जकराया साखर कारखाना - नावीन्यतेचे उत्कृष्ट मॉडेल

विवेक मराठी    18-Jan-2025   
Total Views |
Jakraya Sugar Factory
 
krushivivek 
साखर कारखानदारीत अ‍ॅड. बी. बी. जाधव, सचिन आणि राहुल जाधव या त्रिकुटाने आपला आगळा ठसा उमटवला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या जकराया साखर कारखान्याने घेतलेला नावीन्यतेचा आणि शेतकरी कल्याणाचा वसा. या कारखान्याने साखर, इथेनॉल, सीबीजी गॅस, ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खत व सहवीजनिर्मिती यांसारख्या नावीन्यपूर्ण उपपदार्थ निर्मितीच्या प्रकल्पांची यशस्वी उभारणी करून राज्यासह देशात साखर कारखानदारीत क्रांती करून दाखविली आहे.
उद्योजक होण्यासाठी उद्योजकाच्याच घरात जन्म घ्यावा लागतो असे नाही, तर स्वतःची जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीदेखील उद्योग क्षेत्रात स्वतःचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवू शकतो. हे ज्यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेतून व कष्टातून सिद्ध केले ते नाव म्हणजे वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया साखर कारखान्याचे संस्थापक अ‍ॅड. बी.बी. जाधव होय.
 
 
अ‍ॅड. बी.बी. जाधव मूळचे मोहोळ तालुक्यातील येणकी गावचे. आई-वडील शेतकरी. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची. अशा परिस्थितीतही त्यांनी कृषी व कायद्याची पदवी घेतली. नोकरीकडे न वळता ते व्यवसायाकडे वळले. काही काळ येणकी गावचे सरपंचपदही भूषविले. सकारात्मक मनोवृत्ती व अपयश पचविण्याची ताकद असलेल्या बी.बी. जाधव यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग केले. शेती व उद्योगाचे शास्त्र अवगत करून घेतले. पुढे माचणूर येथे खते व बियाणे विक्रीचा यशस्वी व्यवसाय केला. कृषी क्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास व समर्पण भाव या गुणांमुळे पंचक्रोशीतील शेतकरी जाधव यांच्याकडे अडीअडचणी घेऊन येत. शेतकरी प्रश्नांबाबत त्यांनी नेहमीच आवाज उठवला. जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी सामान्य शेतकर्‍यांच्या जगण्याला आधार दिला. म्हणून ते खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचे आधारवड बनले.
 
 
krushivivek
 
जकराया साखर कारखान्याची मुहूर्तमेढ
 
बी.बी. जाधव यांच्या मनात आयुष्यात काही तरी अफाट नावीन्यपूर्ण काम करून दाखविण्याची जिद्द व महत्त्वाकांक्षा होती. त्याच जोरावर त्यांनी स्वतःचा साखर कारखाना सुरू करण्यासाठी लक्ष केंद्रित केले. 2004 साली त्यांना साखर कारखान्याचा परवाना मिळाला. 2011 साली वटवटेच्या माळरानावर उभ्या राहिलेल्या ’जकराया शुगर’चा पहिला गळीत हंगाम झाला. जाधव हे उत्तम प्रशासक असले तरी ते प्रथम शेतकरी आहेत. त्यामुळे कृषी अर्थशास्त्राचे बारकावे त्यांना अवगत आहेत, त्यामुळे प्रतिदिन तीन हजार मे. टन ऊस गाळप क्षमता असलेल्या या कारखान्यातून आता सहा हजार मे. टन ऊस गाळप होतो. कारखान्याचे सुमारे सतरा हजार शेतकरी सभासद आहेत. सोलापूरसह शेजारील कर्नाटक राज्यातील शेतकर्‍यांसाठी ’जकराया’ हा हक्काचा कारखाना बनला आहे.
 
सहप्रकल्पाची उभारणी
 
आज ऊस शेती व साखर कारखानदारांपुढे अनेक प्रश्न व समस्या उभ्या राहिल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कोसळले की, त्याचा ऊस उत्पादक व साखर कारखानदारांना मोठा फटका बसतो. दुसर्‍या बाजूने कारखानदारांनी कारखाना यशस्वी करण्यासाठी उपाययोजनांची तयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी साखरेसोबत उपपदार्थांची निर्मिती करणे आवश्यक आहे. व्यावसायिक वृत्तीचे व्यवस्थापन अडचणीच्या काळातही साखर कारखाना सक्षमपणे कसा उभा राहू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ’जकराया शुगर’ होय.
 
 
कोविड-19 या काळात जकराया कारखान्याने निर्माण केलेले विक्रमी सॅनिटायझर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शहरापासून महानगरापर्यंत पोहोचले होते. राज्यात सर्वाधिक सॅनिटायझर निर्माण करणारा पहिला कारखाना म्हणून जकराया लौकिकास पात्र ठरला होता.
 
krushivivek 
 
सध्या कारखान्याने सहवीजनिर्मिती, इथेनॉल, सीबीजी गॅस, ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खत व जकराया पतसंस्था आदी प्रकल्पांची जोड देऊन हा साखर उद्योग यशस्वी करून दाखविला आहे. यासाठी बी.बी. जाधव यांना चिरंजीव सचिन व राहुल यांची समर्थ साथ लाभत आहे. सचिन यांनी कृषी आणि एमबीएची पदवी संपादन केली आहे. कारखान्याचे संपूर्ण व्यवस्थापन तेच पाहतात, तर पतसंस्थेची धुरा सचिन यांच्या पत्नी मनीषा सांभाळत आहेत. ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खत व सीबीजी गॅस ही उत्पादने वटवटेसारख्या छोट्या गावातून निर्यात होतात, ही एक मोठी जमेची बाजू आहे.
 
 
स्पेंट वॉशपासून सीबीजी गॅसनिर्मिती
 
साखर कारखान्यातील एक उपपदार्थ म्हणजे स्पेंट वॉश हा एक सर्वात प्रदूषणकारी घटक, यामुळे कारखाना परिसरातील जलस्रोत आणि जमिनी प्रदूषित होतात. या घटकाबद्दल नकारात्मक गुणधर्म असले तरी उपयुक्तता मूल्यही मोठे आहे. स्पेंट वॉशवर प्रक्रिया करून सीबीजी गॅसनिर्मिती करण्याची नामी शक्कल ’जकराया शुगर’ने शोधून काढली. दररोज 20 टन सीबीजी गॅसनिर्मिती केली जात आहे. गॅसविक्रीसाठी सोलापुरातील गेल कंपनी व जत येथील बीबीसीएल कंपनीशी करार केला आहे. कारखान्याने सोलापूर, पंढरपूर व मंगळवेढा आदी ठिकाणी वितरण केंद्रे सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. स्पेंट वॉशवर प्रक्रिया करून सीबीजी गॅसनिर्मिती करणारा जकराया कारखाना हा देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे.
 
ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खतनिर्मिती
 
रासायनिक खतांच्या अति वापराबाबतही केंद्र शासन गांभीर्याने विचार करत आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक ’पोटॅश खत’ही देशाला मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. त्याचाच एक भाग म्हणून जकराया साखर कारखान्याने गॅसनिर्मितीनंतर जो कच्चा माल राहतो त्यापासून ’ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खता’ची निर्मिती सुरू केली आहे. दररोज 100 टन पोटॅश खताचे उत्पादन होते. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. अशा प्रकारचा हा प्रकल्प राबविणारा जकराया राज्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे.
 
 
दररोज एक लाख 80 हजार लिटर इथेनॉलनिर्मिती
 
कारखान्याने उभारणीपासूनच उसाच्या मळीवर प्रक्रिया करून इथेनॉलनिर्मिती प्रकल्पाची उभारणी केली. या प्रकल्पातून दररोज एक लाख 80 हजार लिटर इथेनॉलची निर्मिती केली जाते. पर्यायी इंधनाचा पुरवठा म्हणून कारखान्याने एचपीसीएल व बीपीसीएल या कंपन्यांशी करार करून इथेनॉलचा पुरवठा केला जातो.
 
जकराया मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेची उभारणी
 
शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन 12 जानेवारी 2012 साली जकराया मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेची स्थापना कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. बी.बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मल्टिस्टेटच्या मुख्याधिकारी मनीषा जाधव यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली आज ती पतसंस्था अनेक कुटुंबांचा आधार बनली आहे. या संस्थेच्या जवळपास 11 शाखा आहेत. वटवटे बेगमपूर, मंगळवेढा, मोहोळ, टाकळी सिकंदर, कुरुल, कामती, कंदलगाव, मुंद्रुप, भंडारकवठे, सिद्धापूर आदी ठिकाणी कार्यरत आहेत. सध्या 30 हजार सभासद असून 250 कोटींची वार्षिक उलाढाल आहे. अकरा शाखांत एकूण 60 कामगार आहेत. पतसंस्थेच्या माध्यमातून बचत गटाच्या पाच हजार महिलांना उद्योगासाठी कर्ज देऊन आधारही दिला आहे. तसेच व्यावसायिक आणि शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यात आले आहे.
 
स्थानिकांना वर्षभर रोजगार उपलब्ध
 
साखर कारखाने साधारणतः चार ते पाच महिने चालतात. त्यामुळे स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होत नाही. परिणामी, गळीत हंगाम संपला की, स्थानिक लोक रोजगारासाठी मोठ्या शहराची वाट धरतात. जकराया शुगरच्या सहप्रकल्पामुळे स्थानिक लोकांना वर्षभर रोजगार मिळाला आहे. यामुळे स्थानिक लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे.
 
 
उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ तांत्रिक ज्ञानच आवश्यक असते असे नाही, तर अन्य बाबींचाही अनुभव असणे क्रमप्राप्त आहे, हे जकराया शुगरच्या बी.बी. जाधव, सचिन जाधव व राहुल जाधव या पितापुत्रांनी दाखवून दिले आहे. जकराया हा आता साखर कारखानदारीत राज्यातील एक ब्रँड बनला आहे.
 
 
जाधव कुटुंब हे ग्रामीण भागाशी नाळ जुळलेले व प्रचंड क्षमता असलेले उद्योजक शेतकरी आणि साखर उद्योगाचे गाढे अभ्यासक आहेत. केवळ एका कारखान्याच्या माध्यमातून मोहोळ, मंगळवेढा आणि पंढरपूरसह शेजारील कर्नाटक जिल्ह्यातील गावांमध्ये आर्थिकदृष्ट्या कायापालट करून हजारो कुटुंबांना आर्थिक ऊब देणारे अ‍ॅड. बी.बी. जाधव, सचिन जाधव व राहुल जाधव हे खर्‍या अर्थाने सोलापूर जिल्ह्याचे भगीरथ ठरतात.

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.