लोकांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करणारे निःस्वार्थी व्यक्तिमत्त्व म्हणजे मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी अमोल पाटणकर. त्यांच्या आजवरच्या शौर्य आणि करुणेच्या कृतीमुळे त्यांना ‘वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र’ अशी उपाधी मिळाली आहे. अशा कर्तृत्ववान आणि कृतिशील प्रशासकीय अधिकार्याच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख.
कृष्णात कदम ( 9594969635)लेखक सा. विवेकचे मंत्रालय प्रतिनिधी आहेत.
तज्ञतेची भावना आपल्या भूतकाळाला अर्थ देते, आजच्या वर्तमानकाळासाठी शांतता देते आणि उद्याच्या भविष्यकाळासाठी दृष्टी निर्माण करते.” मेलोडी बीटीचे हे वाक्य एका समर्पित व्यक्तीच्या प्रवासाचे आणि ध्येयाचे सार उत्तम प्रकारे सांगते. अमोल पाटणकर यांच्या जिल्ह्याबद्दलच्या त्यांच्या कृतज्ञतेने आणि प्रेमानेच त्यांना त्यांच्या गावाचा कायापालट करण्याची आणि अथक प्रयत्न करण्याची ताकद दिली आहे. भूतकाळाबद्दल त्यांच्या आपुलकीनेच त्यांना समाजाच्या गरजा समजून घेण्याची मानसिकता दिली, तर आजच्या त्यांच्या कृतींमुळे अनेकांच्या जीवनात शांतता लाभली आणि सुधारणा घडून येत आहे. कृतज्ञतेची ही भावना एका चांगल्या भविष्यासाठी दृष्टी देते. आपल्या प्रदेशासाठी शाश्वत विकासाचे आणि उज्ज्वल भविष्याचे वचनही देते. आपला वारसा अर्थपूर्ण आणि परिणामकारक प्रगतीचा मार्ग कसा मोकळा करू शकतो, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. कृतज्ञतेचे खरे रूप ज्यांच्या प्रयत्नांत आणि दृष्टीमध्ये दिसते, ती व्यक्ती म्हणजे अमोल पाटणकर.
मुंबईतील महाराष्ट्र सरकारचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या गजबजलेल्या दालनात, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एक अवर सचिव तथा विशेष कार्य अधिकारी, हे ज्या पद्धतीने समर्पित वृत्तीने आपली प्रचंड जबाबदारी पार पाडत आहेत, ते पाहून खरोखर डोळ्यांचे पारणे फिटते. त्यांच्या जबाबदार्या अफाट असूनही ते राज्यभर पसरलेल्या विविध समुदायांशी घट्ट नातेसंबंध जपून आहेत. या प्रशासकीय अधिकार्याचे शनिवार व रविवार म्हणजे केवळ कामातील विश्रांती नसून राज्याच्या कानाकोपर्यात जाण्याची आणि विविध क्षेत्रांतील लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी असते.
ही बांधिलकी केवळ कर्तव्यभावनेतून जन्मलेली नाही. त्यांच्या उमेदीच्या काळात महाराष्ट्राने दिलेल्या पोषक वातावरणाची परतफेड करण्याची तीव्र इच्छा त्यांना हे सर्व करण्यास भाग पाडते. अमोल पाटणकर यांची राज्याबद्दल असलेली बांधिलकी त्यांच्या अधिकृत कर्तव्याच्या मर्यादेपलीकडची आहे. कृतज्ञता आणि सहानुभूतीने भारलेला तो एक वैयक्तिक प्रवास आहे. त्यांचे विचार म्हणजे राज्याच्या जनतेसाठी समृद्ध आणि सर्वसमावेशक भविष्याची दृष्टी आहे. विकास प्रकल्पांचे नेतृत्व करण्यापासून सामाजिक कार्यांना मदत करण्यापर्यंत त्यांच्या कामाचा आवाका अफाट आहे. इतकंच काय, तर वंचित-उपेक्षितांचे दयाळूपणे गार्हाणे ऐकून घेण्यासाठी त्यांची उपस्थिती म्हणजे आशेचा किरण आहे आणि अंधारातला दिवाही.
अमोल पाटणकर यांचे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कोंडोलीशी अतिशय घट्ट नाते आहे. “माझ्या गावाशी आणि तिथल्या लोकांशी असणारी ’नाळ’ मी कधीच तोडू शकत नाही,” असे ते अभिमानाने सांगतात. एका गरीब वस्तीपासून मंत्रालयापर्यंतच्या त्यांच्या प्रवासामुळे त्यांच्या गावी असलेल्या लोकांचे जीवन सुधारण्याचा त्यांचा संकल्प आणखी मजबूत झाला आहे. यामुळेच अरुणावती बहुउद्देशीय ट्रस्टची निर्मिती झाली. ही संस्था कोंडोली आणि आसपासच्या भागांत विविध विकास प्रकल्प चालविते.
पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुधारणांचे नेतृत्व
पाटणकर यांचे पहिले यश म्हणजे त्यांच्या गावातील वाहतूक सुधारणा. “पूर्वी कोंडोली मुख्य रस्त्याला जोडलेली नव्हती,” ते सांगतात. त्यांनी आपल्या मूळ गावापर्यंत रस्ता बांधण्यासाठी सेंट्रल रोड फंड (सीआरएफ) मधून रुपये सात कोटींच्या मंजुरीचे प्रयत्न केले. त्यामुळे कोंडोलीजवळील सर्व गावे आता रस्त्यांनी जोडली गेली आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने एक चांगला रस्ता बांधण्यात आला, ज्यामुळे एसटीही गावात पोहोचू शकल्या आहेत. हा विकास विद्यार्थ्यांसाठी, विशेषत: मुलींसाठी खूप फायदेशीर ठरला आहे. त्यांना आता उच्च शिक्षणासाठी वाहतुकीची अडचण नाही.
पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण उपक्रम
कोंडोली हे एके काळी पाणीटंचाईचे समानार्थी मानले जात होते. उन्हाळ्यात पाणी आणण्यासाठी महिला अनेक किलोमीटरची पायपीट करत होत्या. मात्र, पाटणकर यांचे प्रशासकीय अधिकारी होणे आणि सत्ताकेंद्राच्या जवळ असणे गावासाठी पथ्यावर पडले आहे. त्यांच्या टीमने अरुणावती नदीचे चार किलोमीटरचे रुंदीकरण करून आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी 4 चेक डॅम बांधून हा प्रश्न मार्गी लावला. “आम्ही 60 रिचार्ज शाफ्ट विकसित केले, प्रत्येकी 100-200 फूट खोल,” ते म्हणाले. या प्रयत्नांमुळे भूजल पातळी लक्षणीयरीत्या उंचावली आहे, ज्यामुळे गावकर्यांच्या वापरासाठी वर्षभर पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे. याव्यतिरिक्त, नदीच्या आणि रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण केल्याने स्थानिक वनस्पती आणि जैविक प्रणालीचेही पुनरुज्जीवन झाले आहे. नदीच्या किनार्याचे समृद्ध नैसर्गिक अधिवासात रूपांतरण करण्यात आले आहे.
आरोग्यसेवा आणि सुरक्षाव्यवस्थेला चालना
आरोग्यसेवेची गंभीर गरज ओळखून, अमोल पाटणकर यांनी मानोरा तालुक्यामध्ये 30 खाटांचे रुग्णालय 50 खाटांपर्यंत वाढविण्यात मोलाचे योगदान दिले आहेे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि तीव्र पाठपुराव्याचे परिणाम लवकरच दिसून येतील. “जास्त खर्च होईल म्हणून आणि मोठे शहर अतिशय लांब असल्यामुळे लोक गंभीर आजारांनी ग्रस्त असतानाही डॉक्टरकडे जाऊ शकत नाहीत,” ते सांगतात. हे रुग्णालय समाजाला अत्यंत आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवून त्यांच्या गरजेची पूर्तता करणार आहे. अरुणावती मल्टिपर्पज सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी मानोरा तालुक्यामधील रुग्णांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. ही रुग्णवाहिका त्यांनी आपलेे गुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पित केली. रुग्णवाहिकेचे ‘देवेंद्र फडणवीस दूत’ असे नामकरण केले आहे. आज ही रुग्णवाहिका तालुक्यातील आणि जिल्ह्यातील रुग्णांसाठी संजीवनी ठरली आहे. कारंजा लाड आणि मंगरूळनाथ या दोन तालुक्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. सरकारद्वारे अनुदानित या कॅमेर्यांमुळे परिसरात होणार्या चोर्यांना पायबंद बसला आणि बेकायदेशीर गोष्टींनाही मोठ्या प्रमाणात आळा बसला. त्यामुळे गावकर्यांना, विशेषत: महिलांना खूप सुरक्षित वाटू लागले आहे.
भविष्यासाठी दृष्टी
भविष्यासाठी पाटणकर यांनी कोंडोलीची आध्यात्मिक आणि व्यावसायिक पर्यटन स्थळ अशी कल्पना केली आहे. एक आध्यात्मिक थीम पार्क विकसित करण्यासाठीच्या योजना प्रगतिपथावर आहेत. त्याचे बांधकाम आधीच सुरू झाले आहे. त्यांनी भरपूर पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून पाच कोटी मंजूर करून घेतले. शिवाय, व्यावसायिक बोट सेवा ही ‘बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर सुरू केली जाईल. याव्यतिरिक्त, जुन्या धार्मिक स्थळांचे आधुनिक सुविधांसह नूतनीकरण केले जात आहे आणि प्राचीन वारसा समकालीन सुविधांशी जोडला जात आहे.
पाटणकरांची कृती शब्दांपेक्षाही जास्त मोठ्याने बोलते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एका अतिदुर्गम खेडेगावातून दोन वेळा एमपीएससी उत्तीर्ण करणार्या पाटणकर यांना ग्रामीण जीवनातील गुंतागुंत जवळून माहीत आहे. त्यांच्या प्रचंड मोठ्या वर्तुळात सर्व गरजू लोकांचा समावेश होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम पाठिंब्याने पाटणकर आपल्या नि:स्वार्थ सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नवनवे कार्य उभे करत आहेत. अलीकडेच, एका राजकीय कार्यक्रमादरम्यान, एका पीएसआय महिला उमेदवाराने तिच्या संघर्षाची भावनिक कहाणी सगळ्यांसमोर मांडली. तिच्या नियुक्तीसाठी मदत करणार्या पाटणकर यांचा तिने कृतज्ञतेने उल्लेख केला. एका वृत्तवाहिनीवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील या सुपुत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशासनातील सर्वच क्षेत्रांतील समस्या सोडवण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे अधिकारी म्हणून पाटणकर यांनी लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.
कला आणि संस्कृतीचे संवर्धन
पाटणकरांच्या प्रयत्नांनीच वाशिम जिल्ह्याला मंदिरांच्या देखभालीसाठी विक्रमी निधी मिळाला. कारंजा लाड येथील जगप्रसिद्ध गुरुमंदिराला कोणताही शासकीय निधी मिळाला नव्हता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने वाशिमच्या या सुपुत्राने गुरुमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 170 कोटी रुपयांची योजना मांडली. हा प्रस्ताव सध्या मंजुरी आणि निधीसाठी विचाराधीन आहे; तथापि आपल्या सर्व कामगिरीचे श्रेय ते त्यांचे गुरू राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देतात. ते नेहमी म्हणतात, “मी जे करू शकलो ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब यांच्यामुळेच.”
लोकांचा निःस्वार्थ व सच्चा मित्र
राज्याच्या कानाकोपर्यातून येणारे रुग्ण यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अमोल पाटणकर यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्य निधीच्या रूपाने मदत केली आहे. पाटणकर यांचे महाराष्ट्रातील लोकांप्रति असलेले समर्पण हे एका समर्पित व्यक्तीचा समाजावर किती प्रभाव पडू शकतो याचा ठळक पुरावा आहे. लोकांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करणारा तो निःस्वार्थी माणूस आहे. ट्रक उलटून झालेल्या एका दुर्घटनेत अपघातग्रस्तांना त्यांनी कशी मदत केली ते अजूनही लोकांच्या लक्षात आहे. शौर्य आणि करुणेच्या या कृतीमुळे त्यांना ’वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र’ अशी मनापासून उपाधी मिळाली. ते जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असतात. ‘एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह’ अशी ख्याती असणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून अमोल पाटणकर हे मंत्रालयाच्या कानाकोपर्यात प्रसिद्ध आहेत. पाटणकर यांच्या पुढाकाराने केवळ पायाभूत सुविधा आणि राहणीमानात सुधारणा झाली नाही, तर गावकर्यांमध्ये अभिमान आणि सहभागाची भावनाही वाढली आहे. त्यांचे कार्य म्हणजे एखाद्याने आपल्या मुळाशी जोडलेले राहून अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग कसा करता येऊ शकतो याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.निःस्वार्थीपणा, बांधिलकी आणि दृष्टी या सगळ्यांच्या मिलाफातून काय निर्माण केले जाऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. आपल्या वर्तुळात त्यांनी प्रेरणादायी असा बदल घडवून आणला आहे.