महाकुंभ - ऐतिहासिक, भव्य आणि आधुनिक

विवेक मराठी    28-Jan-2025   
Total Views |
आज प्रयागराजमध्ये जी कुंभनगरी उभी आहे ती मुख्यत: नदीच्या कोरड्या पात्रात उभारलेली आहे. तसेच हा कुंभ प्लास्टिकमुक्त कुंभ आहे. कुठेही जेवण वा चहा सिंगल युज प्लास्टिकमध्ये मिळत नाही. सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी राबवलेली पद्धत अप्रतिम आहे. या ठिकाणी गंगा नदीवर 30 तात्पुरते पूल बांधले आहेत. त्यामुळेे कुंभनगरीमध्ये वावरताना हे सतत जाणवते की, बारकाईने योजना करून इथल्या सर्व व्यवस्था उभारल्या आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान आणि कमालीची कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा यामागे उभी आहे, हे लक्षात येते. हे 'याचि देही याचि डोळा' अनुभवलेल्या शरदमणी मराठे यांनी शब्दबद्ध केलेला लेख.
 
prayagraj kumbh mela 2025
 
आयुष्यात अनेक गोष्टी ठरवून होत नाहीत; त्याचा योग यावा लागतो. प्रयागराज महाकुंभाबाबत असेच झाले आणि 14 जानेवारीच्या पहिल्या अमृतस्नानानंतर दोनच दिवसांनी 16 जानेवारी ते 18 जानेवारी असे मी आणि माझी पत्नी महाकुंभनगरी प्रयागराज येथे पोहोचलो. नगरीचे पहिलेच दर्शन पुढल्या तीन दिवसांत आपण काही तरी भव्य बघणार आहोत याची चुणूक दाखवणारे होते. कुंभनगरीत प्रवेश केल्यानंतर बॅटरीवर चालणार्‍या रिक्षाने केलेल्या सुमारे 20 मिनिटांच्या प्रवासात दुतर्फा फक्त तंबू, मांडव, श्रद्धाळू भक्तगण, विविध मांडवांतून ऐकू येणारे भजनांचे, चौपायांचे, कथांचे आवाज, ठिकठिकाणी असलेले पाण्याचे नळ, कचरा टाकायच्या कुंड्या आणि पोलीस लोकांचा जाणवेल असा वावर हेच दिसत होते. ज्याला चेकर्ड प्लेट म्हणतात अशा आठ-10 मिलिमीटर जाडीच्या लोखंडी प्लेट्सना अक्षरशः शेजारी-शेजारी मांडून तयार केलेल्या तात्पुरत्या, पण दुहेरी वाहतूक होऊ शकेल अशा पुरेशा रुंद रस्त्यावरून कापत आमची ई-रिक्षा चालली आणि आम्ही आमच्या तंबू निवासात पोहोचलो. तीन दिवस वावरताना लक्षात येत गेले की, आपण 20 मिनिटे ज्या रस्त्याने गेलो तो या कुंभनगरीचा अगदीच लहानसा भाग होता.
 
‘संघात जाऊन तुम्हाला काय मिळते? तुम्ही ब्राह्मणेतर असून संघात कसे? तुम्ही बुद्धिवादी असूनही बंदिस्त विचारसरणी असलेल्या संघात कसे काय रमू शकता?’ या सर्व प्रश्नांची उत्तरे ..

 https://www.vivekprakashan.in/books/why-we-are-in-sangha/
 संगमावर स्नान हा इथे येणार्‍या श्रद्धाळूंसाठी महत्त्वाचा भाग असतो. स्नानासाठी कायमस्वरूपी नऊ घाट बांधलेले आहेत. शिवाय महाकुंभासाठी आणि विशेषत: अमृतस्नानाच्या सहा पवित्र दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन सुमारे 12 किलोमीटर लांबीच्या किनार्‍यावर 50 तात्पुरते घाट बांधले आहेत. घाटांवर येण्याचा आणि जाण्याचा असे स्वतंत्र मार्ग आहेत. यात्रेकरूंचे चकित करणारे आकडे लक्षात घेऊनही गर्दीचे नियोजन कसे केले याचे मर्म या तात्पुरत्या, पण प्रचंड लांबीच्या घाटांच्या योजनेला द्यायला पाहिजे. तसे बघितले तर गंगेचे, यमुनेचे आणि संगम झाल्यानंतरच्या गंगेचे पात्र चांगलेच मोठे आहे. पाण्याला ओढही आहे. स्नान करताना तसेच डुबकी मारताना ती जागा सुरक्षित असेल याची काळजी घेतली गेली आहे. बेताच्या उंचीच्या प्रवाहाच्या भागानंतर लगेचच एक प्रकारचे कुंपण म्हणून कायम उभ्या केलेल्या नौका, प्लास्टिकचे तरंगणारे फ्लोटर्स यांची एक जणू भिंतच उभी केली आहे. ती ओलांडून कोणी जाणार नाही याची काळजी येणारे तीर्थयात्री घेतातच शिवाय त्यापलीकडे नौकांतून गस्त घालणारे पोलीस आणि लाइफ गार्ड डोळ्यात तेल घालून निरीक्षण करत असतात. काही ठिकाणी या तात्पुरत्या घाटांवर नावेने जावे लागते. त्या नावांतही चांगली नवीन लाइफ जॅकेट्स आहेत. लाइफ जॅकेट्स न घालता यात्रिकांना नेणारी नाव मी तरी बघितली नाही. त्याव्यतिरिक्त भर नदी प्रवाहात तरंगता फलाट करून तिथे नौकांतील पोलिसांचे नियंत्रण करणारे पोलीस स्टेशन आणि पोलीस चौक्यादेखील आहेत. दर वर्षी पावसाळ्यात समुद्रात आणि धबधब्यात पोहायला गेलेल्या तरुणांचे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. हा मजकूर लिहीत असताना महाकुंभ सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. 11 कोटींच्या वर तीर्थयात्री स्नान करून गेले आहेत; पण आजवर एकही जीवितहानी झालेली नाही. यापुढे उत्तरोत्तर यात्रेकरूंची गर्दी वाढते आहे. अशीच सुरक्षा शेवटपर्यंत राखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
 

prayagraj kumbh mela 2025 
 
कुंभनगरीमध्ये वावरताना हे सतत जाणवते की, बारकाईने योजना करून इथल्या सर्व व्यवस्था उभारल्या आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान आणि कमालीची कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा यामागे उभी आहे, हे लक्षात येते. आज जी कुंभनगरी उभी आहे ती मुख्यत: नदीच्या कोरड्या पात्रात उभारलेली आहे. तिथे कुठलेही कायमस्वरूपी बांधकाम करणे शक्य नसते. हा सगळा भाग ऐन पावसाळ्यात, जुलै-ऑगस्टमध्ये पूर्ण जलमय झालेला असतो. त्यामुळे ही सगळी उभारणी गेल्या काही महिन्यांत केलेली आहे. महाकुंभासाठी विकसित केलेला भाग हा सुमारे 40 चौरस किलोमीटरचा आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या दृष्टीने हा 76 वा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला स्वतंत्र जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा आहे. हा संपूर्ण भाग प्रशासनिक
 हा डिजिटल कुंभ आहे. ई-रिक्षावाल्यांना दोन-तीन वेळा रोख द्यायला लागले, तो अपवाद वगळता सर्वत्र डिजिटल पेमेंटने पैसे दिले. अगदी चहाचे 10-15 रुपयेदेखील फोनने दिले. या तात्पुरत्या उभारलेल्या शहरातदेखील गूगल मॅप वापरून हव्या त्या ठिकाणी जाता येते.
 
सोयीसाठी 25 सेक्टरमध्ये विभागला आहे. तीर्थयात्रीसाठी असणारे हजारो तंबू, आखाडे व अन्य धार्मिक संस्था यांचे मांडव आणि या सर्वांना जोडणारे रस्ते असे मुख्य दृश्य प्रत्येक सेक्टरमध्ये दिसते. सुरुवातीला वर्णन केलेल्या तात्पुरत्या रस्त्यांचे जाळे या नगरीत आहे ज्याची एकत्रित लांबी 400 किलोमीटर आहे. त्या प्रत्येक रस्त्यावर दिव्याचे खांब आहेत. त्या खांबांवर नंबर आहेत. हरवलेल्या यात्रेकरूंना शोधण्यासाठी हे नंबर उपयोगी पाडतात. आजवर काही हजार हरवलेल्या माणसांची त्यांच्या आप्तेेष्टांशी गाठ पोलिसांनी घालून दिली आहे. हा डिजिटल कुंभ आहे. ई-रिक्षावाल्यांना दोन-तीन वेळा रोख द्यायला लागले, तो अपवाद वगळता सर्वत्र डिजिटल पेमेंटने पैसे दिले. अगदी चहाचे 10-15 रुपयेदेखील फोनने दिले. या तात्पुरत्या उभारलेल्या शहरातदेखील गूगल मॅप वापरून हव्या त्या ठिकाणी जाता येते. यात्रेकरूंसाठी गरजेची माहिती ज्यावर मिळेल असे क्यूआर कोड्स अनेक ठिकाणी पोस्टर्सवर बघायला मिळतात.
 

prayagraj kumbh mela 2025 
 
सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी गंगा नदीवर 30 तात्पुरते पूल बांधले आहेत. माणसे, वाहने आणि आखाड्यांच्या मिरवणुकीतील हत्ती-घोडे सगळे जाऊ शकेल इतके हे पूल भक्कम आहेत. गर्दीच्या नियोजनासाठी बरेचसे पूल एक-दिशा मार्ग आहेत. त्यामुळे कुठेही वाहतूक थांबल्याचे चित्र नाही. अमृतस्नानाच्या विशिष्ट दिवशी गर्दी लक्षात घेऊन पूल आणि रस्ते यावरील वाहने मर्यादित करणे किंवा बंद करून फक्त यात्रेकरू आणि पादचार्‍यांसाठी सर्व रस्ते उपलब्ध करणे हे निर्णय कुंभमेळा प्रशासन घेते. त्याकरिता 2750 सीसीटीव्ही कॅमेरे आणि शेकडो ड्रोन्स यांची टेहळणी महाकुंभ परिसरात 24 तास सुरू असते. या कॅमेर्‍यांत 328 अद्ययावत ए.आय. कॅमेरे आहेत ज्यायोगे विशिष्ट चौरस मीटर्समध्ये किती गर्दी आहे याची सतत नोंद होत असते आणि त्या माहितीचे त्वरित पृथक्करण करून निर्णय घेतले जातात. काही पाण्याखाली टेहळणी करणारे ड्रोन आहेत. सर्व कॅमेरे, ड्रोन यांचे नियंत्रण करणारी सुसज्ज वॉर-रूम आहे. महाकुंभ क्षेत्रात 56 पोलीस स्टेशन्स आहेत. अक्षयवट पोलीस ठाणे, आखाडा ठाणे, महामंडलेश्वर ठाणे अशा प्रकारची त्यांची नावे आहेत. त्यातली तीन महिला पोलीस स्टेशन्स आहेत. त्याव्यतिरिक्त 10 ठिकाणी ‘पिंक बूथ’ तयार केले आहेत जेथे पुरेशा संख्येने केवळ महिला पोलीस तैनात असतात. सुमारे 50,000 पोलिसांचा फौजफाटा महाकुंभनगरीसाठी तैनात केलेला आहे. चौका-चौकांत पोलीस उभे असतात. सहा महिने त्यांचे प्रशिक्षण केले आहे. त्यामुळे सामान्य यात्रेकरूंशी त्यांचे वागणे अत्यंत मार्दवाचे आणि सहकार्याचे असते. अनेक ठिकाणी सामान्य यात्रेकरूंना माहिती देणे, वाट दाखवणे आणि व्यवस्थांच्या विषयात मार्गदर्शन करणे अशी कामे करताना पोलीस दिसतात. शिवाय विविध भारतीय भाषांतून माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावले आहेत.
 
1250 किलोमीटर लांब पाइपांच्या जाळ्यातून कुंभनगरीला पाणीपुरवठा होतो आहे. अनेक पंपिंग स्टेशन्स, त्यासाठी तैनात केलेले 30 जनरेटर्स, शिवाय 85 कूपनलिका असे मिळून पाण्याची गरज भागवली जाते. रस्त्यात ठरावीक अंतरावर पाण्याचे नळ आहेत आणि सांडपाणी नेण्याची व्यवस्थादेखील आहे. 
 
पाणीपुरवठा नि स्वच्छता या दोन व्यवस्थांची कार्यक्षमता हे या महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाचे गमक आहे. 1250 किलोमीटर लांब पाइपांच्या जाळ्यातून कुंभनगरीला पाणीपुरवठा होतो आहे. अनेक पंपिंग स्टेशन्स, त्यासाठी तैनात केलेले 30 जनरेटर्स, शिवाय 85 कूपनलिका असे मिळून पाण्याची गरज भागवली जाते. रस्त्यात ठरावीक अंतरावर पाण्याचे नळ आहेत आणि सांडपाणी नेण्याची व्यवस्थादेखील आहे. आम्हाला कुठेही नळाच्या आजूबाजूला चिखल आहे, पाणी तुंबले आहे असे दिसले नाही. त्याव्यतिरिक्त आपापल्या पाण्याच्या बाटल्या, तांबे भरून घेण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. उत्तर प्रदेश जल निगमने असे आर.ओ. पाणी देणारे बूथ 200 ठिकाणी उभारले आहेत; पण सर्वसाधारण नळांना येणारे पाणीदेखील पिण्यासाठी योग्य आहे. महाकुंभनगरीत एक लाख पन्नास हजार वा अधिक तात्पुरती शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. त्याची स्वच्छता सांभाळणारे 15,000 सफाई कामगार तिथे 24 तास कार्यरत आहेत. रस्त्यावर पुरेशा संख्येने कचराकुंड्या आहेत. त्या प्रत्येकात मोठी काळी पिशवी लावली आहे. कचरा नेण्याची नियमित व्यवस्था असणार, कारण कुठेही कचराकुंडी भरून वाहताना दिसली नाही. अशा अनेक व्यवस्थांसाठी कामगार तिथे सहकुटुंब काही महिने राहणार असल्यामुळे त्यांच्या मुलांसाठी रीतसर ‘कुंभ स्कूल’ चालवले जात आहेत. घाटांवर पुरेशा संख्येने तात्पुरत्या ‘चेंजिंग रूम’ बनवल्या आहेत. मोठ्या संख्येने महिला त्याचा उपयोग करताना दिसत आहेत.
 
 
prayagraj kumbh mela 2025
 किन्नर आखाडा
हा भक्तीचा आणि सेवेचा कुंभ आहे. शैव आखाडे, वैष्णव आखाडे, शिखांचे उदासीन आखाडे, तृतीयपंथी लोकांचा किन्नर आखाडा, जैन शिबीर, बुद्ध शिबीर अशा विविध भक्तिमार्ग अवलंबणार्‍या लोकांचा आणि साधू-संतांचा महाकुंभमेळ्यात सहभाग आहे. विदेशातून आलेल्या लोकांची संख्यादेखील काही लाखात आहे. या सर्व आखाड्यांतून आणि शिबिरांतून संपूर्ण कुंभकालखंडात म्हणजे 46 दिवस राहणारे लोक लक्षावधी आहेत. त्यांना कल्पवासी असे म्हणतात. या काळात चर्चाविमर्शाचे अनेक उपक्रम आखाड्यांच्या आणि शिबिरांच्या अंतर्गत होत असतात. सर्वांचे मिळूनही असे काही कार्यक्रम कुंभकाळात झाले आहेत, होणार आहेत. असे कल्पवासी आणि सेवेसाठी सर्व 46 दिवस राहणारे लोक मिळून सुमारे 20 लाख लोक कुंभनगरीमध्ये कायम वास्तव्याला आले आहेत. एक-दोन दिवसांसाठी येणार्‍या यात्रेकरूंसाठी प्रचंड सोय कुंभनगरीमध्ये आहे. एका आरामदायी तंबूसाठी 40 हजार रुपये आकारणार्‍या व्यवस्थेपासून ते 100-200 रुपयांत एका रात्रीच्या झोपण्याची सोय करून देण्यापर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. आरामदायी तंबू देणार्‍या कंपन्यांना संगमापासून सर्वात दूर जागा दिल्या आहेत. संगमाजवळील बहुतांशी व्यवस्था या कमी खर्चीक आणि बर्‍याचशा विनामूल्य आहेत. तिथेही सोय न झालेले वा जागरण करण्याच्या तयारीने आलेले अनेक यात्रेकरू रात्रभर सुरू असणार्‍या प्रवचन, कथा आणि भजनांना हजेरी लावत रात्र घालवतात. कुंभनगरीमध्ये सर्वत्र
 
 हा कुंभ प्लास्टिकमुक्त कुंभ आहे. कुठेही जेवण वा चहा सिंगल युज प्लास्टिकमध्ये मिळत नाही. चहादेखील मातीच्या कुल्लडमध्ये किंवा कागदाच्या कपात देतात. कायमस्वरूपी लंगर जसे आहेत तसे रस्त्यात छोट्या रिक्षाने वा टेम्पोने येऊन पुरीभाजी किंवा खिचडी वाटणारे लोकही आहेत; पण रस्त्यात कुठेही अस्वच्छता, पत्रावळी वा केरकचरा पडलेला दिसत नाही.
 
रात्री नक्की वीज असते. प्रकाशाचा लखलखाट असतो. जेवणा-खाण्याची सोय दिवसरात्र सुरू असते. काही ठिकाणी सशुल्क, तर बर्‍याच ठिकाणी विनामूल्य आहे. चहाही असाच सतत आणि ठिकठिकाणी उपलब्ध आहे. हा कुंभ प्लास्टिकमुक्त कुंभ आहे. कुठेही जेवण वा चहा सिंगल युज प्लास्टिकमध्ये मिळत नाही. चहादेखील मातीच्या कुल्लडमध्ये किंवा कागदाच्या कपात देतात. कायमस्वरूपी लंगर जसे आहेत तसे रस्त्यात छोट्या रिक्षाने वा टेम्पोने येऊन पुरीभाजी किंवा खिचडी वाटणारे लोकही आहेत; पण रस्त्यात कुठेही अस्वच्छता, पत्रावळी वा केरकचरा पडलेला दिसत नाही. स्वच्छता आणि साफसफाई सतत सुरू असते.
 
 
prayagraj kumbh mela 2025
  रा. स्व. संघप्रणीत संस्थांनी चालवलेला ‘नेत्र-कुंभ’ हा उपक्रमदेखील डोळे दिपवणारा आहे. महाकुंभात येणार्‍या यात्रेकरूंच्या डोळ्यांची विनामूल्य तपासणी येथे होते.
विविध सेवाभावी संस्था इथे यात्रेकरूंसाठी लंगर चालवीत आहेत. गीता प्रेससारख्या संस्थांची पुस्तकांची दालने आहेत. असाच रा. स्व. संघप्रणीत संस्थांनी चालवलेला ‘नेत्र-कुंभ’ हा उपक्रमदेखील डोळे दिपवणारा आहे. महाकुंभात येणार्‍या यात्रेकरूंच्या डोळ्यांची विनामूल्य तपासणी येथे होते. रोज 5000 पेक्षा अधिक रुग्णांची इथे तपासणी होते. ज्यांना चष्मा देणे गरजेचे आहे त्यांना तिथे विनामूल्य चष्मे काही तासांत दिले जातात. रुग्ण तितकेही थांबण्याच्या स्थितीत नसेल तर त्याच्या पत्त्यावर चष्मा विनामूल्य कुरीअरने पाठवला जातो. ज्यांना मोतीबिंदू वा अन्य शस्त्रक्रिया गरजेची असेल, तर देशभरातील 160 रुग्णालयांचे नेत्र-कुंभ आयोजकांशी सहकार्य आहे. रुग्णाला त्यापैकी कुठल्याही जवळच्या रुग्णालयात विनामूल्य शस्त्रक्रिया करून घेण्याची सोय आहे. रोज 15 नेत्रविशारद नेत्र-कुंभात सकाळी 9 ते सायंकाळी 6 हजर असतात. त्यांच्या मदतीला त्यांचे मदतनीस, तंत्रज्ञ, अन्य कर्मचारी आणि स्वयंसेवक असे शेकडो जण तिथे ही सेवा 46 दिवस करणार आहेत. महाकुंभात जाणार्‍या लोकांनी हा नेत्र-कुंभ सेवा प्रकल्प अवश्य बघण्यासारखा आहे.
 
 
अखेर, ज्यासाठी हा सगळा घाट घातला तो क्षण आला. महाकुंभच्या निमित्ताने त्या पवित्र स्नानासाठी किनार्‍यावरून छोट्या नावेतून संगमावर केलेल्या सुरक्षित ठिकाणी आम्ही गेलो आणि अमृतस्नानाचा विशिष्ट दिवस नसूनही संगमाच्या तीरावर मोठ्या श्रद्धेने आलेला लाखोंचा जनसागर बघून डोळे भरून आले. गंगा नदीबद्दल आणि तिच्या पावित्र्याबद्दल चित्तोडचे कवी अब्दुल जब्बार लिहितात...
 
 
लगाले नैन से कोई, तो ज्योती उसकी बढ जायें
लगाले भाल से कोई, मुकद्दर उसके बन जायें
है आशाओं भरा पानी
नही इसका कोई सानी
करें हमपर मेहरबानी
ये निर्मल नीर गंगा का
 
किती शतके इस्लामी आक्रमणे झेलली, दोन शतके इंग्रजांचे राज्य भोगले; दैन्य, गरिबी, नैसर्गिक संकटे, काय नाही सहन केले? पण तरीही गंगा नदीविषयी आणि प्रयागच्या या संगमाबद्दल समाजात खोलवर रुजलेली पावित्र्याची भावना कशी जपली गेली असेल? पिढ्यान्पिढ्या तो भाव कसा संक्रमित झाला असेल? हाच विचार मनाला खोलवर हलवून गेला. राष्ट्राला एक ‘चिती’ किंवा शाश्वत मूल्यव्यवस्था असते, राष्ट्राचा ‘विराट’ जागृत होतो, असे शब्द भारतीय राष्ट्राची वैशिष्ट्ये सांगणार्‍या अनेक विद्वानांकडून ऐकले होते. त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार या महाकुंभात अनुभवायला मिळाला.
 

शरदमणी मराठे

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक