हिंगोली जिल्ह्याचे कृषी वैभव

विवेक मराठी    20-Sep-2024
Total Views |
 @राजेंद्र कदम
 

vivek 
मराठवाड्यातला हिंगोली हा एक महत्त्वाचा जिल्हा. हळद, सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी व हरभरा उत्पादनांत हा जिल्हा अग्रेसर आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात हळदीची मूल्य साखळी निर्माण झाली आहे. वसमत येथील मा. श्री. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत भरीव कार्य हाती घेण्यात आले आहे.
हिंगोली जिल्हा हा संतमहात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत नामदेवांची ही जन्मभूमी(नर्सी नामदेव). संत नामदेवांचे गुरू विसोबा खेचर या जिल्ह्यातले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे आहे. थोर विचारवंत नरहर कुरुंदकर व ग्रामविकासाचे प्रवर्तक, भारतरत्न नानाजी देशमुख यांचा जन्म याच जिल्ह्यातला. अशी ही भूमी कृषी क्षेत्रातदेखील वैभवसंपन्न आहे. हा जिल्हा गोदावरी नदीच्या खोर्‍यात येतो. पैनगंगा, पूर्णा व कयाधू या तीन नद्या जिल्ह्यात वाहतात. याशिवाय दोन मोठे सिंचन प्रकल्प येतात. हळद, सोयाबीन, तूर, हरभरा, करडई, कापूस आणि ज्वारी उत्पादनात हा जिल्हा अग्रेसर आहे. ’हळद’ पीक जिल्ह्याचे मुख्य बलस्थान. हळद पिकाचा विचार केला असता राज्यातील एकूण उत्पादनांपैकी 80 टक्के उत्पादन हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांत होते. हिंगोलीच्या हळदीला अधिक महत्त्व आहे.
 
 
विशेष म्हणजे जिल्ह्यातील वसमत हळदीला भौगोलिकमानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या हळदीची ओळख जगभर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे अर्थकारण हळद या नगदी पिकाशी निगडित आहे. जिल्ह्यात एकूण 32,551 हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड आहे. दत्तगुरू शेतकरी उत्पादक कंपनी, सूर्या शेतकरी उत्पादक कंपनी व गोदा फार्मसारख्या शेतकरी उत्पादक कंपन्या हळद क्षेत्रात काम करत आहेत. यात आता भर पडली आहे ती वसमत येथील मा. श्री. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राची. 14 सप्टेंबर 2022 साली या संशोधन केंद्राची स्थापना झाली. महाराष्ट्र शासनाने या केंद्रासाठी सुमारे 100 कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी तीन टप्प्यांत प्रस्तावित करण्यात आला आहे. 65 एकरांच्या या केंद्रात काही प्रकल्प कार्य हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये हळद प्रक्रियासह इतर सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा स्थापन होणार आहेत. शिवाय वितरण केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.
 

vivek 
 
आठ एकरांत हळदीच्या 44 वाणांची लागवड
 
हळद पीक घेत असताना नेमक्या कुठल्या घटकांमुळे, कोणत्या जातीच्या हळदीचे उत्पादन वाढू शकते, त्या दृष्टीने केंद्राने पावले उचलली आहेत.
 
2024च्या खरीप हंगामात हळद संशोधन केंद्रात आठ एकर क्षेत्रावर हळदीच्या तब्बल 44 वाणांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये ’सेलम’ या वाणाची पाच एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. याखेरीज ’फुले स्वरूपा’, ’प्रतिभा’, ’प्रगती’, ’सुवर्णा’, ’सुदर्शना’, ’लॅकडॉग’, ’पीडीकेव्ही वायगाव’, ’पीतांबर’, ’सोना’, ’रोमा’, ’एनडीएच 98’, ’आरएच 5’, ‘राजापुरी’, ’सुरंजना’, ’एसबी 10843’, ’अलेप्पी सुप्रीम’, ’जलपरी लोकल’, ’उत्तर रागिणी’, ’अरुणाचल लोकल’, ’पंत पिताब’, ’राजेंद्र सोनाली’, ’पंजाब हळदी 2’, ’वायगाव’, ’वर्णा’, ’बीएसआर 1’, ’काळी हळद’, ’जंगली पिवळी हळद’, ’बीएसआर 2’, ’पंजाब हळदी 1’, ’शोभा’, ‘मायदुकर’, ’रंगा’, ’एसीसी 79’, ’सोनाजुली’, ’रश्मी’, ’अमोदा’, ’पीटीएस 10’, ’दुग्गीराला रेड’, ’रिसर्च एचपी’, ’वरणा’ आणि ’आंबे हळद’ इत्यादी 44 हळद वाणांची लागवड करण्यात आली.
 
दर्जेदार हळद बेण्याची विक्री
 
केंद्राने खरीप हंगाम 2023 मध्ये उत्पादित हळदीची ’सेलम’ व ’फुले स्वरूप’ वाणांच्या बेण्याची विक्री केली. या माध्यमातून केंद्राच्या खात्यात 9 लाख 25 हजार रुपये जमा झाले आहेत. शिवाय हेच बेणे खरीप हंगाम (2024) साठी प्रक्षेत्रावरील लागवडीसाठी जवळपास 75 क्विंटल बेणे वापरले आहे. प्रोट्रे लागवडीसाठी प्रक्षेत्रावर 10 क्विंटल बेणे वापरले गेले.
 
 
मराठवाड्यात हळद लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे, शेतकर्‍यांना दर्जेदार व उत्कृष्ट वाणांची उपलब्धता व्हावी यासाठी संशोधन केंद्रामार्फत हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमातून रक्कम रु. 1 लाख 69 हजार 100 रुपये केंद्राच्या खात्यावर जमा झाले आहेत.
 
 
सदर रोपांपैकी दोन हजार रोपे प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. वेगवेगळ्या अंतरांवर ही लागवड असून यातून येणार्‍या उत्पादकतेचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकर्‍यांना शिफारशी देण्यात येणार आहेत.
 
 
25 एकरांवर सोयाबीन बीजोत्पादन
 
केंद्रातील क्षेत्र वाहितीखाली असावे यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून 25 एकर क्षेत्रावर सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये ’फुले संगम’ (केडीएस 726) पाच एकर व ’पीडीकेव्ही आंबा’ (एएमएस 100-39) 15 एकरांवर पायाभूत बीजोत्पादन, तर ’फुले किमया’ (केडीएस 753) जातीच्या वाणांची पाच एकरांवर प्रमाणित बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
 
 
अद्ययावत प्रक्रिया केंद्राची उभारणी होणार
 
या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील हळदीवर प्रक्रिया करण्याचे काम होणार आहे. विशेष म्हणजे हळद उत्पादनानंतर प्रक्रियेचा जो अतिशय कष्टदायक टप्पा आहे तो हळद उत्पादक शेतकर्‍यांचा कमी होणार आहे. त्यासाठी संशोधन केंद्रावर अद्ययावत प्रक्रिया केंद्राची उभारणी होत आहे. सद्यःस्थितीत पारंपरिक पद्धतीने जी हळद शिजवली जाते ती अतिशय अतांत्रिक पद्धतीने शिजवून त्यावर प्रक्रिया केली जाते. हे करत असताना कुठल्याही प्रकारचे तांत्रिक निकष वापरले जात नाहीत. त्यामुळे हळदीची शिजवण योग्य प्रकारे होत नाही व त्यामधील उपलब्ध घटक घटकांचा र्‍हास होतो. शिजवल्यानंतर शेतामध्ये हळद वाळवताना पुरेशी काळजी घेतली जात नाही, परिणामी हळदीमध्ये विविध प्रकारच्या बुरशींचा शिरकाव होऊन अशी हळद खाण्यासाठी योग्य राहत नाही. त्याला स्थानिक बाजारात योग्य भाव मिळत नाही. निर्यातीसाठीही पाठवता येत नाही. यातून मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. संशोधन केंद्रावर उभारणी करण्यात येत असलेल्या अद्ययावत प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून मानवी हस्तक्षेप अतिशय कमी होत असून सर्व तांत्रिक बाजू विचारात घेऊन हळदीवरची प्रक्रिया पूर्ण होत असल्याने अशी हळद शिजवल्यानंतर त्यामधील कुठल्याही घटकाचा र्‍हास न होता, अतिशय उत्कृष्ट प्रतीची हळद तयार होणार आहे.
 
 
प्रक्रिया केंद्राचे असे होणार फायदे
 
हळद उत्कृष्ट प्रतीची, सर्व प्रकारच्या प्रादुर्भावापासून मुक्त असेल तर शेतकर्‍यांना फायदा होतो. हळद विकिरण केंद्रातून प्रक्रिया केल्याने व संशोधन केंद्रावरील शीतगृहामध्ये साठवून ठेवल्यामुळे पुढील तीन वर्षांपर्यंत अशा हळदीला कुठल्याही प्रकारचा डाग लागणार नाही. हळद विक्री व निर्यातीला फायदा होईल. शिवाय हळदीवर योग्य पॅकिंगची व्यवस्था केंद्रात करण्यात येणार आहे.एकूणच हे संशोधन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त, जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
 
 
हळदीचे लस्टर तयार करणार
 
हळदीच्या उत्पादनवाढीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून उत्पादकता चांगली येण्यासाठीसुद्धा या संशोधन केंद्राच्या माध्यमातून काम सुरू आहे. विशेषत: हळद उत्पादक शेतकर्‍यांचे लस्टर तयार करून दर्जेदार, विषमुक्त व निर्यातक्षम हळदीचे उत्पादन करण्यासाठी काम करण्यात येणार आहे.
 
 
हळदीला चांगला बाजारभाव मिळावा, मालाच्या गुणवत्तेबाबत उत्पादक, खरेदीदार आणि निर्यातदार यांच्यामध्ये योग्य समन्वय राहावा यासाठी सर्व निर्यातदार, हळद उत्पादक व्यापारी यांच्या बैठकाही 20 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई येथे माजी खासदार तथा मा. श्री. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदाच आयोजित करण्यात आल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे, 30 ऑगस्ट 2014 रोजी हळदीची दुसरी जागतिक परिषद मुंबईत घेण्यात आली.
 
 
या जागतिक परिषदेत खरेदीदार, निर्यातदार, एनसीडीएस, मसाले उत्पादक, हळद उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी यांचा सहभाग होता. हळदीच्या उत्पादनांना चांगला बाजारभाव मिळावा यासाठी एनसीडीएस यांच्यासोबत सामंजस्य करार आहे. शिवाय हळदीच्या संबंधित सर्व संस्था, विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र व संशोधन केंद्रे यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात येत आहेत.
 
 
अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून या संशोधन केंद्रातून हळद उत्पादक शेतकर्‍यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीत निश्चितच भर पडणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून या भागात निश्चितच सुवर्णक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, अशी अपेक्षा आहे.
 
 
- व्यवस्थापकीय संचालक
मा. श्री. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत, जि. हिंगोली