दहशतवादी तात्पुरत्या दहशतीखाली

विवेक मराठी    26-Sep-2024   
Total Views |

Israel
पेजरहल्ला घटनेनंतर सर्वात आधी प्रश्न पडतो की, मुळात आजच्या जगात पेजर्ससारखी जुनी व्यवस्था संदेशवहनासाठी का वापरत असतील? पेजरहल्ल्यासारखी घटना अनपेक्षितपणे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर घडल्यामुळे हिजबुल्लासारखी दहशतवादी संघटनाच दहशतीखाली आल्याचे चित्र असले, तरी आगामी काळात इराणच्या मदतीच्या आधारावर ते लवकरच पुन्हा सज्ज होऊ शकतात.
18 सप्टेंबर 2024 रोजी लेबेनॉनमध्ये पेजरचे स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या; तेव्हा त्याचे गांभीर्य व व्याप्ती उशिराने लक्षात आली. पेजर सहसा कमरेला अडकवले जात असल्यामुळे ‘ऑपरेशन बिलो द बेल्ट’ असे या मोहिमेला अनधिकृतपणे दिलेले नाव लोकप्रिय झाले. ही बातमी विरते न विरते तोच वॉकी-टॉकी संचांचे स्फोट झाल्याचेही कळले. एव्हाना स्फोटांची ही मालिका थांबली आहे. हे लिहितेवेळी पन्नास जण मृत्युमुखी पडल्याचे, तीनशे जण अद्याप गंभीर स्थितीमध्ये असल्याचे आणि तीन हजार लोक रुग्णालयात असल्याचे सर्वसाधारण चित्र आहे. या स्फोटांमध्ये इराणचे लेबेनॉनमधील राजदूत जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. हिजबुल्ला आणि इराण यांचे घनिष्ठ संबंध पाहता हिजबुल्लाचा पेजर त्यांच्याकडे कसा, हा प्रश्न कोणालाच पडला नसेल.
 
 
कारवायांचे अतिघातक स्वरूप
 
‘डाय हार्ड’ या चित्रपटाच्या चौथ्या भागामधील दहशतवाद्यांकडून लॅपटॉपचे स्फोट घडवल्याच्या प्रसंगात प्रत्यक्षात घडवलेल्या घटनांचे प्रतिबिंब होते. म्युनिक ऑलिम्पिकमध्ये इस्रायलच्या खेळाडूंना ठार करण्याच्या कटात सहभागी असलेल्यांपैकी एकाचा काटा काढताना फोनमध्ये स्फोटके लावली होती. सर्वसाधारणपणे असाच प्रकार आताच्या पेजर आणि वॉकीटॉकी संचामध्ये घडवून आणलेल्या स्फोटात झाला. दहशतवादी हल्ले असोत, दहशतवादाचा बदला घेणे असो किंवा आपल्याला धोका पोहोचणार हे ओळखून आधीच केलेली कारवाई असो, हत्या घडवून आणण्याचे प्रकार कोणत्या थराला गेले आहेत याची काही उदाहरणे देणे प्रस्तुत ठरेल. 2004 मध्ये चेचन्यामध्ये रशिया समर्थक अध्यक्ष अहमद कॅडिरोव हे लष्करी संचलनादरम्यान बाँबस्फोटात मारले गेले. हा बाँब हे लष्करी संचलन होण्याच्या ठिकाणी केलेल्या दुरुस्तीदरम्यानच्या बांधकामात काँक्रीटमध्ये लपवला गेल्यामुळे कुत्र्यांना व धातुशोधक यंत्रांना शोधता आला नव्हता. इराणचे एक प्रमुख लष्करी अधिकारी कासेम सुलेमानी यांना 2020 मध्ये ड्रोनहल्ल्यात मारण्यात आले. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे प्रमुख समजले जात असलेले शास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादे यांना त्याच वर्षी उपग्रहाद्वारे नियंत्रित मशिनगनने ठार करण्यात आले. इराणी सैन्याचे सर्वात मोठे अधिकारी मोहमद रझा झहेदी यांच्या गाडीवर मिसाइलचा मारा करून या वर्षी एप्रिलमध्ये दमास्कस-सीरियामध्ये मारण्यात आले. या वर्षी ऑगस्टमध्ये पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासचा प्रमुख इस्माइल हानिये त्याच्या तेहरानमधील निवासस्थानी ठेवलेल्या बाँबचा स्फोट होऊन मारला गेला की त्याच्या निवासस्थानावर मिसाइलचा हल्ला केला याबाबत तर्क लढवले गेले.
 
याव्यतिरिक्त एक महत्त्वाचे उदाहरण द्यायचे तर 2021 मध्ये अमेरिकेच्या एफबीआयने एएनओएम नावाची मोबाइल फोन बनवणारी कंपनी स्थापन केली होती. या फोनवरून केलेले संभाषण एनक्रिप्टेड म्हणजे संपूर्णपणे सुरक्षित असल्याचे भासवले गेले तरी प्रत्यक्षात ते जसेच्या तसे एफबीआयकडे पोहोचवण्याची व्यवस्था त्यात होती. काही गुन्हेगारांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत जगभरातल्या तीनशे टोळ्यांमध्ये बारा हजारांपेक्षा अधिक फोन विकले गेले. त्यातून ड्रग्जच्या व्यवहारांसह सर्व प्रकारच्या गुन्ह्यांसंबंधीचे प्रत्यक्ष आणि प्रचंड प्रमाणावर पुरावे पुरवणारे संभाषण एफबीआयच्या हाती लागले होते.
 

Israel  
 
पेजरमध्ये स्फोटके कशी आली?
 
तैवानी कंपनीकडून या पेजरचे सुटे भाग बनवले गेले आणि हंगेरीतील एका कंपनीमध्ये त्यांची जोडणी केली गेली असे उघड झाले आहे. संशय येऊ नये याकरिता ही कंपनी काही वर्षांपूर्वी स्थापन करून ठेवण्यात आली होती. ही जोडणी करताना त्यांच्यात स्फोटके पेरली गेली, असे सुरुवातीला आलेल्या वृत्तांद्वारे कळले. या सर्व पेजर्सना कळीचे संदेश पाठवून त्याद्वारे हे स्फोट घडवण्यात आले. गरम होण्यामुळे मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट होऊन कोणी जखमी होण्यासारखा हा प्रकार नव्हे.
 
 
तीन हजारपेक्षा अधिक पेजर्समध्ये स्फोटके पेरण्याचे काम साधेसुधे नव्हे. हे काम केवळ इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे असणे शक्य नाही. हिजबुल्लाने सदर पेजर्स तैवानी कंपनीकडून विकत घ्यायचे ठरवल्यावर त्यांची जोडणी वर उल्लेख केल्याप्रमाणे हंगेरीतील कंपनीमार्फत करून घेण्याचे ठरवले, तरी प्रत्यक्षात ते हंगेरीतच करायला हवे असे नव्हते. याकामी इस्रायली संरक्षण दलांच्या (आयडीएफ - इस्रायल डिफेन्स फोर्सेस) अभियांत्रिकी विभागाचे सहकार्य मिळाले असल्याची शक्यता आहे. मागच्या वर्षीच्या हमासच्या हल्ल्यांच्या वेळी आणि 1973 मध्ये अरब राष्ट्रांनी मिळून योम किप्पूर या सणाच्या तोंडावर इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांच्या वेळी इस्रायली गुप्तचर यंत्रणांचे साफ अपयश दिसले होते. त्या पार्श्वभूमीवर या पेजरस्फोटांच्या कारवाईमध्ये विविध इस्रायली यंत्रणांमध्ये मोठी सुसूत्रता दिसणे याचे फार मोठे महत्त्व सांगितले जाते.
 
 
मुळात आजच्या जगात पेजर्ससारखी जुनी व्यवस्था संदेशवहनासाठी का वापरत असतील, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. उपग्रहाच्या नेटवर्कवर आधारित चालणारी स्मार्टफोनची यंत्रणा भेदून सदर फोनधारकाचे ठिकाण कळणे शक्य होते. त्यामुळे हिजबुल्ला या संघटनेने केवळ आपल्या सदस्यांपुरतेच नव्हे; तर त्यांच्याशी संपर्क ठेवावा लागत असलेल्या पुरवठादारांसारख्या बाह्य एजन्सींसाठीदेखील या यंत्रणेचा वापर करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.
 
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल?
त्याची संकल्पना काय?
अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा? पुस्तकाची प्रत आजच नोंदवा.
पुस्तकाची मूळ किंमत – रु. 250/-
सवलत मूल्य – रु. 225/-
https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/
 
 
 
हिजबुल्लाला पेजर्स पुरवण्याच्या संदर्भात दोन नावे उघडकीस आली. पहिले नाव आहे मूळचा केरळचा आणि आता नॉर्वेचा नागरिक असलेला रिन्सन जोस याचे. हे पेजर्स तैवानच्या गोल्ड अपोलो कंपनीने बनवल्याचे सुरुवातीला कळले होते तरी त्यात हंगेरीच्या बीएसी कन्सल्टिंग या कंपनीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. ही कंपनी केवळ कागदावरच असल्याचे व प्रत्यक्षात हे काम नोर्टा ग्लोबल लिमिटेड या बल्गेरियन कंपनीने केल्याचे स्पष्ट झाले. रिन्सन या कंपनीचा एकमेव मालक असल्याचे कळते. पेजरस्फोटांची घटना घडतेवेळी तो व्यावसायिक कारणांनी अमेरिकेच्या दौर्‍यावर असल्याचे व आता बेपत्ता झाल्याचे कळते. वर उल्लेख केलेल्या बीएसी कन्सल्टिंग या केवळ कागदावर असलेल्या कंपनीची इटालियन-हंगेरियन मालक क्रिस्तियाना बार्सोनी-आर्चिडियाकोनो हिला धमक्या मिळाल्यामुळे हंगेरी सरकारने संरक्षण दिले आहे.

Israel  
हिजबुल्लाचे स्वरूप
 
हिजबुल्ला (ईश्वराचा पक्ष) ही लेबेनॉनमधील शियांची सशस्त्र संघटना तेथे एक राजकीय पक्षदेखील चालवते. इराणच्या आधिपत्याखाली अमेरिकेचा, इस्रायलचा आणि ज्यूंचा जगभरात शक्य तेथे सशस्त्र विरोध करणे, हे या संघटनेचे ध्येय आहे. सुमारे वीस हजार सक्रिय आणि तेवढेच राखीव लढवय्ये असलेली हिजबुल्ला जगातली सर्वात मोठी बिगरसरकारी सशस्त्र संघटना समजली जाते. एवढी मोठी संघटना चालवण्यासाठी त्यांना इराणकडून केवढी मोठी आर्थिक व अन्य मदत मिळत असेल याची कल्पना केली जाऊ शकते. ज्याप्रमाणे इस्रायलच्या गुप्तचर संस्थांची वाखाणणी केली जाते, त्याचप्रमाणे हिजबुल्लाच्या गुप्तचर यंत्रणेनेदेखील इस्रायली यंत्रणेत शिरकाव केला असल्याचे सांगतात. लेबेनॉनच्या गुप्तचर यंत्रणेवर त्यांचे पूर्ण वर्चस्व असते. लेबेनॉनचे संरक्षण दल हिजबुल्लापेक्षा जवळजवळ तिपटीने मोठे असले, तरी हिजबुल्लाशी संघर्ष टाळण्याकडे त्यांचा कल असतो. तेथील ख्रिस्ती गट अलीकडे हिजबुल्लाच्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला आहे. लेबेनॉनचा ईशान्य भाग, राजधानी बैरुतजवळचा भाग आणि इस्रायलने अठरा वर्षे ताब्यात ठेवलेला लेबेनॉनचा दक्षिण भाग या शिया बहुसंख्य असलेल्या भागांमध्ये हिजबुल्लाचे संपूर्ण वर्चस्व असते. स्वत:च्या बळावर हिजबुल्लाला सुमारे केवळ एकदशांश जागा मिळत असल्यामुळे लेबेनॉनमध्ये सरकार स्थापन करणे त्यांना कधीच शक्य होत नाही. तरी अन्य पक्षांच्या साथीत ते सरकारमध्ये असतात. सध्या त्यांच्या आघाडीने बहुमत गमावलेले असले, तरी ही परिस्थिती तशीच राहिली आणि सहमतीचे सरकार स्थापन न झाल्यास ते आपल्या सशस्त्र संघटनेद्वारे यादवी युद्धाचा इशारा देऊन सर्वांना वठणीवर आणण्यास कमी करत नाहीत. शिया, सुन्नी आणि ख्रिस्ती यांचे प्रमाण सर्वसाधारणपणे सारखेच असल्यामुळे तेथे सत्तेची विभागणी त्या स्वरूपाची असते. सुन्नी गटाकडे प्रभावी सशस्त्र यंत्रणा नसल्यामुळे त्यांचा फारसा प्रभाव नसतो. अशा प्रकारे लेबेनॉनमधील परिस्थिती पॅलेस्टाइनपेक्षा फारच गुंतागुंतीची आहे. त्या देशातील नागरिकांना जगण्याबाबत केवढी अनिश्चितता वाटत असेल आणि लेबेनॉन हा देश म्हणून अस्तित्वात राहण्यामागे नेमकी काय प्रेरणा उरलेली असेल, असे प्रश्न त्यामुळे पडतात.
 
 
“इस्रायलने आजवर अनेकदा हिजबुल्लाच्या सदस्यांना थेट लक्ष्य केलेले आहे, तसेच हवाई बॉम्बवृष्टीद्वारे अनेकांना मारले आहे. हे हिजबुल्लासाठी नवे नाही. मात्र दीर्घकाळापासून हिजबुल्लाचा प्रमुख असलेला हसन नसरल्ला या स्फोटांच्या व्याप्तीमुळे चांगलाच हादरला आहे असे दिसते. ‘इस्रायलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत,’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली. ”
 
 
पेजरहल्ल्यांमागची संभाव्य कारणे
 
 
नोव्हेंबर 1995 मध्ये एका इस्रायली माथेफिरूने पंतप्रधान इत्झाक राबिन यांची हत्या केल्यामुळे इस्रायलची अंतर्गत गुप्तचर यंत्रणा असलेल्या शिन बेथची नाचक्की झाली होती. जगभरात मोबाइल फोनबाबत फारशी माहिती नसण्याच्या काळात इस्रायलविरुद्ध आत्मघातकी हल्ल्यांना ज्याच्यामुळे सुरुवात झाली, त्या बाँब बनवणार्‍या हमासच्या याह्या अय्याश याच्या मोबाइल फोनमध्ये स्फोटके पेरून या घटनेनंतर काही महिन्यांमध्येच त्याला मारण्यात आले होते. त्याचप्रमाणे हमासने इस्रायलवर केलेल्या भयंकर हल्ल्यांना आता लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. या हल्ल्यांमुळे इस्रायली गुप्तचर संस्थांची पुन्हा मोठी नाचक्की झाल्यानंतर कोणत्याही दबावाला बळी न पडता गाझा पट्टीत हमासचा शक्य तेवढा बीमोड करण्याचे इस्रायलचे प्रयत्न चालूच आहेत. मात्र एकूणच त्या अपयशाची अंशत: भरपाई करण्यासाठी इस्रायलने हिजबुल्लाचे शक्य तेवढे नुकसान करण्यासाठी पेजर आणि वॉकीटॉकीचे स्फोट घडवून आणले, असे काहींचे मत आहे.
 
 पेजरस्फोट ही आपल्या आयुष्यात आपण पाहिलेली सर्वात विलक्षण कारवाई असल्याचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणा सीआयएचे निवृत्त अधिकारी मार्क पॉलिमरोपॉलस यांनी सांगितले. इस्रायलविरुद्ध युद्ध लढणे किती जड जाईल याची जाणीव हिजबुल्लाला करून देण्यापुरता या हल्ल्यांमागचा हेतू असावा, असे ते म्हणाले.
 
असाफ ओरियन या निवृत्त इस्रायली लष्करी अधिकार्‍याने इस्रायली कारवाईचे कौतुक केले असले तरी तिच्या साध्याबाबत तो साशंक आहे. हमासच्या मागच्या वर्षीच्या हल्ल्यांनंतर हिजबुल्लानेही इस्रायलच्या उत्तर भागात सातत्याने रॉकेट-ड्रोनहल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे सुमारे साठ हजार इस्रायली नागरिक विस्थापित झाले आहेत. हे हल्ले करणार्‍या हिजबुल्लाला सीमेपासून शक्य तेवढे आत ढकलण्यात इस्रायलला यश मिळाल्यास हे नागरिक आपल्या घरी परतू शकतील. मात्र सध्या हिजबुल्लाच्या संदेशवहनात आलेल्या अडचणींचा फायदा घेत इस्रायलने लेबेनॉनवर आक्रमण करण्याचे टाळले, तर इस्रायलने केलेली ही विलक्षण कारवाई निष्फळ ठरेल, असे त्याचे म्हणणे आहे. पेजरस्फोट ही आपल्या आयुष्यात आपण पाहिलेली सर्वात विलक्षण कारवाई असल्याचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणा सीआयएचे निवृत्त अधिकारी मार्क पॉलिमरोपॉलस यांनी सांगितले. इस्रायलविरुद्ध युद्ध लढणे किती जड जाईल याची जाणीव हिजबुल्लाला करून देण्यापुरता या हल्ल्यांमागचा हेतू असावा, असे ते म्हणाले.
 
 
युरोप आणि मध्यपूर्वेतील गुप्तचर यंत्रणांच्या डावपेचांचा अभ्यास करणार्‍या डॉ. अविवा गुटमान यांचे मत थोडे वेगळे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेजर्स हिजबुल्लाच्या सदस्यांमध्ये वितरित झाल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष स्वरूपाबाबतची गुप्तता पाळणे कठीण होते. त्यांचे खरे स्वरूप उघड झाल्याची शक्यता लक्षात आल्यावर ही संपूर्ण योजना निष्फळ होऊ नये, याकरिता त्यांचे स्फोट आधीच घडवले गेले असावेत, असा त्यांचा कयास आहे. पेजर्सच्या स्फोटसत्रानंतर हिजबुल्लाने तोपर्यंत स्फोट न झालेले पेजर फेकून देण्यास सांगून वॉकीटॉकी संचांचा उपयोग सुरू केल्यावर त्यांचेही स्फोट होऊ लागले. त्यातून ‘काहीच कसे सुरक्षित नाही’ याचा मोठा मानसिक धक्का त्यांच्या सदस्यांना बसून हिजबुल्लाला नवी भरती करणे कठीण होईल, असे त्यांना वाटते. मात्र हे हल्ले करण्यापूर्वी हिजबुल्लाशी युद्ध करण्याचा इस्रायल सरकारचा मूळ विचार असेल आणि एवढे होऊनही हिजबुल्लामध्ये लढण्याची क्षमता उरली असेल, तर या प्रदेशातील स्थिती अस्थिर बनून दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होईलच; शिवाय आपल्या नागरिकांना घरी परतता येईल, या इस्रायलच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
 
 
दुसरीकडे इस्रायलने हिजबुल्लाला लक्ष्य करण्यासाठी लेबेनॉनवर आक्रमण करणे अद्याप टाळले असले तरी लेबेनॉनवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. पेजरहल्ल्यांमुळे हिजबुल्लाची संदेशवहन यंत्रणा विस्कळीत होण्यामुळे हिजबुल्लाचे अधिकारी प्रत्यक्ष भेटण्यावर भर देत आहेत. याचा फायदा घेऊन इस्रायलने हवाई बाँबहल्ल्यांमध्ये हिजबुल्लाच्या रडवान फोर्सेस या संघटनेचा प्रमुख इब्राहिम अकील याला त्याच्या किमान अकरा सहकार्‍यांसह ठार केले. अकील पेजरहल्ल्यात जखमी झाला होता. बैरुतमधील अमेरिकी दूतावासामध्ये हिजबुल्लाने 1983 मध्ये घडवलेल्या बाँबस्फोटाच्या भयानक घटनेपासून अमेरिकेला तो हवा होता.
 
 
ज्याप्रमाणे गाझा पट्टीमध्ये हमास सामान्य नागरिकांची ढाल करते, तसेच हिजबुल्ला लेबेनॉनमध्ये करते. त्यामुळे इस्रायली कारवाईमध्ये सामान्य नागरिक मारले जाऊ लागले, की मानवी हक्कांचा दांभिक डांगोरा पिटणार्‍यांना इस्रायलविरुद्ध आरडाओरडा करण्यास संधी मिळते. काही इस्रायली नागरिकही त्यांच्या या दुष्प्रचाराला बळी पडून आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करू लागतात. अनेकदा इस्रायली सरकारकडून होणारी कारवाईदेखील गरजेपेक्षा कडक आणि अरेरावीची असते.
 
 
समारोप
 
 
पेजरहल्ल्यांसारख्या योजनेची जबाबदारी इस्रायलने घेतलेली नसली, तरी ती योजना त्यांनीच अमलात आणली याबाबत कोणाला संशय नसावा. हे तंत्र यापूर्वीही अवलंबण्यात आलेले असल्यामुळे त्याबाबत सावधानतेचा वेगळा इशारा देण्याचे कारण नाही. अशी अभूतपूर्व योजना इस्रायलने ज्या पद्धतीने अमलात आणली, ते निव्वळ अद्वितीय आहे. इस्रायलविरुद्ध कारवाई करता यावी याकरिता शिया इराणकडून सुन्नी हमास आणि शिया हिजबुल्ला या दोघांनाही मोठी मदत मिळते. मागच्या वर्षीच्या हल्ल्यांनंतर अद्यापही चालू असलेल्या हमासविरुद्धच्या कारवाईमुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र हमासपेक्षा अनेकपट शक्तिशाली असलेल्या हिजबु्ल्लाचा बीमोड करणे हे किती तरी अधिक आव्हानात्मक आहे. पेजरहल्ल्यासारखी घटना अनपेक्षितपणे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर घडल्यामुळे हिजबुल्लासारखी दहशतवादी संघटनाच दहशतीखाली आल्याचे चित्र असले, तरी आगामी काळात इराणच्या मदतीच्या आधारावर ते लवकरच पुन्हा सज्ज होऊ शकतात. हिजबुल्लाला रोखण्यासाठी अमेरिकेकडूनही लेबेनॉनमधील ख्रिस्ती गटाला त्यांच्याविरुद्ध आक्रमक बनवण्याचे व त्यांना सशस्त्र करण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासविरुद्धची मोहीम तर चालू ठेवली आहेच; आता हिजबुल्लाविरुद्धचीही कारवाई चालूच राहील, असे विधान त्यांनी केले असल्यामुळे पेजरहल्ल्यांचे कवित्व लवकर संपण्याची शक्यता धूसर दिसते.