सा. विवेकच्या 'तंजावरचे मराठे' पुस्तकाचे होणार पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते प्रकाशन

विवेक मराठी    05-Sep-2024
Total Views |
 
 
rss
 
9 सप्टेंबर रोजी पुण्यातील बालशिक्षण मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन
 तंजावरचे छ. बाबाजीराजे भोसले, सातार्‍याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचीही उपस्थिती
सा. विवेक व श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम
 
पुणे : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याचप्रमाणे दक्षिणेत तंजावर येथे शहाजीराजांचे तिसरे पुत्र व छत्रपती शिवराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांनीही स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना केली. तंजावरच्या या भोसले संस्थानचे योगदान शब्दबद्ध करणार्‍या साप्ताहिक विवेकच्या ’तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते पुणे येथे येत्या सोमवार, 9 सप्टेंबर रोजी होत आहे.
 
rss
 
या प्रकाशन सोहळ्यास तंजावर भोसले संस्थानचे छत्रपती बाबाजीराजे भोसले, महाराणी गायत्रीराजे भोसले तसेच सातार्‍याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हेदेखील उपस्थित राहणार आहेत. साप्ताहिक विवेक आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा प्रकाशन सोहळा कोथरूड भागातील मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर सभागृह येथे सोमवार, 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपन्न होत आहे. ख्यातनाम इतिहास अभ्यासक, लेखक डॉ. मिलिंद पराडकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. तसेच, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. या महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक कार्यक्रमास पुण्यासह राज्यभरातून अनेक इतिहासप्रेमी नागरिक, विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याने राजकीय स्वातंत्र्याचा वसा घेतला व या स्वराज्याची पुढे ’अटक ते कटक’ अशा विशाल हिंदवी साम्राज्याकडे वाटचाल झाली. त्याचप्रमाणे तंजावरच्या भोसले राज्याने सांस्कृतिक स्वातंत्र्याचा, उन्नतीचा व संवर्धनाचा वसा घेतला. व्यंकोजीराजांचे पुत्र शहाजीराजे दुसरे यांनी राजकारणासोबतच ज्ञान-संस्कृतीमध्ये आपला ठसा उमटवला. देशभरातील हिंदू विद्वानांना एकत्र आणून शहाजीपुरम नगर वसवले. पुढे याच घराण्यातील सरफोजीराजे दुसरे यांच्या काळात ज्ञान-संस्कृतीच्या क्षेत्रात तंजावरची मोठी भरभराट झाली. विजयनगर हिंदू साम्राज्यातील नायक राज्यकर्त्यांनी बांधलेले सरस्वती महाल ग्रंथालय भोसले राजघराण्याच्या योगदानामुळे जागतिक स्तरावरील ज्ञानकेंद्र बनले. विसाव्या शतकातही तंजावरच्या तत्कालीन भोसले राज्यकर्त्यांनी समाजप्रबोधन व सामाजिक सुधारणा चळवळीत मोठे योगदान दिले. अशा रीतीने तंजावर भोसले संस्थानने भाषा, साहित्य, नाट्य, तत्वज्ञान, आयुर्वेद, कला, भारतीय विज्ञान, स्थापत्यशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत दिलेले केलेले अतुलनीय कार्य या पुस्तकात सविस्तररित्या शब्दबद्ध करण्यात आले आहे.
 
साप्ताहिक विवेकद्वारा प्रकाशित होत असलेल्या व डॉ. मिलिंद पराडकर यांनी लिहिलेल्या ’तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ या पुस्तकाच्या माध्यमातून तंजावर संस्थानने जोपासलेल्या या राष्ट्रीय सांस्कृतिक वारशाची ओळख सर्व मराठी भाषिकांना व्हावी तसेच, यानिमित्ताने तंजावर आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक नाते अधिक घट्ट, समृद्ध व्हावे याकरिता महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या सोमवार, 9 सप्टेंबर रोजी होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास पुणेकर इतिहासप्रेमी नागरिक, वाचक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साप्ताहिक विवेक आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.