प्लॅनेट परेड - एक आकाशीय देखावा

विवेक मराठी    23-Jan-2025
Total Views |
@अर्चित गोखले
सध्या सोशल मीडियावर 25 जानेवारी रोजी होणार्‍या प्लॅनेट परेडविषयी जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर अनेक पोस्ट, रील आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनेक वर्षांनी दिसणारी अद्भुत खगोलीय घटना म्हणून या घटनेचा सर्वत्र प्रचार होताना दिसत आहे. ही घटना 25 जानेवारी व पुढील काही दिवसदेखील दिसणार आहे. मग अनेक वर्षांनी एकदाच दिसणारी अद्भुत खगोलीय घटना आणि 25 जानेवारी हा एक ठरावीक दिवस सर्वत्र प्रचलित का होत होता? आजच्या लेखात आपण या प्लॅनेट परेडविषयी माहिती जाणून घेऊ.
 Planetary Parade 2025
 
पहिला मुद्दा असा की, वरती दिलेल्या चित्रात (आकृती) जशी ग्रहस्थिती आहे तशी ग्रहस्थिती 25 जानेवारीला खरंच असणार आहे का? सध्या सर्वत्र फिरणार्‍या व्हिडीओमध्ये ग्रहांची अशी स्थिती दाखवली जात आहे. ह्या प्रश्नाचं सोपं उत्तर असं की, अशी ग्रहस्थिती सध्या आकाशात नाही. प्लॅनेट परेड ही शास्त्रीय संकल्पना नाही. सगळे ग्रह परेडमध्ये असल्यासारखे एका रेषेत आले किंवा एका राशीत आले, तर बोली भाषेत त्याला प्लॅनेट परेड असं म्हटलं जातं. अर्थात ह्या चित्रात दाखवल्यासारखी ग्रहांची स्थिती नाही हे कळण्यासाठी आपल्याला तज्ज्ञाची आवश्यकता नाही. खरंच जर ग्रह अशा स्थितीत असते, तर सूर्य, शुक्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत आले असते म्हणजे अर्थातच सूर्याबरोबर शुक्र उगवला असता आणि त्याच्याचबरोबर मावळला असता. अर्थात सूर्यप्रकाशात लुप्त होऊन शुक्र दिसलाच नसता! त्याचबरोबर मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यूनसुद्धा पृथ्वीच्या दृष्टिकोनातून एकाच सरळ रेषेत आले असते आणि ते एकमेकांच्या अगदी जवळजवळ दिसले असते; पण ह्या घटनेबद्दल बोलताना आपण असं ऐकतो आहोत की, आपल्याला सगळे ग्रह दिसणार आहेत. ह्याचाच अर्थ साधा विचार करून असा लक्षात येईल की, ह्या चित्रासारखी ग्रहांची स्थिती सध्या नाही.
 
 
Planetary Parade 2025
Planetary Parade 2025 
 
मग ग्रह सरळ रेषेत असणार आहेत म्हणजे पृथ्वीवरून बघताना साधारण पूर्व-पश्चिम दिशा जोडणारी रेषा विचारात घेतली, तर त्या रेषेवर ग्रह असणार आहेत का? म्हणजे आज ग्रह वर दाखवल्याप्रमाणे पूर्व-पश्चिम रेषेवर आज आहेत, तर इतर वेळी ते आकाशातली ही रेषा सोडून कुठेही विखुरलेले असतात का?  तर असं होत नाही. ग्रह नेहमीच मधील चित्रात आहेत तसेच पूर्व-पश्चिम दिशा जोडणार्‍या रेषेवरच असतात. ह्याचं कारण आपण समजून घेऊ. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते हे आपल्याला माहीत आहे; परंतु पृथ्वीवरून बघताना आपल्याला आकाशात सूर्य त्याचं स्थान बदलताना दिसतो - एका राशीतून दुसर्‍या! ह्या सूर्याच्या आकाशातील भासमान मार्गाला आयनिक वृत्त असं म्हणतात. ह्या आयनिक वृत्तावर सूर्याचा प्रवास पृथ्वीच्या आकाशात सुरू असतो. हे आयनिक वृत्त साधारण पूर्व-पश्चिम दिशा जोडणारी रेषा, असं आपण म्हणू शकतो, कारण सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतो. सूर्यमालेतील सगळ्याच ग्रहांच्या सूर्याभोवती असलेल्या कक्षांची प्रतलं पृथ्वीच्या सूर्याभोवती असलेल्या कक्षेच्या प्रतलासमान असल्याने हे सगळेच ग्रह नेहमीच आयनिक वृत्ताच्या आजूबाजूला साधारण त्याच रेषेवर दिसतात आणि  मध्ये दाखवल्यासारखे विखुरलेले कधीच दिसू शकत नाहीत!
  
मग नेमकं विशेष सध्याच्या घटनेत काय आहे? तर यामागचा विशेष भाग असा की, आकाशातील पृथ्वीव्यतिरिक्त सातपैकी सहा ग्रह आपल्याला आकाशात एकाच वेळेला दिसणार आहेत! असं नेहमी होतं का? तर अर्थातच नाही! प्रत्येक ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी वेगळा असल्यामुळे पृथ्वीवरून पाहताना त्याचं सूर्यसापेक्ष स्थान वेगवेगळं असतं, जेणेकरून कधी एखादा ग्रह संध्याकाळी दिसतो, तर दुसरा ग्रह पहाटे दिसतो किंवा एखादा ग्रह सूर्यप्रकाशात लुप्त होऊन दिसतच नाही; पण सध्या ग्रहांची आपापल्या सूर्याभोवतीच्या कक्षांमध्ये अशी अनुकूल स्थिती आहे, की पृथ्वीवरून पाहताना सूर्यसापेक्ष ते एका सरळ रेषेत आकाशात एकाच वेळी दिसणार आहेत. सूर्यास्तानंतर सुमारे तासाभराने पश्चिम क्षितिजाजवळ शनी आपल्याला दिसेल. त्याच्याच थोडं वरती, पण पश्चिम दिशेलाच आपल्याला अतिशय तेजस्वी असा शुक्र दिसेल. त्यानंतर अजून थोडं वर नेपच्यूनचं स्थान आहे. आकाशात बरोबर डोक्यावरती युरेनस आहे. त्यानंतर थोडं पूर्वेला तेजस्वी गुरू ग्रह आणि पूर्व क्षितिजावर तांबूस मंगळ! सूर्यास्तानंतर सुमारे दोन तासांसाठी एकाच वेळेला हे सहा ग्रह आकाशात असणार आहेत. अर्थात युरेनस आणि नेपच्यून बघायला मोठ्या व्यावसायिक दुर्बिणीची आवश्यकता असते; पण अन्य चार ग्रह आपण साध्या डोळ्यांनीदेखील बघू शकतो. सध्याची ग्रहस्थिती खालील आकृतीतदाखवल्याप्रमाणे आहे.
 
Planetary Parade 2025
 
ग्रहांची सूर्याभोवतीची गती मंद असल्यामुळे त्यांच्या स्थानात एखाददोन दिवसांच्या अंतराने फार असा फरक पडणार नसल्याने ही घटना 25 जानेवारी या एकाच दिवशी न दिसता पुढे-मागे काही दिवस दिसणार आहे. काही दिवसांनी मात्र काही ग्रह सूर्यप्रकाशात लुप्त होतील. त्यानंतर ते विरुद्ध दिशेला म्हणजे सूर्योदयापूर्वी पहाटे दिसतील, तर काही ग्रह रात्री दिसतील. त्यामुळे ही घटना प्रत्येकाने आवर्जून पाहावी आणि जवळजवळ सगळे ग्रह आकाशात एकत्र आहेत, ह्या भावनेचा आनंद घ्यावा आणि साध्या डोळ्यांनी दिसणार्‍या ग्रहांचे मनसोक्त निरीक्षण करावे! अशी संधी वारंवार आपल्याला मिळणार नाही!