हिंदू आध्यात्मिक सेवा मेळावा - सेवेचे यज्ञकुंड

विवेक मराठी    17-Jan-2025   
Total Views |
हिंदू समाज सेवा हाच धर्म मानणारा आणि प्रसिद्धीपराङ्मुख होऊन कृती करणारा आहे. भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन आणि त्या माध्यमातून अखंड सेवाकार्य करणार्‍या संस्कृतीचे दर्शन नुकत्याच पार पडलेल्या ’हिंदू आध्यात्मिक सेवा फाऊंडेशन’ मेळाव्यात झाले. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर मैदान, गोरेगाव येथे सलग चार दिवस दि. 9 ते 12 जानेवारीपर्यंत हा मेळावा संपन्न झाला.
 
HssF
 
 
‘आत्मनो मोक्षार्थ जगत् हिताय च’ हा ऋग्वेदातील श्लोक सिद्धांत मानून स्थापनेपासून अखंड सेवाकार्याचा यज्ञकुंड प्रज्वलित ठेवणारी संस्था म्हणजे ’हिंदू आध्यात्मिक सेवा फांऊडेशन’ (HSSF). जगभरात एक भ्रामक कथ्य अर्थात फेक नॅरेटिव्ह पसरविण्यात आलं होतं की, केवळ ख्रिश्चन मिशनरी आणि अन्य धर्मीय समाजात सेवा देतात, परंतु हिंदू समाज कोणत्याही प्रकारच्या सेवा देत नाही. हे फेक नॅरेटिव्ह खोडून काढण्यासाठी 2009मध्ये चेन्नई येथून एस. गुरूमूर्ती यांच्या नेतृत्वात ‘हिंदू आध्यात्मिक सेवा फांऊडेशन’ चे कार्य सुरू झाले.
 
 
 
हिंदूंमध्ये प्रचंड विविधता आहे. हिंदूंचा कुणी एकच मार्गदर्शक नाही, एक धर्मगुरू नाही. ही जी विविधता आहे, त्यांना एका धाग्यात बांधणे हेच रा.स्व.संघाचे मुख्य सूत्र आहे. अनेक देवीदेवता, अनेक पूजापद्धती, अनेक प्रार्थना ही हिंदूंची विशेषता आहे. त्याला एक ओळख देणे हे महत्कार्य आहे. हिंदू समाज सेवा हाच धर्म मानणारा आणि कृती करणारा आहे. मात्र हिंदू समाजातील अनेक पंथ आपापल्या स्तरावर या सेवा प्रसिद्धीपराङ्मुख होऊन देत होत्या. म्हणून हिंदू समाज आणि मठमंदिरे करत असलेल्या सेवाकार्याशी सर्वसामान्य समाजाला जोडणे आणि हिंदू जीवनपद्धतीचे अविभाज्य भाग असलेल्या निसर्ग, कुटुंब आणि देश यांच्याबद्दल कर्तव्य आणि आदराची भावना दृढ करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे, तर जीवनमूल्यांना स्वेच्छेने आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे हे या कार्याचे ध्येय आहे.
 
 
HssF
 
सुरुवातीला अशा 50 ते 100 संस्थाना एकत्रित करून छोटेखानी मेळावा 2009 ला चेन्नईत घेण्यात आला. चेन्नईतील द्रविड समाज हिंदू समाजाला स्वीकारीत नव्हता, शिवाय जोडत असलेल्या कॉर्पोरेट, मिडिया इ. संस्थांना या संस्थेच्या नावात असलेल्या ‘हिंदू‘ शब्दाला विरोध होता, तरीदेखील ’हिंदू आध्यात्मिक सेवा फांऊडेशन’ चे संस्थापक एस. गुरुमूर्ती आपल्या निर्णयावर ठाम होते. एस. गुरुमूर्तींचा दृढनिश्चय आणि मेळाव्याला मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहता हळूहळू विरोध करणार्‍या संस्थाही एचएसएसएफ संस्थेशी संलग्न होत गेल्या.
 
 
‘हिंदू आध्यात्मिक सेवा फांऊडेशन’ चा 40 संस्थांपासून सुरू झालेला प्रवास 200 संस्थांपर्यंत येऊन पोहोचला. या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद आणि त्याचे महत्त्व जाणून असे मेळावे एकाच ठिकाणी न घेता संपूर्ण भारताला हिंदू आध्यात्मिक सेवेच्या शक्तीचे दर्शन व्हावे असा विचार पुढे आला. त्यानंतर जयपूर, इंदोर, मुंबई, तेलंगणा, गुजरात, ओरिसा, दिल्ली अशा विविध शहरांत हिंदू आध्यात्मिक सेवा मेळावे झाले. आतापर्यंत विविध राज्यांत 32 मेळावे झाले आहेत आणि 4 कोटीहून अधिक नागरिक त्यात सहभागी झाले आहेत.
 
 
HssF
 
2024-2025 यावर्षी एकूण सहा मेळाव्यांचे आयोजन केले गेले आहे. गोरेगावमधील मेळावा हा या वर्षातील पाचवा मेळावा होता. तो खास उभारण्यात आलेल्या राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर मैदानात सलग चार दिवस दि. 9 ते 12 जानेवारीपर्यंत होता. यावर्षी जयपूर, इंदोर, पुणे, तेलंगणा, मुंबई इथे मेळावे झाले. शेवटचा मेळावा त्यानंतर कर्णावती येथे होणार आहे. गोरेगावच्या मेळाव्यात एकूण 200 हिंदू संस्था सहभागी होत्या. यामध्ये मठ-मंदिर (सिद्धीविनायक, जीवदानी माता इ.) इस्कॉन, चिन्मय मिशन, सामाजिक संस्था (जात-समुदाय), सेवाकार्य करणार्‍या संस्था, शाळा, महाविद्यालय, कॉर्पोरेट, प्रबुद्ध जनसंपर्क, मीडिया, महिला, शासकीय संस्था, कार्यालय, मेळा प्रबंध, असे कार्यविभाग सक्रिय होते. त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि ‘जैन दर्शन गॅलरी’ उभारली होती. या गॅलरीत जैन धर्माविषयी, संस्कृतीविषयी, आणि राष्ट्राप्रती त्यांच्या योगदानाविषयी प्रदर्शनी आणि माहिती दिली होती. प्रवेशद्वाराजवळ आपल्या देशासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीरांची, हुतात्मा झालेल्या शूरवीरांची माहिती प्रदर्शित केली होती. खवैय्यांसाठी अनेक खाद्यपदार्थांची दुकाने होती.
 
 
HssF
 
या मेळाव्याचा उद्घाटन सोहळा स्वामी विवेकानंद मंडपात झाला. मेळाव्याचे उद्घाटन अयोध्येतील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेव गिरिजी महाराज यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले,“मंदिरातील पूजा-पाठ ही परमेश्वराची सेवा आहेच, परंतु समाजात जाऊन जी व्यक्ती निःस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करते तीच खर्‍या अर्थाने परमेश्वराची सेवा आहे. मनुष्यजीवनात सेवेचे स्थान सर्वोच्च आहे. जीवनमूल्यांचे शिखरच मुळात सेवा आहे. प्रयागराज येथे महाकुंभ होत आहे. परंतु हिंदू अध्यात्मिक सेवा मेळाव्यासारखे छोटे छोटे मेळे हे कुंभाचेच कार्य करतात. हिंदूंच्या आत्मविश्वासाचे जागरण या माध्यमातून होत आहे. आई-वडील जेव्हा आपल्या मुलांना अशा मेळाव्यांमध्ये घेऊन येतील तेव्हा त्यांच्यात हिंदू धर्माप्रती सेवाभाव जागृत होईल.”
यावेळी मंचावर मैत्रीबोध परिवाराचे मैत्रेय दादाश्री, देवेंद्र ब्रह्मचारीजी, महामंडलेश्वर श्री सुखदेव महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संघचालक सुरेश भगेरिया, प्रसिद्ध नेत्र रोग विशेषज्ञ डॉ. श्याम अग्रवाल उपस्थित होते.
 
 
HssF
 
वन आणि वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संतुलन, पर्यावरण संरक्षण, कौटुंबिक आणि मानवी मूल्यांचे संवर्धन, महिलांचा आदर आणि देशभक्तीचे बीजारोपण अशा सहा आयामांवर मेळाव्यात मांडणी होती. ‘हिंदू आध्यात्मिक सेवा फांऊडेशन’ च्या लोगोमध्येच या कार्याच्या सहा आयामांविषयीचे दर्शन होते. हिंदूंच्या डीएनमध्येच सेवाभाव आहे, भारतीय संस्कृतीत ‘ईशावास्यं इदं सर्वम्’ या श्लोकातून सर्वत्र ईश्वर आहे ही शिकवण दिली आहे. भारतीय मूल्ये ही व्यक्ती, समाज, राष्ट्र यांच्या कल्याणाची कामना करणारी आहेत आणि याच भारतीय मूल्यांचे संवर्धन करण्याचे कार्य एचएसएसएफ संस्था करीत आहे. नागरिकांसोबत अनेक मान्यवरांनीही मेळाव्यात हजेरी लावली.
 
 
या मेळाव्यास महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही भेट दिली. ते म्हणाले,“सनातन धर्म हा केवळ धर्मच नाही; तर त्याही पलीकडे ती जीवन पद्धती आहे. सनातन धर्माने प्रत्येक धर्माचा स्वीकार व आदर केला आहे. सहिष्णुता व सर्वसमावेशकता ही सनातन धर्माची बलस्थाने आहेत. त्यामुळे मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे.”
 
 
मैत्रीबोध परिवारचे मैत्रेय दादाश्री म्हणाले, “प्रभू श्रीराम, आदी शंकराचार्य, भगवान गौतम बुद्ध, यांचे आपण वंशज आहोत. संपूर्ण विश्वाला आज भारताकडून अनेक अपेक्षा आहेत. आपण जातीपातीत न विभागता एक आहोत हे समजून घेतले पाहिजे. आपल्या सर्वांना भारतीय संस्कृतीचे पुनर्जागरण करायचे आहे. तरच आपला भारत देश परम् वैभवाला पोहोचेल. त्यासाठी आधी राष्ट्र सर्वप्रथम या भावनेने सेवा करणे आवश्यक आहे.“
 
 
हिंदू समाज आणि त्यातील संस्था, मंदिर संस्थाने दानपेटीत आलेल्या पैशाने समाजासाठी कशा उत्तमप्रकारे सेवा देतात हे सर्वांसमोर मांडण्यात आले. तसेच जीवनमूल्ये आणि आदर्श कुटुंब कसे असायला पाहिजे, याची रूजवात होण्यासाठी कन्या वंदनाचा कार्यक्रम, वेदपठण, नारी सन्मान, राष्ट्रभक्तीचे प्रकटीकरण, आचार्य वंदन, युवा संमेलन, शौर्य दिवस, दिंंडी यात्रा, घोषवादन आणि संचलन, कला सादरीकरण इ. कार्यक्रम घेण्यात आले. विभक्त कुटुंब पद्धतीकडे वाढणारा कल आणि त्याद्वारे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न याचे गांभीर्य ओळखून चार-पाच पिढ्या एकत्र राहणार्‍या आदर्श कुटुंबांना बोलावून त्यांचे अनुभवकथन आणि अशा कुटुंबांचा सन्मान करण्यात आला.
 
 
राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त नाटिका आणि नृत्याचे सादरीकरण केले गेले. भारतात असलेली विविधताच भारताची एकता अखंड ठेवण्यास सक्षम आहे, केवळ बंधुभाव दृढ होण्याची गरज आहे. मेळाव्यात आलेले नागरिक तेथे उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर विविध समाजघटकांची ओळख असणारे टोपी, फेटा, पगडी धारण करून सेल्फी घेऊन समरस समाजाचे दर्शन देत होते. गंगा आरती करायला मिळावी असे प्रत्येक हिंदू माणसाला वाटते, काही कारणास्तव प्रत्येकाला तो पवित्र क्षण अनुभवता येत नाही. म्हणून मेळाव्यात कृत्रिम असा सप्तसिंधूचा घाट बांधण्यात आला होता आणि तिथे चारही दिवसांच्या सायंकाळी गंगा आरतीचे आयोजन केले होते.
 
 
मेळाव्यात चारही दिवस भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समारोपाच्या दिवशी जैन समाजाचे विविध कार्यक्रम आणि जैनमुनींचे ‘समस्या से समाधान’ असा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. एकंदरच ‘हिंदू आध्यात्मिक सेवा फांऊडेशन’ हा मेळावा भारतीय संस्कृतीचे विराट दर्शन घडविणारा होता.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.