आयएनएस निलगिरी, आयएनएस सूरत आणि आयएनएस वाघाशीर अशा ह्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धनौका नुकत्याच नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या. भारताचे भौगोलिक स्थान आणि क्षमता यांचा विचार करता प्रगतीला भरपूर वाव आहे. 2050 पर्यंत सुमारे 200 जहाजांचे नौदल आपल्याकडे असावे अशी योजना आहे. ते पूर्ण झाल्यास आपण ब्ल्यू वॉटर नेव्ही ह्या प्रकारचे सामर्थ्य मिळवू. यानिमित्ताने भारतीय नौदलाच्या सामर्थ्याची माहिती देणारा लेख...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जानेवारी 2025 रोजी एकूण तीन युद्धनौका भारताच्या नौदल ताफ्यात समाविष्ट केल्या. आयएनएस निलगिरी, आयएनएस सूरत आणि आयएनएस वाघाशीर अशा ह्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धनौका आहेत. यातील आयएनएस सूरत ही विनाशिका आहे. आयएनएस निलगिरी ही फ्रिगेट प्रकारची युद्धनौका आहे, तर आयएनएस वाघाशीर ही पाणबुडी आहे.
एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या नौका एकाच ठिकाणी ताफ्यात समाविष्ट करण्याचा योग दुर्मीळच, म्हणून त्यानिमित्ताने युद्धनौका आणि नौदल याबद्दल थोडी माहिती घेऊ.
भारताला 7500 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा समुद्रकिनारा, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप हे दोन अत्यंत महत्त्वाचे आणि सुंदर द्वीप समूह लाभले आहेत. तसेच दोन महत्त्वाचे सागरी व्यापार मार्ग, सुवेझ कालव्यातून अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात जाणारा आणि मलाक्का सामुद्रधुनीतून मुख्यत: चीनकडे जाणारा, हे दोन्ही आपल्या प्रभावक्षेत्रात मोडतात. तसेच भारताचे जागतिक नकाशातील स्थानही अत्यंत महत्त्वाचे आणि शक्तिशाली नौदलाची आवश्यकता असणारे आहे.
शक्ती प्रक्षेपण मर्यादेप्रमाणे नौदल तीन प्रकारांत विभागता येईल. फक्त किनारपट्टीचे संरक्षण करू शकेल, आपली किनारपट्टी आणि मध्यम प्रमाणात आजूबाजूचा प्रदेश या भागात आपला शक्ती प्रभाव दाखवू शकेल (ब्राऊन वॉटर) आणि तिसरा प्रकार उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत जगभरात कुठेही प्रभावशाली असेल (ब्ल्यू वॉटर). आज आपण जेमतेम ब्राऊन वॉटर नेव्ही या भागातून ब्ल्यू वॉटर नेव्हीकडे अशी वाटचाल चालू केली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या वाटचालीत आत्मनिर्भरतेकडेही आपण लक्ष देत असून आरेखन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत आपण वेगाने स्वावलंबी होण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
नौदल हे एकमेव असे सशस्त्र दल आहे जे पाण्याच्या पृष्ठभागावर, पाण्याखाली आणि आकाशात अशा तिन्ही ठिकाणी कार्यरत असते. मात्र नौदलाची सर्वच जहाजे युद्धनौका नसतात, तर अन्य विविध प्रकारची जहाजे असतात. युद्धनौका, साहाय्यक नौका, प्रशिक्षण नौका, संशोधन/सर्वेक्षण नौका, पुरवठा नौका इत्यादी.
युद्धनौकांवरील शस्त्रास्त्रांत बराच बदल झाला आहे. दुसर्या महायुद्धात मोठ्या अवजड तोफा आणि पाणतीर (टॉर्पेडो) हेच मुख्य हत्यार असायचे, मात्र आता विविध प्रकारची क्षेपणास्त्रे उपलब्ध असल्यामुळे मोठ्या तोफांची जागा त्यांनी घेतली आहे. असाच फरक जहाजाच्या चालक यंत्रणेतही झाला आहे. आता अणुइंधनाचा वापर शक्य असल्यामुळे पाणबुड्या आणि मोठ्या विमानवाहू नौका आता अणुइंधनावर चालवता येतात, ज्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात अखंड उपलब्ध असण्याच्या कालावधीत खूप वाढ झाली आहे. तसेच आणखी एक बदल जहाजाच्या रचनेत झाला आहे, तो म्हणजे रडार/सोनारपासून जहाज लपवण्याचा प्रयत्न. पाण्यावरील जहाज हे रडारद्वारा, तर पाणबुडी ही सोनार नावाच्या यंत्रणेद्वारा ओळखता येते. या दोन्ही बाबतीत जहाजांच्या रचनेत काही बदल करून असा माग काढता येणे अशक्य नाही; परंतु अतिशय अवघड आहे. आता हे तंत्रज्ञान आपण भारतात निर्मिती करत असलेल्या जहाजांमध्ये वापरण्यास सिद्ध झालो आहोत आणि या नुकत्याच सामील केलेल्या जहाजांपैकी आयएनएस निलगिरी हे अशा तंत्रज्ञानाने युक्त असून या वेगवान युद्धनौकेवर आठ ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे व अन्य नेहमीची शस्त्रे आहेत. तसेच सर्व प्रकारची हेलिकॉप्टर्स वापरण्यासाठी आवश्यक यंत्रणाही उपलब्ध आहे. दीर्घकालीन मोहिमांसाठी ही सुसज्ज असून ही क्षमता ब्ल्यू वॉटर नेव्ही या क्षमतेसाठी महत्त्वाची आहे. तसेच अन्य साहाय्यक नौकांशिवायसुद्धा दीर्घ मोहिमा करण्यासाठीही उपयुक्त आहे.
दुसरे जहाज आयएनएस सूरत हे गाइडेड मिसाइल्सने सुसज्ज आहे. ही क्षेपणास्त्रे आकाशातील, सागरी पृष्ठभागावरील किंवा पाण्याखालील लक्ष्येे अचूक भेदण्यास सक्षम आहेत. अशी एकूण 48 बराक आणि ब्राह्मोेस क्षेपणास्त्रे आणि पाण्याखाली वापरण्यासाठी पाणतीर (टॉर्पेडो) यांनी हे जहाज सुसज्ज आहे. शिवाय ह्या जहाजावर एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करण्यास सक्षम यंत्रणा आहे.
तिसरे जहाज आयएनएस वाघाशीर ही एक डिझेल इलेक्ट्रिक प्रकारची पाणबुडी आहे. ह्या पाणबुडीचेही आरेखन उत्पादन करताना वर उल्लेख केलेल्या स्टील्थ तंत्राचा वापर केलेला आहे. 18 एसयूटी प्रकारचे पाणतीर (टॉर्पेडो), उच्च प्रतीची एसएम 39 जातीची ईएक्सओसीईटी ही क्षेपणास्त्रे किंवा 30 पाणसुरुंग यांचे मिश्रण पाणबुडीवरून वापरता येते. एकूण 50 दिवस पाण्याखाली राहता येईल अशी हिची रचना आहे. सध्या जरी बॅटरी चार्जिंगसाठी पृष्ठभागावर येणे भाग पडणार असले तरी पहिल्या रिफिटच्या वेळी एआयपी (एअर इंडीपेंडन्ट प्रपोलशन) रचना ह्या पाणबुडीवर समाविष्ट करण्यात येईल. त्यानंतर ह्या रचनेचा वापर करून पाण्याखाली असतानाच, ताज्या हवेशिवाय डिझेल यंत्रणा चालू करून बॅटरी रिचार्ज करता येतील आणि त्यानंतर एकाच वेळी 50 दिवस पाण्याखाली राहून मोहीम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरता येईल.
सध्या आपल्याकडे अणुशक्तीवर चालणार्या दोन पाणबुड्या वापरात आहेत. तिसरीच्या चाचण्या चालू आहेत आणि चौथीची बांधणी चालू आहे. या प्रकारच्या पाणबुड्यांना समुद्राच्या पृष्ठभागावर येण्याची गरज फक्त अन्नसामुग्री आणि इतर पुरवठा लागला तरच असते, अन्यथा त्या पाण्याखाली महिनेच्या महिने राहू शकतात, मात्र प्रत्येक वेळी अणुशक्तीचलित पाणबुडीवर अण्वस्त्रे असतातच असे नाही. ती अन्य पाणबुडीवरूनही वापरली जाऊ शकतात.
तसेच आणखी एक युद्धनौका प्रकार म्हणजे विमानवाहू नौका. सध्या भारताकडे एक भारतीय आणि एक रशियन बांधणीची नौका अशा दोन विमानवाहू नौका कार्यरत आहेत. तिसरीची बांधणी चालू आहे. आणखी जवळपास एकूण 60 युद्धनौका बांधणीच्या विविध टप्प्यांत आहेत.
मात्र अजूनही आपले भौगोलिक स्थान आणि क्षमता यांचा विचार करता प्रगतीला भरपूर वाव आहे. 2050 पर्यंत सुमारे 200 जहाजांचे नौदल आपल्याकडे असावे अशी योजना आहे. ते पूर्ण झाल्यास आपण ब्ल्यू वॉटर नेव्ही ह्या प्रकारचे सामर्थ्य मिळवले, असे म्हणता येईल.