@अशोक राठोड 9370280048
महाराष्ट्र राज्याच्या कृषी उद्योगविश्वात सोलापूर जिल्हा महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. मंगळवेढ्याची मालदांडी ज्वारीची आणि सांगोल्याच्या डाळिंबाची जगभर ओळख आहे. याशिवाय करमाळ्याच्या केळीने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आहे. उजनी धरण क्षेत्रामुळे साखर उद्योगात मोठी वाढ दिसून येत आहे. सोलापूरची पांढरीशुभ्र ज्वारी व शेंगा चटणीने खाद्य उद्योगात लौकिक मिळवला आहे.
सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्रातला महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गिरणगाव व चादरींचे शहर म्हणजे सोलापूर. महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणजे पंढरपूर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, बार्शीचे भगवंत महाराज, करमाळ्याची कमलादेवी या देवस्थानांमुळे सोलापूरचा लौकिक वाढला आहे. या जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. शिवाय सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोरी व माण या छोट्या नद्या वाहतात. सोलापूर-पुणे जिल्ह्याच्या सीमारेषेेवर असणार्या उजनी (ता. माढा) येथे भीमा नदीवर उजनी धरण बांधण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले आहे. कांद्याची मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे. ज्वारी, ऊस, डाळिंब, केळी आणि द्राक्ष पीक हे सोलापूरचे मुख्य बलस्थान आहे.
कृषी संशोधन केंद्राचे कार्य
ब्रिटिशकाळात सोलापुरात कृषी संशोधन केंद्राला सुरुवात झाली. कोरडवाहू शेतीचे नियोजन करण्यासाठी ब्रिटिशांनी 1933 साली सोलापुरात (मुळेगाव) कोरडवाहू कृषी संशोधन केंद्र सुरू केले. मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या केंद्राने ‘मालदांडी’ हे पारंपरिक वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित केले आहे. या वाणाने ‘जीआय’ (भौगोलिक मानांकन) देखील प्राप्त केले आहे. मालदांडी मानवी भरणपोषणाबरोबर पशूसाठी चारा म्हणूनही उपयुक्त आहे. रोगास प्रतिकारक्षम असणारी आणि अधिक उत्पादन देणारी मालदांडी हे वाण सर्वपरिचित आहे. शबरी कृषी प्रतिष्ठान संचालित खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय भाजीपाल्याची निर्मिती करणारे ‘जिजाई नॅनो किचन गार्डन‘चे मॉडेल (लहान परसबाग) विकसित करण्यात आले आहे. कमी जागेत व कमी खर्चात लहान कुटुंबासाठी आवश्यक असणारा 60 ते 70 टक्के भाजीपाला या मॉडेलच्या माध्यमातून उपलब्ध होतो.
संपूर्ण राज्याला डाळिंब पिकाची ओळख करून देणार्या सोलापूर जिल्ह्यासाठी केंद्र शासनाने 2005 साली केगाव (उत्तर सोलापूर) येथे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सुरू केले. या केंद्राने डाळिंबाची ‘सोलापूर लाल‘ ही बायोफोर्टीफाइड जात विकसित केली आहे. या प्रजातीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषणद्रव्ये, जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. ही जात फुलधारणेनंतर 165 दिवसांत परिपक्व होते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत सोलापूर शहरात विभागीय कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण, बीजोत्पादन असे नानाविध उपक्रम चालतात.
ज्वारी, डाळिंब व केळी उत्पादनात अग्रेसर
सोलापूर जिल्हा हा ‘ज्वारीचे कोठार‘ म्हणून ओळखला जातो. करमाळा व माढा तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित सर्व तालुक्यांत ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. मंगळवेढ्याची पांढरीशुभ्र मालदांडी ज्वारी, तर बार्शीची शाळू ज्वारी परराज्यांत प्रसिद्ध आहे. विशेषतः हे दोन्ही तालुके ज्वारीच्या कडबा बाजारासाठी राज्यात आघाडीवर आहेत. उजनी धरण क्षेत्रामुळे ज्वारीची जागा उसाने घेतली आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक साखर कारखाने या जिल्ह्यात कार्यरत आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या कृषी वैभवात खरी भर टाकली आहे ती डाळिंबाने. महाराष्ट्र राज्यातील एकूण डाळिंब क्षेत्रापैकी 34 हजार हेक्टर (70 टक्के) डाळिंब क्षेत्र एकट्या सोलापूर जिल्ह्यात आहे. याखेरीज जिल्ह्यात 21 हजार हेक्टरवर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. त्यापैकी सर्वाधिक 17 हजार हेक्टरवरील द्राक्षापासून बेदाण्याची निर्मिती होते. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती बेदाणा बाजारासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. विशेषतः सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील केळी निर्यातीचे मुख्य केंद्र बनत आहे. करमाळा, माढा आणि पंढरपूर या तालुक्यांतील केळीची गुणवत्ता उच्च दर्जाची आहे. कंदर (ता. करमाळा) हे गाव केळी उत्पादनाचे व निर्यातीचे केंद्र आहे. गतवर्षी राज्यात सर्वाधिक 16 हजार कंटेनर केळीची निर्यात एकट्या सोलापूर जिल्ह्यातून झाली. त्यातून 2200 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. याबरोबर वडजी (दक्षिण सोलापूर) हे ‘गुलाबा‘चे, रानमनसले हे (उत्तर सोलापूर) ‘कांद्या‘चे, तर नान्नज हे (उत्तर सोलापूर) ‘द्राक्षा‘चे, मोडनिंब हे (ता. माढा) हे गाव ‘बोराचे‘ गाव म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यात ‘काळं सोनं’ म्हणून ओळखली जाणारी ‘पंढरपुरी म्हैस’ ही साधारण 150 वर्षापासून पंढरपूर भागातील गवळी समाज सांभाळत आहेत.
शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती व विकास
सोलापूरच्या कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी एफपीओ अर्थात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत. बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील महिला शेतकरी अनिता माळगे यांनी महिलांना एकत्रित करून यशस्विनी अॅग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली आहे. महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही महाराष्ट्रातील पहिली कंपनी म्हणून ओळखली जाते. त्याद्वारे प्रक्रिया उद्योगास चालना दिली आहे. निमगाव टेंभुर्णी (ता. माढा) येथील विठ्ठलगंगा शेतकरी उत्पादक कंपनी व कंदर (ता. करमाळा) येथील सन स्टार अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी या दोन कंपन्या केळी क्षेत्रात, तर करकंब (ता. पंढरपूर) येथील करकंब शेतकरी उत्पादक कंपनी द्राक्ष व बेदाणा पिकांत उल्लेखनीय कार्य करत आहेत.
खाद्यसंस्कृतीत स्वतंत्र ओळख
सोलापूर जिल्ह्याची खाद्यसंस्कृतीत स्वतंत्र अशी ओळख आहे. सोलापूरच्या पांढरीशुभ्र ज्वारीची कडक भाकर, खमंग शेंगा चटणी, शेंगा पोळी, तुरीचा पेंडपाला, लांबोटीचा ता. मोहोळ खमंग चिवडा, तांदूळवाडीची ता. दक्षिण सोलापूर बासुंदी, करकंबची ता. पंढरपूर चटकमटक आमटी इ. खाद्यपदार्थ सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.
सोलापूर चादरी
सोलापूर हे सुती चादरींसाठी देशात प्रसिद्ध आहे. शहरात चादरी व टॉवेलचे अनेक कारखाने आहेत. इथल्या चादरींसाठी देशासह संयुक्त अरब, कुवेत, युनायटेड स्टेट्स आदी देशांत मोठी मागणी आहे. एकूणच येत्या काळात सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, केळी, डाळिंब व द्राक्ष प्रक्रिया आणि निर्यातीला वाव मिळणार आहे. गरज आहे या क्षेत्रात भरीव कार्य करण्याची.
लेखक दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी साहाय्यक आहेत.