कृषी समृद्धीचा मार्ग दत्तगुरू फार्म्स

विवेक मराठी    20-Sep-2024
Total Views |

DATTAGURU FARMER
पीक लागवडीपासून ते ग्राहकाच्या ताटापर्यंत अन्न पोहोचविणारी, स्वतःची मूल्यसाखळी विकसित करणारी दत्तगुरू फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. ही 100 टक्के शेतकर्‍यांच्या मालकीची महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीने अल्पावधीतच शेती उत्पादनाची खरेदी व प्रक्रिया उत्पादनात दिशादर्शक कार्य उभे केले आहे.
 
सूर्याजी शिंदे - 8999076332
शेती ही मानव्यकेंद्री आहे. शेतीमध्ये भांडवल, कमी उत्पादकता, वाहतूक, साठवणूक, विपणन, बाजारपेठ हे आर्थिक घटक महत्त्वाचे ठरतात. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीनुसार (2012-13) राज्यात 78 टक्के शेतकरी अत्यल्प व अल्पभूधारक गटात मोडतात. अशा शेतकर्‍यांना अल्प उत्पादनाच्या व कमी भावाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. शेतीचा वाढलेला उत्पादन खर्चाचा मेळ, मजुरांचे घटते प्रमाण, दर, वीज दर, बी-बियाणे, खतांचे वाढते दर पाहता त्या प्रमाणात पिकांना योग्य भाव मिळत नाही. शेतीपुढची नेमकी आव्हाने काय आहेत याचा धांडोळा घेऊन पुढची वाटचाल करावी लागणार आहे. शेतीचे भवितव्य शोधत असताना येत्या काळात अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर केंद्रस्थानी ठेवावे लागणार आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी सामूहिकरीत्या एकत्रित आले पाहिजे.
 
 
‘एफपीओ’ अर्थात ‘शेतकरी उत्पादक कंपनी’ ही शेतीसाठी वरदान ठरणार आहे. शेतकर्‍याला मालक/उद्योजक होण्याची संधी प्राप्त करून देणारी यंत्रणा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून पुढे येत आहे. सहकार तत्त्वात मोठी ताकद आहे. संघटनात्मक कामे केली तर मोठी ताकद निर्माण होते, हे शेतकरी उत्पादक कंपनीतून सिद्ध झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कळमनुरी तालुक्यातील दत्तगुरू फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. होय.
 
 
 
सूर्याजी शिंदे (पांगरा शिंदे, ता. वसमत) व गंगाधरराव शृंगारे (टाकळगव्हाण, ता. कळमनुरी), तानाजी शिंदे, सुरेश देशमुख, चंद्रशेखर अग्रवाल या समविचारी मित्रांनी 1 ऑगस्ट 2020मध्ये दत्तगुरू शेतकरी कंपनीची स्थापना केली. संचालक मंडळात 10 संचालकांसह 3200 शेतकरी सदस्य आहेत. अल्पावधीतच शेतकर्‍यांचा विश्वास संपादन करून दत्तगुरू शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी शेतमालाच्या खरेदीचा उच्चांक निर्माण केला आहे.
 
 
कंपनीची वैशिष्ट्ये
 
कंपनीकडून शेतकर्‍यांच्या दर्जेदार शेतमालाची योग्य दरात खरेदी केली जाते. विशेष म्हणजे शेतकर्‍यांच्या वाहनामध्येचशेतमालाचा भाव ठरविला जातो. शेतकरीहित जोपासून शेतमालाला महा. पी.सी.अंतर्गत हमी भाव केंद्र सुरू करण्यात आले आहे. याद्वारे त्वरित वजन रोखीने पैसे अदा करण्यात येतात. दररोेज दैनिक बाजारभाव प्रकाशित केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप व संकेतस्थळाच्या माध्यमातून ही माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवली जाते. दररोज येणार्‍या वाहनांची/मालाच्या वजनाची नोंद ठेवली जाते. शिवाय मालाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते. शेतमालाच्या खरेदी व विक्रीच्या व्यवहाराची पावती दिली जाते.
 

DATTAGURU FARMER 
 
पाच शेतमालांची खरेदी व विक्री
 
कंपनीमार्फत शेतकर्‍यांकडील हळद, सोयाबीन, तूर, हरभरा व राजमा या पाच शेतमालांची खरेदी व विक्री केली जाते. या शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी करून योग्य बाजारपेठेत पाठवली जाते. हळद देश व परदेशात निर्यात केली जाते. लातूर, नागपूर, सांगली येथील सोया तेल कंपन्यांना सोयाबीनचा पुरवठा केला जातो. हरभरा देशभरात, तर तूरडाळ मिलला पाठविली जाते. या खरेदी-विक्री व्यवहारातून कोट्यवधीची उलाढाल झाली आहे.खरेदी-विक्रीच्या व्यवहारामुळे अनेकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे.
 
 
हळद प्रक्रिया व विक्री
 
संचालक मंडळास शेतमाल खरेदी-विक्रीचा दांडगा अनुभव होता. त्यांनी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली-कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी येथे (मसोड फाटा) सहा एकर जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी गोदामासह शेतमाल स्वच्छता व प्रतवारी, हळद प्रक्रिया व विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालास वाजवी दर दिला जातो. शेतमाल खरेदी व्यवस्थेसाठी कंपनीने हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांतील 100 गावांतील शेतकर्‍यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. यामध्ये दररोज सकाळी दरांची माहिती दिली जाते.
 
 
हळदीचे मूल्यवर्धन
 
कंपनीने हळद खरेदी केंद्र, ग्रेडिंग व डबल पॉलिशिंग प्रकल्प सुरू केला आहे. त्यामुळे मसाला उद्योगांना आवश्यक प्रतीची हळद उपलब्ध होते. 50 किलो वजनी पोत्यांतून खरेदीदारांना पुरवठा होतो. एकूण खरेदीच्या 20 टक्के हळदीपासून संयंत्राद्वारे पावडरनिर्मिती होते. ही हळद 200 ग्रॅम, 500 ग्रॅम, 25 किलो, 50 किलो वजनाच्या पॅकिंगमध्ये बाजारात विक्री होते. या हळदीला परराज्यांत मोठी मागणी आहे.
 
 
राजमाची यशस्वी शेती
 
 
रब्बी हंगामातील पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल व्हावा, यासाठी कंपनीच्या पुढाकारातून 2021-22 या हंगामात राजमा पिकाची लागवड करण्यात आली. याशिवाय लागवड करणार्‍या शेतकर्‍यांची कार्यशाळा घेण्यात आली. कंपनीकडून रास्त भावात बियाणे उपलब्ध करून देत खरेदीची हमी देण्यात आली. अनेक शेतकर्‍यांना एकरी सात ते आठ क्विंटल उत्पन्न मिळाले आहे.
 
208 कोटींची उलाढाल
 
2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने शेतमालाच्या खरेदी व विक्रीतून सुमारे 208 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. या काळातच 36,692 मेट्रिक टन शेतमालाची खरेदी केली.
 
भविष्यातील नियोजन
 
कंपनीला येत्या काळात देशातील सर्वात प्रतिष्ठित कमोडिटी ट्रेडिंग कंपनी बनायचे आहे. नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करून शेतकर्‍यांच्या शेतमालाची उत्पादकता व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. शिवाय डाळ व बेसन मिल स्थापन करण्याचा कंपनीचा मानस आहे.
कळमनुरीसारख्या दुर्लक्षित भागात शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांसाठी उभारलेली ही कृषी मूल्यसाखळी प्रेरणा देणारी आहे.
लेखक दत्तगुरू फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे
व्यवस्थापकीय संचालक आहेत.