@प्रकाश एदलाबादकर 9822222115
संत श्रीदासगणू महाराजांचे साहित्य प्रचंड आहे. त्यांच्या अप्रकाशित अशा अनेक रचना आहेत. त्यांनी आदिमाता जगदंबेच्या दिनचर्येच्या उत्सुकतेपोटी काव्य निर्माण केले. त्यांचे आदिमातेच्या दिनचर्येबद्दलचे ‘रुक्मिणी जगदंबा दिनचर्या’ हे काव्य मनाला खूप भावणारे आहे. नवरात्रीच्या पावन पर्वावर ही रचना प्रकाशित करीत आहोत.
शेगावचे संत श्रीगजानन महाराज यांच्या जीवनचरित्रावर ’श्रीगजानन विजय’ हा ग्रंथ लिहिणार्या संत श्रीदासगणू महाराजांचे साहित्य प्रचंड आहे. त्यांच्या अप्रकाशित अशा अनेक रचना आहेत. श्री. प्र. ग. परांजपे ह्यांच्या पुस्तकात महाराजांच्या अप्रकाशित साहित्याचे एक परिशिष्टच आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध साहित्यिक आणि वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ह्यांनी ‘दीपस्तंभ’ नावाचे एक पुस्तक लिहिलेले आहे. मराठवाड्यात आणि पूर्वीच्या निजामशाहीत होऊन गेलेल्या संत-सत्पुरुषांबद्दलचे अत्यंत वाचनीय आणि माहितीपर लेख यात आहेत. त्यात संत दासगणू महाराजांवरही लेख आहे. हे टिपण लिहिण्यापूर्वी मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही बरीच माहिती दिली. त्याबद्दल नानासाहेब चपळगावकरांचे मी आभार मानतो.
श्रीआदिमाता जगदंबा म्हणजे जगाची आई. महाराष्ट्रामध्ये तर तिची साडेतीन शक्तिपीठे आहेतच, शिवाय महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये देवीची मंदिरे आणि लहानमोठी शक्तिपीठे आहेत. श्रीजगदंबा हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. भक्तांच्या रक्षणार्थ ती सतत फिरत असते. मग देवीमायची दिनचर्या कशी असेल, तिचा दिनक्रम कसा असेल याची रचनाकर्त्याला उत्सुकता वाटली. त्यातून हे काव्य निर्माण झाले. ‘रुक्मिणी जगदंबा दिनचर्या’ असे या काव्याचे शीर्षकच आहे मुळी. दहा कडव्यांचे हे काव्य एखाद्या आर्ती (पूजा झाल्यावर संपूर्ण प्रार्थनेपूर्वी, जी आर्ततेने म्हटली जाते किंवा म्हणावी लागते ती आर्ती असते. हा शब्द ’आरती’ असा नाही.) सारखे आहे. ती रचना टाळ्यांच्या किंवा संबळीच्या तालावर म्हणता येईल अशी आहे.
पहिल्या तीन कडव्यांमध्ये जगदंबेची स्तुती आहे. इथे तिचे मूळ रूप विदर्भकन्या रुक्मिणीचे आहे, हे विशेष! शेवटच्या दोन कडव्यांमध्ये याची फलश्रुती आहे आणि मधल्या पाच कडव्यांत जगदंबेची दिनचर्या आहे. जगदंबेच्या कायम मुक्कामाचे मूळ स्थान अमरावती (विदर्भ) आहे, असे दासगणू महाराजांचे प्रतिपादन आहे. सकाळी उठून आन्हिके आटोपली की, जगदंबा स्नान करायला बासर ह्या गावाला जाते. बासर हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगण यांच्या सीमेवर असलेल्या आदिलाबाद जिल्ह्यात आहे. बासरला सरस्वतीचे प्राचीन मंदिर आहे. तेथून जवळच गोदावरी नदीत जगदंबा स्नान करते. स्नान आटोपून वेणी-फणी करायला ती माहूरला जाते. माहुरात वेणी-फणी आटोपली की, नवे पातळ नेसायला आजच्या चंद्रपुरात जाते. इथे महाराजांनी ‘गड चांद्यात’ असा उल्लेख केला आहे. पूर्वी चंद्रपूरचे नाव चांदा होते आणि हे शहर गडकोटात होते हे आपण जाणतोच. शिवाय चंद्रपुरात जगदंबेचे महाकाली रूपात पीठ आहेच. तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्यात बोधन नावाचे गाव आहे. तेथील श्रीशंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. ह्या बोधनला जगदंबा काजळ लावते, कुंकू लावते आणि हळद लावायला थेट अंबेजोगाईला जाते. हा साजशृंगार झाला की, न्याहारीसाठी तुळजापूरला येते.न्याहारीनंतर मंदिराच्या प्राकारात थांबून दुपारच्या जेवणासाठी मात्र करवीर क्षेत्री म्हणजे कोल्हापूरला येते. कोल्हापुरात जेवण आटोपले की, तांबूल (विडा) सेवन करण्यासाठी राशीन या गावी येते. राशीन हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जगदंबेचे अत्यंत देखणे आणि विशाल असे मंदिर राशीनला आहे. तांबूल सेवन करून मायबाई येते ती थेट वणी (जि. नाशिक) येथील सप्तशृंग गडावर. तिथे ती पुराण-प्रवचन श्रवण करते. ह्या इतक्या गावांमधून फिरताना अर्थातच तेथील भक्तांना दर्शन देते. सकाळपासूनच्या ह्या धावपळीत आता मात्र तिला आपल्या पतिराजांची आठवण येते. इथे मुळात ती रुक्मिणी आहे, हे लक्षात ठेवा, कारण मूळ पीठ अमरावती आहे.
पतिराजांची आठवण आल्यावर कुठे जाते मग मायबाई? ती जाते सरळ पंढरपूरला! महाराजांनी इथे शब्द वापरला आहे ‘निजरमणाच्या भेटीसाठी!!’ अठ्ठावीस युगे तो तिथे उभा आहे. पंढरपूरचा ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशी कळा लोपलिया’ असे ज्याच्या सौंदर्याचे वर्णन केले जाते तो विठ्ठलरूपातील भगवान श्रीकृष्ण! सप्तशृंग गडावरून पुराण श्रवण करून पंढरपूरला यायला तिन्हीसांजा होतच असतील ना! अशा कातरवेळी ती आपल्या रमणाला भेटते. सर्व जगाचा प्रपंच चालविणारे आदिमाता आणि आदिपिता यांचा संवाद रात्रीच्या दुसर्या प्रहरापर्यंत चालत असला पाहिजे, कारण मायबाई निद्राधीन होण्यासाठी परत येते अमरावतीला ती मध्यरात्रीच! रात्रीच्या पहिल्या प्रहरात, आपल्या सगळ्या बाळांचा पाळणा हलविण्याचे काम ती निजरमणाला देत असेल आणि आपण गात असेल अंगाई!! माउली सांगते तसा ’अनाहताचा हल्लरू’ किंवा मुक्ताई सांगते तशी ’अनाहत टाळी’ वाजवीत असली पाहिजे. म्हणून तर तिला अमरावतीला यायला मध्यरात्र होते ना! पुन्हा सकाळी उठून तीच दिनचर्या. जगाच्या प्रारंभापासून कल्पांतापर्यंत तिची हीच दिनचर्या ठरलेली आहे. सर्व जगाची चिंता हरण करायला आणि सर्वांचा भवताप दूर करायलाच तर तिचा अवतार आहे ना?
आपल्या जन्मदात्या आईची दिनचर्या तरी यापेक्षा काय वेगळी असते किंवा होती? आठवून बघा. आपल्या आईतही तीच आई दिसेल ’रुक्मिणी जगदंबा’! अशा ह्या जगदंबेच्या दिनचर्येचे नेहमी स्मरण केले तर आपलेही जीवन-दिनचर्या सुखकर होईल, असे महाराजांचे म्हणणे आहे.