रघुनाथाशिवाय सर्व व्यर्थ आहे

13 Jan 2025 16:16:06
@सुरेश जाखडी 
 
विषयजनित सुखांच्या मागे धावल्याने कोणीही सुखी होणार नाही. शाश्वत रामाच्या ठिकाणी जो श्रद्धा ठेवून त्याची भक्ती करतो, त्याचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन तो सुखीसमाधानी होतो. याव्यतिरिक्त अशाश्वत गोष्टींच्या मागे धावत राहिल्याने कसलाच लाभ होत नाही, हित साधले जात नाही. म्हणून ते सर्व व्यर्थ आहे. याचाच अर्थ रघुनाथाशिवाय सर्व व्यर्थ आहे.
ramdas swami
 
या दृश्य जगातील अशाश्वत मोहमयी घटकांचा त्याग करून रामाची संगत धरली, त्याची भक्ती केली, तर समाधानी होता येईल, असे भक्ताला वाटते. त्यामुळे आपण शाश्वत रामाच्या भक्तिप्रेमात राहावे, अशी खर्‍या भक्ताच्या मनातील इच्छा स्वामींनी मागील श्लोकात सांगितली आहे. आता स्वामी खर्‍या सुखाची कल्पना सांगून, माझे हित करावे, असे रामाला विनवीत आहेत.
 
विषयजनित सूखें सूख होणार नाहीं ।
तुजवीण रघुनाथा ओखटे सर्व कांहीं ।
रघुकुळटिळका रे हीत माझें करावें ।
दुरित दुरि रहावे म्या स्वरूपीं भरावें ॥ 3 ॥
 
 
(वासनेतून- विषयभोगातून निर्माण झालेले सुख क्षणैक असल्याने त्यातून समाधान प्राप्त होणार नाही. हे रामा, खरं सांगायचं तर शाश्वत अशा तुझ्याशिवाय इतर सर्व काही व्यर्थ आहे. रघुकुलश्रेष्ठ रामा, तू माझे हित कर. माझी सर्व पापे दूर राहून मी तुझ्या शाश्वत रूपात एकरूप होऊन पूर्णत्वास जावे असे मला वाटते.)
 
 
प्रत्येक प्राणिमात्राची धडपड आपल्या शारीरिक व मानसिक सुखासाठी चाललेली असते; परंतु सुख म्हणजे नेमके काय आहे, सुख कशात मिळेल आणि समाधानी कसे होता येईल, याचा नीट विवेकाने विचार न केल्याने माणसाची सुखप्राप्तीची दिशा चुकते आणि सुखासाठी केलेल्या प्रयत्नांनी दुःख अनुभवाला येते. अरण्यात हरणे जशी पाण्यासाठी मृगजळामागे जिवाचा आकांत करून धावत असतात; पण त्यांनी धावावे तसतसे मृगजळ दूर दूर सरकल्याने त्यांची तहान भागत नाही, तसे माणूस आयुष्यभर सुखकल्पनेच्या मागे लागून त्याच्या तृप्तीसाठी जिवापाड कष्ट करतो; पण मार्ग चुकल्याने हाती काही लागत नाही. या वासनातृप्तीच्या कल्पनेला स्वामींनी ’विषयजनित सुख’ म्हटले आहे. शाश्वत अशाश्वताचा विवेक न समजल्याने माणूस आयुष्यभर सुखासाठी वासनातृप्तीच्या नादाने अशाश्वत गोष्टींसाठी धडपडतो आणि कष्ट करूनही दु:ख पदरात घेतो. ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे.
 
 
सुखाची आणि आनंदाची कल्पना करताना मनुष्य वासनातृप्तीचा आणि विषयसेवनाचा प्रथम विचार करतो. स्वामींच्या भाषेत ’विषयजनित’ म्हणजे विषयसेवनातून मिळणार्‍या सुखाचा विचार करतो. मनातील कोणत्याही अशाश्वताच्या प्राप्तीसाठी केलेल्या इच्छेला अध्यात्मात विषय म्हटले जाते. विषयसुख हे इतर बाह्य घटकांवर अवलंबून असते. ते घटक केव्हा अनुकूल, तर केव्हा प्रतिकूल होतात. त्यावर आपला ताबा नसतो. त्यामुळे ते अल्प सुख परावलंबी असते. विषयसुखाचे घटक अनुकूल झाले तरी त्यातून मिळणारे सुख अत्यल्प असते. त्या सुखाची तुलना ज्ञानेश्वर माऊलींनी आकाशात चमकणार्‍या क्षणैक अस्तित्व असलेल्या विजेशी केली आहे.
 
एर्‍हवीं विषयीं सुख आहे। हे बोलणेचि सारिखें नोहे।
तरी विद्युत्स्फुरणे कां न पाहे। जगामाजीं (ज्ञा. 5.113)
 
(विषयांत सुख आहे, हे म्हणणेच योग्य नाही; तथापि सुख आहे असे धरून चालले, तर मग आकाशात चमकणार्‍या विजेच्या उजेडात जगातील व्यवहार होतात का?) एकंदरीत विषयसेवनात सुखसमाधान मिळते हा पक्ष बाद होतो.
 
 
माणसाची सुखाविषयी आणखी एक कल्पना असते. माणसाला वाटते की, भौतिक ऐश्वर्य मिळवण्यात सुख आहे. त्यासाठी पैसा हवा असतो. अमाप पैसा मिळवावा, असे माणसाला वाटते. पैशाने सर्व काही विकत घेता येते, या कल्पनेने माणूस लोभी बनतो; पण पैशाच्या हव्यासातून माणूस सुखी होतो का? याचे उत्तर आशादायक नाही. अमाप पैसा मिळवणारी माणसे आयुष्याच्या शेवटी सुखीसमाधानी झालेली दिसत नाहीत. यासाठी अनेक उदाहरणे सांगता येतील. महंमद गझनीने सोमनाथचे मंदिर उद्ध्वस्त करून त्यातील सोनेनाणे आणि रत्ने लुटून नेली. लोकांनी पुन्हा मंदिर उभारून त्याचे वैभव वाढवले. ते कळल्यावर महंमद गझनीने पुन्हा मंदिर लुटले. असे त्याने सतरा वेळा केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. या अफाट संपत्तीचा हा मालक लुटारू, मृत्यूच्या समयी, ही संपत्ती इथेच राहणार, बरोबर काहीही नेता येणार नाही, या कल्पनेने ढसाढसा रडला. आयुष्य कसे उपभोगावे याचे तत्त्वज्ञान नीट न समजल्याने पैशाच्या मोहापायी जगातील अनेक श्रीमंतांच्या आयुष्याचा शेवट वाईट झाला आहे. एका पेट्रोलियम कंपनीचा प्रचंड श्रीमंत असलेला अध्यक्ष हावर्ड हनसन हा आयुष्याच्या शेवटी वेडा झाला होता. श्रीमंत व्यापारी आर्थर क्यूटन दिवाळखोर होऊन मेला. काड्यापेटी उत्पन्नातील मक्तेदारी असलेला आयव्हर क्रूगर याने शेवटी आत्महत्या केली. ही परदेशातील उदाहरणे. तशी उदाहरणे आपल्याकडेही आहेत. या श्रीमंतांचा अंत वाईट झाला, कारण त्यांना जीवनाचे खरे तत्त्वज्ञान व समाधानाचे मानसशास्त्र समजले नाही. केवळ पैशामुळे त्यांचा अंत वाईट झाला असे नसून पैशासंबंधीच्या मानसिकतेने त्यांचा घात केला. म्हणून समर्थ सांगताहेत की, जी विषयजनित सुखे आहेत, ज्यामागे लोक धावत आहेत, त्याने कोणीही सुखी होणार नाही. शाश्वत रामाच्या ठिकाणी जो श्रद्धा ठेवून त्याची भक्ती करतो, त्याचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन तो सुखीसमाधानी होतो. याव्यतिरिक्त अशाश्वत गोष्टींच्या मागे धावत राहिल्याने कसलाच लाभ होत नाही, हित साधले जात नाही. म्हणून ते सर्व व्यर्थ आहे.
 
 
तात्पर्य, रघुनाथाच्या भक्तीशिवाय खरे सुखसमाधान मिळणार नाही. रामाशिवाय इतर सर्व अशाश्वत जगत व्यर्थ आहे. असे असले तरी आपल्याला या अशाश्वत जगातच राहायचे असते. प्रपंच अशाश्वत म्हणून काही तो सोडता येत नाही आणि प्रापंचिक गोष्टींतून समाधान मिळत नाही असा आपला अनुभव असतो आणि संतांचेही सांगणे हेच असते. तेव्हा यातून मार्ग कसा काढायचा, हा सर्वसामान्य माणसांना पडलेला प्रश्न आहे. या अशाश्वतांच्या बाजारात समाधान टिकवण्यासाठी पहिला उपाय संतसंगती हा आहे. संतसंगतीत समाधान टिकवण्याची युक्ती शिकता येते. हे शक्य नसेल तर स्वामींनी ‘दासबोधा’त एक सोपा उपाय सांगितला आहे. स्वामी म्हणतात, या जगात वावरताना-
 
प्रकृतिसारिखे चालावें। परी अंतरीं शाश्वत वोळखावे।
सत्य होऊन वर्तावें । लोकांऐसे॥ (दा. 11.3.40)
 
स्वामी म्हणतात, आपण लोकांसारखेच आचरण ठेवावे; पण मनात शाश्वत काय ते ओळखावे आणि वागताना सत्याची कास सोडू नये. हेही कठीण वाटत असेल, तर रघुकुलश्रेष्ठ रामाला शरण जावे आणि त्यालाच सांगावे की, हे रामा, मी अज्ञानी आहे. माझे हित तू जाणतोस. तेव्हा तू माझे हित कर. आता तू जर माझे हित किंवा माझी इच्छा विचारशील तर मला असे वाटते की, मी माझ्या पातकांना दूर सारून तुझ्या स्वरूपात मिसळून जावे. कायमस्वरूपी मी तुझ्या चरणांजवळ तुझ्या स्वरूपांत एकरूप होऊन राहावे. हीच खरी सायुज्य-मुक्ती होय. तुझ्या स्वरूपात मी मिसळून गेल्यावर माझे तन, मन, धन हे रामा, तुझ्याच रूपात पाहता येईल. हा विचार स्वामींनी ’अनुदिनी अनुतापें’ या ‘करुणाष्टका’च्या पुढील चौथ्या श्लोकात सविस्तरपणे मांडला आहे.
Powered By Sangraha 9.0