एक साधी सरळ यंत्रणा म्हणून सुरू झालेली आयएमडी यंत्रणा आता हवामान अंदाज, संप्रेषण आणि वैज्ञानिक नवकल्पनांचे सशक्त केंद्र बनली आहे. यंदा प्रथमच, आयएमडी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये स्वतःची ही बदलती ओळख दाखवणार आहे. हे वर्ष अधिक संस्मरणीय करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने 150 रुपयांच्या विशेष नाण्याला मान्यता दिली आहे. यानिमित्ताने आयएमडीचा इतिहास, त्यांनी देशासाठी आजवर दिलेल्या योगदानाचा आढावा घेणारा लेख...
भारतीय हवामानशास्त्र विभागाची 15 जानेवारी 1875 रोजी (IMD: India Meteorology Department) स्थापना करण्यात आली होती. या वर्षीच्या 15 जानेवारीला या विभागाला 150 वर्षे पूर्ण झाली. भारतीय हवामानशास्त्र विभाग ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची एक संस्था आहे. हवामानविषयक निरीक्षणे, हवामान अंदाज आणि भूकंपशास्त्र यासाठी जबाबदार असलेली ही प्रमुख संस्था आहे. हिचे मुख्यालय दिल्ली येथे असून ती भारत आणि अंटार्क्टिकामध्ये शेकडो निरीक्षण केंद्रे चालवते. चेन्नई, मुंबई, कोलकाता, नागपूर, गुवाहाटी आणि नवी दिल्ली येथे आयएमडीची प्रादेशिक कार्यालये आहेत. आयएमडी हे जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) सहा प्रादेशिक विशेषीकृत हवामान केंद्रांपैकी एक आहे. मलेशिया आणि सुमात्रा यांच्या दरम्यान असलेली मलाक्का सामुद्रधुनी, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि पर्शियन किंवा अरेबियन गल्फ यासह उत्तर हिंदी महासागरातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नावे देणे, त्यांच्या आगमनाचे अंदाज वर्तविणे आणि त्यांच्या पूर्वसूचनेच्या वितरणाची जबाबदारी या विभागावरच आहे.
आशियाई भूभाग आणि हिंद महासागराच्या कमीजास्त होणार्या उष्णतेमुळे मोसमी वार्यांच्या दिशेत जी उलटापालट होते त्यावर आधारित वर्ष 1686 मध्ये, एडमंड हॅली यांनी भारतीय उन्हाळी मान्सूनवर त्यांचा ग्रंथ प्रकाशित केला. त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिली हवामान वेधशाळा स्थापन केली. यामध्ये 1785 मध्ये कोलकत्ता वेधशाळा, 1796 मध्ये मद्रास वेधशाळा आणि 1826 मध्ये कुलाबा वेधशाळा यांचा समावेश होता. 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात विविध प्रांतीय सरकारांनी भारतात इतर अनेक वेधशाळा स्थापन केल्या होत्या.
वर्ष 1784 मध्ये कोलकत्ता आणि 1804 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या एशियाटिक सोसायटीने भारतात हवामानशास्त्राच्या अभ्यासाला प्रामुख्याने चालना दिली. हेन्री पिडिंग्टन यांनी ‘द जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी’मध्ये 1835 ते 1855 दरम्यान कलकत्ता (आताचे कोलकाता) येथील उष्णकटिबंधीय वादळांशी संबंधित सुमारे 40 शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांनीच उष्णकटिबंधीय वादळांना ‘चक्रीवादळ’ हा शब्द दिला. 1842 मध्ये त्यांनी वादळांचे नियम (लॉज ऑफ द स्टॉर्म्स) हा त्यांचा ऐतिहासिक प्रबंधही प्रकाशित केला.
1864 मध्ये कोलकात्याच्या किनार्यावर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आदळल्यानंतर आणि त्यानंतर 1866 आणि 1873 मध्ये पुरेसा पाऊस देण्यात मान्सून अयशस्वी झाल्यामुळे आलेला दुष्काळ यामुळे हवामानविषयक निरीक्षणांचे एकाच छताखाली संकलन आणि विश्लेषण आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी 15 जानेवारी 1875 रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना करण्यात आली. हेन्री फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड यांची आयएमडीचे पहिले हवामानविषयक पत्रकार म्हणून नियुक्ती करण्यात आली. मे 1889 मध्ये, सर जॉन एलियट यांची पूर्वीची राजधानी कोलकाता येथे वेधशाळांचे पहिले महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आयएमडी मुख्यालय नंतर 1905 मध्ये सिमला येथे, त्यानंतर 1928 मध्ये पुण्यात आणि शेवटी 1944 मध्ये नवी दिल्ली येथे हलविण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्यानंतर, 27 एप्रिल 1949 रोजी आयएमडी जागतिक हवामान संघटनेचे (डब्ल्यूएमओ) सदस्य बनले. भारतीय शेतीत असणार्या मान्सून पावसाच्या महत्त्वामुळे या संस्थेला अधिक महत्त्व प्राप्त झाले. वार्षिक मान्सूनचा अंदाज तयार करण्यात तसेच भारतातील प्रत्येक ऋतूतील मान्सूनच्या प्रगतीचा मागोवा घेण्यात आयएमडी महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे.
प्रत्येक उपमहासंचालकाच्या आधिपत्याखाली चेन्नई, गुवाहाटी, कोलकाता, मुंबई, नागपूर आणि नवी दिल्ली येथे आयएमडीकडे सहा प्रादेशिक हवामान केंद्रे आहेत. प्रत्येक राज्याच्या राजधानीत एक हवामान केंद्रदेखील आहे. हवामान अंदाज कार्यालये, कृषी हवामान सल्लागार सेवा केंद्रे, जल-हवामान कार्यालये, पूर हवामान कार्यालये, क्षेत्र चक्रीवादळ पूर्वसूचना केंद्रे आणि चक्रीवादळ सूचना केंद्रे सामान्यपणे विविध वेधशाळा किंवा हवामान केंद्राबरोबरच सह-स्थित असतात.
आयएमडी संस्थेमार्फत शेकडो पृष्ठभाग (सरफेस) आणि हिमनदी वेधशाळा, अत्युच्च उंचीवरील अप्पर एअर केंद्रे, ओझोन आणि प्रावरण (रॅडिएशन) वेधशाळा आणि हवामानशास्त्रीय रडार केंद्रांचे जाळेच स्थापित केले आहे. कल्पना-1, मेघा-ट्रॉपिक आणि भारतीय दूरसंवेदन उपग्रह (आयआरएस) मालिका आणि उपग्रहांच्या इन्सॅट (INSAT) मालिकेतील उपकरणे यांसारख्या भारताच्या कृत्रिम उपग्रहांकडून हवामानविषयीची अतिरिक्त सांख्यिकी व माहिती (डाटा) प्राप्त होते. भारतीय व्यापारी नौदल आणि भारतीय नौदलाच्या जहाजांवर हवामानशास्त्रीय उपकरणांमधून सांख्यिकी आणि निरीक्षणेदेखील आयएमडी नेटवर्कमध्ये नोंदवली जातात. आयएमडी ही भारतातील पहिली संस्था होती जिने तिच्या जागतिक सांख्यिकी आदानप्रदान (डाटा एक्सचेंज)ला समर्थन देण्यासाठी संदेश स्थलांतर संगणक तैनात केला.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी यांसारख्या इतर संस्थांशी आयएमडी सहयोग करते.
आयएमडी भूकंप निरीक्षण आणि मोजमापासाठी महत्त्वाच्या ठिकाणी भूकंप निरीक्षण केंद्रेदेखील चालवते.
आयएमडी प्रामुख्याने हवामान निरीक्षणे, अंदाज आणि हवामानाविषयी सर्व सेवा देते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सहकार्याने, आयएमडी भारतीय उपखंडातील हवामान निरीक्षणासाठी आयआरएस मालिका आणि भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली (इन्सॅट) देखील वापरते. आयएमडी हा विकसनशील देशाचा पहिला हवामान विभाग होता ज्याने स्वतःची उपग्रह प्रणाली विकसित केली आणि त्याची देखभाल केली. आयएमडीने जानेवारी 2016 मध्ये ब्लॅक कार्बनचे हवेतील प्रमाण, सूक्ष्म कण (Aerosol) प्रारणाचे गुणधर्म, पर्यावरणीय दृश्यमानता आणि त्यांचे हवामानविषयक परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी सिस्टम ऑफ एरोसोल मॉनिटरिंग अँड रिसर्च (SAMAR) सुरू केले. यात 16 एथेलोमीटर, 12 स्काय रेडिओमीटर आणि 12 नेफेलोमीटर अशा उपकरणांचे जाळेच केलेले असेल.
आयएमडीची प्रमुख कार्ये
हवामान अंदाज आणि पूर्वसूचना: आयएमडी दैनंदिन हवामान अंदाज, विस्तारित दृष्टिकोन आणि चक्रीवादळ, गडगडाटी वादळ आणि मुसळधार पाऊस यांसारख्या गंभीर हवामान घटनांशी संबंधित पूर्वसूचना प्रदान करते. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, पूर आणि उष्णतेच्या लाटा यांसारख्या आपत्तींसाठी लवकर इशारा किंवा सूचना देण्यासदेखील ते जबाबदार आहे.
हवामान अभ्यास: आयएमडी दीर्घकालीन हवामान स्थितीचे निरीक्षण करते आणि अभ्यास करते. यामुळे तापमानाचे स्वरूप, मान्सूनमध्ये होणारे बदल आणि जागतिक तापमानवाढीचे परिणाम या गोष्टी भारतातील हवामान संशोधनात योगदान देतात.
भूकंपशास्त्र: आयएमडी देशभरातील भूकंप क्रियेचे निरीक्षण करण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी भूकंपविषयक वेधशाळांचे जाळे वापरते.
विमानचालन हवामानशास्त्र: आयएमडी विमान वाहतूक क्षेत्रासाठी विशेष हवामान अंदाज प्रदान करते. यामध्ये धावपट्टीची स्थिती, दृश्यमानता आणि उड्डाण सुरक्षेवर परिणाम करणारे वार्याचे नमुने यांचा समावेश होतो.
सागरी हवामानशास्त्र: आयएमडी सागरी हवामान, भरती-ओहोटी आणि समुद्राच्या परिस्थितीचा अंदाज वर्तवते. यामुळे नौकानयन, मत्स्यपालन आणि किनारी हवामान यांची उपयुक्त माहिती उपलब्ध होते.
कृषी हवामानशास्त्र: आयएमडी शेतीसाठी उपयुक्त अशी हवामान माहिती सेवा देते. शेतकर्यांना त्यांच्या शेतीविषयक कामांचे नियोजन, विशेषतः पावसाळ्यात करण्यात यामुळे मोठीच मदत होते.
पराकोटीच्या हवामान स्थितीतील (एक्स्ट्रीम वेदर) घडामोडींचे निरीक्षण: हा विभाग चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा आणि अतिवृष्टी यांसारख्या पराकोटीच्या हवामानाच्या घटनांवर सक्रियपणे देखरेख ठेवतो आणि सूचना जारी करतो. यामुळे आपत्ती व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करून जोखीम कमी करण्यात मदत होते.
आयएमडीची प्रमुख साधने आणि पायाभूत सुविधा
हवामान उपग्रह: आयएमडी इन्सॅट (इन्सॅट: इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टम) या उपग्रह मालिकेसह वास्तविक वेळेच्या (रिअल टाइम) हवामान निरीक्षणासाठीही उपग्रह वापरते.
हवामान केंद्रे: तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वार्याचा वेग आणि वातावरणाचा दाब यावर सांख्यिकी (डाटा) गोळा करण्यासाठी आयएमडी देशभरातील स्वयंचलित हवामान केंद्रे (एडब्ल्यूएस) आणि रडार स्टेशनचे जाळे तयार करून वापरते.
सुपर कॉम्प्युटर: आयएमडी उच्च कार्यक्षमता संगणकीय प्रणालीमध्ये अंकीय हवामान अंदाज (एनडब्ल्यूपी) लघुप्रतिकृती वापरते, जी अचूक हवामान अंदाज प्रदान करण्यात मदत करते.
आयएमडी आणि मान्सून
मान्सून हा भारतीय हवामानाचा एक महत्त्वाचा पैलू आहे, जो कृषी, जलस्रोत आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. नैर्ऋत्य मान्सूनची सुरुवात, कालावधी आणि तीव्रता, जो सामान्यत: जूनमध्ये येतो आणि सप्टेंबरपर्यंत माघारतो, याचा अंदाज लावण्यात आयएमडी महत्त्वाची भूमिका बजावते. भारतीय हवामानशास्त्र विभाग मान्सून हंगामासाठी लांब पल्ल्याचा अंदाजदेखील जारी करतो, ज्याची शेतकरी आणि उद्योगांना सारखीच प्रतीक्षा व अपेक्षा असते.
आयएमडीचे योगदान
सार्वजनिक सेवा: आयएमडी हवामान लघु वार्तापत्र (बुलेटिन) जारी करते, वादळ पूर्वसूचना देते आणि विविध माध्यमांद्वारे सामान्य लोकांना दररोज हवामान अहवाल प्रदान करते.
आंतरराष्ट्रीय सहकार्य: आयएमडी डाटा सामायिक करण्यासाठी आणि हवामान अंदाज क्षमता सुधारण्यासाठी जागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ), जागतिक हवामानशास्त्र काँग्रेस (डब्ल्यूएमसी) आणि इतर प्रादेशिक हवामान केंद्रांसारख्या जागतिक हवामान संस्थांसोबत सहयोग करते.
नवनवीन तंत्रज्ञान वापरून आयएमडी अधिकाधिक प्रगतिशील आणि आधुनिक बनून तिची उपयुक्तता वाढविण्यासाठी पुढील उपक्रम सध्या राबवीत आहे.
सुधारित अंदाज तंत्रज्ञान: आयएमडीने सुपर कॉम्प्युटर आणि उपग्रह तंत्रज्ञानाच्या वापरासह हवामान अंदाज वर्तविण्याची साधने अत्याधुनिक केली आहेत.
डिजिटल आऊटरीच: आयएमडीने अॅप्स, वेबसाइट्स आणि सोशल मीडियाद्वारे हवामान सूचना, अंदाज आणि शैक्षणिक साहित्य प्रदान करून आपली डिजिटल सेवा वाढवली आहे.
आयएमडी सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, आर्थिक क्षेत्रांना समर्थन देण्यासाठी आणि संपूर्ण भारतातील आपत्ती सज्जतेला मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे.
एक साधी सरळ यंत्रणा म्हणून सुरू झालेली आयएमडी यंत्रणा आता अशा प्रकारे हवामान अंदाज, संप्रेषण आणि वैज्ञानिक नवकल्पनांचे सशक्त केंद्र बनली आहे. यंदा प्रथमच, आयएमडी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये स्वतःची ही बदलती ओळख दाखवणार आहे. हे वर्ष अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी अर्थ मंत्रालयाने 150 रुपयांच्या विशेष नाण्याला मान्यता दिली आहे. मॅरेथॉनपासून ते प्रदर्शन, कार्यशाळा ते ऑलिम्पियाडपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, बांगलादेश, भूतान, मालदीव, श्रीलंका आणि नेपाळच्या अधिकार्यांना या उत्सवात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मध्यपूर्व आणि नैर्ऋत्य आशियातील प्रतिनिधीही पाहुण्यांच्या यादीत आहेत, कारण एके काळी हे देश अविभाजित भारताचाच भाग होते. हा कार्यक्रम भारताच्या अतीव आनंददायी हवामानाप्रमाणेच उत्साहपूर्ण असण्याची सगळ्यांनाच मोठी अपेक्षा आहे.