागेल, इथे संधी आहे. त्यासाठी आम्हा कोकणी व्यावसायिकांची ‘मार्केटिंग’ची दृष्टी विकसित व्हायला हवी आहे. एकत्रित कोकण पर्यटनाच्या मार्केटिंगवर शासकीय किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी खर्ची व्हायला हवा आहे. चिपळूणच्या ‘बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाइल सफारी’साठी आम्ही ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड’च्या सहकार्यांनी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या होत्या. ‘डेस्टिनेशन चिपळूण’ सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. डिजिटल माध्यमांचाही उपयोग करून घेतला होता; पण सतत याला येणारा खर्च कोण करणार? हा मुद्दा अखेरपर्यंत प्रलंबित राहिला. कोकणातील ज्या गावाचे ब्रँडिंग होईल त्या गावाने डिजिटल खर्चाचा भार उचलायला हवा आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करायला हवी किंवा असलेली यंत्रणा हाताशी घ्यायला हवी आहे.
कोकणात राहण्याच्या चांगल्या व्यवस्था आहेत. कोणत्याही आर्थिक पातळीतला पर्यटक येथे आला तर त्याला सेवा मिळू शकेल असे वातावरण आहे. समुद्र ही कोकण पर्यटनाची मुख्य ताकद आहे. यामुळे आपल्याला कोकणातील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवावे लागणार आहेत. कोकणात पर्यटनस्थळी स्थानिकांनी ‘होम-स्टे’ साकारलीत. कोकणातील महिला इथे येणार्या पर्यटकांना रुचकर जेवू घालत असतात. कोकणात काही ठिकाणी अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, काही ठिकाणी डॉल्फिन दर्शन, उंटगाडी, घोडागाडी सुरू असते; पण हे पुरेसे नाही. कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे, कारण पर्यटक येऊन पाहतात त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. कोकणला आम्हाला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे. देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातो तिथे तिथे आपल्याला प्लॅन्ड टुरिझम चालताना दिसते. दुबईसारखे ओसाड वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे आपल्याला ‘थीम्स’ भेटतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित थीमबेस्ड काम व्हायला हवे आहे. कोकणात अशा पायाभूत आणि नैसर्गिक विकासाकडे सरकारने पाहायला हवे आहे. कोकणाचे सौंदर्य कॅश करण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते इथे येऊ लागलेत. या सार्यांचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. जागतिक हेरिटेजचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदुर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात. विजयदुर्गची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉइंट पर्यटकांना पाहायला आवडतील. अॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंट्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरू झालं, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचं प्रभावी मार्केटिंग झालं तर कोकणात परदेशी पर्यटक टक्का वाढेल. तो इथल्या रोजगारनिर्मितीस पूरक ठरेल.
कोकणातलं कौलारू घर, निसर्गानं बहरलेला परिसर, आंब्या-फणसाच्या, माड-पोफळीच्या बागा, शेणानं सारवलेलं अंगण, माड-पोफळींच्या झावळ्यांचा अंगणातला मंडप, घराच्या मागे किंवा पुढे झुळुझुळु वाहणारा पाण्याचा पाट हा कोकणी थाट देशभरातील पर्यटकांच्या हृदयापर्यंत पोहोचायला हवा आहे. शेणानं सारवलेलं अंगण वाळल्यावर त्या ठिकाणी घराच्या गृहिणीने फक्त पांढर्या रंगाने काढलेली रांगोळी किती सुबक आणि सुंदर दिसते. हे अजून किती काळ शब्दांतच सांगायचं? कोकणी पर्यटनात काम करणारा प्रत्येक व्यावसायिक आपल्या एकूण मिळकतीतील किती टक्के वाटा मार्केटिंगवर खर्च करतो? हे फार महत्त्वाचे आहे. पर्यटन ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. त्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. एके काळी मंडणगडची ओळख ‘कोकणातलं अंदमान’ अशी होती. आता त्या भागातील केळशीसह वेळासच्या किनार्यावर कासव महोत्सवासाठी अलोट गर्दी होते. पंधरा-वीस वर्षांपूर्वी आंजर्ले, हेदवी, गुहागर, मुरूड, हर्णे, दाभोळ, जयगड, नांदिवडे, दाभोळ, कर्दे, लाडघर, कोळथरे, भंडारपुळे, देवगड, वेंगुर्ला, जयगड, कुणकेश्वर, तारकर्ली, साखरी-नाटे, पावस, पूर्णगड, वेत्ये, गावखडी आदी अनेक समुद्रकिनार्यांवर फारसे पर्यटक येत नसत. तेव्हा कोकणात जाणं म्हणजे कुलदेवतेच्या दर्शनाला किंवा मे महिन्यात नातेवाईकांकडे आंबे-काजू खायला जाणं असं स्वरूप तेव्हा होतं. अपवाद गणपतीपुळे, मालवण, तारकर्लीचा होता, कारण तेथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची कॉटेज उपलब्ध झाली होती. 20 जानेवारी 1975 रोजी ’पर्यटन विकास महामंडळ’ स्थापन होऊनही कोकणात विशेष पर्यटन गांभीर्य नव्हते. गणपतीपुळेत 1981च्या सुमारास एमटीडीसी सुरू झालं. 1991 गणपतीपुळे विकास आराखडा तयार झाला असावा. तसेच पुढे ते तारकर्ली व मालवणमध्येही झाले. कोकण रेल्वे कार्यरत झाली. काही ठिकाणी सागरी महामार्ग अस्तित्वात आला. सागरी किनार्यावरील गावं थेट महामार्गाला जोडली गेली. ज्या गावांमध्ये फक्त होडीनं जावं लागत होतं तिथे पूल झाले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग येत्या काही वर्षांत पूर्ण होईल. यास्तव कोकणात पर्यटक येऊ लागलेत. त्यात ‘हंगामी’ स्वरूपाची प्रचंड वाढ झाली आहे. ती ‘बारमाही’ बहरायला हवी आहे. अर्थात ‘बारा महिने कोकण पर्यटन’ ही संकल्पना पर्यटकांत आणि इथल्या जनमानसातही रुजायला हवी आहे. त्यासाठी प्रभावी ‘मार्केटिंग’च आवश्यक आहे.