नव्या कल्पनांचा आणि त्यास पूरक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणे यात सायबर गुन्हेगार तरबेज होत चालले आहेत. तंत्रज्ञानातील नवसाक्षरांसह युवा पिढीलाही अगदी सहजपणे आपल्या जाळ्यात ओढून बसल्या जागी लाखो रुपये कमावण्याचे प्रलोभन सायबर गुन्हेगारांना अधिक प्रोत्साहित करत आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ किंवा ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’ हा त्यातील एक नवा, अनोखा आणि भयानक प्रकार आहे. सायबर गुन्ह्याचा हा नवा प्रकार आहे. काय आहे हा प्रकार? त्याबाबत या लेखात प्रकाश टाकला आहे.
एके दिवशी तुम्हाला एखाद्या कस्टम अधिकार्याचा, पोलिसांचा, अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) किंवा तत्सम शासकीय अधिकार्याचा व्हिडीओ कॉल येऊ शकतो. तुम्ही परदेशात ड्रग किंवा तत्सम बंदी असलेली वस्तू पाठवली आहे किंवा कर बुडवला किंवा सोशल मीडियावर चुकीची माहिती पोस्ट केली आहे किंवा अन्य कोणतेही कारण सांगितले जाऊ शकते. तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि अन्य खासगी माहिती अचूकपणे सांगून तुमची खात्री पटवली जाऊ शकते. आणखी खात्री करण्यासाठी एखाद्या पोलीस स्थानकात येण्याबाबतही कळवले जाऊ शकते. दरम्यान कॉल सुरू असतानाच हे प्रकरण मिटवण्यासाठी विशिष्ट रकमेची लाच मागितली जाऊ शकते. जोपर्यंत ठरलेली रक्कम दिली जात नाही; तोपर्यंत तुम्हाला ‘डिजिटल अटक’ (डिजिटल अरेस्ट) केले असल्याचे सांगून तुम्ही व्हिडीओ कॉल बंद करू शकत नाहीत; बंद केल्यास आणखी कडक कारवाई केली जाईल, अशी धमकी दिली जाऊ शकते. तेव्हा तुम्ही समजून जा की, हा प्रकार सायबर गुन्ह्याचा नवा प्रकार आहे. काय आहे हा प्रकार? त्याबाबत या लेखात प्रकाश टाकला आहे.
काय आहे डिजिटल अरेस्ट?
डिजिटल अरेस्ट ही मूलतः सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी वापरण्यात येणारी कायदेशीर प्रक्रिया आहे; परंतु सायबर गुन्हेगार या संकल्पनेचा गैरवापर करून लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्या डिजिटल साधनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पद्धतीने याचा उपयोग करत आहेत. या प्रकारात सायबर गुन्हेगार आपण सार्वजनिकरीत्या शेअर केलेली माहिती संकलित करतात. त्यामध्ये आपला संपर्क क्रमांक, पत्ता (शहर), ईमेल आयडी, आधार क्रमांक आणि इतर माहितीचा समावेश असू शकतो. ही माहिती घेऊन आपल्याला (ज्याला फसवायचे आहे त्याला) व्हिडीओ कॉल केला जातो. सीबीआय किंवा एनआयए किंवा पोलीस स्थानक किंवा सर्व एकत्र किंवा तत्सम सरकारी अधिकारी सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले जाते. यासाठी व्हिडीओ कॉलचे माध्यम निवडले जाते. तसेच कॉलदरम्यान बोलणारा व्यक्ती गणवेशात आणि पोलीस स्थानक किंवा इतर शासकीय कार्यालयात असल्याचे दाखवले जाते. या टोळीने आपल्या माहितीचे विश्लेषण करून ठरवलेले नाट्य केले जाते. उदाहरणार्थ तुमचे अमुक पार्सल अडकले आहे, त्यात ड्रग्ज आहेत किंवा तुमच्या नावे असलेली पिशवी सापडली असून त्यात अवैध पासपोर्ट, अन्य गोष्टी आहेत किंवा तुमच्यावर डिजिटल अरेस्ट वॉरंट आहे किंवा तुम्ही विशिष्ट प्रकारचा कर बुडवला आहे, तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला अटक होईल, अशी धमकी दिली जाते. हे सगळे तुम्हाला व्हिडीओ कॉलद्वारे सांगितले जाते. खात्री पटवण्यासाठी एखाद्या पोलीस स्थानकात येण्याची सूचना केली जाते. कॉलमध्ये गुंतवत प्रसंगी व्हिडीओ कॉलमध्ये पोलीस स्टेशन किंवा तत्सम शासकीय कार्यालय, शासकीय वेशातील अधिकारी-कर्मचारी दाखवून खात्री पटवण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये पुष्कळ वेळ म्हणजे काही तासही खर्च केल्यावर हे प्रकरण बंद करण्यासाठी यावर एक वेगळा मार्ग असल्याचेही सुचवले जाते. तो मार्ग म्हणजे विशिष्ट रक्कम विशिष्ट खात्यात आणि विशिष्ट, पण मर्यादित वेळेत ट्रान्सफर करणे.
गुन्ह्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणात विश्वासार्हता पटावी यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आहेत. त्यामध्ये एखाद्या अधिकार्याचा आवाज किंवा प्रतिमा वापरणे तसेच व्हिडीओ कॉलदरम्यान एखादी वस्तू किंवा स्थळ पीडित व्यक्तीला दाखवणे. तसेच एखादे पोलीस स्थानक किंवा संबंधित शासकीय कार्यालय दाखवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे.
रक्कम ट्रान्सफर केली तर हे प्रकरण मिटवण्याची ’ऑफर’ दिली जाते. ही रक्कम व्यक्तीनिहाय वेगवेगळी सांगितली जाते. रक्कम ठरविण्यासाठी गुन्हेगारांनी संबंधित व्यक्तीची गोळा केलेली वैयक्तिक माहिती उपयोगात आणली जात असावी. काही प्रकरणांत प्रारंभी 10-15 लाख रुपये रक्कम सांगितली जाऊ शकते. मात्र त्यात तडजोड करून दोन-तीन लाखांपर्यंत ’सौदा’ पक्का केला जाऊ शकतो. त्यानंतर एवढी रक्कम उभारण्यासाठी लागणार्या वेळासाठी आपणास ’डिजिटल अरेस्ट’ केले असल्याचे सांगितले जाते. जर दिलेल्या कालावधीत ही रक्कम जमा केली नाही, तर आपणास प्रत्यक्षात अटक केली जाईल, अशी धमकी दिली जाते.
‘डिजिटल अरेस्ट’ केले असल्याने आपणास ठरलेली ‘तडजोडीची’ रक्कम जमा होईपर्यंत व्हिडीओ कॉल बंद करता येणार नसल्याचे सांगितले जाते. काही प्रकरणांत बनावट अॅप डाऊनलोड करून नकली डिजिटल फॉर्म भरण्याबाबत सूचित केले जाते आणि रक्कम हस्तांतरित होईपर्यंत मानसिक दबाव निर्माण केला जातो. एकदा रक्कम हस्तांतरित झाली की व्हिडीओ कॉल बंद केला जातो. हा आहे नवा सायबर गुन्हा!
ही आहेत काही प्रकरणे
1) अलीकडे लखनौमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अधिकार्याची सीबीआय, एनआयए आणि कस्टम्सचे अधिकारी म्हणून भासवून तीस लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित गुन्हेगाराला लखनौ पोलिसांनी अटक केली आहे.
2) बंगळुरूमध्ये अलीकडेच ईडीचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करत एका 73 वर्षीय व्यक्तीला तब्बल 3.8 कोटी रुपयांना फसविण्यात आले आहे. तैवानला तुमच्या नावाने पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज होते म्हणून मुंबई पोलिसांच्या निगराणीखाली असल्याचा दावा करत फसवणूक करणार्यांनी पीडित व्यक्तीला पाच मि. ते दहा मि. या कालावधीत ’डिजिटल अटक’ (व्हिडीओ कॉलद्वारे देखरेख) केले होते.
3) नोएडा येथे एका पीडितेला एकदा एक आयव्हीआर कॉल आला, ज्यात तिला कळवले की, तिचे आधार कार्ड मुंबईमध्ये मोबाइल फोनचे सिम कार्ड बेकायदेशीर कामांसाठी खरेदी करण्यासाठी वापरले गेले. त्यानंतर हा कॉल मुंबई पोलीस अधिकारी म्हणून दाखविणार्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यात आला. ज्याने कॉल आणि स्काइप व्हीसीची प्राथमिक चौकशी केली. या सिमचा वापर केला असल्याचे सांगून पीडितेवर एका विमान कंपनीच्या संस्थापकाशी संबंधित मनी लाँड्रिंगचा खोटा आरोप करण्यात आला होता. सीबीआयमधील कथित आयपीएस अधिकार्याकडून पुढील चौकशीसाठी गुन्हेगारांनी सत्य असल्याचे भासवून स्काइप आयडीदेखील दिला. फसवणूक करणार्या सीबीआय अधिकार्याने दावा केला की, पीडितेचे नाव एअरलाइन संस्थापकाच्या निवासस्थानी डेबिट कार्डवर आढळले, ज्यामुळे निधी हस्तांतरणाचा आरोप आणि सर्वोच्च न्यायालयाने वॉरंट जारी केले. या प्रकरणातून तिचे नाव काढून टाकण्यासाठी, पीडितेला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी भाग पाडले गेले. वैयक्तिक तत्काळ कर्जासाठी अर्ज करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला, ज्यामुळे तिचे एकूण अकरा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.
4) हैदराबादमध्ये एका वकिलाच्या लॅपटॉपवर रॅन्समवेअर हल्ला झाला. एक पॉप-अप नोटिफिकेशन आले ज्यामध्ये डिजिटल अटकेसाठी तपासणी सुरू आहे, असे सांगण्यात आले आणि त्याच्या सगळ्या फाइल्स लॉक करण्यात आल्या. फाइल्स अनलॉक करण्यासाठी एक लाख रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये भरण्याची मागणी करण्यात आली. वकिलाने सायबर सेलला संपर्क साधून हे प्रकरण मिटवले.
5) पुण्यात 2022 मध्ये एका माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकाला बनावट ईमेल प्राप्त झाला, ज्यामध्ये ‘डिजिटल अटकेसाठी चौकशी’ करण्याचे सांगण्यात आले होते. ईमेलमध्ये एक डिजिटल तपासणी फॉर्म भरण्यासाठी एक लिंक दिली होती. लिंकवर क्लिक करताच, त्याच्या बँक खात्याची सर्व माहिती सायबर गुन्हेगारांच्या हातात गेली आणि त्याच्या खात्यातून मोठी रक्कम काढली गेली.
6) मुंबईत एका कॉलेज विद्यार्थिनीला फोन आला की, तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चुकीची माहिती पोस्ट केली गेली आहे आणि तिला डिजिटल अटक होण्याची शक्यता आहे. फसवणूक करणार्याने स्वतःला सायबर सेल अधिकारी म्हणून सांगितले आणि तिला प्रकरण बंद करण्यासाठी 10,000 रुपये ऑनलाइन भरण्यास सांगितले. विद्यार्थिनीने पैसे भरले; परंतु नंतर लक्षात आले की, ती फसवली गेली आहे.
7) नवी दिल्लीतील एका व्यापार्याला 2022 मध्ये एक ईमेल आला ज्यामध्ये दावा करण्यात आला की, त्याच्यावर डिजिटल अरेस्ट वॉरंट जारी केला आहे. या ईमेलमध्ये त्याला फसवणुकीच्या चौकशीसाठी बोलावले असल्याचे सांगण्यात आले. तसेचनिर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्वरित 50,000 रुपये भरण्यास सांगण्यात आले. घाबरलेल्या व्यापार्याने पैसे भरले; परंतु नंतर समजले की, ही फसवणूक होती.
फसवणूक झाल्यास काय करावे?
पुरेशी दक्षता घेऊनही आपल्या किंवा आपल्या परिचितांच्या बाबतीत अनावधानाने ’डिजिटल अरेस्ट’ किंवा तत्सम प्रकार घडल्यास गोंधळून न जाता आधी 1930 या सायबर क्राइम मदत क्रमांकावर संपर्क साधा. त्यानंतर नजीकच्या पोलीस स्थानकात तक्रार करावी. www.cybercrime.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन तक्रारही नोंदवू शकता.
केंद्र सरकारची कारवाई
ईडी अधिकारी म्हणून सायबर गुन्हेगारांद्वारे डिजिटल अरेस्टच्या वाढत्या प्रकरणानंतर, केंद्र सरकारने ऑनलाइन धमकी, ब्लॅकमेल आणि खंडणीसाठी वापरल्या जाणार्या एक हजाराहून अधिक स्काइप आयडी ब्लॉक करण्यासाठी मायक्रोसॉफ्टशी सहयोग केला आहे. एखाद्या घटनेनंतर लगेच तक्रार नोंदवण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. दरम्यान केंद्र सरकारने डिजिटल साधने वापरकर्त्यांना सूचना करण्यासोबतच सायबर गुन्हेगारांना शोधून कठोर शासन करण्याची आवश्यकता आहे.
हे लक्षात ठेवा
1) एखादे प्रकरण मिटविण्यासाठी खरोखरच लाच घेणार्या व्यक्ती कोणताही पुरावा मागे न ठेवता लाच म्हणून घेतलेली रक्कम शक्यतो रोखीत एखाद्या मध्यस्थांमार्फतच स्वीकारतात. गैरव्यवहार करणारा कोणताही व्यक्ती किंवा समूह कधीही व्हिडीओ कॉल करून बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगत नाही.
2) कायद्यानुसार ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी संशयित किंवा आरोपींच्या डिजिटल माहितीच्या पडताळणीचा समावेश आहे; परंतु या संकल्पनेचा विपर्यास करून सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांची फसवणूक करत आहेत.
धोक्याची घंटा!
आतापर्यंत नवसंगणक साक्षर किंवा ज्येेष्ठ नागरिक यांनाच सायबर गुन्हेगार आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, ’सायबर अरेस्ट’च्या एका प्रकरणात इन्फोसिस या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असलेल्या व्यक्तीलाही जाळ्यात ओढून साडेतीन कोटी रुपयांहून अधिक रुपयांना फसवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांचे नव्या शिक्षित पिढीला जाळ्यात ओढण्याचे नवे यशस्वी सत्र सुरू झाल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येकाने दक्ष राहणे अपरिहार्य आहे.
समारोप
माहिती तंत्रज्ञानाच्या जगात खरे काय आणि खोटे काय हे ठरवणे दिवसेंदिवस क्लिष्ट होत चालले आहे. त्यामुळे प्रामाणिक व्यक्तीने कोणत्याही धमक्या आणि दबावाला बळी न पडता आणि आपल्या कष्टाचा एक रुपयाही कुणालाही विनाकारण न देता वैध मार्गाने शांतपणे अशा प्रकरणाची तात्काळ पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा माहितीच्या आधारावर पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचणे सोपे जाईल.