भ्रामक कथ्याची पोलखोल

विवेक मराठी    17-Jan-2025
Total Views |
 @दीपक करंजीकर
नरेंद्र मोदी हे तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भारत आता फेक नॅरेटिव्हच्या इको सिस्टमच्या रडारवर आला आहे. यापुढे अनेक फेक न्यूज/नॅरेटिव्ह प्रसारित होणार आहेत. आपल्याला जागृत राहावे लागेल. फेक नॅरेटिव्हच्या प्रभावांवर नियंत्रण ठेवून समाजातील तणाव आणि दरी कमी करण्यासाठी सजगता आणि विवेकशील विचारांची आवश्यकता आहे. पण त्या आधी फेक नॅरेटिव्ह ओळखण्याची क्षमता निर्माण करणे ही आता तातडीची निकड बनली आहे. या डिजिटल युगात ते एक अपरिहार्य असे कौशल्य आहे.

Fake Narrative
 
दृश्य क्रमांक 1 -
 
सोशल मिडिया मथळा - सीमेवरील कुंपण.
 
कथ्य - हे कुंपण ग्वाटेमालाच्या सीमेवर मेक्सिकोमध्ये आहे जे तथाकथित फ्रीलोडर्स मेक्सिकोच्या बाहेर ठेवण्याच्या उद्देशाने केले आहे. मथळ्याने याची तुलना मेक्सिको आणि यू.एस.च्या सीमेवर उभारल्या जाणार्‍या सीमेवरील भिंतीशी केली होती.
तथ्य - हे छायाचित्र दहशतवादी आणि बेकायदेशीर आफ्रिकन स्थलांतरितांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सन 2013 मध्ये इजिप्तच्या सीमेवर बांधलेल्या कुंपणाचे होते.
 
दृश्य क्रमांक 2 - टीव्ही
 
कथ्य - एक अरब मुस्लिम गोजिरवाणा लहान मुलगा सिरियातील एका समुद्रकिनार्‍यावर उपडा मरून पडला आहे. त्याचा निरागस चेहरा मुस्लिम समाजावरील अत्याचारांचे प्रतीक बनला.
 
कथ्याचे परिणाम - संपूर्ण युरोपीय जनमानस या फेक छायाचित्राने हळहळलं आणि फसलं. त्यांनी आपल्या देशाची दारं सीरियन अरब निर्वासितांसाठी उघडली. आता फ्रांसपासून ते जर्मनीपर्यंत सगळा युरोपियन समाज पस्तावतो आहे. संपूर्ण युरोपची लोकसंख्या-डेमोग्राफी बिघडली आहे आणि या निर्वासित मुसलमानांनी आपले धार्मिक रंगाचे अवगुण उधळायला सुरुवात केली आहे. फ्रान्स आणि इंग्लंडचे निवडणूक निकाल एकप्रकारे ‘फेक नॅरेटिव्ह’ची शक्ती आणि डाव्या-इस्लामी इकोसिस्टीमचे आर्थिक वर्चस्वही दर्शवतात. ही व्यवस्था स्वार्थी आणि अनैतिक हेतूने जगावर राज्य करू पाहते. भ्रामक कथ्याची ताकद अशी प्रचंड असते.
 
भ्रामक कथ्य म्हणजेच फेक नॅरेटिव्ह. पूर्वी आणि आजच्या फेक न्यूजचा फरक आज त्या ज्या वेगाने पसरतात आणि ज्या प्रकारे त्या ग्राहकांना प्रभावित करू शकतात तो पूर्णत: वेगळा आहे. आजच्या बहुतेक खोट्या बातम्यांमध्ये खळबळजनक मथळे किंवा कथांचा समावेश असतो, त्या वस्तुस्थितीला विकृत आणि फसवी बनविणार्‍या असतात. फेक न्यूज कथेचा निर्माता चित्रासारख्या सत्य माहितीचा एक भाग घेऊ शकतो आणि नंतर पूर्णपणे भिन्न कथा तयार करू शकतो.
 

max 
 मॅक्समुलर भारतातील फेक नॅरेटिव्हचा जनकच आहे.
भारतात असल्या भ्रामक कथ्याचे बीजारोपण मोठ्या प्रमाणावर इंग्रजांनी का केले असावे? असा प्रश्न मला पडतो आहे, याचे कारण असं योग्यायोग्य विचार करणारं मन तयारच होऊ नये, अशी पुरेपूर काळजी इंग्रजांनी भारतात शिक्षण व्यवस्था सुरू करताना घेतली होती. कलकत्ता-कोलकाता-विद्यापीठ हे आधुनिक भारतातलं पहिलं विद्यापीठ. ते दि. 24 जानेवारी 1857 ला सुरू झालं, तर त्याच वर्षी 18 जुलैला मुंबई आणि 5 सप्टेंबरला मद्रास विद्यापीठ सुरू झालं. एकाच वर्षात ही तीनही विद्यापीठं चालू करण्यात, भारतीयांनी आधुनिक शिक्षण घेऊन शहाणं व्हावं, असा मुळी हेतू नव्हताच. उलट, भारतीयांची शिक्षण व्यवस्था आपल्याच हातात एकवटलेली राहावी. त्या व्यवस्थेतून गुलामांची मानसिकता असणारे काळे इंग्रज निर्माण व्हावेत. यथावकाश त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वत: होऊन स्वीकारावा. आपल्या मूळ धर्म, संस्कृती, इतिहास यांचा त्यांनी मनापासून तिरस्कार करावा. त्यायोगे ब्रिटनचं या देशावरचं साम्राज्य युगानुयुगे अबाधित राहावं, इतका हा सूक्ष्म पण जबरदस्त प्रभावी ‘नॅरेटिव्ह’ होता. इंग्रजांनी भारताचे शिक्षण मर्म हे कथाकार, कीर्तने, पोवाडे आणि अशा विविध मौखिक परंपरेच्या सावलीत वाढले आहे, हे लक्षात घेतले. भारत ही वेल-रेड वसाहत नसून बहुश्रृत असा समाज आहे. एकाने सहज दुसर्‍याला सांगावे आणि ते गावभर व्हावे ही जी सांगण्या-ऐकण्याची प्रवाही ठेवण आहे ते केवळ परस्परावलंबीत मानवी समूहात आढळते. पाश्चात्य वसाहती या प्रायव्हसी जपणार्‍या आणि व्यक्तिचेच हित सर्वश्रेष्ठ अशा होत गेल्याने तिथे समष्टी हा विचार आढळत नाही. परस्परावलंबीत समाजमन लवकर फेक नॅरेटिव्हला बळी पडते. कारण जिथे एकमेकांबद्दल कुतुहल असते, तिथेच त्याचा गैरफायदा उचलला जाण्याची शक्यता जास्त असते.
 
‘संघात जाऊन तुम्हाला काय मिळते? तुम्ही ब्राह्मणेतर असून संघात कसे? तुम्ही बुद्धिवादी असूनही बंदिस्त विचारसरणी असलेल्या संघात कसे काय रमू शकता?’ या सर्व प्रश्नांची उत्तरे ..

https://www.vivekprakashan.in/books/why-we-are-in-sangha/
 
 
इंग्रज हे मुळात दुसर्‍याला तुच्छ लेखणारे असे उद्दाम आणि घमेंडी होते. त्यांनी पहिले खोटे कथ्य हे प्रसारित केले की भारतीय समाज केवळ मिथकाचा समाज आहे म्हणजे इथे काहीही पूर्वी घडलेले नाही. इथे ना काही शोध लागले, ना कुठले संशोधन करणारे लोक होते, ना शिल्पकला, चित्रकला यांचा काही वारसा होता, असले तर मुळात काही ठोस असा पुरावा नाही, हा समाज हजारो वर्षांपूर्वी एका प्रगत अवस्थेत होता याचा काही इतिहास नाही आणि आहेत ती केवळ मिथके. त्यांना काही एतद्देशीय बाजारबुणगे सामील झाले आणि एक मोठा फेक नॅरेटिव्ह पसरवला गेला की, भारत हा एक मागासलेला समाज आहे. भारताच्या वैभवशाली इतिहासाची अशी मोडतोड करून इथल्या शिक्षणाचे मातेरे करत हे सगळे जनतेला समजण्याच्या वाटा जणू बुजवण्यात आल्या आणि मग आपणही पूर्वी काही नव्हतो, आपण अगदी अलीकडचे आहोत, कारण पूर्वीचे काहीही नव्हते नुसते मिथक आहे, असल्या भ्रामक समजुतीने जगू लागलो.
 
 
इंग्रजांना माहीत होते की आपण केवळ नशीबाने बळकावलेला हा भारत देश, हिंदू समाज आपल्यापेक्षा मुळातच श्रेष्ठ आहे. पण त्यांना जर अमर्याद काळापर्यंत आपले दास बनवायचे असेल, तर यांची अस्मिता, आत्मसन्मान, त्यांच्यात असणारा मातृभूमीभक्तीचा भाव, तोडला पाहिजे. 1853 साली इंग्रजांनी मॅक्समुलर या विद्वानाकरवी एक फेक नॅरेटिव्ह सोडला की, आर्य हा एक मानववंश असून, या आर्यांनी भारतावर आक्रमण करून तिथल्या मूळनिवासी द्रविड लोकांना जिंकून गुलाम बनवले. आजचे भारतीय लोक म्हणजे, या आर्य-अनार्य वंशीयांची भेसळ आहे. मॅक्समुलरने सिद्धांत म्हणून स्थापित केलेल्या या अफवेला त्याच्या समकालीन पाश्चिमात्य विद्वानांनी आव्हान देऊनही, इंग्रजांनी ती अफवा भारतीयांच्या शिक्षणक्रमात सिद्धांत म्हणूनच आणली. या अफवेतून निघणारा ‘नॅरेटिव्ह’ असा होता की, अरे, भारतीय लोकांनो, तुम्ही सगळे परकीय आक्रमकांची मिश्र-संतती (बास्टर्ड) आहात. ही तुमच्या बापजाद्यांची ही मूळ भूमी नसल्याने त्याबद्दल प्रेम बाळगायचे काही कारण नाही. काही शतकांपूर्वी या भूमीवर आर्यांनी आक्रमण केलं. मग इस्लामी तुर्कांनी केलं. सध्या आम्ही (इंग्रज) इथे राज्य करीत आहोत. याबद्दल तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. गेली किमान पावणेदोनशे वर्षे ’आर्य आक्रमण सिद्धांत’ ही ‘फेक न्यूज’ आणि ‘फेक नॅरेटिव्ह’ आम्हा हिंदूंच्या मनांवर राज्य करीत आहे. तो ‘फेक नॅरेटिव्ह’ फेकून देऊन आमची अस्मिता खडबडून जागी व्हावी म्हणून स्वामी विवेकानंदांपासून आज स्वामी गोविंददेव गिरींपर्यंत असंख्य साधुसंत, देशभक्त चंदनासारखे झिजत आहेत. मुद्दा असा की, हा ‘फेक नॅरेटिव्ह’ आजही टिकून आहे. कारण हल्ली अनेक व्हॉटसअ‍ॅप समूहावर एक संदेश फिरतोय. ‘हिंदू’ हे नाव तुम्हाला आक्रमक, विजेत्या अरबांनी दिलं. मग तुम्ही हिंदूपणाचा अभिमान का बाळगता?’ हाच तो भ्रम!
 

Fake Narrative 
 गेली सात दशके ‘फेक नॅरेटिव्ह’ या इको-सिस्टिमने चालवलेली निराधार अपप्रचाराविरुद्धची लढाई संघ लढत आहे.
 
दु:ख याचे आहे की, याची एक समाज म्हणून फार मोठी किंमत आपण आत्मवंचनेच्या रूपाने मोजली आहे आणि आता या देशाच्या अस्मितेच्या बाबींवर काम करणारे सत्ताधीश आले आहेत तर स्वातंत्र्यानंतर ज्या कम्युनिस्ट नतद्रष्ट लोकांनी भारताच्या इतिहासाची फेक मांडणी केली आणि ती शिक्षण पद्धतीत रूजवली (या इंग्रजांच्याच अवलादी) त्यांच्या नव्या ‘फेक नॅरेटिव्ह’ला सुरुवात झाली आहे.
 
 
‘फेक नॅरेटिव्ह’चे तीन स्तर असतात, एक म्हणजे कथ्य. दुसरे ते तयार करणारे समूह. तिसरे ते प्रसारित करणारे लोक. भारतात या मागचे प्रमुख कारण आहे ते यांच्या हातातून निसटत गेलेले राजकीय फायदे.
 
 
‘फेक नॅरेटिव्ह’ म्हणजेच खोट्या, दिशाभूल करणार्‍या किंवा आंशिक सत्यावर आधारित असलेल्या गोष्टींचा प्रसार करणे. या लोकांचे विचार, भानगडी, आणि निर्णयप्रक्रियेवर परिणाम करण्याच्या उद्देशाने तयार केले जातात. ‘फेक नॅरेटिव्ह’ विविध माध्यमांद्वारा, जसे की सामाजिक माध्यमे, बातम्या, आणि अफवा यांनी पसरतात.
 
 
आजकाल आपण वाचत असलेल्या बातम्या किंवा सोशल मीडियावरील पोस्ट्स यामध्ये अनेकदा ‘फेक नॅरेटिव्ह’ला सामोरे जात असतो. हे नॅरेटिव्ह म्हणजे खोट्या किंवा चुकीच्या माहितीची रचना असते, ज्यामुळे लोकांच्या मनावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. एखाद्या विचारसरणीच्या विरुद्ध जनमत तयार करण्यासाठी ‘फेक नॅरेटिव्ह’ फार मोठे हत्यार आहे. कारण त्यामुळे लोकांत भ्रम किंवा टोकाची भीती निर्माण होते. भ्रामक कथ्य हे लोकांना चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवायला भाग पाडण्याची सक्ती करतात, लोकांचे सामूहिक वर्तन त्यामुळे बदलू शकते. भ्रामक कथ्याचा परीघ मोठा असतो. त्यात खोट्या बातम्या, विकृत तार्किक पद्धतीने सादर केलेल्या अफवा, अपप्रचार, अर्धसत्य, एकाच वेळी अनेकांनी उच्चारण करून त्याच्या सत्यतेचा आभास निर्माण करणे, असल्या असत्य बाबीचा प्रसार-प्रचार विविध घटकांत करणे, समाजातील विशिष्ट व्यक्तींना यासाठी सामील करून घेणे, समाजातील प्रमुख घटकांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणे, वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या संपादकांच्या वर्तुळाचे मंथन घडविणे वगैरे असल्या उदात्त हेतूने पुन्हा एकदा असत्य माथी मारणे, सार्वजनिक जीवनात अल्पसंख्य घटकांत मुळात असणारे भय अधिक गडद करणे, जे विषय म्हणजे स्वाभाविकपणे समाजात दरी पडू शकण्याचे आशय बाळगणारे असतात त्यांना वारंवार सामोरे आणणे, आविष्कार स्वातंत्र्य या गोंडस नावाखाली स्वैराचार घडवण्यासाठी एखादे नवेच कथ्य प्रसृत करणे, मजकूर वेगळा, मथळा वेगळा अशा फसव्या बातम्या देणे अशा विस्तृत गोष्टींचा समावेश आहे.
 
 
अशा ‘फेक नॅरेटिव्ह’वर काम करणारे नेहमीच आपण स्पष्टवक्ते, सत्य सांगणारे, नेमका आशय उजेडात वगैरे आणणारे जाणकार आहोत असा एक भ्रम स्वत:बद्दल समाजात पसरवत असतात. एखाद्या महत्त्वाच्या मांडणीत इकडून तिकडून माहिती गोळा करून ती आपली म्हणून घुसडून देणे, हा अजून एक उद्योग ‘फेक नॅरेटिव्ह’ला खतपाणी घालणारा आहे. म्हणजे धादांत खोटे ते खरे वाटल्यासारखे फेकणे असा मोठा पल्ला म्हणजे रेंज या भ्रामक कथ्याला लाभली आहे. या सगळ्या रेंजमध्ये असल्या भ्रामक कथ्याचे अनेक प्रकार आहेत. भ्रामक कथ्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक काही व्यक्ती आणि काही समूह यांचे आशय प्रामुख्याने आणले जातात. आशय आपली वैशिष्ट्ये घेऊन येतात आणि असल्या ‘फेक नॅरेटिव्ह’ने प्रत्येक आशयाचा प्रसार केला जातो.
 
 
राजकीय भ्रामक कथ्य हे निवडणुकींचे निकाल झुकावे म्हणून जनमत बदलण्यासाठी आणि विशिष्ट राजकीय प्रणाली प्रसारित करण्यासाठी वापरले जाते. त्यात मग खोटी माहिती पसरवणे, जुने व्हिडिओ त्याच्यात फेरफार करून दाखवणे, मतदार एका बाजूला झुकवण्यासाठी समाजात प्रक्षोभ निर्माण होईल असे प्रचारतंत्र आणणे. हा उद्देश प्रसंगी खालच्या पातळीवर जाऊन राबवला जातो. चुकीच्या माहितीने समाजात विभाजन झाले आणि दीर्घकालीन एखादा चुकीचा पायंडा पडला तरी बेहत्तर, पण आपली राजकीय सोय पाहणे इतकंच याचे कारण असते. केवळ अशी र्‍हस्व दृष्टी असणारे अनेक राजकारणी आहेत. असल्या ‘फेक नॅरेटिव्ह’बद्दल सावधानता न बाळगली तर चुकीची माणसे पाच वर्षे जनतेच्या बोकांडी बसतात.
 
 
सामाजिक ‘फेक नॅरेटिव्ह’ मूलत: समाजात दुही निर्माण करणे यासाठी वापरला जातो, भिन्न श्रद्धा असणारे दोन समुदाय या ‘फेक नॅरेटिव्ह’ला बळी पडले तर मग समाजात द्वेष, हिंसा आणि असंतोष निर्माण होतात आणि ते फार मोठे नुकसान असते. सातत्याने असले भ्रामक कथ्य मांडत गेल्याने समाजाची परस्परावलंबीत घडी विस्कटते आणि मग अशा समाजात आणखी ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवणे सोपे होऊन जाते.
 
आर्थिक भ्रामक कथ्य - याचा उद्देश बाजारपेठेवर नियंत्रण मिळवणे असा असतो. काही कंपन्यांचे नुकसान करणे. यामुळे आर्थिक गुंतवणूकदारांनी चुकीची गुंतवणूक करणे किंवा आर्थिक उलाढालीची दिशाभूल होणे शक्य असते आणि मग बाजार अस्थिर झाले की त्याचा राजकीय फायदा उठवणे सोपे जाते. देशाची सारी सूत्रे अर्थकारणाच्या मार्गाने वळवणे सुद्धा असल्या फेक कथ्याने होऊ शकते.
 

Fake Narrative 
 
व्यक्तीविषयी ‘फेक नॅरेटिव्ह’ - अधिकारावर असणार्‍या किंवा प्रभावशाली असणार्‍या एखाद्या व्यक्तीविषयी चुकीची माहिती मुद्दाम पसरवून त्याची प्रतिमा जनमानसात मलिन करण्यासाठी वापरला जातो. मुद्दाम खोटी माहिती पसरवणे, त्या व्यक्तीला बदनाम करून तिचा लोकांवरील प्रभाव कमी करणे, त्याच्या व्यवसायात, वैयक्तिक आयुष्यात अडचणी निर्माण करणे यासाठी नको त्या बाबी जनतेत पसरवून त्याचे मानसिक खच्चीकरण घडविले जाते. त्या व्यक्तीच्या प्रभावाखाली असणार्‍या वर्तुळात वैचारिक गोंधळ निर्माण होतो. काही प्रमाणात त्याचे समर्थक आणि विरोधक अशी विभाजनाची मांडणी तयार होते. अशी व्यक्ति समाज आणि देशासाठी काम करणारी असेल तर त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहते.
 
 
फेक नॅरेटिव्हचा प्रसार हा या डिजिटल युगात अत्यंत सुलभ झाला आहे. न्यूज पोर्टल्स किंवा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हॉटसअ‍ॅप फॉरवर्ड्स, आणि इतर विविध डिजिटल माध्यमांच्या द्वारे फेक नॅरेटिव्ह जलद गतीने आणि व्यापक प्रमाणात पसरतात. सोशल मिडिया हे अत्यंत वेगवान माध्यम आहे. मात्र त्याला सत्याचे भान नसते आणि सत्याच्या चाचपणीचा वेळही नसतो. त्यामुळे एखादी बाब तातडीने पसरवायला हे एक प्रभावी साधन आहे. त्यातल्या त्यात व्हॉटसअपने फॉरवर्ड नावाची सुविधा करून या सगळ्या फेक नॅरेटिव्हला मोठीच चालना दिली आहे. बरेचसे लोक त्या क्षणाला आवडले म्हणून काहीही भान न ठेवता इतरांना फॉरवर्ड करतात. फॉरवर्ड करणार्‍याच्या विश्वसनीयतेमुळे किंवा संबंधाने ही प्रक्रिया वेगवान होते. चुकीची माहिती अनेक ठिकाणी एकाचवेळी पसरवण्याची व्हॉटसअपची क्षमता विलक्षण आहे आणि ती धोकादायकही आहे. याचबरोबर विविध वेबसाईट्स आणि ब्लॉग्सवरून देखील फेक नॅरेटिव्ह पसरवले जातात. यामुळे वाचकांना चुकीची माहिती मिळते आणि ते त्यावर विश्वास ठेवतात. या कुठल्याही प्लॅटफॉर्म्सवर कोणतीही चुकीची माहिती पसरवणे यावर काहीही कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने एक खोटी बाब अनंत काळापर्यंत समाजात आतपर्यंत भिनत जाते. फेक नॅरेटिव्हचा प्रसार रोखण्यासाठी संबंधित प्लॅटफॉर्म्सवर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे लोकांच्या मनावर होणारा चुकीचा प्रभाव रोखता येईल.
 
 
मुळात हे आपल्याला लक्षात येत नाही की असल्या फेक नॅरेटिव्हचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती सतत चुकीच्या बातम्या आणि अफवा ऐकत असेल, तर त्याच्या मनात अनिश्चितता आणि भय निर्माण होऊ शकते. समाज भीतीच्या आणि अनाकलनीय अस्वस्थतेच्या एक अनामिक गुहेत शिरतो, ज्याचे खरे तर काहीही कारण नसते. डिप्रेशन, स्ट्रेस या मानसिक आरोग्याच्या समस्याही होतात. वारंवार चुकीच्या माहितीने लोक मानसिकदृष्ट्या थकलेले आणि निराश होऊ शकतात. या समस्यांमुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. असे सतत घडल्याने परस्परांवरील विश्वास, सौहार्द याला तडे जातात आणि मग हळूहळू एखाद्या विषयावरील मुक्त चर्चा करणे टाळले जाते. तो विषय बहिष्कृत होऊन बसतो. ज्यावर समाजाची एकसंघता अवलंबून आहे अशा महत्त्वाच्या विषयाबाबतची उदासीनता सगळ्यांना एककल्ली आणि एकलकोंड्या भावनेकडे घेऊन जाणे हा संवेदनशील समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने मोठा धोका असतो. एक राष्ट्र म्हणून मोलाच्या विषयाबाबत तुकड्यांत विभागलेला समाज, हा राष्ट्राच्या एकसंघतेला मोठा धोका बनतो.
 
 
फेक नॅरेटिव्हमुळे भ्रमदेखील निर्माण होतो. लोक जेव्हा खर्‍या आणि खोट्या माहितीत असलेले भेद समजू शकत नाहीत, तेव्हा त्यांच्यात भ्रम निर्माण होतो. ही भ्रमित अवस्था त्यांच्या निर्णयक्षमता आणि विचारसरणीवर विपरीत परिणाम करते. फेक नॅरेटिव्हमुळे लोकांच्या विचारसरणीत नकारात्मक बदल होतात आणि त्यांना असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यात व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्य बिघडवण्याची क्षमता आहे.
 

Fake Narrative 
 
गंमत बघा, जे तंत्रज्ञान लोकांना एकत्र आणणे व परस्पर संवाद विस्तृत करणे आणि आनंदी तणावरहित समाजनिर्मितीचे विलक्षण आयुध आहे त्याच्याच पोटी फेक नॅरेटीव्ह असले विकृत अपत्य जन्माला घालते. खोट्या किंवा विकृत माहितीच्या प्रसारामुळे, समाजात विविध प्रकारचे तणाव आणि विभाजन निर्माण होतात. या खोट्या कथा आणि अफवा समाजाच्या विविध घटकांमध्ये द्वेषभावना निर्माण करतात, ज्यामुळे सामाजिक एकतेला तडा जातो. सामाजिक विभाजन हा सध्या थेट फेक नॅरेटिव्हचा एक ठळक परिणाम आहे. धार्मिक, जातीय, किंवा राजकीय मुद्द्यांवर आधारित खोट्या माहितीच्या प्रसारामुळे समाजाच्या विविध गटांमध्ये परस्पर अविश्वास आणि ताण वाढतो. हे विभाजन अनेकदा हिंसाचार,द्वेषप्रचार आणि आपल्या विचारधारेच्या विरोधात असलेल्या लोकांबद्दल तिरस्कार निर्माण करण्यासाठी वापरले जाते. फेक नॅरेटिव्हमुळे सामाजिक सहजीवनात द्वेषभावना निर्माण होणे हा एक असाध्य रोग आहे. एरवी एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा शांत समाज खोटा अन्याय, विकृत विद्वेष या सारख्या खोलवर करणार्‍या असमानतेचे बीजारोपण करतो, जे पूर्ववत होण्यासाठी पिढ्या जाव्या लागतात. हे सगळे अशासाठी सांगितले की फेक नॅरेटिव्ह हा यापुढे भारतात भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे. कारण एकतर जेव्हा जग म्हातारे होते आहे तर भारत तरुण होत आहे. भारतातील सोशल मीडियाचा वापर ही जगासाठी अत्यंत कुतूहलाची बाब आहे.
 
 
आजची अधिक तरुण अशी लोकसंख्या अशीच दिसून येते ज्यांच्यापासून इतिहास लपवला गेला, विकृत पद्धतीने समोर आणला गेला आहे. आपण सजग राहिलो नाही तर त्याची फार मोठी किंमत भारत मोजेल.
 
ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही केले नाही अशी आजची 40-70 या वयोगटातील पिढी आता खर्‍या अर्थाने भारताच्या वैचारिक स्वातंत्र्यासाठी काम करू शकते. ज्यांना या देशाच्या प्रवासाची कल्पना नाही पण जे लोक तंत्रज्ञान अत्यंत हुशारीने वापरू शकतात अशा वर्गाला जागृत करण्यासाठी त्यांच्याशी भारताच्या सगळ्या प्रवासाबद्दल नीट संवाद साधावा लागले. ज्यांना जास्तीत जास्त मागे वळून बघता येते त्यांनाच अधिक पुढे जाता येते. जगातील अनेक देशात केवळ वैयक्तिक बाबींना महत्व आल्याने सहजीवन उद्ध्वस्त झाले आहे. कमालीचे एकारलेपण तिथे नांदते आहे. त्यामुळे जो समाज एकमेकांपासून तुटल्यासारखा जगतो, त्याला भीतीने ग्रासून टाकणे अत्यंत सोपे असते. अमेरिकेत आणि युरोपात सरळ सोप्या मार्गाने ‘फेक नॅरेटिव्ह’ला जे यश आले आहे ते यामुळेच. भारतात परस्परावलंबीत समाज असल्याने ‘फेक नॅरेटिव्ह’च्या पद्धती बदलल्या आहेत. त्या नीट समजून घेतल्या पाहिजेत
 
 
भारतात ‘फेक नॅरेटिव्ह’ नेहमीच सत्तास्थानापासून जवळ असणार आहे. कारण लोकशाही देशात राजकीय सत्तास्थानाला अनन्यसाधारण महत्व असते. एकूणच भारतीय नागरिक हा आत्मवंचनेच्या सापळ्यात अडकलेला असल्याने क्षणभर मिळणारा सन्मान मग तो प्रसंगी देशाच्या हिताशी तडजोड करणारा का असेना त्याचे त्याला फार आकर्षण आहे. मी कोणीतरी खास आहे ही भावना त्याच ब्रिटिशांनी हिरावून घेतलेल्या आत्मपरिचयाच्या वंचनेशी जोडलेली आहे. त्यामुळे पुरस्कार, सन्मान आणि तोही परदेशी संस्थांनी करणे याची जी एक लालसा भारतीय माणसात रुजलेली आहे ती फार घातक आहे. भारताच्या मिडिया, राजकारण, सहकार आणि शिक्षण या क्षेत्रांत काही अस्तनीतील साप आहेत ज्यांना दलाल बनवून त्यांचा उपयोग देशात अस्थिरता माजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘फेक नॅरेटिव्ह’मध्ये पाच प्रकारच्या विषयांचे प्रसार आणि महत्व या पुढच्या काळात वाढत जाणारे आहे. कारण ते विषय या टप्प्यावर स्वत:ची आणि स्वत्वाची जाणीव झालेल्या भारतीय समाजासाठी सगळ्यात जिव्हाळयाचे आहेत. त्याचाच उपयोग करून आता अनेक फेक नॅरेटिव्हज राबवले जातील याची साधार भीती आहे. परदेशी शक्ती आणि या देशातील त्यांचे हस्तक यांच्याकडून या पाच मुद्द्यांभोवती सगळ्या ‘फेक नॅरेटिव्ह’चे बांधकाम होणार आहे कारण हे पांचही मुद्दे भारताच्या ठाम परिचयाचे आहेत
 
1) राजकीय फेक नॅरेटिव्ह
 
समाजातील विशिष्ट व्यक्तींना काही परदेशी पुरस्कारांनी/सन्मानांनी भूषवणे, जसे पूर्वी फोर्ड फाउंडेशन होते तसे आजकाल मॅगेसेसे आहे. एका मुख्यमंत्र्याला हा पुरस्कार जेव्हा देण्यात आला होता तेव्हा तो राजकारणातच नव्हता, मग त्याला पुढे राजकारणात आणले गेले. त्याने एका फकिर वृत्तीच्या सामाजिक व्यक्तिमत्त्वाला वापरुन भ्रष्टाचाराविरूद्ध मोठे आंदोलन उभे केले. देशातील अनेक तरुण त्याच्यावर लुब्ध झाले. तो त्याच्या जोरावर मुख्यमंत्री झाला. पुढचा इतिहास त्याच्यावरील खटल्यांचा आणि तुरुंगवारीचा आहे. पण काही वर्षे या देशातील काही लोकांच्या आशांना ‘फेक नॅरेटिव्ह’ने गुंतवले. त्यांच्या आयुष्यातील ती बहुमोल वर्षे वाया गेली आणि आता ते लोक दिशाहीन होऊन भटकत आहेत. देशाला व समाजाला काडीचाही फायदा न होता, हे सगळे पुन्हा एकदा अराजकाच्या वळचणीला जाऊन पडले आणि देश मागे पडला. भारतीय समाज व्यक्तिप्रधान असल्याने त्यावर लगेच अशा व्यक्तींचा प्रभाव पडतो. मग अशा व्यक्तींचा एक गोतावळा तयार केला जातो. त्यांना लिबरल असे म्हणण्याची फॅशन आहे. कारण तरुण पिढी नेहमीच लिबरल मतांचा आदर करणारी असते. तिच्यावर अशा गोतावळ्याचे गारुड पडते. त्यामुळे राजकीय फेक नॅरेटिव्हचा सामना करणे हे अत्यंत आवश्यक आहे. कारण तो सगळ्यात मोठा धोका आहे.
 
2) हिंदू शक्ती आणि श्रेष्ठता:
 
देशात राष्ट्र प्रथम या विचारांवर चालणारे सरकार आले आहे आणि त्यांनी राष्ट्रीय अस्मितेच्या अनेक मुद्यांवर धोरण, निर्णय आणि अंमलबजावणी या तिन्ही स्तरांवर मोठ्या कामाची सुरुवात केली आहे. प्रथमच या देशात हिंदू हा शब्द जाहीरपणे कोणालाही अपमानास्पद वाटत नाही. हिंदूपणाचा अभिमान बाळगणार्‍यांना विनाकारण कोणताही त्रास दिल जात नाही. अनेक प्रकारचे साहित्य, चित्रपट आणि माहिती ज्यातून आपल्या पुरातन संस्कृतीची महती जागृत होईल असे उपक्रम राबवले गेले आहेत आणि राबविले जात आहेत. याचा एक निश्चित परिणाम होणार आणि त्यामुळेच यापुढचे ‘फेक नॅरेटिव्ह’ प्रचारात यायचे व त्याचे खंडन करणारे अथवा हे खोटे आहे असे वृत्त, माहिती, संशोधन, चर्चासत्रे, चित्रपट आणि नाटके अशा अनेक स्तरांवर होणार आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, न्याय्य हक्क असल्या उबदार आवरणाखाली ते लपून पुढे येईल त्याबद्दल सर्वांनी जागरूक असले पाहिजे. इथे मिडिया हा मोठा धोका असेल कारण त्याला परदेशी मांडणीतून असे काहीतरी दाखवण्याचा मोह होईल,ज्यात हिंदू धर्माची निंदानालस्ती करण्याचे किंवा त्याचे न्यूनगंड समाजमनावर लादले जाण्याचे प्रयत्न केले जातील.
 
3) जतन आणि पुनरुज्जीवन :
 
हिंदूंच्या जाज्वल्य इतिहासाला पुन्हा जागवण्याचे काम अगदी कोणत्याही संकोचाविना सुरू झालेले आहे. भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात अशा अनेक दुर्लक्षित देशभक्तांची महती आकाशवाणी सारख्या सरकारी माध्यमातून वर्षभर लोकांपर्यंत पोचवली गेली. याचा फार मोठा प्रभाव समाजमनावर पडला आणि लोकांच्या अस्मितेला नवे धुमारे फुटले. प्रचलित सरकारने कोणतेही लांगूलचालन न करण्याचे धोरण तडीस नेले आहे आणि एक राजकीय पक्ष असूनही ज्या पद्धतीची पकड शीर्षस्थ नेत्यांची आपल्या कार्यकर्त्यांवर ठेवलेली आहे ते अत्यंत वाखाणण्यासारखे आहे. इथे कार्यकर्त्यांना सन्मान, सर्वसमावेशक तत्वे, राजकीय तडजोडी यासारखी अमिषे दाखवणे घडू शकते. पक्ष सजग राहील ही काळजी घेतली पाहिजे. जे पुनरुज्जीवित होते आहे त्याचे जतनही तितकेच मोलाचे आहे. देशातील विविध म्युझियममध्ये आता भारतीयत्व दर्शन झाले पाहिजे एकदा का ती मोठी रेष काढली की मग इतर रेषा खोडण्याचे काम करावे लागणार नाही, त्या आपोआप छोट्या होतील. इथे सांस्कृतिक क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणावर जतन करावे लागेल. हिंदू विचारधारेचे आणि प्रचलित सरकारचेदेखील सांस्कृतिक क्षेत्रातील विषयांकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि ते नेहमीच ‘फेक नॅरेटिव्ह’ निर्मितीच्या मदतीला धावून येते व सहाय्यभूतच ठरते असा आजपर्यंतचा अनुभव आहे.
 
4) प्रगती आणि राष्ट्रीय अभिमान :
 
हा देश लोकशाही राबवण्याच्या लायकीचा नाही असे उद्दामपणे तुच्छतेने बोलणार्‍या विन्स्टन चर्चिलच्या थडग्यात आता तर नुसत्याच टिकलेल्या नव्हे तर इंग्लंडपेक्षा सुदृढ असणार्‍या भारतीय लोकशाहीच्या अमृतवर्षाचे स्वर पोचले असतील. त्याच्या त्या घमेंडी देशाला भारताने आर्थिक मोजमापात मागे टाकले हे ही त्या साम्राज्यावर कधीच सूर्य न मावळण्याची बेबंद भाषा करणार्‍या लुटारू सत्तेला कळले असेल. ही प्रगती आता अशा टप्प्यावर पोचली आहे की, भारत या यावर्षी जगात सगळ्यात जास्त राष्ट्रीय ठोकळ उत्पन्न वाढ असणारा देश झाला असेल. हे यशाचे अमृत आता हलाहल सुद्धा आणते. मागच्या वर्षी एका नॅरेटिव्हच्या माथेफिरुने उघडपणे असे सांगितले होते की, मोदींच्या पराभव व्हावा यासाठी मी एक अब्ज डॉलर्स ओतले आहे. याचा अर्थ अशा पद्धतीचे नियोजन कुठंतरी सुरू असते. आपल्या देशातील अनेक वर्षे सत्ता भोगलेल्या राजघराण्याचा कुलदीपक ज्या देशाने हे सारे वैभव त्याला दिले त्या देशाचीच यथेच्छ बदनामी परदेशी भूमीवर करतो तेव्हा नॅरेटिव्हची फॅक्टरी अत्यंत जोमात सुरू असते हे लक्षात घ्या. यापुढे याला अधिकच गती येणार आहे. यासाठी अनेकांना परदेशी वार्‍या, संपत्ती व सन्मान अशी खैरात वाटली जाईल. देशहित प्रथम असे धोरण असेल तर देशहिताच्या आड येणारे अनेक दलाल बेरोजगार होतात आणि त्यांचे पोसलेले राजकीय गणंग मग ‘फेक नॅरेटिव्ह’चा प्रसार करू लागतात. कारण काहीही करून पुन्हा सत्तेच्या आणि मस्तीच्या सहवासात त्यांना जायची आकांक्षा असते. राष्ट्रीय अभिमानाच्या स्मारकांची पुनर्स्थापना हा अजून एक घटक जपणारे सरकार सत्तेवर राहिलेले असल्या सन्मानस्थळांच्या विटंबनेवर आपली राजकीय पोळी भाजणार्‍यांना मुळीच चालत नाही. त्यामुळे अनेक ‘फेक नॅरेटिव्ह’ यापुढे येत राहतील. त्यामुळे आर्थिक प्रगती आणि राष्ट्रीय अस्मिता हातात हात घालून चालणे ज्या कोणाला परवडत नाही त्यांचे बुरखे फाटू नयेत म्हणून अनेक खोट्या बातम्यांचा महापूर येत राहणार, हे नक्की.
 
 
5) व्यक्तिमत्व आणि पराक्रम (पंतप्रधान मोदी):
 
नरेंद्र मोदी या नि:स्वार्थी माणसाने अथक काम करत जो देशाचा सन्मान आणि महत्व परदेशातील अवकाशात निर्माण केले, ही बाब अनेकांच्या स्वार्थी राजकीय भवितव्याला संपवणारी आहे. केवळ दहा वर्षात भारताला इतके महत्त्व प्राप्त होत असेल तर आपण इतकी वर्षे सत्तेवर राहून नक्की काय केले या साधा प्रश्न देशातील जनतेच्या मनात उभा राहणारच या भीतीने त्या अनेकांना अस्वस्थ केले आहे.
 
त्यातूनच लोकशाही मार्गाने मोदींनी अनेकांना सत्तेबाहेर बसवले आहे. त्यामुळे ईव्हीएम, अदानी, राफेल, मोदींचे व्यक्तिमत्व अशा अनेक बाबींवर राळ उठवत राहणे इतकेच काम त्या सर्वांना उरले आहे. ज्यांना धड आपला छोटा व्यवसाय, गल्लीतील पत किंवा छोटा प्रादेशिक पक्ष सांभाळता येत नाही, ज्यांची कुठल्याही विषयात गती नाही ते मोदींविषयी अनेक भ्रम निर्माण व्हावेत म्हणून आदळआपट करतील यात शंका नाही. मोदींचे विनाकारण चारित्र्यहनन करणे, त्यांच्यावर अनेक खोटेनाटे आरोप लावणे हे उद्योग सुरूच राहतील. त्याला मोठा पाठिंबा आणि आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे.
 
विदेशातील अनेक व्यक्ति/संस्था ज्यांचे हितसंबंध राखणे बंद झाले आहे व ज्यांची संरक्षण दलालीतील मजबूत प्राप्ती थांबली आहे, अशांकडून या गोष्टी होत राहतील यात शंका नाही. भारतातील मोठा मिडिया व अनेक व्यक्ती त्यांच्या पे-रोल वर असल्याने की काय, ते सर्व त्यांच्या असल्या नॅरेटिव्हला प्रसिद्धी देत राहतील याचीही खात्री आहे. त्यामुळे कोणताही नॅरेटिव्ह कुठून आला आहे आणि त्यामागे कोण आहे हे तपासले पाहिजे.
 
 
विशेषत: मोदी तिसर्‍यांदा निवडून आल्यावर भारत आता फेक नॅरेटिव्हच्या इको सिस्टमच्या रडारवर आला आहे. यापुढे अनेक फेक न्यूज/नॅरेटिव्ह प्रसारित होणार आहेत. आपल्याला जागृत राहावे लागेल. वरील पाच बाबींना बळी न पडता, सत्य आणि तथ्याची माहिती मिळवून भारतीय समाजातील एकता आणि सलोख्याची भावना पुनर्स्थापित करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. फेक नॅरेटिव्हच्या प्रभावांवर नियंत्रण ठेवून समाजातील तणाव आणि दरी कमी करण्यासाठी सजगता आणि विवेकशील विचारांची आवश्यकता आहे. पण त्या आधी फेक नॅरेटिव्ह ओळखण्याची क्षमता निर्माण करणे ही आता तातडीची निकड बनली आहे. या डिजिटल युगात ते एक अपरिहार्य असे कौशल्य आहे. माहिती आणि तथ्य, बातमी आणि मर्म, मिळणारा डेटा आणि त्याची शहानिशा करण्याची साधने यांचा समावेश शालेय शिक्षणापासून करायला हवा. महाविद्यालयात प्रथम वर्षांच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करायला हवा. यासाठी एक निश्चित अशी कार्यप्रणाली आरेखित करावी लागेल. यातली पहिली पायरी आहे ती माहितीचा स्त्रोत त्याची विश्वासार्हता तपासून पाहण्याची प्रभावी आणि निर्हेतूक अशी साधने निर्माण करावी लागतील, शिवाय ती सुलभ असणे आवश्यक आहे. कारण सुरुवातीलाच असला प्रसार रोखणे त्यामुळे शक्य होईल. जसे आर्थिक बचतीच्या योजनांत शासकीय योजना सगळ्यात सुरक्षित असतात आणि तिथे इतर खोट्या अर्थसंस्थांसारखी फसवणूक होत नाही याचा अपरंपार विश्वास लोकांच्या मनात अनुभवातून रूजला आहे. अशा पद्धतीच्या संदर्भ संस्था निर्माण कराव्या लागतील, त्यांना आवश्यक ते संरक्षण पाठबळ द्यावे लागेल आणि काही खासगी संस्था जरी समाजहितैषी भावनेतून निर्माण होणे शक्य असले तरी त्यावर एक सरकार म्हणून नियंत्रण असायला हवे. सरकारचे प्रमुख काम हे सुव्यवस्था राखण्याचे असते. त्यामुळे हा त्यांच्या प्रशासन व्यवस्थेचा कायदेशीर पाठबळ असणारा विभाग बनवायला हवा.
 
 
‘फेक नॅरेटिव्ह’मुळे होणार्‍या नुकसानीची प्रतवारी निश्चित करून त्याला कायदेशीर शिक्षा वगैरेची तरतूद करावी लागेल. हा एक व्यापक अशा शासकीय कृती आराखड्याचा भाग बनला पाहिजे. जसे शेअर बाजारात सेबीसारख्या प्रभावी नियंत्रक संस्था आहेत तशा ‘फेक नॅरेटिव्ह’चे परीक्षण करण्याची व्यवस्था आणि त्यासाठी खासगी ऑडिटर्सची फळी उभी करावी लागेल. आर्थिक नुकसान हे तात्कालिक असते ते भरून येऊ शकते, पण सामाजिक नुकसान दीर्घकालीन असते आणि बर्‍याचदा ते भरून येण्याची कोणतीही तातडीची शक्यता दिसत नाही. अशा वेळी अशी व्यवस्था मदत करू शकेल. पण हे झाले शासकीय प्रशासन व्यवस्थेच्या बाबतीत.
 
फेक नॅरेटिव्हविरुद्ध लढा देण्यासाठी सजगता आणि सतर्कता या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, गेल्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपाच्या पाठीशी असूनही भाजपा अजून एका पक्षाशी लढत होता, तो म्हणजे ‘फेक नॅरेटिव्ह’. कारण संविधान धोक्यात येणार आणि आरक्षण जाणार या ‘फेक नॅरेटिव्ह’ने भाजपचे मोठे नुकसान केले.
 
‘फेक न्यूज’ आणि ‘फेक नॅरेटिव्ह’ने जगभर सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. ‘फेक नॅरेटिव्ह’ आपल्याला खोडणं आवश्यक आहे. गैरसमज आणि अफवा पसरवणारे आपले काम करतच राहतील कारण तेच त्यांच्या अस्तित्वाचे मूळ आहे. अनेकदा ते अशा खोटे बोलणार्‍या लोकांच्या टोळ्या उभ्या करतात. महाराष्ट्रात आपण पाहतोच की, एक राजकीय नेता काहीतरी धादांत खोटे विधान करतो, लगेच सोशल मिडियावरील एक तथाकथित निर्भीड(?) माणूस त्या विषयांवर व्हिडियो करतो, तातडीने एक न्यायप्रिय(?)वकील त्याच पद्धतीचे एक स्टेटमेंट देतो, दुसर्‍याच दिवशी एक विद्वान (?) संपादक त्यावर अग्रलेख लिहितो. पाठोपाठ न्यूज चॅनेलवर काहीतरी सनसनाटी मथळे देऊन आणि मोठ्या वैचारिकतेचे आव आणणारे पण सहेतुक असे कार्यक्रम केले जातात. महाराष्ट्रात ‘फेक नॅरेटिव्ह’वाल्यांनी अशी एक संपूर्ण इकोसिस्टिम उभी केली आहे. कुठल्या तरी भुक्कड स्वार्थासाठी आपल्या पदरी बाळगलेले काही विचारवंत(?) यांच्याकडे आहेतच. मग ते अधूनमधून पण सर्व लक्षात ठेवून यावर बोलत राहतात. असे सर्वंकष खोटे पसरवले जाते. यातल्या प्रत्येकाचे त्या त्या विषयावर वेगवेगळ्या काळात आलेली मते बघा, ती परस्परविरोधी असतात, नंतर हे सर्वच जण आपण काय बोललो ते आपमतलबीपणे विसरून जातात, कारण ते मुळात खोटे असते. गेली सात दशके असलीच ‘फेक नॅरेटिव्ह’ या इको-सिस्टिमने चालवलेली निराधार अपप्रचाराविरुद्धची लढाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लढत आलेला आहे. थेट गांधीहत्येपासूनच्या बेछूट आरोपापासून, देशावर आलेल्या कुठल्याही आपत्तीत संघाचाच हात असल्याचे खोटे मथळे ‘फेक नॅरेटिव्ह’वाल्यांनी वर्षानुवर्षे वापरले. संघ या विरुद्ध ठामपणे उभा राहीला. याचे एक कारण असल्या आणि साटेलोटे असणार्‍या बाजारबुणग्याकडच्या ढोंगी इको सिस्टिमला संघाने आपल्या अंगभूत संपर्क-सामर्थ्याने सबलपणे तोंड दिले. हे आरोप करणारे सगळे संपले आणि संघ दिमाखात शंभराव्या वर्षात पदार्पण करतो आहे. संघासारखे देशहितासाठी झटणारे माध्यम देशात असतांना, भारताचे संपूर्ण नुकसान करू शकेल इतका प्रभावी नॅरेटीव्ह या देशात उभा राहू शकेल असे वाटत नाही. कारण संघ असल्या ‘फेक नॅरेटिव्ह’मधून ‘केला जरी पोत बळेची खाले,ज्वाला तरी ते वरती उफाळे‘ या उक्तीप्रमाणे पुन्हा तेजाने उजळून व उसळून वर आलेला आहे.
 
लेखक अभिनेता, व्यवस्थापनतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ आहेत.