दुधाची विक्री न करणारे गाव येहळगाव गवळी

विवेक मराठी    21-Sep-2024
Total Views |
@गणेश मंदाडे
महाराष्ट्रातील अनेक गावांना समृद्ध इतिहास आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. हिंगोली जिल्ह्यातील येहळगाव गवळी या गावात दुधाचे उत्पादन घेतले जाते; पण त्याची विक्री केली जात नाही. शेकडो वर्षांपासून ही परंपरा गावकर्‍यांनी जपली आहे. या गावात दुधाची विक्री का केली जात नाही? त्यामागचे कारण काय? याविषयी जाणून घेऊ या.
milk
 
मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्याची ऐतिहासिक व आध्यात्मिक अशी ओळख आहे. संत नामदेव, विसोबा खेचर व संततुकामाई यांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झाली आहे. औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. याखेरीज नरसीनामदेव, कानिफनाथ गड, दिगंबर जैन मंदिर आदी स्थाने हिंगोली जिल्ह्याच्या वैभवात भर घालतात. याच जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येहळगाव गवळी हे असेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव. या गावात बहुतांश नंद गवळी समाजाचे लोक राहतात. गावची लोकसंख्या 2500 आहे. गावात भगवान श्रीकृष्णाचे जागृत मंदिर आहे. गावकर्‍यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. गावाचे 10 टक्के क्षेत्र बागायती आहे. उर्वरित क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आदी पिकांचे, तर रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा व गव्हाचे उत्पादन घेतले जाते. गावात सहावीपर्यंत शाळा आहे. नव्या पिढीचा शिक्षणाकडे कल आहे. येथील तरुण भारतीय सैन्यदल, शिक्षक, नायब तहसीलदार आणि शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पशुपालन हा इथल्या गावकर्‍यांचा मुख्य व्यवसाय आहे.
 
अशी एक परंपरा
 
काळाच्या ओघात एखाद्या घटनेमुळे प्राचीन परंपरेची मुळे उखडली जातात. ती दुसरीकडे रुजतात; पण सगळीच मुळे काही उखडत नाहीत. काही तेथेही घट्ट टिकून राहतात आणि आपल्या अस्तित्वाच्या खुणांनी इतिहास जागा ठेवतात. असेच काही येहळगावात आढळते. या गावातील गावकरी स्वतःला नंदकुळाचे (श्रीकृष्ण) वंशज मानतात. आपले गोकुळ सुदृढ आणि निरोगी राहावे म्हणून गोकुळातील दुधविक्रीला श्रीकृष्णाचा विरोध होता. त्यामुळे गवळणीच्या मडक्यात असलेले दूध मथुरेला जाऊ नये यासाठी श्रीकृष्णाने गवळणींचे दुधाचे घडे फोडले होते. श्रीकृष्णाने दिलेला संदेश पालन करणारे हे गाव आहे.
 
 
milk
 
या गावात नव्वद टक्के घरे ही गवळ्यांची आहेत. गावकरीस्वतःला श्रीकृष्णाचे वंशज समजतात. गाईचे दूध, ताक, तूप, शेण व गोमूत्र हे पंचगव्य औषध आहे, यातच सर्व आजारांचे निराकरण आहे. पूर्वी पशुधनावरच शेतकर्‍यांची, गावाची, राज्याची श्रीमंती मोजली जायची. त्यामुळे गोमाता आणि शेती परस्परावर अवलंबून आहेत. भगवान श्रीकृष्णानेसुद्धा गाईंचा महिमा वाढविला. गवळ्याचा पोर म्हणून गोकुळात वाढला. दुधाचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळेच या गावात मुबलक प्रमाणात दूध उपलब्ध राहावे, यासाठी शेकडो वर्षांपासून दुधविक्री करत नाही. महत्त्वाचे म्हणजे एकही नंद गवळी समाजातील ग्रामस्थ दुधाची विक्री करीत नाही. एखाद्याला दुधाची गरज भासल्यास त्याला मोफत दूध येथील ग्रामस्थ देत असतात. या परंपरेला फाटा देऊन दुधविक्री केल्यास त्यांच्या घरी काही अशुभ घटना घडल्या आहेत. दूध विकले जात नाही म्हणून गावात दूध डेअरी, चहा दुकान नाही. किराणा दुकानातही दुधाची विक्री केली जात नाही. गावात दूध घेण्यासाठी कोणी आले तर त्याला कोणत्याच घरी दूध विकत दिले जात नाही. कामापुरते दूध मोफत दिले जाते, अशी माहिती माजी सरपंच राजाभाऊ मंदाडे यांनी दिली.
 
गावात 400 हून अधिक पशुधन
 
या अनोख्या गावात 400 हून अधिक पशुधन आहे. यामध्ये 200 पेक्षा अधिक गाई व 100 हून अधिक वासरे आणि 65 हून अधिक बैलजोड्या आणि 30 पेक्षा अधिक म्हशी आहेत. विठ्ठलराव मंदाडे या पशुपालकाकडे सर्वाधिक 30 गाई आहेत. गावात दररोज 500 लिटरपेक्षा अधिक दुधाचे संकलन होते; पण त्याची विक्री केली जात नाही. यामध्ये गाईचे दूध जास्त आहे. हवे तेवढे दूध काढून उरलेले सर्व दूध पिण्यासाठी वासराला सोडले जाते. गावातील आबालवृद्ध रोज आहारात दुधाचा वापर करतात. उर्वरित दुधाची विक्री येथील एकही ग्रामस्थ करीत नाही. गावात दुधापासून तूप बनवले जाते. 1000 ते १५००  रुपये किलो दराने तुपाची विक्री केली जाते. गावातील प्रत्येक जण गाईला आपल्या कुटुंबातील सदस्य मानतो. भाकड गाई व म्हशींना बाजारात विकले जात नाही. गाईंची शेवटपर्यंत काळजी घेतली जाते. मुख्यतः गावातील ग्रामस्थांची आर्थिक परिस्थिती फार चांगली आहे अशातला भाग नाही. अशा परिस्थितीतही गाई सांभाळण्याचा आणि त्यांचे दूध न विकण्याचा गवळ्यांच्या मनाचा मोठेपणा आणि जपलेली परंपरा वाखाणण्यासारखी आहे.
 

milk 
 
कृष्णजन्माष्टमी हा वार्षिक उत्सव
 
 
येहळगाव गवळी गावातील ग्रामदैवत भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे कृष्णजन्माष्टमी अर्थात गोपाळकाला हा वार्षिक उत्सव असतो. यानिमित्ताने मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. पहिल्या दिवशी मंदिरात श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते. रात्री उशिरापर्यंत भजन, कीर्तन व प्रवचनांचे आयोजन केले जाते. दुसर्‍या दिवशी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या वेळी भविकांना मंदिराच्या वतीने प्रसादवाटप केले जाते.
 
 
श्रीकृष्ण मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार
 
 
गावात भगवान श्रीकृष्णाचे प्राचीन मंदिर होते. मंदिर जुने झाल्याने ग्रामस्थांनी मंदिराचा सुमारे एक कोटी रुपये लोकवर्गणीतून जीर्णोद्धार केला आहे. लोकवर्गणीतून मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. मंदिरात भगवान श्रीकृष्ण व प्रभू रामचंद्राच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंदिराच्या कळसाचे काम अतिशय सुबक व आकर्षक झाले आहे. याशिवाय मंदिरात आकर्षक सभामंडप उभारण्यात आले आहे.
 
 
ट्रॅक्टरांचा गाव म्हणून लौकिक
 
आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने मानवी जीवनाची दिशा पार पालटून गेली आहे. यात कृषी क्षेत्रसुद्धा मागे राहिले नाही. ‘दुधविक्री न करणारे गाव’ म्हणून प्रसिद्ध पावत असलेल्या येहळगाव गवळीची ‘ट्रॅक्टरांचा गाव’ म्हणून पंचक्रोशीत अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. दोन-अडीच हजार लोकसंख्येच्या या गावात तब्बल 35 ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे गावातील शेती विकसित होण्यास मदत होत आहे. शेतातील नांगरणी, वखरणी, पेरणी व मळणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
 
मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपले वेगळेपण जपणार्‍या हिंगोली जिल्ह्यातल्या या छोटा गावाची कहाणी अचंबित करणारी आहे.
 
 
या गावात दूध न विकण्याची परंपरा
येहळगाव गवळी गावात
तूप प्रकल्प उभा राहावा
 
- राजाभाऊ मंदाडे
 
 
milk
दूध न विकणारे गाव म्हणून येहळगाव गवळी गावचा लौकिकमहाराष्ट्रभर पसरत आहे. या गावात दूध न विकण्याची परंपरा अजूनही टिकून आहे. या परंपरेला ग्रामस्थांनी स्वतःसाठी जिवंत ठेवले आहे. या ठिकाणी दररोज 500 ते 600 लिटर दूध संकलन होते. ही उपलब्धता लक्षात घेता दुधाचे मूल्यवर्धन होणे अपेक्षित आहे. त्यासाठी शासनाचा पुढाकार हवा. केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या ‘व्होकल फॉर लोकल’ या मोहिमेला चालना देण्यात येत आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता येहळगाव गवळी या गावात शासनाच्या पुढाकारातून तूप प्रकल्प उभा राहणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे गावातील दुभत्या जनावरांची संख्या तर वाढेलच, शिवाय स्थानिक महिला व युवकांना रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.
 
- माजी सरपंच, येहळगाव गवळी, ता. कळमनुरी
 
8007454344