सन्मान कलासाधकाचा

विवेक मराठी    28-Jan-2025
Total Views |
@रवींद्र देव
 

rss
चित्रतपस्वी वासुदेव कामत आपल्या चित्रांमधून प्रबोधनाबरोबरच भारतीय संस्कृती, विचार, मूल्य व संस्कार प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडत राहिले. देशभरात रामायण आणि महाभारतावरील सचित्र व्याख्याने त्यांनी दिली. आपली चित्रकलेतील एक वेगळी शैली निर्माण केली. अशा या वासुदेव कामत यांचा भारत सरकारने पद्मश्री देऊन उचित गौरव केला आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख...
25 जानेवारी सायंकाळी 7 वा. खूप आनंददायी बातमी आली. चित्रकार वासुदेवराव कामतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. संपूर्ण चित्रकला आणि शिल्पकला क्षेत्रांत आनंद पसरला. माझा ऊर अभिमानाने भरून आला आणि एकीकडे मन अस्वस्थ झाले ते तीर्थरूप भारती वहिनींच्या आठवणीने ज्यांना वासुदेवराव ‘गृहिणी’ म्हणूनच हाक मारायचे. आज त्या असत्या तर मला तत्काळ फोन आला असता की, अहो रवीजी, तुम्हाला कळलं का, ह्यांना पद्मश्री मिळाली. आजही त्यांच्या चेहर्‍यावरचा तो आनंद आणि अभिमान याची मी कल्पना करू शकतो.
 

vasudev kamat 
 
‘संघात जाऊन तुम्हाला काय मिळते? तुम्ही ब्राह्मणेतर असून संघात कसे? तुम्ही बुद्धिवादी असूनही बंदिस्त विचारसरणी असलेल्या संघात कसे काय रमू शकता?’ या सर्व प्रश्नांची उत्तरे ..

https://www.vivekprakashan.in/books/why-we-are-in-sangha/

मा. वासुदेवरावांशी माझा परिचय गेल्या 32 वर्षांपासूनचा. संस्कार भारतीच्या महाराष्ट्र प्रांताच्या ठाणे येथील कलासाधक संगमात पहिली भेट झाली. त्यांना या कार्यक्रमात आणणारे विश्वास चक्रदेव. दुपारच्या कलाश: सत्रात वासुदेवरावांचे रेखाटनावर सत्र होते. तेथून आमचा परिचय जो झाला, तो इतका की, मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच झालो आणि आजतागायत त्यांच्या नितांत प्रेमास पात्र झालो. माझा कलेतील एक वेगळा प्रवास मा. वासुदेवरावांच्या सहवासात आल्यानंतर सुरू झाला.
 
 
दुसरी भेट केशव सृष्टीला बैठकीनिमित्त झाली. बैठक संपल्यानंतर वासुदेवांबरोबर त्यांच्या आग्रहास्तव मी व डॉक्टर देगलूरकर बोरिवली येथील काजूपाड्यातील घरी गेलो. त्या वेळी प्रथम भारती वहिनींची भेट झाली. अत्यंत सुंदर आदरातिथ्य वहिनींनी केलं. त्यांच्या हातचा शेवयांचा उपमा मी आयुष्यात प्रथमच खाल्ला. नंतर त्या घरातील वरच्या खोलीतील त्यांचा स्टुडिओ बघितला. तेथे सुरू असलेल्या पोर्ट्रेटची कामे बघितली. याच घरात वासुदेवरांवाचे जपानमधील बुद्ध मंदिरातील सुरू असलेले काम त्यांनी एका बाजूने उलगडून दाखविले. आठ फूट उंच, लांबी अंदाजे वीस फूट असेल. त्या चाळीतील छोट्याशा पत्र्याच्या घरात एका वेळी संपूर्ण चित्र बघतासुद्धा येत नव्हतं. ते काम पाहून तर मी थक्क झालो. त्यानंतर बुद्धाच्या जीवनावर डॉ. देगलूरकर व वासुदेवरावांचा संवाद सुरू झाला. दोन अत्यंत बुद्धिमान चर्चा करत होते. त्यावरून मला लक्षात आलं की, वासुदेवराव फक्त चित्रकार नाही, तर एक चिंतनशील, अभ्यासू आणि संवेदनशील कलासाधक आहेत. आम्ही निघालो. जाताना भारती वहिनींनी मला आवडलेला शेवयांचा उपमा आठवणीने डब्यात भरून दिला. त्यानंतर आम्ही भेटतच गेलो. नाती घट्ट होत गेली. कामत कुटुंबीयांशी, त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींशी जवळीक वाढत गेली.
 

vasudev kamat 
 
कर्नाटकातील कारकळ या छोट्याशा गावातून वडील तारानाथजी व कुटुंबीय चरितार्थासाठी मुंबईत आले. काजूपाड्यासारख्या वस्तीत अत्यंत सामान्य परिस्थितीत राहूनही घरचे आणि संघाचे संस्कार त्यांनी आयुष्यभर नुसते जपलेच नाहीत, तर ते आचरणात आणले. वासुदेवरावांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. काजूपाड्यातील घरात व बाहेर अनेक भिंती त्या चिमुकल्या हातांनी रंगत होत्या. कोणाला कल्पनाही नव्हती या वस्तीतून एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार उदयास येईल. शाळेचे शिक्षण संपल्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी फाइन आर्टला प्रवेश मिळविला व शेवटच्या वर्षी त्यांच्या चित्राला गोल्ड मेडलही मिळाले. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर उदरनिर्वाहासाठी काय करायचे, हा मोठा प्रश्न होताच. मग एका प्रसिद्ध वृत्तपत्रात कटिंग पेस्टिंग आर्टिस्टची नोकरी धरली. तोही अनुभव घेतला. मग काही काळानंतर नोकरी सोडून त्यांनी स्वतंत्र चित्रकार म्हणून काम करण्याचे ठरविले.
 
 
सतत रेखांकने, निसर्गचित्रण आणि व्यक्तिचित्रण चालूच होते. वासुदेवराव नुसते चित्रकार नाहीत, तर ते उत्तम शिल्पकार आहेत. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी काजूपाड्यातील विविध लोकांची पोर्ट्रेट करून जहांगीर कलादालनात पहिले प्रदर्शन भरविले. त्यातून अनेक पोर्ट्रेटच्या त्यांना ऑर्डर मिळाल्या. तेथून त्यांचा व्यावसायिक चित्रकार म्हणून प्रवास सुरू झाला.
 
 
संकल्पना चित्र
 
व्यक्तिचित्रण, स्थिरचित्रण आणि निसर्गचित्रण यांचा उपयोग करून त्यांनी भारतीय विषयांवर चित्रमाला करण्यास सुरुवात केली. एक विषय घेऊन त्यावर संपूर्ण मालिका करत त्यांनी अनेक विषयांवर चित्रमालिका निर्माण केल्या. रामायण, महाभारत, श्रीकृष्ण, उपनिषद, मंदिर, संत, कालिदास, मेघदूत, कबीर, प्राणी व मानव, हनुमान, बुद्ध, रायगडावरील राज्याभिषेक व नंतर निघालेली मिरवणूक व त्यातील बारकावे, पावनखिंडीतील रात्रीचा प्रसंग, तानाजी मालुसरेचा प्रसंग, अफजल खानाचा वध, लाल महालातील शाहिस्तेखानाची बोटे छाटतानाचा प्रसंग, रामदास स्वामी व छ. शिवाजी महाराजांची भेट असे असंख्य विषय त्यांनी चितारले.
 
  
स्वामी नारायण मंदिरांसाठी केलेली प्रमुख स्वामीजींच्या जीवनावरील चित्रांची मालिका ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या मालिकेतील चित्रांच्या छापलेल्या पुस्तकांची प्रचंड विक्री तर झालीच; परंतु ती चित्रे जगभर गाजली. नालंदा विद्यापीठातील तक्षशिला वर्गातील विद्यार्थी व शिक्षक शिकवितानाचा प्रसंग, जळगाव येथील जैनांच्या संग्रहालयासाठी महात्मा गांधींच्या जीवनावरील प्रसंगचित्र व जैनांच्या पिढीतील 80 व्यक्तिचित्रांची निर्मिती. छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची अनेक चित्रं अनेक कलाकारांनी साकारली; परंतु वासुदेवरावांनी तेच चित्र अत्यंत अभ्यासपूर्ण आणि वेगळ्या अँँगलनी चितारले. त्यावरून त्यांचे कामातील वेगळेपण आणि विचार करण्याची पद्धत दिसते. ही चित्रे करताना त्याचा पूर्ण अभ्यास करणे आणि आवश्यक संदर्भांचा शोध घेणे तसेच वाचन आणि तज्ज्ञांबरोबर वेळोवेळी चर्चा ते करतात.
 
 
ऑल इंडिया आर्ट, लंडनसाठी अनेक भारतीय विषयांवर अतिशय सुंदर प्रसंग त्यांनी चितारले आहेत. पू. बाबासाहेब आंबेडकर यांचा चवदार तळ्याचा प्रसंग, संत गुरू गोविंद सिंह, जालियनवाला बाग, रायगडावर छ. शिवाजी राजे आपल्या मावळ्यांबरोबर पाहणी करताना, छ. शिवाजी महाराजांच्या युद्धातील गनिमी काव्याचे प्रसंग, बाजीप्रभू देशपांडे यांचे खिंडीतील युद्ध, ही चित्रं पाहिली की अंगावर काटा येतो. इतके जिवंत वातावरण उभे करणारी सुंदर चित्रे आपल्याला त्या इतिहासात नेऊन ठेवतात.
 
 
आजवर अशा अनेक विषयांवर त्यांनी चित्रे काढली. ती समाजासमोर प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडली. देशभरात रामायण आणि महाभारतावरील सचित्र व्याख्याने त्यांनी केली. आपली चित्रकलेतील एक वेगळी शैली निर्माण केली.
 

vasudev kamat 
 
तीन टप्प्यांत- पौराणिक, ऐतिहासिक आणिसद्यःस्थितीवरील घटनांवर आधारित विषय घेऊन चित्रमालिका तयार केल्या व कलादालनात समाजासमोर मांडत गेले. या चित्रांमधून प्रबोधनाबरोबरच भारतीय संस्कृती, विचार, मूल्य व संस्कार प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडत राहिले. ही चित्रे सर्वसामान्यांपर्यंत या विषयांमुळे पोहोचली.
 
थोर व्यक्तींची व्यक्तिचित्रणं
 
पू. महात्मा गांधी, पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार, पू. माधव सदाशिव गोळवलकर, पं. दीनदयाळ उपाध्याय, शाहीर अण्णा भाऊ साठे, पूर्वपंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, पूर्वराष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पूर्वराष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉ. हरिभाऊ वाकणकर, पं. दीनानाथ मंगेशकर, छत्तीसगड पूर्वमुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, अभिनेता ऋषी कपूर, पूर्वकेंद्रीय रेल्वेमंत्री राम नाईक, ज्येष्ठ साहित्यिक, अशा अनेक थोर विभूतींची चित्रे कामतांनी काढली आहेत. काही व्यक्तिचित्रणे समोर बसून काढली.
 
 
निसर्गचित्रण व रेखाटन
 
वासुदेवराव नेहमी सांगायचे, माझी बॅग केव्हाही तपासा. प्रवासात माझ्याकडे स्केचबुक व पेन्सिल हे तुम्हाला सापडणारच. प्रत्यक्ष निसर्गात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणांचे निसर्गचित्रण वासुदेवरावांनी केले. संपूर्ण भारतभर आणि विदेशातही स्पॉटवर बसून काम केले. भारतातला कोणताही भाग राहिला नाही जिथे कामतजी गेलेले नाहीत. त्यांच्याबरोबर त्यांची सहचारिणी गृहिणी भारती वहिनी या सावलीसारख्या असायच्या. त्यांचा सर्व प्रवास, जेवणखाण आणि हॉटेलचे बुकिंग सर्व काही भारतातील व विदेशातील भारती वहिनीच बघायच्या. रंग काढता काढता भारती वहिनीही उत्तम चित्रे काढायला लागल्या. त्यांचे चित्र प्रदर्शनातही मांडले होते. ब्रह्मदेश, श्रीलंका, बाली, रशिया, अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये जाऊन त्यांनी काम केले व तेथील संग्रहालयाला भेट दिली. अनेकदा काही तरुण चित्रकारही त्यांच्याबरोबर जायचे. कामत सरांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. ती अनेकांना मार्गदर्शक ठरली आहेत.
 
 
 
शिल्पकार वासुदेवराव
 
त्यांचे आजोबा शिल्पकार शेणॉय यांच्याकडूनच कदाचित हा चित्रकलेचा वारसा आला असेल असे वाटते. कारकळसारख्या छोट्या गावात राहून शिल्पकार शेणॉय यांनी ऐंशी वर्षांपूर्वी भगवान बुद्धांचा उभा 60 फुटी पुतळा जपानच्या एका उद्यानात केला होता. त्यानंतर जपानमधील बुद्ध मंदिरातील विश्वस्तांना कळले की, शिल्पकार शेणॉय यांचे भारतातील नातू वासुदेव कामत हेही चित्रकार आहेत. म्हणून ते भारतात वासुदेवरावांना काजूपाड्यात भेटायला आले. त्यांचे काम बघून त्यांनी जपानमधील मंदिरासाठी बुद्धांच्या जीवनावरील मोठी चित्रे तयार करून देण्याची विनंती केली. तीसुद्धा भारतीय चेहरे व परिवेशांमध्येच असावे, असा आग्रह धरला. बुद्धांच्या जन्मापासून ते अंतापर्यंत चित्रमालिका तयार झाली. त्या चित्रांचा स्लाइड शो व्याख्यानासहित ज्या वेळी पुण्यातील तीन दिवसीय संस्कार भारतीच्या प्रांताच्या चित्रकलेच्या कार्यशाळेत त्यांनी 300 चित्रकारांसमोर केला त्या वेळी कामत हे काय रसायन आहे हे महाराष्ट्राला कळले. वासुदेवराव फक्त चित्रकारच नव्हे तर एक उत्तम वक्ते आहेत हे सर्वांनी अनुभवले.
चित्रांमधील कथा सांगत सांगत, त्यातील वैचारिक मांडणी एका कलासाधकाच्या अंगाने ते कसा विचार करतो हे सांगत, काही ठिकाणी हळूच चिमटे घेत, विनोद सांगत, रसिकांच्या मनावर चित्राचा प्रभाव पाडत प्रबोधन केव्हा होते ते कळतसुद्धा नाही. व्यक्तिगत गप्पागोष्टी करताना त्यांच्या प्रवासातील अनेक घटना तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच कला क्षेत्रांतील अनेक कलावंतांचे विचार ऐकायला मिळतात.
 
 
vasudev kamat
 
स्वामी नारायण मंदिर- दिल्ली, सॅन फ्रॅन्सिस्को- अमेरिका येथील शिल्पकारांसाठी लागणारी शिल्पांच्या खांबांची ड्रॉइंग केली. त्यावरून शिल्पे केली गेली. मध्य प्रदेशमधील पू. शंकराचार्यांच्या पुतळ्याचे मूळ रेखांकन व त्यांचे पेंटिंग हे वासुदेवरावांनीच केले व त्यावरून 108 फुटी पुतळा शिल्पकार भगवान रामपुरे यांनी साकारला. वासुदेवरावांनी आलेले व्यावसायिक काम कधीही आपल्यापुरते न ठेवता अनेक चित्रकारांना त्यात सहभागी करून घेतले. त्यामुळे वासुदेवरावांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा अनुभव अनेक चित्रकारांना मिळाला. बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानातील शिल्प असो वा शिवाजी पार्क- दादर येथील शिल्प असो, मूळ संकल्पना ही वासुदेवरावांची आहे. दरवर्षी घरातील गणपतीची मूर्ती स्वत: करून त्याची उत्तम सजावट नातवंडांना घेऊन करत असतात. अयोध्या मंदिर निर्माण प्रक्रियेतही फार मोठा सहभाग आहे.
 
 
सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान
 
वासुदेवराव नेहमी म्हणतात, उपलब्धी आणि योगदान (Achievement & Contribution) या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आयुष्यात आपण शिक्षण घेताना पीएच.डी. करतो, अनेक सत्कार आणि पुरस्कार मिळवितो; परंतु समाजासाठी आणि देशासाठी आपलं योगदान असलं पाहिजे. हे ते नुसते सांगत बसले नाहीत, तर त्यांनी ते प्रत्यक्ष आयुष्यात घडवून दाखविलं. अनेक पुरस्कार प्राप्त झाले. पहिला भारतीय चित्रकार ज्याने पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या 2006 सालच्या इंटरनॅशनल पोर्ट्रेट स्पर्धेत ‘ड्रेपर ग्रँड प्राइज’ (प्रथम क्रमांकाचे) मिळविले. ते जाहीर झाल्यानंतर व्यासपीठावर जाताना पायर्‍या चढताना त्यांनी राष्ट्रगीत म्हणत ते बक्षीस स्वीकारले. त्यांच्यातील देशभक्ती आणि राष्ट्रीयत्व हे सतत जागे असते याचे हे जिवंत उदाहरण आहे. पुरस्कारांची यादी मोठी आहे. त्यातील काही मोजकेच पुरस्कार म्हणजे पं. सातवळेकर प्रतिष्ठान पुरस्कार, श्रीगुरुजी पुरस्कार, चंद्रकांत मांढरे गौरव पुरस्कार- कोल्हापूर, नुकताच प्राप्त झालेला मानाचा चतुरंग प्रतिष्ठानचा चतुरंग पुरस्कार. वासुदेवराव हे समाजाभिमुख कलावंत आहेत. सर्व प्रकारच्या वयोगटांतील अगदी विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत त्यांचा प्रत्येकाशी संवाद असतो. अनेक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देशविदेशात त्यांची अनेक प्रात्यक्षिके झालीत. त्यानिमित्ताने उपस्थित रसिकांबरोबर संवादही ते करत असतात.
 
आध्यात्मिक जीवन
 
अत्यंत साधे, सरळ, निरलस, मृदू, प्रेमळ, हळुवार, कल्पक, विचारी, श्रद्धाळू, संवेदनशील, निर्व्यसनी, संशोधक, अभ्यासू आणि चिंतनशील असं चतुरस्र सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेला असा हा कलाकार आहे. एवढं यश पदरात पडत असताना अहंकाराचा कोठे स्पर्शही न होता, केवळ स्वत:पुरते न जगता सतत समाजाचा विचार कलेच्या माध्यमातून करत राहाणं. आध्यात्मिक जीवन म्हणजे दुसरं काय असतं. माणूस त्याच्या कुटुंबाबरोबर समाजातील सज्जनशक्तींच्या सहवासात घडत असतो. पू. गोळवलकर गुरुजी, संघाचे प्रचारक शिवराय तेलंग, मा. योगेंद्रजी, कलाशिक्षक अभ्यंकर, डॉ. गो. बं. देगलूरकर अशांसारख्या अनेक थोर विभूतींचा सहवास वासुदेवरावांना लाभला.
 
 
कलेतील गुणवत्ता व वैचारिक उंची
वासुदेवराव लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. ते सांगतात, संघ ही माझी जीवनभराची वचनबद्धता आहे. त्यांनी इतिहास संकलन समितीचे अनेक वर्षे काम पाहिले. तसेच संस्कार भारतीमध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये विविध जबाबदार्‍या सांभाळत अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून गेली सहा वर्षे अत्यंत सक्षमपणे काम केले. तसेच बॉम्बे आर्ट सोसायटी व आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या दोनही संस्थांचे अध्यक्षपद भूषविले. केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या अनेक सांस्कृतिक विभागांच्या समित्यांवर काम केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणासंबंधीही त्यांचे मोलाचे योगदान आहे.
 
त्यांच्या चित्रांबरोबरच त्यांची वैचारिक बैठक पक्की आहे. कलेच्या माध्यमातून नेमके काय करायचे याची स्पष्टता त्यांच्या मनात पक्की आहे. कलेच्या क्षेत्रात अजातशत्रू असं हे व्यक्तिमत्त्व आहे. अनेक नवीन पिढीतील कलाकारांचे ते स्फूर्तिस्थान आहेत. कला क्षेत्रातील कलावंताच्या जीवनाविषयीचे गैरसमज त्यांनी त्यांच्या आचरणातून हाणून पाडले. कलाकाराचे जीवन हे समाजाभिमुख असले पाहिजे, तो निर्व्यसनी असला पाहिजे, हे त्यांनी न बोलता, कोणताही गवगवा न करता, प्रसिद्धीपराङ्मुख राहून व्यवहारातून दाखवून दिले.
 
‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित
 
चित्रकार वासुदेवराव कामतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण कलाजगतात आनंद व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारने एका योग्य कलाकाराची दखल घेतली याचं समाधान नक्कीच आहे. वासुदेवरावांसारखी ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वं या देशात आहेत म्हणूनच हा देश टिकला. भारतीय संस्कृतीची जपणूक व संवर्धन करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपली आयुष्यं खर्ची घातली त्यापैकी एक म्हणजे मा. वासुदेवराव कामत आहेत. आज या भारतमातेच्या शिरपेचावर अजून एक लखलखता हिरा त्या कोंदणात विराजमान होत आहे याचा आम्हा कलासृष्टीतील कलासाधकांना व कलारसिकांना नक्कीच सार्थ अभिमान आहे. बंधुवर्य वासुदेवराव, आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.
 
लेखक संस्कार भारतीचे अ. भा. दृश्यकला
संयोजक आहेत.