संविधानाचा कायदा भारतीयत्वाची ओळख राजकीय अंगाने करून देतो. लोकांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेने आपल्या सर्वांची एक राजकीय ओळख असण्यासाठी सर्वांना समानतेने अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. यातून एक भारतीय म्हणून आपलेे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व तयार होते. दुसर्या भाषेत सांगायचे तर संविधानाचा कायदा प्रजेला राजकीयदृष्ट्या संघटित करतो आणि बांधून ठेवतो.
संविधानाच्या कायद्याचे पालन करायचे असते आणि सांविधानिक मूल्यांचे आचरण करायचे असते, याचा आपण मागील लेखात विचार केला. कायदा आणि मूल्यांचे पालन कशासाठी करायचे? आपण वस्त्रे घालतो, कशासाठी घालतो? त्याची तीन कारणे आहेत. 1) शरीर झाकण्यासाठी, 2) थंडी-वार्यापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी, 3) आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी. तसेच आपण अन्न घेतो कशासाठी? पहिले कारण आपण जिवंत राहण्यासाठी, दुसरे कारण शरीराच्या वाढीसाठी, तिसरे कारण शरीर निरोगी राहण्यासाठी. संविधानाच्या परिभाषेत आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. वस्त्र आणि अन्न जसे आपल्या व्यक्तिगत जीवनाचे रक्षण करते, तसे संविधानाचा कायदा आणि मूल्ये संविधानाने दिलेल्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचे रक्षण करीत असतात.
संविधानाने आपल्याला कोणते व्यक्तिमत्त्व दिले? आपल्या राज्यघटनेचे सुरुवातीचे शब्द आहेत, ‘आम्ही भारताचे लोक’. या आम्हीतील मी एक भारतीय आहे. संविधानाने मला दिलेले हे व्यक्तिमत्त्व आहे. त्याची आपल्याला नित्य जाणीव असली पाहिजे. अनेक वेळा धूर्त राजकारणी आणि बुद्धिभेद करणारे पंडित आपल्याला भ्रमित करतात. ते सांगतात, मी अमुक अमुक जातीचा घटक आहे, माझी ओळख ओबीसी आहे, मराठा आहे, दलित आहे. धार्मिक ओळखींच्या बाबतीत काही सांगायलाच नको. या सर्व ओळखी संविधानाने न दिलेल्या आहेत. संविधानाने मला दिलेली एकच ओळख आहे, ‘मी प्रथम भारतीय आहे, दुसर्यांदा भारतीय आहे आणि तिसर्यांदाही भारतीयच आहे.’
संविधानाचा कायदा ही भारतीयत्वाची ओळख राजकीय अंगाने करून देतो. राजकीय अंगाने कशी, हे थोडे समजून घेऊ या. आपण सर्व जण भारत नावाच्या एका भूखंडात राहतो. या भूखंडाचे आपण नागरिक असतो. या भूखंडावर राहणार्या प्रजेने आपले राज्य कसे असावे हे ठरवलेे. त्यासाठी एक राज्यघटना तयार केली. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत हा सर्व विषय आलेला आहे. लोकांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेने आपल्या सर्वांची एक राजकीय ओळख असण्यासाठी सर्वांना समानतेने अनेक गोष्टी दिलेल्या आहेत.
आपल्याला आपल्या राज्यघटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत. समतेचे, स्वातंत्र्याचे आणि उपासना स्वातंत्र्याचे हे अधिकार आहेत. ते सर्व प्रजेसाठी आहेत. सर्वांना एकाच कायद्याखाली आणलेले आहे. आपल्या संविधानाने एक न्यायप्रणाली दिलेली आहे. आपल्या संविधानाने देशासाठी एकच चलनव्यवस्था स्वीकारली आहे. रुपयाचे मूल्य सर्व भारतात सारखेच असते. दिल्लीत वेगळे आणि चेन्नईत वेगळे असे नसते. पोस्टाची व्यवस्था एक आहे. दूरसंचार व्यवस्था एक आहे. आपला टाइम झोन एक आहे. या क्षणी आपल्या घड्याळात जितके वाजले असतील तीच वेळ श्रीनगर ते कन्याकुमारी येथील सर्व घड्याळांत दाखवली जाईल. सर्वांना भारतात कुठेही मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य आहे.
यातून एक भारतीय म्हणून माझे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व तयार होते. वर दिलेले सर्व विषय ही माझी वस्त्रे आणि अन्न आहेत. त्यामुळे माझी एक स्वतंत्र राजकीय ओळख होते. दुसर्या भाषेत सांगायचे तर संविधानाचा कायदा प्रजेला राजकीयदृष्ट्या संघटित करतो आणि बांधून ठेवतो. व्यक्तिजीवन आणि सामूहिक जीवन यांचा सुंदर मेळ या कायद्यामुळे घातला जातो. यामुळे सशक्त राज्याची निर्मिती होते. राज्य हा शब्द खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावा लागतो. राज्य याचा अर्थ अमुक अमुक राजाचे राज्य, सम्राटाचे साम्राज्य, असा करून चालत नाही. इंग्रजीत त्याला स्टेट म्हणतात. घटनेच्या दृष्टीने स्टेट एकच असते, त्याचे नाव आहे भारत. महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य, बिहार राज्य असे शब्दप्रयोग आपण करतो; परंतु संविधानाच्या भाषेत त्यांना राज्य म्हणता येत नाही. राज्यकारभाराच्या दृष्टीने ते केलेले विभाग आहेत. ही विभागीय ओळख महत्त्वाची की संविधानाने दिलेली भारतीय ओळख महत्त्वाची, याचा विवेक सतत जागृत ठेवायला पाहिजे.
आपले संविधान सशक्त, संघटित, समृद्ध राज्याचा विचार करूनच थांबत नाही. आपले संविधान हे विसरत नाही की, आपले भारतीय राज्य एका राष्ट्राचा भाग आहे. राज्य (स्टेट) आणि राष्ट्र (नेशन) या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. राज्य कायद्याने बांधून ठेवता येते, राष्ट्र भावनेने बांधावं लागतं. भावना केवळ कायद्यातून निर्माण होत नाही, भावनांची निर्मिती प्रदीर्घ इतिहास आणि संस्कृतीतून होत असते. इतिहास आणि संस्कृती आपल्याला काही मूल्ये देतात, ही मूल्ये जगावी लागतात.
आपल्या संविधानाची उद्देशिका सांगते की, राष्ट्राची एकता आणि एकात्मता आम्हाला मजबूत करायची आहे. ती कशी करायची आहे, तर न्यायावर आधारित सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समाजरचना उभी करून तसेच सार्वत्रिक बंधुभावना जोपासून. ही सार्वत्रिक बंधुतेची भावना सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अशा तिन्ही अंगांनी करावी लागते. संविधानाने आपल्या सर्वांना सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अधिकार दिलेले आहेत. त्यांच्याविषयी आपण सर्वांनी समान भावना जोपासणे आवश्यक आहे. बंधुता हा भावनिक विषय आहे.
आपल्या संविधानात बंधुतेला मूलभूत अधिकाराचा विषय केलेले नाही. का नाही केले? बंधुता ही कायदा करून निर्माण करता येत नाही. कायदा करून स्वातंत्र्य आणि समतेच्या अधिकारांचे रक्षण करता येते. कायद्याने बंधुता निर्माण करणे अशक्य आहे. ती संस्काराने निर्माण करावी लागते. संस्कार निर्माण करण्याची राज्यसंस्थेची शक्ती अतिशय मर्यादित असते. राज्यसंस्था दोन गोष्टी खूप चांगल्या प्रकारे करू शकते. त्यातील पहिली गोष्ट कायद्याचे भय निर्माण करू शकते, दंडशक्तीचा कठोर वापर करू शकते आणि दुसरी गोष्ट लोककल्याणाच्या असंख्य योजना करू शकते. संस्कारप्रणाली निर्माण करू शकत नाही.
राज्यसंस्थेच्या विविध अंगांत काम करणारे उच्चपदस्थ लोक संस्कारहीनतेमुळे अतिशय घाणेरडा व्यवहार करतात. कोलकात्याचे आर. जी. कर हॉस्पिटलचे प्रकरण आपल्याला माहीत आहे. तेथील प्रिसिंपलवरील अंगावर शहारे आणणारे आरोप वर्तमानपत्रांतून आलेले आहेत. संस्कारहीनतेचे हे ज्वलंत उदाहरण आहे. गांधीजींचे नाव घेऊन सत्तेवर यायचे, मद्यघोटाळा करायचा, तुरुंगात जायचे हीदेखील संस्कारहीनतेची उदाहरणे आहेत. प्रशासकीय अधिकारी नागरिकांचे काम करण्यासाठी पैशाची मागणी करतात, त्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो. संस्कारहीनता हे त्याचे मूळ आहे.
मग प्रश्न उरतो की, बंधुता कशी निर्माण होईल? संविधानाने त्याचा कोणता मार्ग सांगितलेला आहे. संविधानाने सांगितलेला मार्ग म्हटलं तर सोपा आहे आणि सोपा असल्यामुळे आचरण करण्यास थोडा कठीण आहे, हा विरोधाभास झाला; परंतु जीवनात असे अनेक विसंगतीपूर्ण विरोधाभास असतात. संविधानाची अपेक्षा अशी आहे की, आपण सर्वांनी भाषाभेद विसरले पाहिजेत, उपासनाभेद विसरले पाहिजेत, जातिभेद विसरले पाहिजेत. लिंगभेदातून विषमता आणि अन्याय निर्माण करू नये. दुर्बळांची काळजी करावी. पर्यावरणाचे रक्षण करावे. अशी समान उद्दिष्टे ठेवून जर आपण वागलो, तर बंधुतेची भावना वाढीला लागेल.
एकाच माता-पित्याच्या दोन अपत्यांमध्ये रक्ताच्या नात्याने बंधुभाव-भगिनीभाव असतो. ही भावंडे एकमेकांची काळजी करतात. एखादा भाऊ किंवा बहीण वाह्यात निघाली तर तिला किंवा त्याला टाकून देत नाही, तर त्यांना सांभाळून घेतात. आपला शब्द आहे ‘पदराखाली घेतात’. यामुळे कुटुंबव्यवस्था टिकून राहते आणि मजबूत होते. भावनिक हितसंबंध समान असल्यामुळे ही भ्रातृत्वाची भावना प्रबळ राहते.
आम्ही सर्व भारतीय आहोत. आमचा एक देश आहे. आमच्या सर्वांच्या समान आकांक्षा आहेत. आम्हा सर्वांना बांधून ठेवणारा एक समान कायदा आहे. आम्हा सर्वांना स्वातंत्र्य, समता, उपासनेचे अधिकार प्राप्त झाले आहेत. या समान भावना एका भारतीयाला दुसर्या भारतीयाशी जोडून ठेवणार्या आहेत. त्याचे भावनिक जागरण अत्यंत प्रभावीपणे सांस्कृतिक माध्यमातून होत राहिले पाहिजे. कविता, कथा, नाटक, चित्रपट, दूरदर्शनवरील विविध मालिका, ही सर्व प्रभावी माध्यमे आहेत. त्या माध्यमांचे संचालन करणार्या मंडळींचे सामूहिक भावना प्रबळ करण्याचे पहिले राष्ट्रीय कर्तव्य आहे. राज्य कायद्याने बांधता येते आणि राष्ट्राची बांधणी सार्वत्रिक बंधुतेच्या भावनेने करावी लागते. आपली राज्यघटना या दोघांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करते, हे तिचे आगळेेवेगळे वैशिष्ट्य आहे. ऊठसूट बंद पुकारणारे ज्या प्रश्नांचे राजकारण करू नये त्या प्रश्नांचे राजकारण करतात. सद्भावनाच्या बुरख्याखाली धार्मिक तेढ वाढविणारे आपले राज्यही बळकट करत नाहीतच आणि राष्ट्राच्या बळकटीचा स्वप्नातही विचार करत नाहीत. यासाठी आपण निरंतर जागरूक राहणे आवश्यक ठरते.