फातिमाचे भूत

विवेक मराठी    16-Jan-2025
Total Views |
@तुषार दामगुडे 
‘फातिमा शेख मुस्लिम समाजातील पहिली स्त्री शिक्षिका असून सावित्रीबाई फुले यांच्याबरोबरीने शाळेत शिकवत होती,’ हे फेक नॅरेटिव्ह वर्षानुवर्षे आपल्या माथी मारले गेलेआणि लोकांनीही हे कथ्यच तथ्य समजले. दिलीप मंडल या आंबेडकरी नेत्याने ट्विटरवर फातिमा नावाचे काल्पनिक पात्र ‘आपण निर्माण केले’ हे जाहीर केले आणि खळबळ उडाली. म्हणून अशा प्रकारचे अनैतिहासिक व समाजात द्वेष पसरवणारे दावे खोडून काढले पाहिजेत. अन्यथा भविष्यात ही फातिमा शेख (?) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्य व व्यक्तिमत्वाला झाकोळून समाज कलुषित करण्याचा प्रयत्न करीत राहील.
 
fatima
 
काही दिवसांपूर्वी दिलीप मंडल या आंबेडकरी नेत्याने ट्विटर या सोशल साईटवर एक माफीनामा प्रकाशित केला. त्यात त्याने ’गेल्या काही काळापासून फातिमा शेख(?) नावाचे काल्पनिक पात्र मी निर्माण केले असून, 2006 सालापासून वेगवेगळ्या माध्यमातून मी ते प्रसिद्धीस आणले आहे. परंतु असे कोणतेही पात्र फुले दांपत्याच्या जीवनात नसून या सगळ्या प्रकाराबद्दल मला माफ करावे,’ असा आशय व्यक्त केला आहे. दिलीप मंडलच्या या खुलाश्याने तथाकथित पुरोगामी वर्तुळात एकच खळबळ उडाली. तसेच बीबीसी, द वायरसारख्या वृत्तसंस्थांना असे खोटे लेख प्रकाशित केल्याबद्दल तोंड दाखवायला जागा उरली नाही. अर्थात दिलीप मंडलसारखे सोयीस्कर राजकारणी व बीबीसी, वायरसारख्या वामपंथी वृत्तसंस्था यापुढे सुधारतील अशी आशा आपण बाळगायचे कारण नाही, कारण मग त्यांच्या अस्तित्वाचे प्रयोजनच उरणार नाही. ते एक असो...
 
 
या सगळ्या नाट्याचे प्रमुख पात्र असलेल्या फातिमाविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. 10/10/1856 रोजी सावित्रीबाई फुले या आजारी असताना त्यांनी त्याविषयी ज्योतिबा फुले यांना कळवताना लिहिलेल्या एका पत्रात ’फातिमास त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही’ अशी एक ओळ लिहिली आहे. या एका ओळीचा धागा पकडून राईचा पर्वत करण्यासाठी तथाकथित पुरोगाम्यांना केवळ एक ओळ देखील पुरेशी आहे. या पत्रात ज्या फातिमाचा उल्लेख आहे ती नेमकी फातिमा कोण, ती यहुदी, मुस्लिम, ख्रिश्चन यापैकी नेमकी कोणत्या धर्मातील आहे ? त्या नेमकं काय काम करतात, त्या शिकल्या आहेत की नाही, त्या कुठून आल्या, किती काळ होत्या, त्यांनी किती मुस्लिम मुलींना शिकण्यासाठी फुलेंच्या शाळेत आणलं, तिचं आडनाव शेख आहे असं काही म्हणजे काही कळत नाही.
 

fatima 

fatima 
 
परंतु तथाकथित पुरोगाम्यांनी या एका ओळीवरून ’फातिमा’ हिचे आडनाव शेख असून ती मुस्लिम समाजातील पहिली स्त्री शिक्षिका असून सावित्रीबाई फुले यांच्याबरोबरीने शाळेत शिकवत होती. फातिमा शेख मनुवाद्यांच्या विरोधात लढणारी योद्धा होती. फातिमा शेखचे अस्सल ’छायाचित्र’ वगैरे वगैरे अनैतिहासिक कथा रचली असे स्पष्ट दिसते. या बनावट कथांचा वापर करून विकिपीडियावर पेज क्रियेट केले गेले, तिथे काही संदर्भ पुरावे म्हणून टाकले गेले. या संदर्भाचा वापर करून गुगलवर डुडल बनवले, तामिळनाडू सरकारने फातिमा शेखच्या नावे पुरस्कार सुरू केला, भिडे वाड्यावर स्थलदर्शक म्हणून लावलेल्या पाटीवर फातिमा शेखचा उल्लेख आला, सावित्रीबाईंच्या तसबीरीत फातिमा शेखचा समावेश झाला, पुणे विद्यापीठ-हिंदू बनारस विद्यापीठात तिच्या विषयावर डॉक्टरेट दिली गेली, कोंढव्यात तिच्या नावाने नगर उभे राहिले. पण हे सगळं करताना ज्यांचे दावे केले जात आहेत त्याचे मूळ पुरावे कुठं आहेत?
 
 
fatima
 
तर फातिमा शेख (?) नावाचे पात्र उभे करण्यासाठी तथाकथित पुरोगामी समग्र फुले साहित्याचा संदर्भ देतात. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे साहित्य महाराष्ट्र शासनाने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केले आहेत व त्यासोबतच इंटरनेटवरदेखील सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध आहे. संपूर्ण फुले साहित्यात तेवढा ’फातिमास त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही’ हा एक ओळीचा उल्लेख सोडला तर कुठेही, काहीही आढळत नाही. (फुले साहित्याचे अभ्यासू तज्ञ स.गं.मालशे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या मा.गो.माळी चरित्रातील पत्रे, छायाचित्रे यांवर अभ्यासू आक्षेप घेतले आहेत. संदर्भ : तारतम्य पुस्तक)
 
फुले साहित्याशिवाय फातिमाचा दावा करण्यासाठी ज्या पुस्तकातील उल्लेखांचे संदर्भ दिले जातात. त्या प्रमुख पुस्तकांची नावे व लेखक पुढीलप्रमाणे.
 
1) Susie J. Tharu; K. Lalita (1991). Women Writing in India: 600 B.C. to the early twentieth century
2) Grey, Mary (2016). Opposition to Untouchability: Gandhi and Ambedkar - Cry for Dignity: Religion, Violence and the Struggle of Dalit Women in India
3) Tschurenev, Jana (2019). Civil Society, Government, and Educational Institution-Building, Bombay Presidency, 1819-1882
 

fatima 
ही सगळी पुस्तके अगदी अलीकडची असून यातल्या कुठल्याही पुस्तकात मा.गो.माळी व्यतिरिक्त इतर कुठल्याही संदर्भाचा उल्लेख नाही. फुले साहित्याचे अभ्यासक असलेले हरी नरके व डाव्या विचारसरणीचे सूरज ऐंगडे यांनीदेखील फातिमा संदर्भात आक्षेप घेऊन पुराव्यांची मागणी केली आहे हे लक्षात घ्यावे लागते.
 

fatima 
 
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सदर शाळा सुरू करताना ब्रिटिश सरकारबरोबर जे व्यवहार केले ते उपलब्ध असल्याने आपल्याला तत्कालीन बरीच माहिती मिळते. त्या माहितीनुसार ही शाळा सुरू ठेवण्यासाठी ज्योतिबा फुले, केशव जोशी, बापू मांडे, अण्णा सहस्रबुद्धे, विष्णू भिडे, जगन्नाथ सदासीवजी आदी सहयोगी असल्याचे समजते. शाळेचा खर्च भागवण्यासाठी अनेक ब्रिटिश अधिकारी व स्थानिक व्यक्तींमध्ये चिपळूणकर-मेहेंदळे-परांजपे आदी अनेक व्यक्तींनी रोख रक्कम दिल्याचे समजते. (त्याची यादी उपलब्ध आहे.) सदर शाळेत शिकवले जाणारे विषय तसेच कोणत्या इयत्तेसाठी कोण शिक्षक आहेत त्याचाही उल्लेख आढळतो. त्यातील एक शिक्षक म्हणून नारायण शास्त्री टोकेकर आणि दुसरे शिक्षक म्हणून विनायक पंत यांचा उल्लेख आढळतो. पण हे सगळं नाकारून फातिमा नामक तथाकथित पात्र नेमके कशासाठी तयार करायचे हा प्रश्न निर्माण होतो.
 
 
तर काही सामान्य व्यक्तींनी व्यक्तिगत लाभासाठी किंवा अज्ञानातून असं केले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येते. पण कबीर कला मंच, सचिन माळी, शीतल साठे यांच्यासारखे नक्षलवादी संशयित लोक जेव्हा एखादा विषय पुढं आणतात तेव्हा आधीच सावध व्हावे लागते. कारण काही चुकीच्या गोष्टी अगदीच निरुपद्रवी दिसत आहेत म्हणून सुरुवातीला दुर्लक्षित केल्यानंतर काही वर्षांनी त्याची वाईट फळं चाखावी लागतात, हे आपल्याला आता अनुभवाने माहीत आहे. या फातिमा शेख(?)च्या आडून सुरवातीला ब्राह्मण जातीसंदर्भात समाजात विष कालवायचे व त्यानंतर हिंदू धर्माविषयी गरळ ओकायची हा शहरी नक्षलवादी डाव सहज ओळखता येतो.
 
 
त्यामुळे या तथाकथित फातिमा शेख (?) व तत्सम प्रकारांविषयी सोयीस्कर भूमिका घेणारी राजकीय मंडळी किंवा शहरी नक्षलवादी काय म्हणतात याकडे लक्ष न देता संधी मिळेल तिथे अशा प्रकारची अनैतिहासिक व समाजात द्वेष पसरवणारे दावे खोडून काढले पाहिजेत. त्यासाठी आपण स्वतः चौकस राहून संबंधितांना संदर्भ-पुरावे मागण्याचे धाडस दाखवले पाहिजे. अन्यथा भविष्यात ही फातिमा शेख (?) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्य व व्यक्तीमत्वाला झाकोळत काही तरी भलतेच रूप धारण करून कलहाचे कारण बनल्याशिवाय राहणार नाही.