सोलापूर जिल्हा हा दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो. अनेक देवस्थानांनी समृद्ध हा असा जिल्हा संतांची भूमी म्हणूनदेखील ओळखला जातो. सोलापूर चादरीसह ‘ज्वारीचे कोठार’ म्हणूनदेखील या जिल्ह्याची ओळख आहे. करकंबची ‘बाजार आमटी’ आणि लांबोटीची ‘शेंगा चटणी’देखील सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. माध्यमातून यांसारख्या अनेक बाबींचा उल्लेख आढळतो. फक्त आढळत नाही ती म्हणजे आपली सोलापूरची म्हणून प्रसिद्ध असलेली ‘पंढरपुरी म्हैस’.
आपल्या राज्यात ‘काळं सोनं’ म्हणून ओळखली जाणारी पंढरपुरी म्हैस ही साधारण 150 वर्षांपासून पंढरपूर भागातील गवळी समाज सांभाळत आहे. त्यांनीच या जातीचे संगोपन व संवर्धन केले आहे. सोलापूरच्या स्थानिक कोरड्या हवामानास अनुकूल व जादा दूध देणारी ही जातसुद्धा सोलापूर जिल्ह्याचे वैभव आहे. त्यासाठी सर्व सोलापूरकरांनी संधी मिळेल तेव्हा त्याचे महत्त्व सर्व माध्यमांतून अधोरेखित करायला हवे. तरच इतर बाबींसोबत एक वेगळी ओळख पंढरपुरी म्हशीला मिळेल. जिल्ह्यात सांगोला येथे रविवारी, सोलापूर येथे मंगळवारी, अकलूज येथे सोमवारी आणि बार्शी येथे शनिवारी पंढरपुरी म्हशींचे मोठे बाजार भरतात. कार्तिक वारी पंढरपूर आणि जानेवारीमध्ये सोलापूर गड्डा यात्रेत मोठ्या प्रमाणात पंढरपुरी म्हशींची खरेदी-विक्री होत असते. त्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढालदेखील होते जी जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
पंढरपुरी म्हैस 16 ते 47 अंश सेल्सिअस तापमानात तग धरणारी आणि कमी पर्जन्यमान असलेल्या भागात होत असलेल्या ज्वारी, बाजरी आणि मका या पिकांच्या चार्यावर जादा दूध उत्पन्न देणारी ही प्रजाती आहे. त्यामुळे ही प्रजाती सोलापूरसह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आढळते. पंढरपुरी म्हैस आकाराने मध्यम असून चेहरा लांबट व निमुळता असतो. रंग काळा असून काही वेळा राखाडीदेखील आढळतो. शिंगे लांब खांद्याच्या पलीकडे तलवारीच्या आकाराची असतात. सरासरी लांबी 100 सेंटिमीटरपर्यंत आढळते. कानदेखील लांब असतात. 19 ते 24 सेंटिमीटरपर्यंत त्यांची लांबी असते. कास पोटाला चिकटलेली, सड लंबगोलाकार असतात. कासदेखील फिकट काळसर रंगाची असते व ठेवणदेखील उत्तम असते. प्रौढ म्हशीचे वजन 380 ते 400 किलोंपर्यंत असते व रेडेदेखील 450 ते 500 किलोंपर्यंत वजनाचे असतात. रेड्या 30 ते 35 महिन्यांत माजाला येऊन 43 ते 46 महिन्यांत वेतात तसेच तीन ते साडेतीन महिन्यांत पुन्हा गाभण जातात हेदेखील त्यांचे वैशिष्ट्य आहे. सदर पंढरपुरी म्हशीला एकूणच राज्याच्या हवामानाचा विचार केला तर निश्चितपणे संपूर्ण राज्यात किंबहुना नजीकच्या राज्यांतदेखील फार चांगला मोठा वाव आहे.
या प्रजातीच्या संवर्धनासाठी व आनुवंशिक सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या अर्थसाह्यातून 2014 पासून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आनंद यांच्या सहयोगाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पंढरपूरसह माढा, सांगोला, माळशिरस, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, दक्षिण व उत्तर सोलापूर या नऊ तालुक्यांत ‘वंशावळ निवडीतून उच्च आनुवंशिक गुणवत्ता असलेल्या पंढरपुरी जातीचे वळू तयार करणे’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या सर्व तालुक्यांतून एकूण 40 कृत्रिम रेतन सेवा देणार्या केंद्राच्या माध्यमातून नियमित कृत्रिम वेत केले जाते. दूध उत्पादनाच्या बाबतीत पूर्वी 1300 ते 1600 किलो प्रति वेत असणारे दूध उत्पादन हे आज 2000 किलोपर्यंत प्रति वेत गेल्याचे या प्रकल्पातील दूध मोजणीत आढळले आहे. पंढरपुरी म्हशीचे फॅट हे आठ टक्के असते. या प्रकल्पातील सर्व पशुपालक हे आपल्या गोठ्यातच चांगल्या रेड्यादेखील तयार करून दूध उत्पादन वाढवत आहेत. या प्रकल्पातून आज अखेर पशुपालकांच्या गोठ्यात तयार झालेले उच्च वंशावळीचे 35 वळू हे पशुसंवर्धन विभागाच्या पुणे व औरंगाबाद येथील गोठीत रेतमात्रा प्रयोगशाळेत, राहुरी सिमेन स्टेशन, बायफ पुणे, साबरमती आश्रम गोशाळा गुजरात, अलमंडी सिमेन स्टेशन चेन्नई या ठिकाणी वीर्य उत्पादनासाठी पुरवण्यात आले आहेत. त्यातून उत्पादित रेतमात्राचा महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक भागांत पुरवठा करण्यात येत आहे. सोबत सोलापूर, जालना, कोल्हापूर आणि पुणे येथील अनेक प्रगतिशील पशुपालकांना 16 रेडे नैसर्गिक रेतनासाठी पुरवण्यात आले आहेत, जेणेकरून या माध्यमातून उच्च आनुवंशिक गुणवत्ता असलेली पैदास निर्माण होऊन पशुपालकांना फायदा होईल.
पंढरपुरी म्हशीची इतर वैशिष्ट्ये म्हणजे कमी व निकृष्ट चार्यावर चांगले दूध देतात. निकृष्ट वाळलेल्या वैरणीवरदेखील दूध उत्पादनामध्ये खंड पडत नाही. दूध काढण्याच्या सवयींबाबत फार काटेकोर नाहीत. त्यासाठीच कोल्हापूर शहरात दूध कट्ट्यावर त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. घरातील कोणीही दूध काढू शकते. काटक व रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याने आजारी पडत नाहीत व पडल्यास तात्काळ उपचाराने बर्या होतात. भाकड काळदेखील कमी आहे व कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून गर्भधारणेचे प्रमाणदेखील खूप चांगले आहे. उत्तम व्यवस्थापन ठेवल्यास दिवसाला 12 ते 15 लिटर दूध देण्याची क्षमतादेखील आहे, तर अशा पद्धतीने जिल्ह्यातील आपली म्हैस राज्यातील किंबहुना देशातील पशुपालकांनी जाणीवपूर्वक सांभाळण्यासाठी आपण त्याचा प्रचार आणि प्रसार कसा होईल याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. ऊठसूट परराज्यात जाऊन तेथील मुर्हा, मेहसाणा आणि सुरती म्हशी आणण्यापेक्षा आपल्या वातावरणातील चांगल्या दूध देणार्या पंढरपुरी म्हशी जर आपण सांभाळल्या, तर निश्चितपणे त्यांची संख्या वाढून एकूणच पशुपालकाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यात सांगोला येथे रविवारी, सोलापूर येथे मंगळवारी, अकलूज येथे सोमवारी आणि बार्शी येथे शनिवारी पंढरपुरी म्हशींचे मोठे बाजार भरतात. कार्तिक वारी पंढरपूर आणि जानेवारीमध्ये सोलापूर गड्डा यात्रेत मोठ्या प्रमाणात पंढरपुरी म्हशींची खरेदी-विक्री होत असते. त्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढालदेखील होते जी जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
आजपर्यंत आपल्या राज्यातील काही प्रमाणात माडग्याळ मेंढी सोडली, तर इतर कोणतेही ब्रीड आपण देश पातळीवर घेऊन जाऊ शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासाठीच गरज आहे ती पंढरपुरी म्हशीच्या प्रसिद्धी आणि प्रचाराची. त्यासाठी राज्यातील सर्व संबंधित पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, विद्यापीठ आणि सेवाभावी संस्था याबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती आपापल्या परीने करतच आहेत; तथापि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक सोलापूरकरानेदेखील यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. संधी मिळेल त्या ठिकाणी इतर बाबींसह पंढरपुरी म्हशीचीदेखील ओळख ही निर्माण करायलाच पाहिजे इतकंच.