राष्ट्रनिर्माणास पूरक ठरणारे संविधान मंदिर!

विवेक मराठी    26-Sep-2024
Total Views |
@शुभांगी जाधव
 Samvidhan Mandir
महाराष्ट्रात नुकतीच एक ऐतिहासिक घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून संविधान मंदिर साकारण्यात आले आहे. 15 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून, एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास विभागांतर्गत 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरांचे लोकार्पण करण्यात आले. याद्वारे विद्यार्थ्यांना राज्यघटनेची महती, त्याचे महत्त्व समजावण्याचा उद्देश आहे. हे मंदिर विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल! त्यांना व त्यांच्या विचारांना आकार देईल.
आधुनिक भारताचा विचार करता भविष्यातील भारत घडवण्यासाठी, आपल्या देशातील पुढच्या पिढ्यांना आपला सांस्कृतिक, सामाजिक आणि संवैधानिक वारसा अलगदपणे देणे, त्यांच्यावर देश चालवण्याची जबाबदारी सोपवणे, हे आपल्या सर्वांचे प्राथमिक कर्तव्य आहे. ही जबाबदारी सोपविण्याचे मार्ग आणि माध्यम वेगवेगळे असू शकतात; परंतु उद्देश एकच असायला हवा, ज्यामुळे पुढच्या पिढ्यांना या जबाबदार्‍या सुपूर्द करताना आपल्याला अडचणी येत नाहीत! महाराष्ट्रात नुकतीच एक ऐतिहासिक घटना घडली आहे. राज्यातील 434 आयटीआय संस्थांमध्ये संविधान मंदिरे उभारण्यात आली असून, देशाच्या उपराष्ट्रपतींनी या मंदिरांचे लोकार्पण केले.
 
संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिकृती असलेले संविधानाचे मंदिर कुठे बांधले जाईल किंवा असे मंदिर एखाद्या विद्यालयात अस्तित्वात येईल याची कल्पनादेखील यापूर्वी कोणी केली नसेल! परंतु महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हे मंदिर साकारण्यात आले आहे. 15 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून, एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास विभागांतर्गत 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरांचे लोकार्पण करण्यात आले. ही देशासह महाराष्ट्र राज्यासाठी ऐतिहासिक घटना होती.
 
 Samvidhan Mandir 
26 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी, यासाठी संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतला होता. औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या परिसरात निर्माण होणारी पवित्र वास्तू म्हणून हे संविधान मंदिर मर्यादित न ठेवता, या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महिन्यातून एकदा येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. भारतीय राज्यघटनेतील तरतुदींबाबत विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. नागरिकांमध्ये, विशेषतः उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहिमा आयोजित करणे; घटनात्मक समस्या, दुरुस्त्या, समकालीन समाजातील घटनेची भूमिका यांसारख्या विषयांना घेऊन परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा आयोजित करणे, विद्यार्थ्यांना त्यांचे घटनात्मक अधिकार समजून घेण्यास किंवा त्यांचा वापर करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना कायदेशीर साहाय्य करणे, तसेच राज्यघटनेचे सखोल आकलन व्हावे यासाठी निबंध स्पर्धेसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे संविधानाच्या विविध पैलूंवर पुस्तके, लेख इत्यादी गोष्टी उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचा उद्देश आहे. संविधान दिवस, प्रजासत्ताक दिन यांसारख्या विशेष महत्त्व असलेल्या दिवशी येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. एक सकारात्मक उद्देश घेऊन कार्य करत राहिले तर आपल्याला यश नक्की मिळते! हाच सकारात्मक उद्देश घेऊन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संविधान मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे ज्याचा परिणाम येणार्‍या काळात आपल्याला नक्की दिसून येईल.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत जडणघडण झालेल्या व्यक्तिमत्त्वालाच असे विचार सुचतात. याची प्रचीती मंगल प्रभात लोढा यांच्या विचारांकडे पाहून येते. संघाची शिकवण पुढच्या पिढ्यांना देण्याचे राष्ट्रीय कार्य ते करत आहेत.
 
 
 Samvidhan Mandir
 
संवैधानिक मूल्य आपल्या लोकशाही मानणार्‍या भारत देशाचा पाया आहेत. आजच्या घडीला आपल्या शेजारील इतर देशांत जे होत आहे, ते भारतात होऊ नये याकरिता पुढच्या पिढ्यांना आपले संविधान किती सशक्त आणि सक्षम आहे, याची माहिती व्हायला हवी. त्याचप्रमाणे आपले अधिकार आणि कर्तव्ये याची जाणीवदेखील पुढच्या पिढ्यांना व्हावी, याकरिता हे संविधान मंदिर दिशादर्शक ठरणार आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या वेळी जणू आता देशाचे संविधानच बदलले जाणार, असा संभ्रम निर्माण करण्याचे काम राजकीय व्यक्तींनी केले होते. या सर्व गोष्टींनादेखील आळा घालण्याचे काम या ठिकाणी होणार आहे. संविधान असे सहजासहजी बदलले जाऊ शकत नाही! केवळ राजकारण करणार्‍या राजकीय पुढार्‍यांना हे लक्षात आणून देण्याचे काम आपले युवक करतील, कारण ते संविधानाचे जाणकार आणि अभ्यासक बनतील, तर असे राजकीय पुढारीदेखील संविधानाबद्दल राजकीय भ्रम पसरवू शकणार नाहीत!
 
सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही आपल्या भारतीय संविधानातून मिळत असल्यामुळे संविधान मंदिर स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना राज्यघटनेची महती, त्याचे महत्त्व समजावण्याचा उद्देश आहे. हे मंदिर विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल! त्यांना व त्यांच्या विचारांना आकार देईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण या ठिकाणी पूजली जाईल. योग्य विचारांनी प्रेरित झालेला कौशल्यसंपन्न युवा स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि देशाची प्रगती साधण्याचे सामर्थ्य बाळगतो. त्यामुळे नीतिमंत विचार आणि हाताला रोजगार असणारी पिढी घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी या लोकार्पण सोहळ्यावेळी सांगितले आहे. यातून त्यांचा भविष्यातील पिढ्यांना घडवण्याचा विचार स्पष्ट होतो.
भारतीय संस्कृतीचे सार आपल्या संविधानात सामावले आहे. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधाननिर्मितीमध्ये मोठे योगदान आहे. भारतीय राज्यघटना सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून, राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणे गरजेचे आहे. वंचितांच्या विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर परिश्रम केले. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय हा आरक्षणाचा आधार असून, वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर यांचे योगदान नव्या पिढीला समजणे गरजेचे असून, त्या दृष्टीने संविधान मंदिर उपक्रम अतिशय उपयुक्त ठरेल. जागतिक लोकशाही दिवस सर्वत्र साजरा होत असताना आपल्याला अभिमान वाटतो की, भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, जो विविधतेतही एकता जपून आहे. याचे सर्व श्रेय आपल्या संविधानाला जाते. ‘भारतीय’ हीच आपली पहिली ओळख असून, राज्यघटनेप्रति आपण सदैव आदर बाळगणे गरजेचे आहे. या संविधानाचे महत्त्व नव्या पिढीला समजावे यासाठी असे उपक्रम खूप गरजेचे आहेत, असे मत या कार्यक्रमादरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मांडले. राज्यात 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ’संविधान मंदिर लोकार्पण’ हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही उपराष्ट्रपती धनखड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संविधानाचे खरे संरक्षक कोण असतील? तर ती भारतातील जनता आणि आपली युवा पिढी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
 
सर्वार्थाने सशक्त असलेले भारतीय संविधान आणि त्यातील मूल्ये आपल्या पुढच्या पिढीला लक्षात आणून देण्याचा हा उपक्रम अभिनंदनास पात्र आहे. आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवावेत आणि आपल्या संविधानाला आद्यग्रंथ मानून राष्ट्रीय कार्यात सक्रिय व्हावे, हीच आपली माफक इच्छा आहे.