सोलापूरचे प्रति महाबळेश्वर - चिंचणी गाव

विवेक मराठी    18-Jan-2025
Total Views |
@मोहन अनपट
 
सोलापूर जिल्ह्यातील चिंचणी या विस्थापित गावाने ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राची उभारणी करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. ग्रामस्थांच्या पुढाकारातून चालविले जाणारे हे महाराष्ट्रातील पहिले ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र. ‘झाडांचे गाव’ ते ‘मिनी महाबळेश्वर’ अशी ओळख निर्माण करणार्‍या या गावाला महाराष्ट्र शासनाचा ’वनश्री’ हा पुरस्कार मिळाला आहे.
 
krushivivek
महात्मा गांधी म्हणायचे की, भारत हा देश खेड्यांनी बनलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत खेड्यांचा आणि गावांचा विकास होणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाही. गांधीजींच्या याच विचाराचा धागा पकडत पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावाने स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर गाव करण्याचा कृतिशील कार्यक्रम राबविण्यास गेल्या वीस वर्षांपासून प्रयत्न चालविले आहेत. याच गावातील महिलांनी ‘वरदायिनी महिला बहुउद्देशीय सामाजिक सेवा सहकारी संस्था मर्यादित चिंचणी’ या संस्थेच्या माध्यमातून पर्यटन संचालनालयाचे नोंदणीकृत ’चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र’ सुरू केले आहे.
 
 
चिंचणीची प्रेरणादायी वाटचाल
 
ज्यांच्या कित्येक पिढ्या जावळीच्या खोर्‍यात प्रामुख्याने महाबळेश्वरच्या पायथ्याशी गेल्या अशा ‘चिंचणी‘ (पूर्वीचा सातारा तालुका) गावच्या लोकांना ‘कन्हेर‘ धरणामुळे 1978 मध्ये सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीतून विस्थापित व स्थलांतरित व्हावे लागले, तेही त्यांच्या मूळ गावापासून दोनशे किलोमीटर दूरवर असलेल्या आणि पंढरपूरजवळच संपूर्ण वारकर्‍यांसाठी आदराचे स्थान असलेल्या ‘टप्पा‘जवळच्या दुष्काळी माळावर. वास्तविक पाहता दुसरीकडे कायमस्वरूपी विस्थापित होत असताना चिंचणी गावाला कुठेही जागा मिळाली असती; पण या गावच्या कित्येक पिढ्या वारकरी परंपरेमध्ये वाढलेल्या असल्याने आणि आपले उरलेसुरले आयुष्यही पंढरपूरच्या म्हणजेच विठ्ठलाच्या भक्तीत, संतांच्या आठवणीत व पायी चालत येणार्‍या वारकर्‍यांच्या सेवेत घालवता यावे म्हणून त्यांनी वारकर्‍यांसाठी आदराचे स्थान असलेल्या ’टप्पा’जवळच्या माळरानाची मागणी सरकारकडे केली अन् चिंचणी गावाला 100 एकरांची जमीन व 15 एकरांचे गावठाण राहण्यासाठी आणि कसण्यासाठी मिळाले.
 
 
पुनर्वसनाच्या निर्णयानंतर 1978 पासून हळूहळू एक एक कुटुंब पंढरपूरच्या टप्पाजवळच्या माळावर कायमचेच राहायला यायला लागले. आज अखेर या ठिकाणी जवळपास 60 ते 65च्या आसपास कुटुंबे आहेत.
 
 
krushivivek
 
चिंचणी गावाला विस्थापित झाल्यावर पहिल्या दोन पिढींत अपमानाचे जगणे वाट्याला आले. त्या वेळच्या विस्थापित पिढीच्या आयुष्याची परवड सुरू झाली अन् प्रचंड हतबलता व निराशा त्यांच्या वाट्याला आली. त्या काळात सुरुवातीच्या दोन पिढीने परकेपणाची अवहेलना सोसली. जसजसा काळ पुढे सरकत होता तसतसे या गावची नवी पिढी पंढरपूरच्या मातीशी आपली नाळ जोडण्याचा व विठ्ठलाच्या भक्तीत रममाण होण्याचा प्रयत्न करीत होती. या बदलत्या प्रयत्नातूनच 2005-06 साल उजाडता उजाडता नव्या तरुण पिढीच्या धाडसी निर्णयामुळे चिंचणी गावाने आपला चेहरामोहराच बदलून टाकण्याचा ठाम निश्चय केला अन् चिंचणी गावाचे, पंढरपूरचे आणि सोलापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नेण्याचा चंगच त्यांनी बांधला.
 
 
काय होता तो धाडसी निर्णय? तो धाडसी निर्णय असा होता की, आपण या टप्पाजवळच्या उजाड व दुष्काळी माळावर आपल्या पूर्वीच्या अनेक पिढीने अनुभवलेले सह्याद्रीच्या कुशीतले हिरवाईने नटलेले ’प्रति महाबळेश्वर’ निर्माण करायचे.
 
 
राज्यातील पहिले
‘ग्रामीण कृषी पर्यटन गाव‘
 
गावच्या सार्वजनिक मालकीचे असणारे हे ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र हे राज्यातील एकमेव पर्यटन केंद्र आहे. लोकसहभाग, लोकवर्गणी व शासनाच्या वेगवेगळ्या निधींतून हे केंद्र उभे केलेले आहे. तत्पूर्वी ग्रामदैवत वरदायिनी देवीच्या नावाने ‘वरदायिनी महिला बहुउद्देशीय सामाजिक सेवा सहकारी संस्थे’ची स्थापना करण्यात आली. याअंतर्गत कृषी पर्यटन केंद्राचा आराखडा तयार झाला तेव्हा गावकर्‍यांकडे भांडवल नव्हते. त्या वेळी गावातील महिलांनीच मार्ग काढत आपल्याकडील 40 तोळे सोने गहाण ठेवले. त्यानंतर 13 जून 2022 मध्ये ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र सुरू झाले. 15 एकरांच्या गावठाणात सुमारे दहा हजार झाडांची वनराई फुलली आहे. प्रत्येकाच्या घरासमोरील आंबा, नारळ, जांभूळ, पेरू, चिकू आणि वनौषधी झाडे लक्ष वेधून घेतात. मध्यवर्ती भागात वसलेले मुख्य पर्यटन केंद्र खुणावते. शासनाने या केंद्राची दखल घेऊन ’छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’ पुरस्काराने गावाला गौरविले आहे. आज या गावाला ग्रामीण कृषी पर्यटनाचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने ’क’ वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे.
 
 
ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव
 
सध्या या पर्यटन केंद्रामध्ये हुरडा पार्टी हंगाम जोरात सुरू आहे. यामध्ये ज्वारीचा हुरडा, मका कणीस, उसाचा रस, चुलीवरचे गावरान जेवण, ग्रामीण खेळ, बैलगाडी, शिवारफेरी, ग्रामीण वस्तुसंग्रहालयातील कणगी, जुन्या काळातील घर, माजघर, व्हरांडा, अंगणातील दगडी विहीर आणि रहाट हे सर्व शहरी भागातील लोकांना खूप आनंद देत असून ग्रामीण जीवनशैलीचा अनुभवसुद्धा देत आहे. यामुळे गावातील शेतकर्‍यांना गावातच बाजारपेठ उपलब्ध झाली असून शेतातील ज्वारी कणीस, मका कणीस आणि भाजीपाला यांच्या विक्रीमधून चांगले उत्पन्न मिळत आहे.
 
ग्रामीण विकासाला चालना
 
सध्या चिंचणी गावाला आदर्श, स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर गाव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गावातील संपूर्ण घराच्या छतावरील पाणी गोळा करून ते पाणी जमिनीत जिरवून रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आलेले आहे. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या वरच्या बाजूला समतल चर तयार करून गावातून वाहून जाणारे पाणी यामध्ये जिरवून पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावाची संपूर्ण नळ पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर सुरू आहे. प्रीसिजन कंपनीच्या सीएसआर फंडातून 17 एचपी एवढ्या अश्वशक्तीचे सौर पंप बसवण्यात आले आहेत. याचबरोबर गावातील 40 सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर सौर पथदिवे उभे करण्यात आलेले आहेत. गावच्या सार्वजनिक मालकीचे पिण्याच्या पाण्याचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. गावातील सर्व कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी मोफत दिले जाते. 2023-24 या कालावधीत जिल्हा परिषदेने ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा‘ हे अभियान राबवले होते. या अभियानामध्ये सोलापूर जिल्ह्यामधील 3764 शाळांमध्ये (द्विशिक्षकी) चिंचणी जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक मिळाला.
 
 
गावची स्मशानभूमी स्वच्छ, सुंदर व बगिच्यासारखी असल्यामुळे या ठिकाणी गावातील मुले अभ्यास करत असतात. याशिवाय गावामध्ये झाडांचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पक्ष्यांचा वावर वाढलेला आहे. मुख्यतः हे गाव पर्यावरणपूरक आहे. गेल्या पाच वर्षांपासून सण, उत्सव, यात्रा, वाढदिवस अशा कार्यक्रमांसाठी फटाके वाजवले जात नाहीत.
 
 
सोलापूर जिल्ह्यामध्ये शहराच्या जवळच ग्रामीण कृषी पर्यटन केंद्रे आहेत; परंतु पंढरपूर उपविभागांमध्ये हे एकमेव पर्यटन केंद्र असल्यामुळे पंढरपूरसह शेजारील अनेक तालुक्यांमधून या ठिकाणी लोक येतात. शाळांच्या सहली येत आहेत. पंढरपूरला विठोबा-रखुमाईमुळे धार्मिक पर्यटन म्हणून वेगळी ओळख आहेच; परंतु आज चिंचणीसारख्या छोट्याशा गावाने उभ्या केलेल्या ग्रामीण कृषी पर्यटनामुळे पंढरपूरला आणखीन एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
 
लेखक चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राचे विश्वस्त आहेत.