@मंगल काटे 9423979002
मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीला जीआय (भौगोलिक) मानांकन मिळाले असले तरी याचा इथल्या ज्वारी उत्पादक शेतकर्यांना कितपत फायदा झाला आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे. विद्यमान सरकारने या भागात ज्वारी प्रक्रिया उद्योगाची उभारणी करून शेतकर्यांचे जीवनमान उंचवावे.

मंगळवेढा तालुका हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. संत चोखामेळा, संत दामाजीपंत आणि संत कान्होपात्रा असे अनेक संत या भूमीमध्ये होऊन गेले. भौगोलिकदृष्ट्या मंगळवेढा तालुका हा भीमेच्या तीरावर सुपीक खोर्यात काळ्या मातीच्या कुशीत वसलेला. हा तालुका सोलापूरपासून सुमारे 56 किलोमीटर, तर पंढरपूरपासून केवळ 23 किलोमीटर अंतरावर आहे. हा तालुका कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. अशा ह्या दुष्काळी तालुक्यामध्ये आशेचा किरण म्हणजे ‘मालदांडी ज्वारी‘चे पीक होय. मालदांडी म्हणजे भरपूर माल दाणे देणारी ज्वारी. ही ज्वारी पौष्टिक, उत्तम चव असणारी व तापमानाला प्रतिकारक्षम आहे. मंगळवेढा तालुक्यात रब्बी हंगामात साधारण चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जाते. हलक्या जमिनीत सरासरी एकरी पाच ते 10 क्विंटल, मध्यम जमिनीत 15 ते 20 आणि चांगल्या जमिनीत 25 ते 30 क्विंटल ज्वारीचे उत्पादन होते.
मालदांडीला ‘भौगोलिक मानांकन‘
मालदांडी ज्वारीचे पारंपरिक वाण टिकवून ठेवणे व तिची ओळख जगभर होणे गरजेचे होते. त्यासाठी भौगोलिक मानांकनाचे अभ्यासक व ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीचे अध्यक्ष अॅड. गणेश हिंगमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालदांडी ज्वारीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गरज होती फक्त मालदांडी ज्वारी उत्पादक शेतकरी एकत्रित येण्याची. कृषी पदवीधर प्रशांत काटे यांनी शेतकर्यांना प्रोत्साहित केले. त्या वेळी उपस्थित शेतकर्यांच्या आग्रहास्तव मंगल श्रीरंग काटे यांनी संघाचे नेतृत्व करावे, असा आग्रह धरला आणि मालदांडी ज्वारी विकास संघाची स्थापना करण्यात आली. 2014 मध्ये बौद्धिक संपदा विभाग यांच्याकडे भौगोलिक मानांकनासाठी मालदांडी ज्वारी विकास संघाच्या वतीने अर्ज सादर केला. सतत तीन वर्षे प्रयत्न चालूच ठेवले. सरतेशेवटी 2016 मध्ये मंगळवेढा ज्वारीला भौगोलिक मानांकन मिळाले.
मालदांडी विकास संघाचे कार्य
ज्वारी उत्पादक शेतकर्यांची संख्या वाढविणे, त्यांना मालदांडीचे बियाणे व जैविक निविष्ठा पुरविणे, हे कार्य करण्याबरोबर ज्वारी काढणी व मळणी करताना तसेच पॅकिंग करताना कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही याची दक्षता मालदांडी ज्वारी विकास संघाच्या माध्यमातून घेतली जाते. याशिवाय ग्राहकांच्या मागणीप्रमाणे एक किलो, पाच किलो, 20 किलो, 50 किलो याप्रमाणे पुरवठा केला जातो. सभासद शेतकर्यांना 50 ते 60 रुपये प्रति किलो दर देण्याचा प्रयत्न केला आहे व भविष्यात उत्तम प्रकारच्या ज्वारी प्रक्रिया पदार्थ निर्मिती माध्यमातून सभासद शेतकर्यांना प्रति किलो 80 रुपये दर देण्याचा मानस आहे. तसेच सेंद्रिय प्रमाणीकरण करून सेंद्रिय ज्वारी निर्यात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी संघ प्रयत्न करीत आहे.
आव्हाने आणि संधी
सध्या सोलापूरसह मराठवाड्यात हुरडा पार्ट्या दिसू लागल्यात. विशेष म्हणजे मंगळवेढ्याच्या ज्वारीची चवच न्यारी असल्याने मुंबईपासून ते नागपूरपर्यंतचे खवय्ये या भागात येऊन हुरडा पार्टीचा आस्वाद घेताना दिसतात. फेब्रुवारी महिना संपेपर्यंत मंगळवेढा तालुक्यात पाहुण्यांची वर्दळ असते. मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीला जीआय (भौगोलिक) मानांकन मिळाले असले तरी याचा इथल्या ज्वारी उत्पादक शेतकर्यांना कितपत फायदा झाला आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे.
काळाच्या ओघात उत्पादन खर्चात झालेली वाढ, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेत मिळत असलेला दर यामुळे मालदांडी ज्वारीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. पूर्वी मालदांडीच्या उत्पादनाबरोबरच जनावरांना चारा म्हणून कडबा उपयोगी पडत होता. एकूणच मालदांडीचे वेगळेपण असले तरी बाजार मूल्य हे कधी वाढलेच नाही. कडब्याचीही मागणी ही घटलेली आहे. याचा फटका मंगळवेढ्याच्या ज्वारीला बसत आहे. आणखी काही वर्षे असेच चालू राहिले तर ही मालदांडी ज्वारी कालबाह्य होईल, त्यामुळे मालदांडीचे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी यास राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. विद्यमान राज्य सरकारने या पिकाचा क्लस्टर पद्धतीने विकास केला पाहिजे. याद्वारे पिकाची लागवड ते प्रक्रिया उद्योग असा विकास करता येईल. यामुळे शेतकर्यांचे जीवनमान उंचावेल आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी उद्योगाला आणखी झळाळी प्राप्त होईल.
लेखिका मंगळवेढा येथील मालदांडी ज्वारी विकास संघाच्या अध्यक्षा आहेत.