सामाजिक व कौटुंबिक जीवनाचा सुंदर मिलाफ - रत्नाकर विनायक भागवत

विवेक मराठी    24-Jan-2025
Total Views |
@डॉ. प्राची रवींद्र साठे
 
संघ, समाज, राष्ट्र आणि कुटुंब यांचा विचार करणारे ‘रत्नाकर भागवत’ हे व्यक्तिमत्त्व ‘बाबा’ ही भूमिकाही निष्ठेने जगले. असे हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व! यातील प्रत्येक भूमिका ते समरसून जगले. संघासाठी, कुटुंबासाठी, वैयक्तिक कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी त्यांनी तितकाच एक्सक्लुझिव्ह वेळ दिला.
vivek
 
रत्नाकर विनायक भागवत ऊर्फ बाळू भागवत आणि अर्थात आम्हा तीन भावंडांचे लाडके बाबा! या तीनही ओळखी सार्थ जगलेले हे व्यक्तिमत्त्व!,यांना 14 जानेवारी 2025 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी देवाज्ञा झाली.
 
प्रत्येकालाच बाबा प्रिय असतात किंवा प्रत्येकाचा आदर्श असतात. तसेच माझे बाबा माझे आदर्श होतेच; पण इतक्या छोट्या ओळखीत ते सामावतील का, असा प्रश्न त्यांच्या जीवनाचा आलेख समोर आल्यानंतर पडला आणि बाबांबरोबरीनेच किंबहुना थोडी जास्त सरस अशी ‘संघ स्वयंसेवक रत्नाकर विनायक भागवत’ ही ओळख उठावदारपणे समोर आली.
 
 
23 फेब्रुवारी 1931 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड या गावी त्यांचा जन्म झाला. शालेय जीवनातच ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या संस्थेशी नाळ जोडली गेली ती जीवनाच्या अखेरपर्यंत!
 
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल? त्याची संकल्पना काय? अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा?
https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/
 
 
स्वातंत्र्यपूर्व काळात वयाच्या अवघ्या पंधरा-सोळाव्या वर्षी त्यांचे देश, स्वातंत्र्य, स्वराज्य आणि राष्ट्र या संकल्पनांविषयीचे आकलन अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ होते. स्वा. सावरकरांच्या विचारांनी ते प्रभावित होते. गोळवलकर गुरुजींना भेटण्याची त्यांना संधी मिळाली व संघकार्य ते निष्ठेने करू लागले.
 
 
देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर दीडशे वर्षांची गुलामी पुसून टाकण्यासाठी सरकारने पावले उचलावीत यासाठी सगळे राष्ट्रप्रेमी, विशेषतः संघ स्वयंसेवक आतुर होते; पण प्रत्यक्षात काही तरी वेगळे घडू लागले. 1948 साली गांधीहत्येचा बादरायण संबंध संघाशी जोडला गेला. संघ स्वयंसेवकांना तुरुंगवास भोगावा लागला. बाबाही वयाच्या 17-18 व्या वर्षी तुरुंगात गेले. तुरुंगात असतानाही सहकारी संघ स्वयंसेवकांचे मनोबल टिकून ठेवण्यासाठी खड्या आवाजात संघगीते म्हणण्याचे काम त्यांनी धीराने आणि निष्ठेने केले.
 
 
तुरुंगातून सुटल्यानंतर कोणतीही कच न खाता उलट जास्त अभिमानाने त्यांनी ‘संघ स्वयंसेवक’ अशी स्वतःची ओळख निर्माण केली आणि खर्‍या अर्थाने संघविचार जगून आचरणातून सार्थ ठरवली.
 
 
दहा भावंडे, आई व वडील आणि मावस भावंडे असा मोठा परिवार आणि हातातोंडाशी असलेली लढाई! परिस्थितीचे भान ठेवून नशीब अजमावण्यासाठी ते मुंबईत आले. सुरुवातीला काच कारखान्यात नोकरी केली आणि काही काळानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवून स्थिरस्थावर झाले. या काळात भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने कर्मचार्‍यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात ते अग्रेसर राहिले. या काळात बालांना शाखेमध्ये नेणे, घरोघरी जाऊन संघाचे महत्त्व समजावणे, हे कार्य चालूच होते. रिझर्व्ह बँक कॉलनी, मुंबई सेंट्रल येथे ‘रद्दीदान’ या योजनेतून घरोघरी जाऊन रद्दी गोळा करून ते पैसे ‘वनवासी कल्याण आश्रमाला’ देण्याचे कार्य त्यांनी अखंड पंधरा-वीस वर्षे केले. लोकांना रद्दी द्यायला लावताना संघाचे विचार त्यांच्या घरापर्यंत पोहोचवता येतात, हाच सुज्ञ विचार या उपक्रमामागे होता. आज वळून पाहताना वाटते की, एका छोट्या कृतीतून माझ्यासारख्या किती तरी लहान मुलांवर कोणतेही काम कमी दर्जाचे नाही, हे श्रमप्रतिष्ठेचे मूल्यसंस्कार किती सहजपणे रुजवले गेले हे बाबांचे श्रेय! 1975 मध्ये देशात आणीबाणी लादली गेली तेव्हा अत्यंत शांतपणे अनेक भूमिगत संघ स्वयंसेवकांना त्यांनी मदत केली.
 
 
त्यांच्या कार्याचा आलेख किती विविधअंगी होता हे लिहायला बसल्यानंतर आठवते. आज ‘काश्मीर फाइल्स’, ‘आर्टिकल 15’, ‘आर्टिकल 30’ अशा सिनेमांमधून समोर येणार्‍या घटना व पुराव्यानिशी खरा असणारा इतिहास लहानपणापासून बाबांच्या तोंडून आम्ही ऐकत मोठे झालो. काश्मीरविषयी, ‘एक देश मे दो विधान, दो संविधान और दो निशान नही चलेंगे’ या घोषणेचा खरा अर्थ त्यांनी आमच्या वयाच्या कळत्या वयापासून आमच्या मनावर बिंबवला व देशातील काही अग्रणी व्यक्ती आपली फसवणूक करत आहेत याचे भान जागे करून खरी राष्ट्रभक्ती म्हणजे काय हे मनावर ठसवले.
 
 
‘लव्ह जिहाद’ हा शब्द आपण सध्या मोठ्या प्रमाणावर ऐकतो; पण आमच्या कॉलनीत 1980 च्या दरम्यान ती घडलेली घटना, त्या कुटुंबातील एका मुलीला असे फसवल्यानंतर उरलेल्या तीनपैकी दोन मुलींना सुरक्षित ठेवण्यात बाबांना आलेले यश; पण सरकारी अनास्थेमुळे कुटुंबाला नाइलाजाने पंजाबला स्थलांतरित व्हावे लागल्याचे शल्य बाबांना अखेरपर्यंत राहिले. मात्र त्याच वेळेस इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या शिखांच्या हत्याकांडावेळी कॉलनीतील एकही शिखाला हात लागणार नाही, असा निश्चय करून त्यांनी केलेला संघर्ष आठवतो.
 
 
‘साप्ताहिक विवेक’शी त्यांचे विशेष नाते होते. संघविचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘विवेक’सारख्या साप्ताहिकाचे वर्गणीदार वाढले पाहिजेत यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी विक्रमी प्रमाणावर ‘विवेक’चे वर्गणीदार वाढवण्यात हातभार लावला होता, ही गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा अनेक धडाडीने त्यांनी केलेल्या कार्यांची मांदियाळी डोळ्यासमोर उभी राहते. रत्नाकर भागवत या व्यक्तिमत्त्वाची उत्तुंगता जाणवते आणि ऊर अभिमानाने भरून येतो.
 
 
अशा प्रकारे संघकार्य आणि समाजसमर्पित जीवन जगत असतानाच कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी पेललेली जबाबदारी अचंबित करून जाते. बाळूमामा, बाळूकाका किंवा भावंडांचा बाळू हा पूर्ण भागवत कुटुंबासाठी सदैव तत्पर असायचा. केवळ कठीण प्रसंगातच नाही, पण सुट्टीसाठी कॉलनीत ‘जे 514’ या ब्लॉकमध्ये जमलेल्या भाचवंडांना चौपाटीवर नेणे, बग्गीतून फिरवणे, या गोष्टीही आवर्जून सतत आनंदाने आणि उत्साहात ते करायचे.
 
 
सतत संघ, समाज आणि कुटुंब यांचा विचार करणारे ‘बाळू भागवत’ हे व्यक्तिमत्त्व ‘बाबा’ ही भूमिकाही निष्ठेने जगले. आम्ही तीन भावंडे, मोठी ताई धनश्री, मधला दादा यशोधन व मी सर्वात धाकटी प्राची. आम्हा भावंडांचे स्वभाव अत्यंत वेगवेगळे. ताई मितभाषी आणि अबोली, दादा अत्यंत मस्तीखोर, पण तितकाच श्रद्धाळू आणि मी त्यांचा छोटा नमुना शेंडेफळ म्हणून लाडोबा! बाबांनी मात्र तिघांच्याही स्वभावाचा अभ्यास करून आम्हाला आमच्या विचारांप्रमाणे घडवले. दादाची बायको प्रणिता आल्यानंतर, ही माझी तिसरी मुलगी म्हणून तिचेही तितकेच केलेले लाड हे बाबांच्या कुटुंबवत्सल गोष्टीचे द्योतकच आणि माझे पती रवींद्र साठे हे प्रचारक होते हे कळल्यावर झालेला आनंद संघप्रेमाची साक्षच देणारा!
 
 
कोणालाही बोलताना त्यांच्या जागी उभे राहा व आपल्या बोलण्याचे समोरच्याला काय वाटेल ते समजून घेऊन आपले शब्द उच्चारा किंवा माणूस संपूर्ण वाईट कधीच नसतो. परिस्थितीनुसार तो त्या प्रसंगात तसा वागतो, त्यामुळे माणसावर कायमचा राग कधीच ठेवू नका किंवा ‘लाथ मारीन तिथे पाणी काढायची हिंमत ठेवा’ अशा अनेक वाक्यांचे संस्कार त्यांनी स्वतःच्या आचरणातून आमच्यावर केले. त्यांच्याही हातून कधी तरी चुका झाल्या; पण समोरच्याने प्रत्येक वेळेस त्यांना माफ केलेच असे नाही. अशा वेळेस मी जेव्हा त्यांच्याशी तात्त्विक वाद घालायचे तेव्हा त्यांचे उत्तर ठरलेले असायचे. ते म्हणायचे, परिस्थिती आणि प्रसंग या गोष्टींकडे किंवा घटनेकडे पाहण्याची समोरच्याची योग्यता नाही ते समजून घेऊन आपण वाईट वाटून घ्यायचे नाही. विसरून जायचे आणि पुढे निघायचे. हे सांगताना, तुझ्यामध्ये मात्र ही योग्यता आली पाहिजे. त्यासाठी वाचनाचा व्यासंग हवाच, हे सांगायला ते कधीही विसरायचे नाहीत. जे. कृष्णमूर्तींच्या विचारांची शिदोरी, बाळशास्त्री हरदास यांचे खंडन करणारे विविध विषयांवरील भाष्य या व अशा अनेक पुस्तकांची शिदोरी त्यांनी मला दिली. हे वाचत असताना माझे झुकते माप मात्र ललित लेख, कविता आणि कादंबर्‍या वाचण्याकडे होते, हे त्यांच्या लक्षात आल्यावर माझ्या स्वभावानुसार त्यांनी मला स्वतंत्रपणे पुढे जाऊ दिले यातच त्यांचे ‘बाबा’पण सिद्ध होते. त्यांच्याकडे अनेक दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह आहे.
 
 
आई हा त्यांच्या आयुष्यातील हळवा कोपरा होता. तिला फिरायला नेणे, लग्न वाढदिवसाला सिनेमाला जाणे, हे ते आवर्जून करायचे.
मैत्रीचे महत्त्व त्यांच्या आयुष्यात वेगळे होते. परांजपे, रानडे, ओक आणि भागवत असे हे चार मित्र एकाच दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला लागले. तेव्हापासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात न चुकता हे चौघे मित्र नाटक बघून जेवायला बाहेर जात असत. किती तरी वर्षे हा नेम चालू होता. त्यांचे सर्व स्वयंसेवकांशीही मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या वाणीत नेहमी गोडवा असे व स्वागतशील भूमिका असे.
 
 
असे हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व! यातील प्रत्येक भूमिका ते समरसून जगले. संघासाठी, कुटुंबासाठी, वैयक्तिक कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी त्यांनी तितकाच एक्सक्लुझिव्ह वेळ दिला. हे सगळं बघताना वाटतं की, हे ‘टाइम मॅनेजमेंट’चे गुरूच होते.
त्यांच्या हयातीत 370 कलम, राम मंदिर असे महत्त्वाचे विषय प्रत्यक्षात पूर्णत्वास गेलेले पाहता आले हे खूप महत्त्वाचे आहे. ज्या विषयांसाठी त्यांनी आयुष्य वेचले ते प्रत्यक्षात घडताना पाहणे असे हे कृतार्थतेचे क्षण केवळ मोदी सरकारमुळे अनुभवता आले, हे आमच्यासाठी, बाबांच्या समाधानी शेवटच्या क्षणांसाठी खूप महत्त्वाचे आहे.
 
 
शेवटच्या काही महिन्यांत त्यांचे आकलन हळूहळू कमी होत होते. दैनंदिन कामाचे आणि जेवण-नाश्ता याविषयीचे विस्मरण सुरू झाले होते. बांगलादेशी हिंदूंना वाचवले पाहिजे, असे न म्हणता त्यांच्यात लढण्याची हिंमत जागवली पाहिजे, असे व्यवहारी विचार ते त्या नकळत्या काळातही स्वच्छपणे मांडत राहिले. यातूनच शेवटपर्यंत त्यांच्या मनात प्रखर राष्ट्रभक्ती जागी होती हे प्रकर्षाने जाणवत असे.
 
 
असे हे रत्नाकर विनायक भागवत एक सच्चे संघ स्वयंसेवक! माझ्या आजच्या मनःस्थितीत माझ्या आठवणींच्या कप्प्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व साकार करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न!
 
त्यांचे विचार जगणे, हीच आम्हा भावंडांकडून त्यांना विनम्र श्रद्धांजली!