@महेश काळे
यंदाची 24 वी राष्ट्रीय वनवासी खेलकूद प्रतियोगिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धा म्हणजे प्रचंड ऊर्जेने भारलेला क्रीडा महोत्सव असतो. तिरंदाजी आणि फुटबॉल या दोन प्रकारांमध्ये यंदाची स्पर्धा झाली. यानिमित्त वनवासी क्षेत्रातील युवकांची खेळामधील प्रतिभा शोधतानाच त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणे आणि खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हे वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट साकार होत आहे.

वनवासी क्षेत्रातील युवकांच्या क्रीडा कौशल्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 1987 ला मुंबईत सुरू झालेली एकलव्य खेलकूद प्रतियोगिता आता वनवासी कल्याण आश्रमाचे एक देशव्यापी वैशिष्ट्य बनले आहे. अफाट शारीरिक क्षमता, काटकपणा आणि चपळाई या अंगभूत गुणांच्या आधारावर वनवासी क्षेत्रातील बालक-युवक क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी मारू शकतात, हा विचार घेऊन स्व. अशोकजी साठे या मुंबईतील समर्पित कार्यकर्त्याची कल्पकता आणि मेहनतीच्या बळावर एकलव्य खेलकूद स्पर्धा सुरू झाल्या. त्यांच्याच प्रयत्नाने 1987 ला मुंबईतील कांदिवली येथे पहिली एकलव्य खेलकूद स्पर्धा संपन्न झाली. कधीही रेल्वेत न बसलेल्या, शहराच्या झगमगाटापासून किती तरी मैल दूर असलेल्या वनवासी क्षेत्रातील जवळपास साडेतीनशे खेळाडूंचा या स्पर्धेच्या निमित्ताने थेट मुंबई महानगरीत प्रवेश झाला होता.
क्रीडा क्षेत्रात भारताची सातत्याने होत असलेली दुर्दशा थांबविण्यासाठी देशभरातील उपेक्षित आणि दुर्लक्षित अशा वनवासी क्षेत्रातील खेळाडूंचे योगदान मिळवण्याचा भारताच्या क्रीडा इतिहासातील हा अचाट प्रयोग होता. देशभरातील साडेतीनशे खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित होते. भारताचे प्रसिद्ध अॅथलीट ’फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंह या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रातील या खेळाडूंची चमक पाहून आपल्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे या सुदूर जंगलात निवास करत असलेल्या युवकांमधूनच कुणी तरी माझा विक्रम नक्की मोडू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
योगायोगाची बाब म्हणजे त्यानंतर अशाच एकलव्य खेलकूद स्पर्धेतून पुढे आलेल्या आणि भारतीय संघातून थेट ऑलिंपिकपर्यंत धडक मारलेल्या नाशिकच्या कविता राऊत यांनी मिल्खा सिंह यांचा विक्रम मोडून हा विश्वास सार्थ ठरवला.
1987 ला मुंबईतून सुरू झालेला हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. सुरुवातीची काही वर्षे एशियाड-ऑलिंपिकच्या धर्तीवर या स्पर्धा दर चार वर्षांनी होत असत; पण गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी तिरंदाजी हा समान प्रकार ठेवत अॅथलेटिक्स, फुटबॉल, खो-खो, कबड्डी आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांपैकी एक अशा दोन प्रकारांमध्ये दरवर्षी ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धा म्हणजे प्रचंड ऊर्जेने भारलेला क्रीडा महोत्सव असतो. खेळाच्या निमित्ताने जनजाती समाजाचे सांस्कृतिक दर्शन आणि नगरीय क्षेत्रातील व्यक्तींचा या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभाग असतो. तालुकास्तरापासून आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करत राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले शेकडो खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असतात.
यंदाची 24 वी राष्ट्रीय खेलकूद प्रतियोगिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाली. रायपूर आणि अन्य विविध महानगरांमधील कार्यकर्त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक या स्पर्धेची तयारी केली होती. छत्तीसगडमधील जनजाती समाजाचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेल ज्योती यात्रा, मातृहस्ते भोजन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रायपूर महानगरातील शेकडो परिवारांशी यानिमित्ताने संपर्क साधण्यात आला होता. दुर्दैवाने भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंहजी यांच्या निधनामुळे हे सर्व उपक्रम रद्द करत अत्यंत साधेपणाने या स्पर्धा संपन्न झाल्या.

तिरंदाजी आणि फुटबॉल या दोन प्रकारांमध्ये यंदाची स्पर्धा संपन्न झाली. देशभरातून 579 खेळाडू प्रदीप सहभागी झाले होते. त्यामध्ये 69 महिला खेळाडूंचा सहभाग होता. मणिपूरपासून ते राजस्थानपर्यंत आणि सुदूर बस्तरसारख्या दुर्गम भागातून ते थेट अंदमानसारख्या छोट्या बेटावरून हे सर्व खेळाडू आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी रायपूर नगरीमध्ये दाखल झाले होते. शेजारी राष्ट्र नेपाळमधील खेळाडूदेखील स्पर्धेत सहभागी झाले होते. आश्चर्याची बाब म्हणजे या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच रेल्वेमध्ये बसलेल्या खेळाडूंची संख्या ही लक्षणीय होती.
27 डिसेंबरला खेळाडू म्हणून विविध औपचारिकता पूर्ण केल्यानंतर 28 तारखेला दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंहजी यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अत्यंत साध्या सोहळ्यात या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्रसिंहजी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या नाशिक येथील कविता राऊत-तुंगार या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रारंभी तिरंदाजी आणि फुटबॉलचे उद्घाटकीय सामने सायन्स कॉलेज, पं. रविशंकर शुक्ल विद्यापीठ मैदान आणि स्वामी विवेकानंद स्टेडियम, कोटा या तीन स्वतंत्र ठिकाणी खेळवण्यात आले.
फुटबॉल स्पर्धेसाठी 27 प्रांतांमधील 378 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. फुटबॉल हा खेळ तसा सर्वदूर वनवासी क्षेत्रात खेळला जात नाही, मात्र काही राज्यांमध्ये, त्यातही पूर्वांचलातील राज्ये किंवा पश्चिम बंगाल, झारखंड अशा राज्यांमध्ये युवक उत्साहात फुटबॉल खेळत असतात. तसे बर्यापैकी नवखे असूनही एकूणच या फुटबॉलच्या स्पर्धेत खूपच रंगत चढली होती. अंतिम सामन्यात संथाल परगना संघाने केरळचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत वनवासी क्षेत्रातील युवकांची शारीरिक क्षमता आणि चपळाई चांगलीच नजरेत भरत होती.

तिरंदाजी हा तसा वनवासी क्षेत्रातील युवकांच्या दृष्टीने अत्यंत जवळचा खेळ. तीरकमान तर वनवासी क्षेत्रातील काही वर्षांपूर्वीपर्यंत एक नियमित शस्त्र मानले जायचे. अर्थात तिरंदाजीचा खेळ असतो आणि त्याच्या स्पर्धा होतात हे समजायलाच या युवकांना बराच काळ गेला. मात्र कल्याण आश्रमाने तिरंदाजीमधील युवकांचे कौशल्य लक्षात घेऊन दरवर्षी या क्रीडा प्रकाराचा स्पधेर्र्र्त समावेश केला. रायपूरलादेखील तिरंदाजीच्या स्पर्धेत 69 मुलींसह एकूण 201 खेळाडू सहभागी झाले होते. पुरुषांच्यास्पर्धेत पूर्वी उत्तर प्रदेश संघाने 12 पैकी चार पदके मिळवून विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या गटात कर्नाटकने आपला प्रभाव दाखवला. हिमेश बरांडा (राजस्थान), सकानोन लेपचा (उत्तर बंगाल), मंजु लता (ओडिसा) आणि भाग्यश्री (कर्नाटक) यांनी विविध गटांमध्ये या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
गेल्या 38 वर्षांपासून वनवासी युवकांचे गुणवैभव शोधण्याचा प्रयत्न वनवासी कल्याण आश्रम या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहे. आत्तापर्यंत 35 पेक्षा अधिक खेळाडूंनी या स्पर्धेच्या निमित्ताने आपली कारकीर्द सुरू करत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आजही भारतीय खेल प्राधिकरणसारख्या विविध संस्था या स्पर्धांमध्ये आवर्जून उपस्थिती लावत खेळाडूंची निवड करत असतात. या स्पर्धेच्या निमित्ताने अशाच तीन प्रमुख खेळाडूंची मुलाखत सर्वांना खूपच प्रेरणास्पद ठरली. त्यात ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या अॅथलीट कविता राऊत (कविता राऊत सध्या वनवासी कल्याण आश्रमाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्षा आहेत), राष्ट्रीय कोच म्हणून कार्यरत असलेले राजस्थानमधील धनेश्वर मईडा आणि आशियाई तिरंदाजी स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवलेले विजयकुमार (उत्तर प्रदेश) यांनी आपले अनुभव कथन केले. विशेष म्हणजे हे तिघेही जण कल्याण आश्रमाचे कार्यकर्ता या नात्याने स्पर्धेत सहभागी झाले होते.
माजी पंतप्रधानांच्या निधनामुळे राष्ट्रीय शोक असताना अत्यंत साधेपणाने ही स्पर्धा संपन्न झाली, मात्र खेळाडूंच्या उत्साहात आणि कौशल्यात कुठेही फरक पडला नाही. मुळात वनवासी क्षेत्रातील युवकांचे खेळामधील गुणवैभव शोधतानाच त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणे आणि खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हे कल्याण आश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
रायपूर येथे संपन्न झालेली राष्ट्रीय वनवासी क्रीडा प्रतियोगिता हे त्याच दिशेने टाकलेले 24वे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.