या शेतीने लळा लाविला...

विवेक मराठी    26-Sep-2024
Total Views |
krushivivek
 
हिंगोली शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे भूषण साहेबराव देशमुख होय. देशमुख यांची शेती-मातीशी नाळ जोडली गेली आहे. ते एका जर्मन कंपनीत अ‍ॅडमिनिस्ट्रेशन एच.आर. विभागात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होते; पण शेती-मातीची ओढ आणि समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. उच्च पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन ते शेती व समाजकार्यात सक्रिय झाले. देशमुख यांची नांदापूर (ता. कळमनुरी) येथे शेती आहे. या शेतीत त्यांनी पीक व फळबागसंदर्भात विविध प्रयोग केले आहेत. सेंद्रिय केशर आंबा हा त्यातील एक भाग. सध्या त्यांच्याकडे बारा वर्षांपूर्वी लागवड केलेली केशर आंब्याची 200 झाडे आहेत. या फळांचा दर्जा उच्च प्रतीचा आहे. या फळबागेला करवंदाच्या झाडीचे कुंपण केले आहे. याखेरीज देशमुख यांनी कोकण बहाडोली जांभूळ व पपईची लागवड केली आहे. बहुतांश माल हैदराबाद बाजारपेठेत विकला जातो. सेंद्रिय शेती, आधुनिक तंत्रज्ञान, कृषी योजना संदर्भात परिसरातील शेतकर्‍यांना माहिती व्हावी यासाठी ते विविध तज्ज्ञांची व्याख्याने व चर्चासत्रे आयोजित करतात.
 
राष्ट्रहित लक्षात घेऊन ते हिंगोली शहरातल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत मागील वीस वर्षांपासून कार्यरत आहेत. ते विविध संघटना व संस्थांशी निगडित आहेत.
 
स्व. वामनराव देशमुख बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ते विविध उपक्रम राबवितात. शिवाय गोरगरीब लोकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करतात. महत्त्वाचे म्हणजे ’जेईई’ यांसारख्या परीक्षांचे निवासी शिबिरही आयोजित करतात. देशमुख यांचे ’मधुरदिप पॅलेस’ नावाचे मंगल कार्यालय व रिसॉर्ट आहे. सर्व जातीधर्मांतील गरीब व्यक्तींना ते सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करून देतात.
 
देशमुख कुटुंबातील नऊ व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात आहेत. मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून हे संपूर्ण कुटुंब वैद्यकीय व सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देत आहे.
 
- प्रतिनिधी
संपर्क
भूषण देशमुख
98227 09588