हिंगोली जिल्ह्याची मुख्य नदी ही कयाधू आहे आणि ती हंगामी वाहते. यामुळे पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाहायला मिळतो म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेने या नदीला पुनर्जीवित करण्याचे कार्य सुरू केले. सुरुवातीला नदीची अवस्था जाणून घेण्यात आली. कयाधू नदीची एकूण लांबी 99 कि.मी. आहे, तर कयाधू नदीला 154 गावांचा पाणलोट आहे. नदीजवळच्या 154 गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाची रचनात्मक कामे झालेली आहेत.
हिंगोली जिल्ह्यामध्ये सरासरी तीन वर्षांनी एकदा दुष्काळ येतो. जिल्ह्यात सरासरी 700 ते 750 मि.मी. पाऊस पडतो. पेनगंगा, पूर्णा व कयाधू या नद्या जिल्ह्यात वाहतात. पेनगंगा नदी व पूर्णा नदी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतात. या नदीतील निम्मे पाणी जिल्ह्यात, तर निम्मे पाणी शेजारील जिल्ह्यामध्ये वापरतात. कयाधू नदी जिल्ह्याच्या मध्यातून वाहते म्हणून या नदीला ‘जीवनवाहिका’ असे म्हटले जाते. या नदीचा उगम वाशिम जिल्ह्यातील अगरवाडी ह्या गावी झाला, तर नांदेड जिल्ह्यातील चिंचोली या गावी पेनगंगा नदीसोबत संगम झाला आहे. कयाधू नदीची एकूण लांबी 99 कि.मी. आहे. नदी तीव्र उताराची असल्याने व पाणलोट क्षेत्र विकासाची रचनात्मक कामे नसल्याने नदी केवळ जून ते जानेवारीपर्यंतच वाहते. कयाधू नदीची पार्श्वभूमी पाहिली, तर 50 वर्षांपूर्वी नदी बारमाही वाहत होती. उन्हाळ्यामध्ये गावातील मुले पोहायला जायची, तर पालक नदीमध्ये बरू व अंबाडी पिकांची अवशेष भिजत ठेवत असत व काही दिवसांच्या अंतराने त्यापासून ताग काढत असत. ताग दोरी बनविण्यासाठी अंबाडी व बरू झोपडी बनविण्यासाठी वापरत असत; परंतु वाळूउपसा, पाणीउपसा, पाण्याचे सुनियोजन नाही. लोकस्तरावरून पुनर्भरणासाठी प्रयत्न केले जात नाहीत. सतत वृक्षतोड याचे प्रमाण जसजसे वाढत गेले तसतसे नदीचा प्रवाह कमी होत गेला. प्रवाह इतका कमी झाला की, आता फक्त पावसाळ्यातच नदी वाहताना दिसते.
कयाधू नदी आणि उगम संस्था
कयाधू नदीची एकूण लांबी 99 कि.मी. आहे, तर कयाधू नदीला 154 गावांचा पाणलोट आहे. कयाधू नदीला येऊन मिळणारे या गावातील 1125 कि.मी. अंतराचे ओढे, नाले व ओहोळ आहेत. या नाल्यातील 224 कि.मी. अंतरावर खोलीकरणाचे काम झालेले आहे, तर नवीन कामातून 235 कि.मी. अंतरावर काम होण्यास वाव आहे. कयाधू नदीजवळच्या 154 गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाची रचनात्मक कामे झालेली दिसून आलेली आहेत व त्याच्यातील सध्याचा जलसाठा व भविष्यकालीन जलसाठा ह्याच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. ह्या गावात जुने सिमेंट नाला बांध 577, गेटचे बंधारे 76, दुरुस्तीलायक बंधारे 46, गाळाने उथळ झालेले बंधारे 427, शासनामार्फत गाळ काढण्यात आलेले बंधारे 87 आहेत. तसेच माती नाला बांध 458, त्यातील तुटलेले 31 व गाळ काढण्यायोग्य 366 बंधारे असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
उगम ग्रामीण विकास संस्थेकडून 154 गावांमध्ये कयाधू नदीला जिवंत करण्यासाठी गावातील समुदायासोबत बैठका घेण्यात आल्या. त्यांना पाणीबचत कशी केली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. विविध उपक्रमांद्वारे गावकर्यांना पाण्याचे महत्त्व सांगितले. जमीन ही आपली बँक आहे. जेवढा पाऊस बँकेत (जमिनीत) जमा करू तेवढाच नियोजनबद्ध वापरल्यास दुष्काळावर मात करता येऊ शकते. म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेने तांत्रिक तज्ज्ञाकडून 154 गावांमध्ये नवीन सलग समतल चर 1139 हेक्टरवर होऊ शकतात, तर नवीन लूज बोल्डर 13570, गॅबियन 1375, पाइप बंधारे 147, अर्थन मॉडेल 3655, नवीन सिमेंट नाला बांध 62, डोह मॉडेल 1200, रिचार्ज शाँफ्ट व विहीर व बोअरवेल रिचार्ज 7700 ही प्रस्तावित कामे होऊ शकतात हे गावकर्यांच्या लक्षात आणून दिले. उगम संस्थेकडून प्रत्येक गावातील नकाशे तयार केले गेले असून त्या नकाशावर गावातील झालेली कामे व प्रस्तावित कामे ह्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. तसेच अस्तित्वात व प्रस्तावित रचनात्मक काम नकाशावर सर्व्हे नंबरसहित नोंदविले आहे. अस्तित्वात असलेले व प्रस्तावित बंधार्यामध्ये किती पाणीसाठा राहू शकतो याचे मोजमाप करण्यात आलेले आहे. 154 गावांतील पाणलोट क्षेत्राचे रचनात्मक कामाचे नकाशे तयार करून पूर्ण आहेत.
सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. कयाधू नदी जिवंत करण्यासाठी ही कामे लोकसहभागातून किंवा शासकीय मदतीतून होणे गरजेचे आहे. त्यातून हिंगोली जिल्हा दुष्काळप्रवण क्षेत्रातून बाहेर येण्यास मदत होऊ शकते. तसेच प्रत्यक्ष 48332 कुटुंबे ही पाणीदार गावाचे मानकरी असतील. त्यांची 242512 ही लोकसंख्या आहे. या गावाचे 113100 इतके क्षेत्रफळ आहे, तर 99061 इतके क्षेत्रफळ पाण्याखाली येईल.
तसेच वन्यप्राणी, वनस्पती, मधमाश्या, फुलपाखरे, मासे, झिंगे, पक्षी, कीटक यांचे अधिवास वाढण्यास मदत होईल. हिंगोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक हा कमी आहे. आर्थिक स्थिती वाढविण्यासाठी कयाधू नदीला पुनरुज्जीवित लोकसहभागातून करणे गरजेचे आहे व लोकचळवळ उभी करण्यासाठी पाईकराव सरांकडून प्रयत्न सुरू आहेत. कयाधू नदी जिवंत झाल्यास हिंगोली जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल यात काही शंकाच नाही.
पाणी दिंडीतून प्रबोधन
लोकचळवळीसाठी उगमने पाणी दिंडीचे आयोजन केले होते. दिंडी कयाधू नदीच्या उगमापासून ते कळमनुरी तालुक्यातील सोडेगावापर्यंत म्हणजेच एकूण 84 कि.मी. नदीच्या पात्रातून चालत 10 दिवसांमध्ये 100 कार्यकर्त्यांनी पायदळ चालून पूर्ण केली. दरम्यानच्या काळात नदीपात्राच्या जवळच्या गावात सकाळी व संध्याकाळी जाणीव जागृतीचा कार्यक्रम घेऊन लोकांना पाण्याबद्दल संवेदनशील करण्यात येत होते तसेच नदी हंगामी होण्याची कारणे व उपाय चर्चेतून समजून घेऊन लोकांची पाणी चळवळीबद्दल समज विकसित करण्यात आली. तसेच तांत्रिक टीमकडून करण्यात आलेल्या कामांची मांडणी गावकर्यांसमोर करण्यात आली.
निसर्गातून मानवाच्या अन्न, वस्त्र व निवारा ह्या प्राथमिक गरजा पूर्ण होऊ शकतात; पण मानवाची हाव पूर्ण होऊ शकत नाही आणि हाव इतकी प्रचंड प्रमाणात वाढली आहे की, गावात असलेली सर्व जंगले नामशेष झाली आहेत, तर शहरातील जंगल तोडून तिथे वस्त्या निर्माण झाल्या आहेत. वृक्षतोडीचा परिणाम पर्जन्यमानावर झाला, तर पडलेला पाऊस मुरविण्यासाठी झाडाच्या मुळांची मदत होते; पण झाडेच राहिली नाहीत म्हणून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण वाढले व त्यासोबत मातीसुद्धा वाहून जाऊ लागली. मातीचा एक इंच थर तयार होण्यासाठी 300 ते 500 वर्षे लागतात; परंतु एका पावसाळ्यात पाच इंचांपर्यंत माती वाहून जाते. निसर्ग आपल्याला जगवण्यासाठी तत्पर आहे. मग आपण निसर्गाला का जगवत नाही, हा प्रश्न निर्माण होतो. याची छोटी कृती म्हणजे जयाजी पाईकराव सरांनी कयाधू नदीला पुनरुज्जीवित करण्याचे स्वप्न पाहिले.
आता महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करण्यासाठी मजुरांना एकत्रित करण्यात आले आहे, त्यासाठी सर्व मजूर वर्ग कामाची मागणी करेल वआराखड्याप्रमाणे कामे होतील. तसेच वृक्ष लागवड, गवत संवर्धन, पारंपरिक वाण जतन असे उपक्रम राबवून नदीला पुनर्जीवित केले जाईल.
जलसंवर्धनातून गवताचे कार्य
गवत ही दुर्लक्षित परिसंस्था आहे. एके काळी मोठ्या प्रमाणावर पडीक क्षेत्र होते. त्याचा वापर कुरण म्हणून शेतकरी करीत होते. कुटुंबाच्या विभागणीबरोबर कुरण क्षेत्राची विभागणी झाली. शेतीची जवळपास कामे तंत्रज्ञानामुळे होऊ लागली, त्यामुळे कुरण क्षेत्र नष्ट करून ते शेतीसाठी वापरले जात आहे. या कुरण क्षेत्राबरोबरच बहुतांश गवताच्या प्रजाती संपुष्टात आल्या. कंपनीने शेतकर्यांचे कष्ट कमी करण्यासाठी तृणनाशके बाजारपेठेत उपलब्ध करून दिली. श्रम व वेळ वाचविण्यासाठी शेतकरी तृणनाशकांचा वापर करीत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गवत नष्ट केले जात आहे. गवताबरोबरच गवतावर अवलंबून व आधारित असणारे फुलपाखरे, कीटक, सरपटणारे प्राणी, मधमाशा इ. जैवविविधतेचे प्रमाण कमी झाल्याची खूप निरीक्षणे व उदाहरणे आहेत. गवतामुळे अन्नसाखळी टिकून राहण्यासाठी मदत होते.
पूर्वी कुरण क्षेत्राचे प्रमाण जास्त होते म्हणून पशुधनाची संख्या जास्त होती. अगदी अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने पशुधन पाळणार्या शेतकर्यांची संख्या कुरण क्षेत्राबरोबर कमी झाली. पूर्वी कुरण क्षेत्रे होती. त्याचा वापर गवत संवर्धन करून त्याची चारा बँक तयार केली जायची. चारा काढून झाल्यावर ते कुरण वणवा पेटून देऊन सर्व नष्ट केले जायचे. वणव्यात गवताबरोबर असंख्य सूक्ष्म जीव जळून जायचे. तसेच गवतावर आधारित जीवसुद्धा नष्ट व्हायचे. मात्र त्या वेळी पडीक क्षेत्राचे प्रमाण जास्त असल्याने दुसर्या कुरणातील जीव परत त्याचे अस्तित्व निर्माण करायचे. यातून असे लक्षात येते की, शेतकरी चारा म्हणून गवत ठेवत.
कयाधू नदीकाठावरील
गवताचे प्रकार
मारवेल, पिवळा मारवेल, पसरट मारवेल, जोंधळी, पवना, डोंगरी, बोंडी, शिकाई, कुंदा, हाराळी, स्टायलो, बुरसाळी, दशरथ, पाल, चिकटा, भरडा, काळी कुसळी, खांडसुर्या, रेशीम काटा, लीचडा, केना, बिंडी, कोल्हा शेपूट, फुलराणी, कांडी गवत, गोंडवेल, लवंग, लव्हाळ, बोट्या, रईलोना, तांबिट, गांधी, नाचणी, पंधाड व पांढरी कुसळी इ. प्रजातींचे प्रमाण आहे.
काही वर्षांपूर्वी नदीचे पात्र अरुंद होते; पण दरवर्षीच्यापुरामुळे नदीकाठची माती वाहून जाते. त्यामुळे नदीचे पात्र रुंद झाले. नदीच्या पात्राच्या तीरेवर माती नदीच्या पात्रात आल्यामुळे नदीपात्र उथळ झाले आहे, तर काही ठिकाणी नदीचा प्रवाह बदलला आहे. या सर्व बाबींपासून बचाव करण्यासाठी नदीकाठावर गवताचे प्रमाण असणे गरजेचे आहे. गवतामुळे माती व पाणी संवर्धन होते तसेच नदीमध्ये वाहून येणार्या गाळाला आळा बसतो.
नदीला पुनर्जीवित करण्यासाठी नदीला वाहून येणारे ओघोळ याच्यावर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे होणे गरजेचे आहे. या कामामधून पडणारे पाणी जमिनीमध्ये मुरविण्यासाठी मदत होऊ शकते. जी पाणलोट क्षेत्र विकासाची कामे होतील त्यातून निघणार्या मातीवर तृण लागवड केली जाऊ शकते व त्या रचनात्मक कामाची वयोमान वाढण्यास मदत होते. पाणी संवर्धन करण्यासाठी अधिक काळ रचनात्मक कामे उपयोगात येऊ शकतात.
गवत हा पाणी संवर्धन व माती संवर्धन करण्यासाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. गवताची उंची कमी असल्याने व थोंब करून राहत असल्याने वाहणारे पाणी अडविण्यात त्यांची मोठी भूमिका आहे. तसेच जे पाणी अडते त्या पाण्याला मुळाच्या आधारे जमिनीत मुरवितात. गवताचे थोंब हे असंख्य मुळांचे असते, त्यामुळे हे मूळ मोठ्या प्रमाणात माती धरून ठेवतात. याच कारणाने डोंगरावरील पाणलोट क्षेत्राच्या सलग समतल चरामधून काढलेल्या मातीवर गवत लावतात. हे गवत डोंगरावरील मातीला वाहून जाऊ देत नाहीत. तसेच नदीच्या काठावर गवताच्या प्रजातीचे संरक्षण केल्याचे निरीक्षण याच कारणाने असल्याचे दिसते.
एका हेक्टरवरील गवताचे प्रमाण जर 1 मिमी पाऊस पडला तर 250000000 लिटर पाऊस संवर्धन करते. 25 कोटी लिटर पाण्याची रक्कम प्रति लिटर 20 रु. गृहीत धरली तर 5000000000 (5 अब्ज) रुपयांचा फायदा केवळ एक हेक्टरपासून मिळतो. मात्र पाणी फुकट मिळते, त्यामुळे याचा विचार केला जात नाही; पण पाणी पुनर्भरण प्रक्रियेमध्ये गवताचे पाणी संवर्धनामध्ये खूप महत्त्व आहे. गवत क्षेत्रामधील पडणारा चार तासांचा पाऊस व इतर ठिकाणी पडलेला 12 तासांचा पाऊस हा सम प्रमाणात जमिनीमध्ये मुरतो. म्हणजेच गवताच्या उपलब्धतेमुळे तीनपट पाणी संवर्धन होते. तसेच एका गावठाणच्या क्षेत्राइतके जर कुरण क्षेत्र आहे, कुरण क्षेत्रावर जर 16 तास पाऊस पडला, तर त्या गावाला वर्षभर लागणारे पाणी कुरण क्षेत्र संवर्धन करते.
नदी व ओढ्याकाठावरील गवताळ पट्ट्याचे संवर्धन
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, नवी दिल्ली, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कयाधू नदी व ओढ्याकाठावरील गवताळ पट्ट्याचे संवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कयाधू नदीकाठावर मारवेल, पवना, जोंधळी व कुंदा अशा काही पोषक गवतांच्या जाती आहेत. या गवतांचे प्रकार पशुधनासाठी पोषक आहेतच; पण जमिनीची माती आणि कस टिकून ठेवण्यासाठीही पूरक आहेत. गेल्या पाच वर्षांपासून उगम या प्रकल्पावर कार्यरत असून लोकांचे संघटन, त्यांचेमनपरिवर्तन, जाणीव जागृती या सर्व आघाड्यांवर सध्या काम सुरू आहे. शेतकरी थडीचा वापर शेतीसाठी करायचे. त्यासाठी गवत नष्ट केले जायचे; पण आता हळूहळू मानसिकता बदलत आहे. त्यांना थडीचे महत्त्व पटले आहे. इतर पिके घेऊन जेवढे उत्पन्न घेतो तेवढेच उत्पन्न गवताच्या जोपासनेतून पशुधनासाठी चारा आणि दुग्ध व्यवसायातून मिळू शकते हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्याचप्रमाणे गवतामुळे नदीत वाहून जाणार्या मातीचे प्रमाण कमी होऊन नदीचे पात्र ठरावीक राहणार आहे. पूर्वी कुरण क्षेत्र कमी केल्यामुळे नदीच्या काठावरील बरीच माती वाहून गेल्याने नदी रुंद झाल्याचे निरीक्षण आहेत. हे कमी कुरण क्षेत्र वाढविल्यामुळे नदी पात्र ठरावीक ठेवणे शक्य आहे हे शेतकर्यांना समजले आहे. सामगा ते सोडेगाव अशा बारा गावांतून सध्या उगम कार्यरत आहे.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचे व कुरण क्षेत्राचे तुकडे झाले. कुरण क्षेत्र नष्ट करून शेतकरी शेती करीत होते. त्यामुळे स्थानिक व दुर्मीळ जैवविविधता नष्ट होऊ लागली. गवतामुळे टिकून राहिलेली माती नदीच्या पुरामुळे वाहून जाऊ लागली. मातीचा एक इंचाचा थर निर्माण होण्यासाठी 100 ते 300 वर्षे लागतात आणि एका पावसाळ्यामध्ये सरासरी चार इंच माती वाहून जाऊ लागली. ही एक गंभीर समस्या निर्माण झाली होती. म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेने बायफ संस्थेच्या मदतीने गवताची पौष्टिकता जाणून घेतली. हिंगोली जिल्ह्यातील मुख्य पीक म्हणून सर्व शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. म्हणून उगम संस्थेने सोयाबीनपासून मिळणारे उत्पन्न आणि गवतापासून मिळणारे उत्पन्न यांचा तुलनात्मक अभ्यास 20 शेतकर्यांच्या माध्यमातून पूर्ण केला व शेतकर्यांसमोर मांडला आहे. तेव्हा असे लक्षात आले की, सोयाबीन पिकाच्या दुप्पट उत्पन्न हे मारवेल गवतापासून मिळते. जेव्हा शेतकर्यांसमोर हे मांडले तेव्हा शेतकर्यांचा विश्वास बसत नव्हता. आता 12 गावांतील 565 शेतकर्यांच्या मदतीने 317 हेक्टर कुरण क्षेत्र निर्माण केले आहे. 12 गावांतील पाच गावांमध्ये दूध संकलन केंद्रे आहेत. 50 टक्के शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना नियमित पैसा मिळतोय. गवत संवर्धनामुळे शाश्वत उपजीविका मिळाली आणि आता शाश्वत ग्रामीण विकासाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.
लेखक उगम ग्रामीण विकास संस्थेचे
कार्यक्रम समन्वयक आहेत.