आता माझे मन फक्त तुझी अविरत भक्ती करू दे, अशी आस माझ्या मनाला लागली आहे. यासाठी मी माझ्या मनावर सक्ती करीत नाही. तुझी भक्ती, तुझे भजन-पूजन सहज लीलेने घडावे, अशी माझ्या मनीची इच्छा आहे. यासाठी समर्थ म्हणताहेत की, ’अचल भजनलीला लागली आस तुझी’. मी तनमनधन तुझ्या रूपात पाहात असल्याने माझी ही आस तू पूर्ण करशील, असा माझा विश्वास आहे.
’अनुदिनी अनुतापें’ या ‘करुणाष्टका’तील पुढील श्लोक असा आहे.
तन मन धन माझें राघवा रूप तूझें ।
तुजवीण मज वाटे सर्व संसार ओझें ।
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी ।
अचल भजनलीला लागली आस तूझी ॥4॥
(हे राघवा, रामा, तुझ्या रूपात मी भरून जावे अशी इच्छा उत्पन्न झाल्याने आता माझे तनमनधन सारे मी तुझ्या रूपात पाहात आहे. हा अशाश्वत संसार मला आता ओझ्याप्रमाणे वाटत आहे. तेव्हा माझी बुद्धी तुझ्या ठिकाणी स्थिर राहू दे. ती तेथून हलू देऊ नको. तुझे भजन-पूजन सहज लीलेने घडावे, अशी आकांक्षा माझ्या मनात उत्पन्न झाली आहे.)
साधक भक्त रामाच्या शाश्वत रूपात आपले तनमनधन पाहात असतो. रामभक्तीशिवाय हे प्रपंचातील शुष्क तनमनधन माणसाला खरे समाधान मिळवून देतात का याचा विचार केला पाहिजे. माणूस आनंद मिळवण्यासाठी संसारात पडतो आणि प्रापंचिक मोहपाशात गढून जातो. संसार हे माझ्या सुखाचे साधन आहे, अशी त्याने कल्पना केलेली असते. त्यासाठी त्याचा या जगाशी संबंध येतो. व्यावहारिक देवघेवीत, आचारात त्याला आनंद शोधावा लागतो; तथापि संसारात काय किंवा व्यवहारात काय, देहबुद्धी माणसाची साथ सोडत नाही. देहबुद्धीतून अहंकार जन्माला येतो. मानसशास्त्र सांगते की, 'Normally a person acts in satisfaction of ego.' म्हणजे आपला अहंभाव सुखावण्यासाठी सर्वसाधारण परिस्थितीत माणूस क्रिया करीत असतो. अहंभाव सुखावण्यासाठी माणूस तत्पर असतो, प्रयत्नशील असतो. आपल्या अहंकाराविषयी तो आग्रही बनतो. परिणामत: प्रत्येक घटनेत त्याचा ’मीपणा’ प्रकट होतो. मी श्रेष्ठ, मी शक्तिमान, मला सर्व समजते, मी ज्ञानी, असे तो मानतो. त्याची वृत्ती स्वार्थी बनते. त्यातून पुढे मी म्हणेन ते झाले पाहिजे, सर्वांनी माझ्या मताप्रमाणे वागावे, असे विचार बळावत जातात. कुटुंबात आणि समाजात वावरताना या विचाराने त्याला संघर्षाला सामोरे जावे लागते, कारण व्यवहारात देहबुद्धी व अहंभाव इतर व्यक्तींच्या ठिकाणीही थोड्या फार फरकाने असल्याने मतभेद निर्माण होऊन वादाचे, प्रसंगी हाणामारीचे प्रसंग उद्भवतात. मनासारखे झाले नाही तर देहबुद्धीने द्वेष, मत्सर, परनिंदा, अव्यवहार्य भाषा असे दुर्गुण मनात उद्भवतात. त्यांचा प्रभाव वाढल्यावर बुद्धी, विचारशक्ती आणि विवेक भ्रष्ट होऊन माणसाला अनेक संकटांना आणि दुःखांना सामोरे जावे लागते. ज्या आनंदासाठी या अशाश्वत संसाराचा आणि व्यावहारिक आचारविचारांचा स्वीकार केला, तो तर दूरच राहिला; पण दुःख मात्र भोगावे लागले. पराकोटीचा अहंभाव व देहबुद्धी यामुळे माणसाची समाधानाची वाट चुकते व तो भलत्याच दिशेने जातो. त्यामुळे दु:ख भोगल्याने मनाची दैन्यावस्था होते. हे आपण विस्ताराने यापूर्वी पाहिले आहे.
आता तन म्हणजे शरीर आणि धन म्हणजे पैसा आणि संपत्ती यांचा विचार करता त्यातून आनंद मिळतो का? याचे उत्तर शोधताना त्यात देहबुद्धी व अहंकार दृढ झाल्याने आनंदशोधनाची दिशा चुकते. तन आणि धन अशाश्वत असल्याने त्यांच्या लोभातून सुखाचा शोध घेता येत नाही. शाश्वत रामाला शरण जाऊन त्याची भक्ती केली तर समाधानाचा मार्ग दिसू शकेल. एकंदरीत तन, मन आणि धन या अशाश्वताची लालसा रामाला अर्पण करून, त्यांच्या निरिच्छ भक्तीतून समाधानाचा मार्ग सापडतो.
समर्थ रामाला सांगत आहेत की, हे राघवा, मी माझे तनमनधन सारे तुझ्या रूपात पाहात आहे. तुझ्या शाश्वत रूपाशिवाय मला इतरत्र समाधान दिसत नाही. या अशाश्वत आणि बेभरवशी संसारात समाधान सापडत नाही. या संसारातील घटना देहबुद्धी व अहंकार यांनी युक्त असल्याने त्या समाधान देऊ शकत नाहीत. आनंद मिळवण्यासाठी काही करायला जावे तर त्यातून दु:खाचा अनुभव या संसारात येतो. त्यामुळे आता तुझ्याशिवाय या सांसारिक घटना यांचे एक प्रकारे ओझे झाले आहे असे मला वाटते. आयुष्यभर हे ओझे मी वाहत आहे. तेव्हा हे राघवा, तुझ्या शाश्वत रूपाचा विसर पडल्याने या संसारात मी दु:ख-कष्टांचा अनुभव घेत आहे. याची मला जाणीव होऊ लागली आहे. हे संसाररूपी ओझे शिरावर घेऊन मी मार्गक्रमणा करीत असल्याने मला त्याने कष्ट होत आहेत, कारण या सांसारिक ओझ्यात सगळीकडे अहंकार असल्याने तुझे अस्तित्व कोठे जाणवत नाही. थोडक्यात, या अशाश्वत गोष्टीत काही ’राम नाही’ अशी स्थिती प्राप्त झाली आहे. अहंकाराच्या व देहबुद्धीच्या ओझ्याखाली मी सापडलो असल्याने हे जीवन कष्टमय झाले आहे. माझ्या वृत्तीतील ’मीपणा’ संपत नाही. ‘मीपणा’मुळे शाश्वत अशा तुला मी दुरावलो आहे. त्यामुळे ‘तुजवीण वाटे सर्व संसार ओझें’ ही स्थिती मी अनुभवत आहे.
या अशाश्वताच्या बाजारात सुखाचा मुखवटा घालून सगळीकडे दुःख-कष्ट उभे आहे असे मला दिसू लागले आहे. हे रामा, तुझ्या भक्तीशिवाय कायम टिकून राहणार्या सुखाचा अनुभव येणे हे कठीण आहे, याची मला जाणीव झाली आहे, कारण भौतिक गोष्टींतून मिळणारी सुखे क्षणैक असून ती फसवी आहेत. भौतिक सुखातील अशाश्वतता बाजूला काढून निर्भेळ सुख मिळवता येत नाही. सुखाच्या मधुर कल्पनेत मन रमल्याने त्याच्या पाठीमागची दुःखे दिसत नाहीत, हे आता मला कळून चुकले आहे. माझ्या मनातील देहबुद्धी पक्की झाल्याने या जगातील अशाश्वत अशी अनेक आकर्षणे माझ्या मनाला भुरळ घालीत आहेत. तेव्हा हे रामा, आता तूच यातून मला सोडव. माझी देहबुद्धी कमी करून आता माझी बुद्धी तुझ्या ठिकाणी स्थिर होऊ दे. सध्या माझे मन याबाबतीत चलबिचल करीत आहे. तेव्हा माझी स्थिर बुद्धी डळमळीत (प्रचलित) होऊ देऊ नकोस. या वायुरूप मनाचे चांचल्य सर्वविदित असल्याने या जगातील अशाश्वत आकर्षणांना माझे मन केव्हाही बळी पडू शकते. तेव्हा हे राघवा, तुझ्यापासून माझी वृत्ती ढळणार नाही, अशी बुद्धी मला दे व या आकर्षणांपासून मला वाचव, अशी मी तुला कळकळीची विनंती करीत आहे. आता माझे मन फक्त तुझी अविरत भक्ती करू दे, अशी आस माझ्या मनाला लागली आहे. यासाठी मी माझ्या मनावर सक्ती करीत नाही. तुझी भक्ती, तुझे भजन-पूजन सहज लीलेने घडावे, अशी माझ्या मनीची इच्छा आहे. यासाठी समर्थ म्हणताहेत की, ’अचल भजनलीला लागली आस तुझी’. मी तनमनधन तुझ्या रूपात पाहात असल्याने माझी ही आस तू पूर्ण करशील, असा माझा विश्वास आहे. मला तुझी आस लागली आहे, तरी त्यात जे अडथळे जाणवतात त्याचा विचार समर्थांनी पुढील श्लोकात केला आहे.