झपूर्झा - भारतीय कला-संस्कृतीचा वारसा

विवेक मराठी    23-Jan-2025
Total Views |
Zapurza Museum of Art & Culture Pune
 
 
मुलाखतकार :  वर्षा  वेलणकर 
 
zapurza
 
धकाधकीच्या जीवनात दूर निघून जाऊन निवांत वेळ कुटुंबातील इतर सदस्यांसोबत घालवण्याची इच्छा होतेच.  आपल्या कला, संस्कृती आणि परंपरेच्या वृक्षाच्या सावलीत जाऊन बसणे, असा वेळ घालवण्यासाठी पुण्याजवळील कुडजे गावातील झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय ही जागा आहे, असे म्हणता येईल. येथे वस्त्रांपासून ते अलंकारांपर्यंत, चित्रांपासून ते मूर्त्यांपर्यंत, घरात वापरल्या जाणार्‍या दैनंदिन वस्तूंच्या घडणावळीपासून ते कलांच्या सादरीकरणातील विविधतेपर्यंत, सगळे विस्मयचकित करणारे संग्रहालयात  आहे. याबाबत त्यांचे संस्थापक अजित गाडगीळ यांच्याशी केलेली बातचीत.
 
इतिहास वर्तमानाला संपन्नतेचा भाव देणारा असतो. मागे काय काय होऊन गेले आणि गतवैभव किती समृद्ध होते, ही जाणीव इतिहासाच्या संपर्कात गेल्यावर आणखी गडद होते. बदलत्या काळाचा स्वीकार अगदी खुल्या दिलाने करतानाच आपण काही तरी सुखावणारे गमावूनदेखील बसलो आहे, हीसुद्धा एक जाणीव इतिहास आपल्याला करून देतो; पण त्याचबरोबर ज्या चुका इतिहासात झाल्या त्याची पुनरावृत्ती होऊ नये, ही भावनादेखील इतिहासाची झलक अनुभवताना आपल्याला मिळते. भारताच्या प्रादेशिक वैविध्यतेची तुलनाच केली जाऊ शकत नाही आणि अशात जर देशातील विविध प्रांतांच्या कला-परंपरांच्या इतिहासाचा कणभर जरी आढावा घेतला तरी जीव सुखावणार्‍या हजारो गोष्टी त्यात पाहायला मिळतात. वस्त्रांपासून ते अलंकारांपर्यंत, चित्रांपासून ते मूर्त्यांपर्यंत, घरात वापरल्या जाणार्‍या दैनंदिन वस्तूंच्या घडणावळीपासून ते कलांच्या सादरीकरणातील विविधतेपर्यंत, सगळे विस्मयचकित करणारे आहे आणि त्याचीच एक भारावून टाकणारी झलक मिळते ती पुण्याच्या ‘झपूर्झा’ या कला व सांस्कृतिक संग्रहालयात. हे संग्रहालय कसे उभे झाले आणि ते काय आहे, याबद्दल त्याचे संस्थापक अजित गाडगीळ यांच्याशी केलेली बातचीत. सुप्रसिद्ध पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स याचे ते संचालक आहेत.
 
 
पूर्वी एखादी रवी किंवा अडकित्ता जरी विकत घ्यायला गेले तरी त्यावर काही तरी कलाकुसर दिसायचीच. घराघरांत अशा गोष्टी होत्या. जरीच्या साड्या होत्या, नक्षीकाम केलेले लाकडाचे सामान होते, घरात वापरायची स्वयंपाकाची वैशिष्ट्यपूर्ण भांडी होती, त्यांचे आकारदेखील वैविध्यपूर्ण होते. झपूर्झाला जेव्हा ज्येष्ठ नागरिक येतात आणि या अशा संग्रहातील गोष्टी पाहतात तेव्हा त्यांच्या नजरेत कौतुक असते. आपण हे वापरलेले आहे, त्याचा त्यांचा अनुभव त्यांना आठवणींच्या प्रदेशात घेऊन जातो आणि ते आनंदी होतात. त्याच वेळी जेव्हा लहान बालगोपाळ मंडळी हा ठेवा पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात कुतूहल ओसंडताना दिसते; त्यांना हे सगळे वैभव पाहून कित्येक प्रश्न पडतात आणि या संग्रहाचा इतिहास जाणून घेण्याची त्यांच्यातील उत्सुकता हेच झपूर्झाचे यश आहे, स्वतःच्याच कामाने हरखून गेलेले अजित गाडगीळ सांगत होते. पुण्यासारख्या परंपरा आणि संस्कृतीशी नाळ जपून असणार्‍या शहराच्या कुडजे नावाच्या गावात, खडकवासला बॅकवॉटर्सच्या साक्षीने अडीच वर्षांपूर्वी एक कला व सांस्कृतिक संग्रहालय उभे करण्यासाठी म्हणून पुढे आलेले गाडगीळ आता त्याच्या वाढत जाणार्‍या व्यापाने सुखावले आहेत. तेव्हा ते सांगतात की, कसे हे संग्रहालय कलेच्या आणि परंपरेच्या गोष्टींचा ओंजळभर वारसा घेऊन नव्या पिढीसाठी सज्ज झाले आहे.
 
 
zapurza
 
लहानपणापासून आमच्या घरात आम्हाला कलेचा वारसा मिळाला. कुटुंबातील सगळ्यांच्या हातात काही तरी कलाकुसर होतीच. मला वेगवेगळ्या गोष्टींचा संग्रह करायची हौस होती. त्यातच वयात आल्यावर कुठे चित्र पाहायला गेलो, तर त्यातील आवडलेले एखादे आपल्याकडे असावे असे वाटू लागले आणि संग्रह वाढत गेला. घरी गोळा केलेली चित्रे जेव्हा माझ्या कार्यालयात मी ठेवू लागलो तर येणारे-जाणारे पाहून खूश व्हायचे आणि कौतुक करायचे. त्यांचा आनंद पाहून मग वाटले की, आपल्या या आनंदाच्या ठेव्याला सगळ्यांसाठी खुले केले तर काय हरकत आहे, संग्रहालयाच्या कल्पनेची रुजुवात कशी झाली हे सांगताना गाडगीळ म्हणाले. आजच्या घडीला त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या संग्रहाची सुरुवात ही पंचवीस वर्षांपासून सुरू आहे.
झपूर्झा मुख्य पुणे शहरापासून 21 किमी अंतरावर आहे. ते तसे फार लांब नाही; पण शहरात जागा शोधून छोटेसे काही तरी साकारण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यातील हा साडेसहा एकरांचा विस्तीर्ण परिसर संग्रहालयासाठी योग्य वाटला. मुळात शहराच्या धकाधकीच्या आयुष्याला थोडेसे बाजूला सारून निवांत काही तास घालवावा हे सगळ्यांनाच वाटते. तशात झपूर्झाला पाण्याचा सहवास आहे, प्रचंड हिरवळ आहे. फक्त संग्रहालयाची दालने आणि मोजकेच बांधकाम सोडले तर बरीच जागा मोकळी आहे जिथे आलेल्यांना मोकळा श्वास घेत फिरता येते. त्यामुळे शहरी वातावरणापासून वेगळे काही तरी अनुभवल्याचा आनंद इथे मिळतो, झपूर्झाचे वेगळेपण विशद करताना अजितकाका सांगत होते.
 
 
आधीच आपल्या देशात संग्रहालयांसंदर्भात बरीचशी अनास्था दिसून येते. अशा ठिकाणांना भेटी देणे म्हणजे कंटाळवाणे काम, असे त्याच्याकडे पाहिले जाते. इतिहासाची ओढ जाणवली तरी ती ठरावीक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या अशा वस्तुसंग्रहालयांमुळे मारली जाते. त्यात संग्रहालये ही फक्त सरकारने तयार करायची आणि चालवायची फक्त त्यांची जबाबदारी आहे, अशीही एक समजूत आहे. अशात झपूर्झाची मांडणी करून त्याला प्रत्यक्षात आणण्याचा विचार कसा पुढे आला, हे सांगताना ते म्हणाले, सरकारची जबाबदारी म्हणून आपण अनेक गोष्टी सोडून देतो; पण समाजाचे घटक म्हणून आपणही काही तरी समाजाचे देणे लागतो, ही जाणीव आता वृद्धिंगत व्हायला हवी. झपूर्झा इतर वस्तुसंग्रहालयांपेक्षा वेगळे असावे, हा विचार मनात होताच. इतकेच काय, तर संग्रहालय असे त्याला संबोधू नये, असेही एक वेळ आम्ही ठरवले होते; पण ज्येष्ठ चित्रकार आणि आमचे मित्र सुभाष अवचट यांनी आमचा विचार हाणून पाडला. नावात संग्रहालयच असावे, हा त्यांचा आग्रह होता. फक्त मांडणी मात्र इतर वस्तुसंग्रहालयाप्रमाणे आम्ही ठेवली नाही.
 
zapurza 
 
एकुणात अकरा दालने आम्ही इथे तयार केली आहेत. प्रत्येकाचा विषय वेगळा आहे आणि त्यातील काही दालनांची रचना आणि त्यातील वस्तू या दर सहा महिन्यांनी बदलल्या जातात. त्यामुळे एक प्रकारचा ताजेपणा आणि तजेलदारपणा कायम इथे दिसतो. म्हणजे तुम्ही झपूर्झाला दुसर्‍या वेळी पुन्हा जरी आलात तरी इथे नवीनच काही तरी तुमच्यासाठी वाढून ठेवलेले असणार हे नक्की, अजितकाका सांगतात. शिवाय या रचनेत आणखी एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे ती म्हणजे त्याचे विषय आणि त्या विषयाचा प्रेक्षकांनी आस्वाद घेतल्यानंतर त्याला मिळणारा मोकळा वेळ. स्त्रिया दागिन्यांत किंवा साड्यांमध्ये जास्त रमतात. इथे आभूषणांचे आणि चांदीच्या काही दुर्मीळ होत चाललेल्या वस्तूंचे एक संपूर्ण दालन आहे. लोकांना हे फार आवडते. देवघर, त्यातील काही वस्तू, ताम्हण, पळी, प्रसादाच्या वाट्या, बाळकृष्ण, त्याचा झोपाळा यापासून ते अगदी भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांतील जुने चांदीचे अलंकार जे विशेषतः स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. या दालनातून बाहेर आल्यावर लगेच तुम्हाला दुसर्‍या दालनात जाण्याची घाई झपूर्झामध्ये होत नाही. तुम्ही तुमचा निवांत वेळ दोन दालनांच्या मधल्या परिसरात अगदी सहज घालवू शकता. विभागवार सगळे रचल्यामुळे, सगळे पाहिलेच पाहिजे, हा आग्रह त्यामुळे होत नाही. पैठण्यांचे, साड्यांचे दालन पाहिल्यावर तुम्हाला महाराष्ट्र कला दर्शन दालन पाहायचे नसेल तर तुम्ही तो पर्याय निवडू शकता, कारण एक संपूर्ण दालन पूर्णतः आम्ही वेगळे ठेवले आहे. अशा अकरा दालनांमध्ये जे अंतर राखले आहे, त्यामुळे सगळे एका दमात पाहण्याचा दबाव कुणावर येत नाही, गाडगीळ स्पष्ट करतात.
 
zapurza 
 
झपूर्झा ही एका भेटीत संपूर्ण पाहण्याची जागा नाही. इथला परिसर स्वतःत एक निवांतपणा घेऊन बसलेला दिसतो. अगदी प्रवेशद्वारापासूनच इथली शांतता तुम्हाला कवेत घेते. एक-एक पाऊल पुढे जाताना एक-एक गोष्ट दिसत जाते जी थांबवून घेते. इथल्या चित्राच्या, दिव्याच्या आणि लिथो वर्कच्या दालनांपासून ते अगदी इथल्या कलेच्या वस्तूच्या स्टोअरपर्यंत सगळे काही देखणे आणि मनमोहक आहे. स्टोअरमध्ये सध्या कलाकृती आहेत; पण झपूर्झामध्ये निर्माण झालेली किंवा त्याची विशेष आठवण करून देणारी वस्तू अजून तिथे नाही. ती तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे काही जे इथे निर्माण झाले असेल आणि ते घेऊन जाताना लोकांसोबत झपूर्झाचा ठेवा सोबत जाईल, अशी इच्छा आहे, अजितकाका सांगत होते.
 
 
झपूर्झाला सुरू होऊन अडीच वर्षे झाली आहेत. या कालावधीत पुणे आणि आसपासच्या परिसरांतील जवळपास अडीच लाख लोकांनी झपूर्झाला भेट दिली आहे. आम्ही इथे काही उपक्रमदेखील राबवतो. एक अँफिथिएटर आणि एक सभागृह अशा दोन जागा प्रस्तुतीकरणासाठी झपूर्झाला आहेत. इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. कवितावाचन, मुलांचे नाटुकले, नृत्य प्रकारांचे सादरीकरण, असे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही येणार्‍या लोकांसाठी आयोजित करत असतो. शिवाय जर कुणाला स्वतःचे काही कार्यक्रम ठेवायचे असतील तर ती सुविधासुद्धा इथे आहे. लहान मुलांसाठी वाचनकट्टा, कथाकथनाचे कार्यक्रम, तालवाद्य, मेडिटेशन, पुस्तकांचे स्टॉल, ग्लास पेंटिंगची प्रात्यक्षिके आणि ते करून पाहण्याची संधी, पॉटरी असे प्रकारही इथे आयोजित केले जातात.
 
झपूर्झा
zapurza 
 
कला व संस्कृती संग्रहालय,
एनडीए, खडकवासला बॅकवॉटर,
कुडजे, पुणे
प्रवेश फी: रु. 200/- प्रति व्यक्ती
संपर्क : 9850991008
 
 
झपूर्झाच्या उभारणीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे तो इथल्या आसपासच्या गावांमध्ये राहणारा आहे. प्रत्येक दालनाच्या संदर्भात जुजबी माहिती देणारे आणि आलेल्यांना मार्गदर्शन करणारे जे कर्मचारी आहेत ते इथे जवळपासच्या गावांमध्ये राहतात. त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. त्यांच्याच परिसरात एक अशी वेगळी जागा काम करण्यासाठी निर्माण झाल्यामुळे या काम करणार्‍या तरुण मुलामुलींमध्ये एक प्रकारची उत्सुकता आणि कौतुक आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल त्यांना आस्था वाटते, गाडगीळ सांगत होते. संग्रहालयासाठी इतर राबणारे हात कुणाकुणाचे आहेत, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, माझे मावसभाऊ दिलीप जोशी यांचा संग्रहालयाच्या प्रत्यक्ष रूपात येण्यात मोठा वाटा आहे. ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन्स, अहमदाबादला मला सीनिअर होते. त्यांनी हे संग्रहालय उभारताना खूप मार्गदर्शन केले. ते आता दालनाचे ज्येष्ठ संग्राहक म्हणून काम पाहतात. याशिवाय संग्रहालयातल्या चित्रांची जी दालने आहेत त्याचे मुख्य संग्राहक हे राजू सुतार आहेत आणि झपूर्झाच्या परिसराचे मुख्य म्हणून सुनील पाठक काम पाहतात.
 
 
या प्रकल्पाकडे मुळात एक व्यवसाय म्हणून पाहण्याचे गाडगीळ टाळतात. त्यांच्यासाठी ही एक अशी गोष्ट आहे ज्यातून समाजात आणि विशेषतः येणार्‍या पिढीत देशाच्या कला-संस्कृती, परंपरेची रुजुवात होण्यास मदत व्हावी, अशी अपेक्षा आहे. पु. ना. गाडगीळ अँड सन्सची यशस्वी घोडदौड एकीकडे त्यांच्या नेतृत्वात सुरूच आहे; पण झपूर्झा त्या व्यावसायिक यशापासून स्वतःला थोडे वेगळे राखून आहे. व्यवसाय करणे आणि आवड जपणे यातील जो फरक आहे तोच फरक सुवर्णपेढीचे काम आणि झपूर्झा सांभाळणे यात आहे, असे अजित गाडगीळ यांच्या बोलण्यातून जाणवते.
 
 
zapurza
 
झपूर्झाचा पसारा तसा मोठा आहे आणि त्याचा सांभाळ करणे फार कष्टाचे काम आहे. प्रत्येक दालनातील मौल्यवान संग्रहाचे जतन करणे, त्याची निगा राखणे, त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ बाळगणे, परिसर कायम स्वच्छ ठेवणे, हे सगळे फार खर्चीक काम आहे आणि त्यामुळे या प्रकल्पासंदर्भात नफ्या-तोट्याचे समीकरण अपेक्षेप्रमाणे नीट बसत नाही. ‘आर्थिक लाभ’ हाच एकमेव उद्देशदेखील या प्रकल्पाचा नाही, असे गाडगीळ स्पष्ट करतात. मात्र जे रचले ते टिकवून ठेवण्यासाठी पैशांची कसरत करावी लागतेच, असे त्यांचे मत आहे.
 
 
मुळात भविष्यात झपूर्झाला आणखी काय करायचे आहे, असे जर कुणी विचारले तर माझी इच्छा आहे की, ही जागा म्हणजे एक शिक्षणकेंद्र व्हावे. इथे आल्यावर जी कला परंपरा आणि संस्कृती आम्ही जतन करून ठेवली आहे ती पाहून नवीन पिढीला नवनिर्मितीची प्रेरणा मिळावी, अशी इच्छा आहे. ज्यांनी इतिहास अनुभवला आहे अशा ज्येष्ठांच्या सान्निध्यात येऊन त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन या प्रेरणेला एक नवीन रूप तरुण पिढीच्या कल्पनाशक्तीला मिळावे असे मनापासून वाटते. असे लर्निंग सेंटर जिथे कल्पनेच्या भरारीला रोखणारे काही नसेल. जुन्या-नव्याचा संगम असेल आणि जुन्याजाणत्यांकडून स्वतःचे कुतूहल शमवून घेतल्यावर आपण काही तरी तयार करावे, ही ऊर्मी इथे तरुणांना मिळावी. अशा दोन वयोगटांची सांगड घालून देण्याचा आमचा भविष्यात प्रयत्न असणार आहे, अजितकाका म्हणाले.
 
 
भविष्यात परिसरात आणखी बांधकाम होण्याची शक्यता नाही. आहे ते सगळे आधीच विचारपूर्वक बांधण्यात आले आहे. जे काही आता पुढे होणार ते उद्देशपूर्ती कशी साध्य होणार त्या दिशेने होणारे काम आहे. आपल्या देशात मुळात संग्रहालय आणि त्याच्याबद्दलच्या आस्वादक वृत्तीबद्दल थोडी अनास्थाच दिसते; पण झपूर्झा उभे केल्यानंतरचा अनुभव उत्साह वाढवणारा आहे. लोक येतात. गेल्या अडीच वर्षांत भरपूर प्रतिसाद मिळाला आणि ही जागा पाहून गेलेत. काही तर वारंवार येतात. कधी नातेवाईकांना किंवा बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांना घेऊन येतात. त्यांना झपूर्झाचे कौतुक वाटते. आता पुणे महानगर पालिकेच्या बसची पण सोय तशी झाली आहे. शनिवार व रविवार शहराच्या काही भागांतून झपूर्झासाठी बस सोडली जाते आणि परत जाताना तीच बस प्रवाशांना घेऊन जाते. त्यामुळे भविष्यात आणखी लोक इथे भेट द्यायला येण्याची शक्यता आहे, अजितकाका यांनी माहिती दिली.
 
 
दृश्यकलांचा प्रचार-प्रसार व्हावा, त्याची आवड लोकांच्या मनात निर्माण व्हावी, विशेषतः तरुण मुलामुलींना नावाजलेल्या कलाकारांची माहिती व्हावी, त्यांच्या कलाकृती जवळून पाहण्यासाठी उपलब्ध व्हाव्यात, हे झपूर्झाच्या उभारणीमागचे मुख्य कारण आहे. त्यामुळे आम्ही इथे राहण्याचीही व्यवस्था केली आहे. काही कलाकारांना इथे येऊन राहण्याची आणि काम करण्याची इच्छा झाली तर ते येऊ शकतात. शिवाय त्यांच्या कलेची माहिती ते इथे येणार्‍या तरुणाईसोबत शेअर करू शकतात. त्यांनी इथे राहून कार्यशाळा घ्याव्यात अशी व्यवस्था इथे आहे, गाडगीळ म्हणाले.
 
 
जग सगळे धावत आहे. ती धावाधाव नक्कीच वायफळ नाही; पण तरीही एक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात असा येतो, जेव्हा या सगळ्यापासून दूर निघून जाऊन निवांत वेळ कुटुंबातील इतर सदस्यांसोबत घालवण्याची इच्छा होतेच. निवांत वेळ असा ज्यात फक्त वेळ घालवणे नसेल. त्यात असेल आपल्या कला, संस्कृती आणि परंपरेच्या वृक्षाच्या सावलीत जाऊन बसणे. असा वेळ ज्यातून समृद्ध झाल्याची भावना मिळेल आणि असा वेळ घालवण्यासाठी सध्या तरी कुडजे गावातील झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय ही जागा आहे, असे म्हणता येईल. नक्की भेट द्या.
 
9823484426