संघशाखा म्हणजे लोकमत परिष्कार

(विचारसुमन - 6)

विवेक मराठी    13-Jan-2025   
Total Views |
व्यक्ती व समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत राहावी म्हणून जे प्रयत्न होत असतील त्याला लोकमत परिष्कार म्हणता येईल. संघ स्वयंसेवकांचे समाजाप्रति कार्य हे प्रामाणिकपणे, निःस्वार्थ बुद्धीने आणि तन-मन-धनपूर्वक असते. स्वयंसेवकाला कशाचाच मोह नाही. संघ स्वयंसेवकांची समाजजीवनामध्ये म्हणजेच राष्ट्रजीवनामध्ये भूमिका लोकमत परिष्काराचीच असते.
rss
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 1925 साली प्रारंभ झाला. 1940 साली डॉक्टर हेडगेवार यांचा देह शांत झाला. अवघ्या पंधरा वर्षांत संघाचे काम देशभर पसरले. 1940 साली नागपूरला झालेल्या प्रशिक्षण वर्गासाठी 1400 कार्यकर्ते आले होते. 9 जूनला वर्गाचा समारोप झाला. परमपूज्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे उद्बोधन झाले. डॉक्टरांचे कार्यकर्त्यांना उद्देशून ते अखेरचे मार्गदर्शन ठरले. डॉक्टरांना याची कल्पना असावी म्हणून त्यांनी आपली सर्व शक्ती एकवटून केलेले ते भाषण आहे.
 
‘संघात जाऊन तुम्हाला काय मिळते? तुम्ही ब्राह्मणेतर असून संघात कसे? तुम्ही बुद्धिवादी असूनही बंदिस्त विचारसरणी असलेल्या संघात कसे काय रमू शकता?’ या सर्व प्रश्नांची उत्तरे ..
 https://www.vivekprakashan.in/books/why-we-are-in-sangha/
 
 
...मला वाटत नाही, तुमच्यापुढे दोन शब्दही मी आज नीटपणे सांगू शकेन... संघाच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत सद्भाग्याचे आहे. आज माझ्यासमोर हिंदू राष्ट्राचे छोटे स्वरूप पाहत आहे. माझा व आपला परिचय नसताना अशी कोणती गोष्ट आहे, की जिच्यामुळे तुमचे अंत:करण माझ्याकडे व माझे अंत:करण तुमच्याकडे धाव घेते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्त्वज्ञानच असे प्रभावी आहे की, ज्या स्वयंसेवकांचा परस्परांशी परिचय नाही, त्यांना पाहता क्षणीच एकमेकांविषयी प्रेम वाटते. बोलता-बोलता ते एकमेकांचे मित्र होऊन जातात. मी 24 दिवस अंथरुणावर पडून होतो. माझे अंत:करण तुमच्याजवळ होते.
 
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल? त्याची संकल्पना काय? अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा?
https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/


 
 आज तुम्ही आपापल्या स्थानी परत जात आहात. मी तुम्हाला प्रेमाने निरोप देत आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत संघाला विसरणार नाही, अशी प्रतिज्ञा करा.
 
 
‘आज मजकडून किती काम झाले’ याची रोज निजतेवेळी आठवण करा.
 
संघाचे कार्यक्रम बिनचूक करणे, रोज नियमित संघस्थानी उपस्थित राहणे (शाखेत जाणे), एवढ्याने संघकार्य संपत नाही.आसेतु हिमाचल पसरलेल्या हिंदू समाजाला आपल्याला संघटित करावयाचे आहे.
 
हिंदू जातीचे (समाजाचे) अंतिम कल्याण संघटनेतच आहे. दुसरे कोणतेही काम संघाला करावयाचे नाही.
 
संघ पुढे काय करणार? हा प्रश्न निरर्थक आहे. संघ हेच संघटनेचे काम पुढे किती तरी वेगाने करणार आहे. हे मार्गक्रमण करता-करता असा एक सोन्याचा दिवस निश्चित उगवेल की, ज्या दिवशी सर्व हिंदुस्थान संघमय झालेला दिसेल. मग हिंदू जातीकडे वाकड्या दृष्टीने पाहू शकणारी कोणतीही शक्ती उभ्या जगात राहणार नाही.
 
 
आम्ही कोणावर आक्रमण करण्यास निघालेलो नाही; पण आमच्यावर आक्रमण होणार नाही याची खबरदारी मात्र आम्हाला घेतलीच पाहिजे.
 
महत्त्वाचे कार्यक्षेत्र संघाबाहेरच आहे. संघ केवळ स्वयंसेवकांपुरता नाही. संघाबाहेरील लोकांसाठीही संघ आहे. राष्ट्रोद्धाराचा खरा मार्ग सर्व लोकांना दाखवून देणे हे आपले ‘कर्तव्य’ आहे.
  
संघशाखेच्या रचनेमध्ये गटनायक हे काम करीत असतो. सात-आठ स्वयंसेवकांच्या घरी संपर्क ठेवण्याचे काम त्याला दिलेले असते. तो प्रत्येकाच्या घरी वारंवार जातो. आई-वडील, भाऊ-बहीण व घरी असलेले अन्य कोणी नातेवाईक यांचा परिचय करून घेणे, संघासंबंधी काही माहिती देणे, ही कामे तो बोलता-बोलता सहज करतो. त्याचा व्यवहार परिवारातील ज्येष्ठ मंडळींना आदर देणारा व नम्रतेचा असतो. वारंवार जाण्यामुळे तो त्या परिवारातील एक घटकच बनून जातो.
 
rss 
 
एक गटनायक-आठ परिवार-परिवारामध्ये पाच सदस्य असा ढोबळ हिशोब मानला तर एक गटनायक 40 नागरिकांचे मानस संघानुकूल म्हणजेच राष्ट्रानुकूल बनवतो. एका शाखेत किमान पाच गटनायक मानले तरी एक संघशाखा किमान दोनशे नागरिकांचे प्रबोधन करते. यालाच ‘एकात्म मानव दर्शन’चे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी लोकमत परिष्कार म्हटले आहे. गटनायक हा संघशाखेतील संपर्क करणारा पहिल्या पायरीवरचा कार्यकर्ता आहे.
 
 
लोकमत अनेक माध्यमांतून बनतच असते. शिक्षण, साहित्य, कला, संगीत, संवाद माध्यमे, आजकाल सोशल मीडिया आणि निवडणूक काळातील पक्षोपक्षाच्या वतीने होत असलेले चर्चा-चर्वितचर्वण आदीद्वारे लोकमत बनतच असते. सध्याचे युग माहितीचे युग मानले जाते. विचारांचा मारा आपल्यावर सतत होतच असतो.
 
अशा वातावरणात काय घ्यावे आणि काय सोडावे याचा विवेक जागृत असावा लागतो. याला कोणी सदसद्विवेकबुद्धी म्हणतात.सत्-असत् विवेक हवा. व्यक्तीला, कुटुंबाला, समाजाला व देशाला हितकारक आहे, ते स्वीकार्य व्हावे. माझ्या हिताचे आहे; पण कुटुंबाच्या हिताचे नाही. जे कुटुंबाच्या हिताचे आहे; पण माझ्या समाजाच्या (जात, युनियन, संप्रदाय आदी) हिताचे नाही. माझ्या समाजाच्या हिताचे; पण देशाच्या हिताचे नाही असे जे असेल ते त्याज्य समजावे. माझ्या, कुटुंबाच्या, समाजाच्या व देशाच्या हिताचे होईल ते स्वीकार्य, यालाच विवेकबुद्धी म्हणता येईल.
 
 
व्यक्ती व समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत राहावी म्हणून जे प्रयत्न होत असतील त्याला लोकमत परिष्कार म्हणता येईल. असे कार्य साधुसंत, कीर्तनकार, प्रवचनकार, ऋषी-मुनी, भिक्खू वर्ग करीत असतो. ज्यांना स्वतःचा काही स्वार्थ नाही, जे सत्तातुर, कामातुर, धनातुर, मानातुर नाहीत व राष्ट्रहित सर्वतोपरी मानणारा वर्ग लोकमत परिष्कार करू शकतो.
 
 
संघ स्वयंसेवकांची समाजजीवनामध्ये म्हणजेच राष्ट्रजीवनामध्ये भूमिका लोकमत परिष्काराचीच असते. स्वयंसेवक भगव्या ध्वजाला म्हणजेच त्यागमूर्तीला साक्षी ठेवून प्रतिज्ञा करीत असतो. संघाचे कार्य मी प्रामाणिकपणे, निःस्वार्थ बुद्धीने आणि तन-मन-धनपूर्वक करीन. स्वयंसेवकाला कशाचाच मोह नाही. एका काव्याची पंक्ती त्याच्या मनात नेहमी रुंजन घालीत असते.
 
वृत्तपत्र में नाम छपेगा, पहनुंगा स्वागत सुमहार ।
छोड चलो ये क्षुद्र भावना, हिंदूराष्ट्र के तारणहार ।
 
स्वयंसेवक जिथे राहतो तेथे अनेक परिवारांशी आत्मीयतेचे आणि स्नेहाचे संबंध उत्पन्न करतो. कोणाबद्दलही भेदभावना व पूर्वग्रह मनात ठेवत नाही. आपले चारित्र्य, निःस्वार्थपणा, स्नेहमय आणि नम्रतापूर्वक व्यवहार यामुळे आपल्या क्षेत्रात तो आदरास प्राप्त होतो. कोणत्याही एका समाजगटाचा, जातीचा वा पक्षाचा प्रवक्ता बनून तो काम करीत नाही. कधी-कधी मदतीस धावून जातो. त्यामुळे अनेकांना आपल्या मोहल्ल्याचा आणि सोसायटीचा तो आधार वाटतो. लोक त्याच्याशी चर्चा करतात. इथेच त्याचे लोकमत परिष्काराचे कार्य प्रारंभ होते. डॉ. हेडगेवार यांनी अखेरच्या संदेशात केलेले मार्गदर्शन त्याला आठवते. राष्ट्रोद्धाराचा खरा मार्ग सर्व लोकांना दाखवून देणे हे आपले कर्तव्यच आहे. हिंदू समाजाचे अंतिम कल्याण संघटनेतच आहे. तृतीय सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस म्हणत असत, आत्मीयतापूर्ण कौटुंबिक संपर्क असेल तर बोलण्यात सहजता राहते. घरसंपर्क हा संघशाखेचा प्राण आहे. दहा हजार लोकसंख्येमध्ये किमान एक शाखा असा हिशोब सध्या मांडला जातो. म्हणजेच एका शाखेने दोन हजार परिवारांशी संपर्क साधला पाहिजे. समाज संघाचा आणि संघ समाजाचा आहे. समाजमन जाणण्यासाठी संपर्क आवश्यक आहे. शाखा संपर्काचे निमित्त शोधत असते. रक्षाबंधन हे असेच निमित्त आहे. भावंड-भावनेचा विस्तार करण्याकरिता रक्षाबंधनाचे पर्व अत्यंत उपयोगी आहे.
 
 
लोकसंपर्क, लोकसंस्कार, लोकसंग्रह व लोकनियोजन हे डॉक्टरांच्या जीवनाचे सूत्र म्हणून सांगता येईल. ते सूत्र पकडून स्वयंसेवक काम करीत असतात. लोकसंपर्कातून आत्मीयता व सहजता निर्माण व्हावी. लोकसंस्कार म्हणजे समाजानुकूल, देशानुकूल विचार व व्यवहार व्हावा. लोकसंग्रह म्हणजे देशानुकूल विचार करणार्‍या व्यक्तींना कामात जोडणे व लोकनियोजन म्हणजे संघटनकार्याला वाहून घेणारे कार्यकर्ते उभे करत राहणे. हे चक्र सतत चालू राहिले पाहिजे.
 
 
लोकसंपर्काचा दायरा जेवढा वाढवता येईल, तेवढा वाढवण्याचा संघाचा प्रयत्न असतो. समाजाच्या सर्व वर्गांतील (वैज्ञानिक, खेळाडू, कलाकार, साधुसंत, धर्माचार्य, शेतकरी, मजूर, जनजाती आदी) गणमान्य नागरिकांची यादी तयार करून त्यांच्याशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न होतो. प्रतिनिधी सभेत मंजूर झालेल्या प्रस्तावावर चर्चा होते. परमपूज्य सरसंघचालकांच्या विजयादशमीच्या भाषणावर प्रयत्नपूर्वक भारतातील 40-50 शहरांमध्ये चर्चा घडवली जाते.
 
 
 
अखेरच्या भाषणात डॉ. हेडगेवार म्हणतात की, ‘संघाच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत सद्भाग्याचे आहे. आज माझ्यासमोर हिंदू राष्ट्राचे (म्हणजे जागरूक हिंदू समाजाचे) छोटे स्वरूप मी पाहात आहे. संघटन वाढता-वाढता असा एक सोन्याचा दिवस निश्चित उगवेल की, ज्या दिवशी संपूर्ण हिंदुस्तान संघमय झालेला दिसेल. मग हिंदू समाजाकडे वाकड्या दृष्टीने पाहणारी शक्ती उभ्या जगतात कोणी उरणार नाही. असा अजेय शक्तिसंपन्न हिंदू समाज उभा राहावा. त्यातच जगाचे आणि मानवतेचे कल्याण आहे. असे ध्येय ठेवून डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रारंभ केला.
 
लोकमन संस्कार करना, यह परमगति साधना है ।
और रचना गौण है सब, यह शिखर संयोजना है ।

मधुभाई कुलकर्णी

राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत...