‘मिशन मौसम’ हा दोन वर्षांचा उपक्रम आहे, ज्याचा उद्देश आत्यंतिक (Extreme) हवामान आणि हवामानातील आव्हानांचा सामना करण्याची भारताची क्षमता वाढवणे असा आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 2024 ते 2026 या कालावधीसाठी या ‘मिशन मौसम’ची आखणी केली आहे. देशाला कोणत्याही हवामानस्थितीसाठी सज्ज आणि जलवायूदृष्ट्या ‘सजग’ (Smart करण्याचे या प्रकल्पाचे लक्ष्य आहे. हवामान आणि जलवायूची देखरेख, पूरक तंत्रज्ञान तसेच अधिक उपयोगी, अचूक आणि तत्पर सेवेसाठी यंत्रणांचे सक्षमीकरण हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ’मिशन मौसम’ लाँच करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. हा दोन वर्षांचा उपक्रम आहे, ज्याचा उद्देश आत्यंतिक(Extreme) हवामान आणि हवामानातील आव्हानांचा सामना करण्याची भारताची क्षमता वाढवणे असा आहे. 2,000 कोटी रुपयांच्या आर्थिक नियोजनाचे हे अभियान भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. दाट धुके, गारपीट आणि अतिवृष्टी व भूस्खलन, गडगडाटी वादळे, आवर्ते आणि ढगफुटी यांसारख्या वातावरणीय आणि हवामानाशी निगडित आत्यंतिक घटनांचे प्रमाण भारतात दरवर्षी वाढतेच आहे. भारत आपल्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि शहरीकरणाचा विस्तार करत असताना पूर, चक्रीवादळ आणि दुष्काळ यांसारख्या आत्यंतिक हवामानाच्या घटना देशात आपत्तीजनक ठरत आहेत. यामुळे जीवित, वित्तहानी होऊन अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. भारत हा जागतिक स्तरावर आत्यंतिक हवामानाच्या संदर्भात सर्वात असुरक्षित देशांपैकी एक आहे, असे आता म्हटले जात आहे.
हवामान बदलामुळे भारताला अगोदरच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मान्सूनमध्ये येणार्या पुरापासून ते उष्णतेच्या लाटा आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये होणार्या भूस्खलनापर्यंत, सध्याच्या हवामान सेवेच्या तरतुदीमध्ये या घटनांच्या वाढत्या प्रमाणाला सामावून घेण्याची क्षमता नाही. देशाच्या हवामान बदलाच्या माहितीपूर्ण हवामान निरीक्षणासाठी साधे, नेमके व जटिल हवामान निरीक्षण अत्यंत आवश्यक आहे.
भारतातील हवामान अंदाजाबाबत कमालीची विश्वासार्हता निर्माण करण्याचे आव्हान संपलेले नाही. हवामान अंदाज हा अतिशय गंभीर आणि शास्त्रीय विषय आहे. तरीही त्याबाबत कायम साशंकता असते. ही साशंकता लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी केंद्राच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 2024 ते 2026 या कालावधीसाठी या ‘मिशन मौसम’ची आखणी केली आहे. देशाला कोणत्याही हवामानस्थितीसाठी सज्ज आणि जलवायूदृष्ट्या ‘सजग’ (Smart) करण्याचे या प्रकल्पाचे लक्ष्य आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मागील आठवड्यात एकूण दोन हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे.
हवामान आणि जलवायूची देखरेख, पूरक तंत्रज्ञान तसेच अधिक उपयोगी, अचूक आणि तत्पर सेवेसाठी यंत्रणांचे सक्षमीकरण हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. अत्याधुनिक हवामान देखरेख तंत्रज्ञान तसेच त्यासाठी यंत्रणांचा विकास, अत्याधुनिक रडार आणि उपग्रहांचे सक्षम कार्यान्वयन, अत्यधिक क्षमतेच्या संगणकाची यंत्रणा उभारणी, हवामान आणि जलवायू प्रक्रिया तसेच अंदाजांच्या भाकितात सुधारणा, अत्याधुनिक सांख्यिकी यंत्रणांचा विकास, शेवटच्या क्षणापर्यंत आत्यंतिक हवामान घटनेवेळी संपर्क साधण्यासाठी अत्याधुनिक प्रसार प्रणालीचा विकास अशा प्रकारे हवामानातील आव्हानांचा सामना करण्याची एकूणच क्षमता वाढविणे, ही या मिशनची उद्दिष्टे आहेत.
प्रकल्पांतर्गत देशभरात पन्नास डॉप्लर हवामान रडार, साठ ‘रेडिओसाँड’/‘रेडिओ विंड’ (हे एक लहान यंत्र असते. ते हायड्रोजन वा हेलियम वायूने भरलेल्या एका विशिष्ट फुग्याला बांधलेले असते. या फुग्याद्वारे हे यंत्र हवेत सोडले जाते. ते वायुदाब, तापमान, आर्द्रता आदी मोजते.) स्थानके, शंभर ‘डिस्ड्रोमीटर’ (पाऊस, हिमवर्षाव, वादळ मापन यंत्र), दहा विंड प्रोफायलर (वार्याची गती, दिशा आदी मोजण्याचे यंत्र), एक शहरी ‘टेस्ट बेड’ (सखोल, पारदर्शक अशा शास्त्रीय संशोधनासाठीची अत्याधुनिक समर्पित जागा), एक प्रक्रिया ‘टेस्ट बेड’, एक सागरी संशोधन केंद्र आणि वातावरणातील वायूच्या देखरेखीसह दहा सागरी स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. मार्च 2026 पर्यंत उत्तम देखरेखीसाठी ‘रडार’, ‘विंड प्रोफायलर’ आणि ‘रेडिओसाँड’चे मोठे जाळे उभारण्याचे लक्ष्य आहे.
अशा पद्धतीने ’मिशन मौसम’ प्रगत संशोधन आणि सुधारित हवामान विज्ञान क्षमतांद्वारे भारताची हवामान सज्जता मजबूत करण्याचा प्रयत्न करील. हा उपक्रम नागरिक आणि प्रमुख आस्थापनांना पराकोटीची हवामान परिस्थिती आणि हवामान बदलाच्या वाढत्या प्रभावांना तोंड देण्यासाठी उत्तम साधने आणि संसाधने सुसज्ज करेल. कालांतराने समुदाय, परिसंस्था आणि विविध उद्योगांमध्ये याबाबतीत लवचीकता (Flexibility) येऊ शकेल.
या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने वायुमंडल विज्ञानातील (Climatology) संशोधनाचा विस्तार करणे, हवामान निरीक्षण, अंदाज आणि प्रतिमानीकरण (Modelling) लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे. हवामानाच्या अंदाजांची अचूकता सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि उच्च-कार्यक्षमता संगणन यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचाही उपयोग केला जाईल.
’मिशन मौसम’ अभियान, हवामान निरीक्षण प्रणाली सुधारण्यास तसेच अचूक आणि वेळेवर माहिती प्रदान करण्यास प्राधान्य देईल. मान्सूनचा अंदाज, हवेच्या गुणवत्तेचे इशारे आणि धुके, गारपीट आणि अतिवृष्टी यांसारख्या आत्यंतिक हवामानासंबंधी इशारे यांचाही यात समावेश असेल. याव्यतिरिक्त, ’मिशन मौसम’ उपक्रम, क्षमता-निर्मिती प्रयत्नांवर आणि हवामानसंबंधित आव्हानांबद्दल जनजागृती करण्यावर भर देईल. पुढच्या पिढीतील रडार, प्रगत उपग्रह प्रणाली आणि उच्च कार्यक्षमता असलेले सुपर कॉम्प्युटर यांसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान मिशनच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावतील. रिअल-टाइम डेटा प्रसारासाठी भौगोलिक माहिती प्रणालीवर (GIS) आधारित स्वयंचलित निर्णयप्रणालीदेखील विकसित केली जाईल.
कृषी, आपत्ती व्यवस्थापन, संरक्षण, विमान वाहतूक, जलसंपदा, ऊर्जा, पर्यटन आणि आरोग्य यासह अनेक क्षेत्रांना ’मिशन मौसम’चा फायदा होणार आहे. हा उपक्रम शहरी नियोजन, वाहतूक, अपतट प्रदेशातील कार्य आणि मोहिमा (Offshore operations) आणि पर्यावरण निरीक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये सांख्यिकी (Data) आधारित निर्णय घेण्यास बळ देईल.
भारताला हवामान अभ्यासाचा मोठा इतिहास आहे. भारतीय हवामान विभागाची अधिकृत स्थापना सन 1875 मध्ये झाली. हवामान विभागाच्या अंदाज वर्तविण्याच्या क्षमतेला सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय मध्यम श्रेणी हवामान पूर्वानुमान केंद्र मदत करते. या मोहिमेत भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय मध्यम श्रेणी हवामान पूर्वानुमान केंद्राची महत्त्वाची भूमिका आहे. सांख्यिक हवामान अंदाजाचे मॉडेल विकसित करणे आणि त्यात निरंतर संशोधनाद्वारे वारंवार सुधारणा करणे, हे या केंद्राचे मुख्य काम आहे.
भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत संस्था ’मिशन मौसम’च्या अंमलबजावणीचे नेतृत्व करतील. या अभियानात या संस्था हवामान आणि हवामान विज्ञानात भारताचे नेतृत्व पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था, या उद्योगातील नेते आणि शैक्षणिक संस्थांसोबत सहकार्य करतील. या संस्था दिलेल्या कालावधीत निर्धारित मिशन पूर्ण करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा वापर करतील. शैक्षणिक संस्था, उद्योग आणि जागतिक संशोधन संस्था, जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारांचे अतिरिक्त सहकार्य या गोष्टी हवामान आणि हवामानातील गतिशीलतेमध्ये भारताची भूमिका उंचावण्यास हे अभियान मदत करेल.
उपलब्ध माहितीनुसार, भारतातील 75 टक्क्यांहून अधिक जिल्हे हे आत्यंतिक किंवा पराकोटीच्या (Extreme) हवामान घटनांचे संवेदनशील प्रदेश आहेत. भारतात वर्ष 2010 नंतरच्या कालावधीत 350 पेक्षा जास्त आत्यंतिक हवामान आणि हवामानसंबंधित घटनांची नोंद झाली, ज्यात उष्णतेच्या लाटा आणि थंड लाटा यांसारख्या सुरुवातीच्या संथ घटनांचा समावेश आहे. किमान 75 किंवा त्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये विध्वंसक पुराच्या घटना घडल्या. 2019 मध्ये बाधित जिल्ह्यांची संख्या 151 वर पोहोचली होती.
भूस्खलन, अतिवृष्टी, गारपीट, गडगडाटी वादळे आणि ढगफुटी यांसारख्या संबंधित घटनांची वारंवारता भारतात गेल्या दोन दशकांत 20 पटीने वाढली आहे. अनेक जिल्ह्यांत आत्यंतिक दुष्काळी घटनांची नोंद झाली. या कालावधीत दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची वार्षिक सरासरी 13 पटीने वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दरवर्षी आत्यंतिक तीव्रतेच्या चक्रीवादळाच्या घटना घडत आहेत.
गेल्या दशकातच 258 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसल्याची नोंद झाली आहे.
चक्रीवादळ संवेदनशील जिल्हे पुरी, चेन्नई, नेल्लोर, उत्तर 24 परगणा, गंजम, कटक, पूर्व गोदावरी आणि श्रीकाकुलम हे सगळे पूर्व किनारपट्टीवर केंद्रित होते. पूर्व किनार्याचे तापमान वाढणारे प्रादेशिक सूक्ष्म हवामान, भू-वापरातील बदल आणि निकृष्ट जंगलामुळे या प्रदेशात चक्रवात निर्मिती प्रक्रिया सुरू झाली आहे. 1970 आणि 2023 दरम्यान संबंधित चक्रीवादळ घटनांची संख्या 12 पटीने वाढली. पूरप्रवण क्षेत्र अवर्षणप्रवण बनणे यांसारख्या आत्यंतिक घटनांचे स्वरूप आणि संख्या सध्या वेगाने बदलत आहे.
ज्या जिल्ह्यांनी पुराकडून दुष्काळाकडे वळण्याची प्रवृत्ती अनुभवली त्यांची संख्या दुष्काळातून पुराकडे स्थलांतरित झालेल्या जिल्ह्यांपेक्षा जास्त होती. भूवापर बदल, जंगलतोड, खारफुटींवरील अतिक्रमण आणि पाणथळ जागा यांसारख्या स्थानिक हवामान बदलांच्या घटकांमुळे भारतीय उपखंडात हे सूक्ष्म हवामान बदल होऊ लागल्याचेही निरीक्षण आहे.
भारतात हवामान अंदाज चुकण्याच्या वारंवारितेला हवामानाचा लहरीपणाही कारणीभूत असला तरी, अचूक अंदाज वर्तविण्याची सक्षमता तितकीच गरजेची आहे. हा अंदाज पीक-पाण्यावर परिणाम करणारा तसेच नैसर्गिक आपत्तीशी संबंधित असल्याने संबंधित यंत्रणांचे सक्षमीकरण, अत्यानुधिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. प्रगत देशांच्या तुलनेत आपल्याकडे तो अपुरा आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ही उणीव भरून काढण्याचा एक ठोस प्रयत्न म्हणजे हे ‘मिशन मौसम’ आहे. यामुळे येत्या काळात ‘हवामान अंदाजा’ला अधिक अचूकता येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे आणि हेच या अभियानाचे मुख्य ध्येय आहे.
जगभरातील हवामान बदलातील असामान्य वेगामुळे एखाद्या देशातील हवामानाचा अचूक अंदाज करणे आज अपरिहार्य बनले आहे. चक्रीवादळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे भारत हा एक हवामान संवेदनशील देश बनला असल्याने या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यात आघाडीवर आहे. या संदर्भात, ’मिशन मौसम’ हा भारतातील काही अद्वितीय प्रकल्पांपैकी एक आहे. यात हवामान बदलाच्या प्रभावांचा आणि त्याच वेळी देशाच्या हवामान अंदाज प्रणालीतील सुधारणांचा विचार सर्वसमावेशकपणे केला जाणार आहे.
हवामान बदलामुळे भारतापुढे निर्माण झालेली आव्हाने प्रचंड असली तरी, मिशन मौसमच्या माध्यमातून या समस्यांना तोंड देण्यासाठी भारत सरकारची वचनबद्धता हे देशासाठी एक आश्वासक पाऊल आहे. भारत हवामान-सज्ज आणि हवामान-स्मार्ट बनण्याचे काम करत असताना, सर्वांसाठी सुरक्षित, अधिक लवचीक भविष्य घडवण्यात वैज्ञानिक समुदाय, सरकारी संस्था आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भारताचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि तेथील नागरिकांचे कल्याण वाढविण्यासाठी हा एक समग्र दृष्टिकोन आहे.
पाच वर्षांचे हे मिशन मौसम दोन टप्प्यांत राबवले जाईल. पहिला टप्पा मार्च 2026 पर्यंत चालेल आणि तो निरीक्षण नेटवर्कच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करेल.
पुढील पाच वर्षांमध्ये, मिशन मौसम अल्प-मध्यम-श्रेणी हवामान अंदाज अचूकता 5 ते 10 टक्क्यांनी सुधारण्यावर आणि प्रमुख मेट्रो शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा अंदाज 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यावर लक्ष केंद्रित करेल. हे मिशन पंचायत स्तरावर 10-15 दिवस अगोदर हवामानाचा अचूक अंदाजदेखील देईल आणि अधिक वारंवार, दर तीन तासांऐवजी प्रत्येक तासाला हवामानाचा अंदाज प्रदान करेल.