राष्ट्र प्रथम आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत व्हायची असेल, तर संपर्क आणि संवादाचे पूल आपले आपण उभे करावे लागणार तरच समोरील व्यक्तीला आपण कोणत्या विचाराचे पाईक आहोत हेे समजेल. अशा विचारांची गुंफणच राष्ट्र बलशाली होण्यास अनुकूल ठरेल. म्हणून संघविचार आणि सत्विचारांचा प्रसार आणि प्रचार हे व्रत दाजी करंबेळकर यांनी मनोभावे कृतीतून साकारले.
‘दाजी करंबेळकर’ याच नावाने संघ परिवारात परिचित असलेले विष्णू पुरुषोत्तम करंबेळकर (दाजी) यांची वयाच्या 88 व्या वर्षी दि. 7 जानेवारी 2025 रोजी प्राणज्योत मालवली. रा. स्व. संघाच्या अंधेरी भागातील पहिल्या फळीतील आणखी एक बिनीचा शिलेदार हरपल्याची भावना यानिमित्त झाली. मनुष्य शरीरधर्माप्रमाणे आलेला माणूस जाणारच, हे खरे असले तरी काही वेळा नियतीचा नियम पटत नाही. दाजी जाणार, अशी पुसटशी कल्पनाही येऊ नये अशी त्यांची दिनचर्या होती. गेले त्या दिवशीही त्यांनीस्वतःची दैनंदिन कर्मे स्वतःच केली. जाण्याच्या आदल्या दिवशी थोडं अस्वस्थ वाटलं, हेच काय ते निमित्त. तपासणीअंतर्गत समजलं की, सौम्य हृदयविकाराचा झटका त्यांना येऊन गेला. संपर्क-संवाद हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य. मृत्यूची कल्पना आली तरी त्यांनी त्यांचा स्वभावधर्म सोडला नाही. रुग्णालयातील सर्वांशी तर ते बोलतच होते. तेथील नर्सची ओळख काढून कुटुंबीयांनाही सांगितले की, ही आपल्या कोकणातलीच आहे.
कुठून येते अशी निगर्वी वृत्ती? एकंदर त्यांचा जीवनप्रवास पाहिला, तर त्यांच्या स्वभावातील मर्म उकलते. दाजींचा जन्म कणकवलीतला. दाजी मिळून एकूण पाच भावंडे, चार भाऊ आणि एक बहीण, त्यात दाजी थोरले. प्राथमिक शालेय शिक्षण कणकवलीतच झाले. थोरले असल्याने कुटुंबकबिल्याची जबाबदारी होतीच. गावातून मुंबईत आले. नोकरीसोबत शिक्षण सुरू ठेवले. रात्रशाळेत जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला एका कंपनीत कामाला होते. त्यानंतर इंडियन ह्यूम पाइप कंपनीत स्थिरस्थावर झाले आणि त्याच कंपनीतून 1994 साली सेवानिवृत्त झाले.
बालपणापासून संघशाखेशी जोडलेले असल्याने ‘राष्ट्र प्रथम’ ही शिदोरी अखेरच्या श्वासापर्यंत व्रत म्हणून अंगीकारली. तसेच व्यक्तिनिर्माण हे संघसंस्काराचे मूल्यही त्यांनी व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात जपले. त्यांच्या तिन्ही भावंडांना त्यांनी उच्चविद्याविभूषित करून डॉक्टर पदवीपर्यंत शिक्षण दिले. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, तर संघसंस्काराने मनुष्य व्रतस्थ होतो, हे दाजींचे प्रामाणिक मत होते. म्हणून त्यांनी संघसंस्काराचे बीज कुटुंबातील सर्वांनाच दिले.
1950 साली कणकवलीतून दाजी आले ते मुंबईतील ग्रँट रोड परिसरात राहायला. गावातून आले तरी संघशाखेशी नाळ तुटू नये म्हणून त्या परिसरातील शाखा शोधून काढली आणि जाऊ लागले. त्या शाखेत नाना पालकरही येत असत. परिसाचा स्पर्श झाल्याप्रमाणे दाजींचे व्यक्तिमत्त्वही तेजाने उजळले. दाजींना संघकामाची योग्य दिशा गवसली आणि त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. मुंबईत आल्यानंतर ग्रँट रोड, जोगेश्वरी, बोरिवली आणि अखेर अंधेरी अशी स्थलांतरे झाली; पण संघकार्यात कधीही अंतर आले नाही. बोरिवलीत असताना नगरकार्यवाह पदाची जबाबदारी त्यांनी कुशल पद्धतीने संभाळली.
अंधेरीत राहायला आल्यानंतर तेथील मार्गदर्शन प्रभात शाखेशी जोडले गेले. संघदायित्वातून मंडल अधिकारी आणि इतर विविध जबाबदार्या दाजींनी स्वीकारल्या. दाजींचे वय, अनुभव आणि प्रगल्भता यातून मार्गदर्शन प्रभात शाखेचे ते ज्येष्ठ स्वयंसेवक झाले. 94 साली निवृत्त झाल्यानंतर संघकार्य, तसेच संघविचारांच्या आणि सत्विचारांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे हेही व्रत त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पाळले. ‘साप्ताहिक विवेक’, ‘धर्म भास्कर’, ‘एकता’ मासिक, ‘ऑर्गनायझर’, ‘पांचजन्य’ आणि बालवयोगटासाठी नागपूरहून निघणारे मुलांचे मासिक असे सत्साहित्य प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे, असा दाजींचा आग्रह असे.

सत्साहित्याचा प्रसार आणि प्रचार यांचा आग्रह असणार्या दाजींना अपरिचित व्यक्ती असली तरी काही फरक पडत नसे. त्यांच्या मते सारे भारतीय एक आहेत. राष्ट्र प्रथम आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत व्हायची असेल, तर संपर्क आणि संवादाचे पूल आपले आपण उभे करावे लागणार तरच समोरील व्यक्तीला आपण कोणत्या विचाराचे पाईक आहोत हेे समजेल. अशा विचारांची गुंफणच राष्ट्र बलशाली होण्यास अनुकूल ठरेल. म्हणून संघविचार आणि सत्विचारांचा प्रसार आणि प्रचार हे व्रत त्यांनी मनोभावे कृतीतून साकारले. संपर्कासाठी ते पायाला भिंगरी बांधावी तसे फिरत असत. खंड पडला तो एका छोट्या अपघाताने पायाला जखम झाली तेव्हा. खंड फक्त फिरण्याचा हा, संपर्कात अजिबात खंड पडू दिला नाही. फोनवरून संपर्क-संवाद अखंड चालूच ठेवला. सत्साहित्य वाचण्याचा आग्रह करताना ते अधिकारवाणीने सांगत, कारण हे साहित्य मीदेखील वाचतो आणि ते व्यक्तिगत, सामाजिक आणि राष्ट्रीय पुनर्बांधणीसाठी आणि विकासासाठी कसे उपयुक्त आहे हे दाजी पटवून देत असत.
अंधेरी पूर्व भागात दाजी करंबेळकर आणि सदाशिव काणे यांची जोडगोळी होती. या जोडगोळीने त्या काळी ‘सा. विवेक’चे 500हून अधिक वर्गणीदार करून वर्गणीदार संख्येचा उच्चांक गाठला होता. ‘सा. विवेक’शी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते, म्हणूनच ‘सा. विवेक’ची वर्गणीदारवाढ व्हावी म्हणून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यरत होते. ‘सा. विवेक’च्या कामानिमित्त दाजींचा प.पू. सरसंघचालकांच्या हस्ते सत्कारही झाला होता. ते कामाप्रति इतके समर्पित होते की, हे नश्वर शरीर सोडून जाण्याच्या आठवड्याभरापूर्वीच ‘सा. विवेक’च्या कार्यालयात वर्गणी विभागात फोन करून अंक ग्राहकांना मिळावेत यासाठी जातीने सूचनावजा काळजी व्यक्त केली होती.
‘सा. विवेक’शी दाजींचे नाते खूप आधीपासूनचे म्हणजे ‘सा. विवेक’ टॅबलेट स्वरूपात निघत असे तेव्हापासूनचे. ‘सा. विवेक’च्या सर्व स्थित्यंतराचे दाजी साक्षीदार आणि हितचिंतक होते. ‘सा. विवेक’ने आपली कात टाकून नवे देखणे रूप धारण केले तेव्हाही दाजींनी कौतुकोद्गार काढले. केवळ देखण्या रूपाचे कौतुक नाही, तर विषयांची वैविध्यपूर्ण हाताळणी ‘सा. विवेक’ची धुरा सांभाळणारी नवी पिढी करीत आहे, असे स्पष्टवक्तेपणाने मांडणारे दाजी ‘सा. विवेक’च्या चमूला ज्येष्ठ व्यक्ती म्हणून आदराप्रीत्यर्थ होती.
दाजी करंबेळकर तसे तटस्थ व्यक्तिमत्त्व. भारदस्त आवाज, शरीरयष्टीदेखील तशीच; परंतु त्यांच्या वाणीत एक प्रकारचा गोडवा जाणवे. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा त्यांनी अनुग्रह घेतला होता. दाजी ‘श्री राम जय राम जय जय राम’ या त्रयोदशाक्षरी मंत्राचे नामस्मरण सतत करीत असत. मालाडला न चुकता बाबा बेलसरे यांची प्रवचने ऐकायला गोंदवलेकर महाराजांच्या मठात जात असत. आध्यात्मिक क्षेत्रात गोंदवलेकर महाराजांचा प्रभाव आणि बाबा बेलसरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. दाजींच्या प्रेरणेनेच घरातील व्यक्तींनीही गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला आहे.
दाजींनी त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात त्यांच्या प्रति असलेली सर्व कर्तव्ये चोख पार पाडली. अनेकांना संघकार्याशी जोडले, सत्साहित्य वाचण्यास प्रवृत्त केले. अध्यात्म हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे, हे जाणून स्वतःबरोबर अनेकांना अध्यात्माच्या मार्गाला आणले. सर्व जणांचे कल्याण होवो, हीच दाजींची इच्छा होती. दाजी वृत्तीने आनंदी आणि समाधानी होते. ऐंशीच्या पुढे वयोमान असले तरी कुठेही पिढीचे अंतर (जनरेशन गॅप) जाणवेल असा त्यांचा व्यवहार नसे. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती दाजींसोबत मनमोकळेपणाने संवाद साधत. खरं तर ते संपर्क-संवादाचे पूल म्हणावे असेच होते. आणखी एक विशेष म्हणजे आपला भार कोणावरही पडता कामा नये, हे तत्त्व त्यांनी शेवटपर्यंत निभावले. मृत्यूची कल्पना येऊनही त्यांच्या वृत्तीत आणि व्यवहारात तसूभरही फरक जाणवला नाही. इतकी दाजींच्या जीवनात सहजता होती.
दाजींच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असे भरलेले कुटुंब आहे. दाजींच्या संघसंस्कारामुळे व प्रेरणेमुळेच त्यांची तिन्ही मुले काही वर्षे प्रचारक म्हणून सक्रिय होती. आता संघ परिवारातील विविध जबाबदार्यादेखील ते सांभाळत आहेत. असे हे दाजी झाडावरून अलगद फूल पडावे तसे आपल्यातून निघून गेले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, ही प्रार्थना.