डॉ. संजय गांधी लिखित 'आकांक्षा नव्या युगाची’हे पुस्तक म्हणजे केवळ संजय गांधींचे चरित्र वा आत्मकथन नाही, तर गेल्या तीन दशकांत भारतासह जगभरात झालेली तंत्रज्ञानाची क्रांती, त्याचे समाजजीवनावर झालेले परिणाम, त्यातून निर्माण झालेली आव्हाने व संधी या सार्यांचे उत्तम दस्तावेजीकरण आहे.
एका छोट्याशा कल्पनेला कष्ट, अनुभवसिद्ध कर्तृत्व आणि अभ्यासाची जोड मिळाली तर तिचे रूपांतर एका यशस्वी व्यवसायात होऊ शकते. याच कल्पनेला सामाजिक जाणिवेचीही जोड मिळाली तर तिचे रूपांतर केवळ यशस्वी व्यवसायातच नाही, तर सामाजिक-आर्थिक चळवळीतदेखील होऊ शकते! याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. संजय गांधी यांनी स्थापन केलेली अॅस्पायर नॉलेज अँड स्किल्स ही संस्था आणि त्यांच्या माध्यमातून उभी राहत असलेली 'राइट टू रिपेअर’ ही अभिनव चळवळ. कोकणातील रायगड जिल्ह्यात महाडजवळील गोरेगाव येथे जन्मलेल्या संजय गांधींनी पुण्यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला. काळाची पावले ओळखत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनव्या वाटा ते धुंडाळत राहिले आणि त्यातून अॅस्पायर नॉलेज अँड स्किल्स ही संस्था कशी स्थापन झाली, तिचा 'ए-स्टोअर’ हा ब्रँड कसा निर्माण झाला, त्याची अनेक ठिकाणी साखळी कशी उभी राहते आहे आणि यातून युवकांमध्ये रोजगारनिर्मितीसोबतच ई-कचर्याच्या व्यवस्थापनासह शाश्वत विकासाकरिताही कसे योगदान मिळते आहे, ही सारी वाटचाल डॉ. संजय गांधी यांनी लिहिलेल्या ’आकांक्षा नव्या युगाची’ या पुस्तकात शब्दबद्ध झाली आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ संजय गांधींचे चरित्र वा आत्मकथन नाही, तर गेल्या तीन दशकांत भारतासह जगभरात झालेली तंत्रज्ञानाची क्रांती, त्याचे समाजजीवनावर झालेले परिणाम, त्यातून निर्माण झालेली आव्हाने व संधी या सार्यांचे उत्तम दस्तावेजीकरण आहे.
‘सकाळ प्रकाशन’ने गतवर्षी म्हणजेच 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या या 192 पानी पुस्तकाचे शब्दांकन प्रसाद मिरासदार यांनी केले असून मधुमिता शिंदे यांनी मुखपृष्ठ व मांडणी केली आहे. हे पुस्तक आत्मकथन या प्रकारात येत असले तरी यात भारताचे सामाजिक-आर्थिक-औद्योगिक वर्तमान व भविष्याविषयी तपशीलवार चिंतन प्रकट झाले आहे. महाडजवळील गोरेगाव येथे एका व्यापारी कुटुंबात संजय गांधी यांचा जन्म झाला. या गावाची व आसपासच्या परिसराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, कोकणातील निसर्गाची मिळालेली शिकवण, त्या वेळचे शालेय शिक्षण, या सार्यातून बालपणी झालेला संस्कार याबाबत पुस्तकाच्या सुरुवातीलाच तपशीलवार वर्णन वाचायला मिळते ज्यातून लेखकाची आपल्या जन्मभूमीविषयी असलेली कृतज्ञता आणि आदर स्पष्ट करते. संजय गांधी यांच्या वडिलांनी गावात किराणा मालाचा व्यवसाय सुरू केला व तो यशस्वी केला. ही वाटचाल बालपणापासून पाहिल्याने व्यवसायातील खाचाखोचा, जनसंपर्काचे महत्त्व, दर्जेदार सेवा आणि ग्राहक टिकवण्याचे कसब या सार्या गोष्टींचा संस्कार बालपणापासूनच त्यांना मिळत गेला. त्यातून विविध लहानमोठ्या व्यवसायांचे निरीक्षण-अभ्यास करण्याची आवड त्यांना लहानपणापासूनच लागली. याबाबतचे वेगवेगळे प्रसंग व आठवणी आणि त्यातून प्रकट होणारे तत्कालीन कोकणी ग्रामीण लोकजीवन पुस्तकात ओघवत्या शैलीत मांडण्यात आले आहे.
इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षणानंतर त्या वेळच्या प्रवाहाप्रमाणेच लेखकाने वैद्यकीय शिक्षणासाठी प्रयत्न केला; परंतु पुरेसे गुण नसल्याने वैद्यकीय क्षेत्राऐवजी अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घ्यावा लागला. त्या वेळी अभियांत्रिकी क्षेत्राबाबत फारशी माहितीही नव्हती, अशी प्रांजळ कबुली लेखक देतो. उद्योग-व्यवसायाचे बाळकडू घरातूनच मिळालेले असल्याने पुण्यात अभियांत्रिकीसाठी भारती विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर शिक्षण सुरू असतानाच त्यांनीस्वतःचा कॉम्प्युटर नेटवर्किंग, देखभाल-दुरुस्तीचा व्यवसायही सुरू केला व उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असतानाच पुण्यातील व्यावसायिक क्षेत्राची ओळख त्यांना झालेली होती, हे विशेष. व्यावसायिक जीवनाशी लहानपणापासून असलेला परिचय, त्यातून विकसित झालेली दृष्टी, शिवाय पुढे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान पुण्यात सुरू केलेला व्यवसाय या सार्यांचा उपयोग पुढील कारकीर्दीत डॉ. गांधी यांना झाला. कोणत्याही व्यवसायात नवे प्रयोग करावे लागतात, धाडस करावे लागते आणि प्रसंगी प्रवाहाविरुद्धही जावे लागते. याची उदाहरणे या पुस्तकात टप्प्याटप्प्यावर वाचायला मिळतात, जसे की जेटकिंग कंपनीची डॉ. गांधी यांनी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर घेतलेली फ्रँचायजी, त्याचा ब्रँड उभा करण्यासाठी घेतलेली मेहनत व पुढे या प्रयत्नांना मिळालेले यश, हे सर्व तपशील आवर्जून वाचण्यासारखे आहेत.
संगणक व संगणक प्रशिक्षण या विषयांत जम बसल्यानंतर काळाची पावले ओळखत आपल्या व्यवसायांत आवश्यक ते बदलही लेखकाने अंगीकारले. जसे की, 2012-2014 च्या दरम्यान तंत्रज्ञानात होत असलेले जागतिक बदल पाहून अतिशय अचूक वेळी त्यांनी डेस्कटॉप कॉम्प्युटर्सवरून आपला मोर्चा लॅपटॉप, टॅब आणि मोबाइल्सकडे वळवला. तसेच, आगामी काळात कौशल्य विकासाला प्रचंड महत्त्व येणार आहे, हेही ओळखत तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यातूनच ’अॅस्पायर नॉलेज अँड स्किल्स’चा जन्म झाला. हे निर्णय घेत असताना त्यामागील भूमिकेची अतिशय उत्तम मांडणी संजय गांधींनी या पुस्तकात केली आहे. यात ’नॅनो उद्योजक’ घडवण्याची आणि त्यांचे कौशल्य विकसित करण्याची त्यांची संकल्पना व आवश्यकताही त्यांनी तपशीलवार मांडली आहे. गांधी यांच्या पुण्यातील कारकीर्दीबाबत त्यांनी केलेल्या कथनात त्या त्या वेळी समाजात, शैक्षणिक क्षेत्रात, रोजगार व युवा क्षेत्रांत घडत असलेले बदल आणि स्थित्यंतरे याचेही उत्तम दस्तावेजीकरण आपल्याला वाचायला मिळते. उदाहरणार्थ कोविडकाळात घडलेले सामाजिक बदल तसेच आर्थिक क्षेत्रातील, बाजारपेठेतील, तंत्रज्ञानातील बदल, त्यांचा भारताच्या युवकांवर आणि त्यांच्या कौशल्य विकासाच्या वाटचालीवर झालेला परिणाम असा मोठा पट उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी येथे केला आहे. स्मार्टफोन्स आणि डिजिटलायझेशन यामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेवर होत असलेले परिणाम हेदेखील त्यांनी केवळ वरवरचे भाष्य न करता बारकाईने अभ्यासून मांडले आहेत. कोविडकाळानंतर शाश्वत विकासाची गरज पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाली. शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञान क्षेत्रात काय योगदान देता येईल, या विचारांतून गांधी यांनी ई-कचरा या विषयात 'मॅक्रो’ आणि ’मायक्रो’ स्तरावर मूलभूत चिंतन केले. हे चिंतन पुस्तकात अभ्यासपूर्ण मांडणी व त्यावर आधारित छोटीछोटी, परंतु अर्थपूर्ण निरीक्षणे यातून वाचायला मिळते. या सार्या विचारमंथनाला कृतीची जोड देण्याच्या प्रयत्नांतून मोबाइल वापरकर्त्यांमध्ये '5-आर’ची संकल्पना पोहोचवण्याची मिळालेली प्रेरणा, त्यातून 'राइट टू रिपेअर’ विषयात काम करण्याची मिळालेली प्रेरणा हे सारे तपशील अतिशय वाचनीय आहेत.
'राइट टू रिपेअर’ अर्थात 'दुरुस्तीचा हक्क’ या एका वेगळ्या, परंतु प्रचंड क्षमतेच्या संकल्पनेबाबत डॉ. गांधी यांनी येथे सखोल मांडणी केली आहे. दुरुस्ती व्यवसाय वा सेवेची जागतिक व भारतातील स्थिती, आजची बाजारपेठ व तिच्या गरजा, या सार्यांचा इतिहास, शाश्वत विकासाचे तत्त्व आणि त्याकरिता ’दुरुस्तीच्या हक्का’ची गरज हे सारे आकडेवारीसह अभ्यासपूर्ण शैलीत त्यांनी मांडले आहे. किंबहुना या संपूर्ण पुस्तकात अनेक ठिकाणी अनेक मुद्द्यांवर विविध तक्ते, आकडेवारी आणि संदर्भ आढळतात. यातून लेखकाने शास्त्रोक्त पद्धतीने विषयाचे विश्लेषण केले आहेच; परंतु सोबत अवतीभोवतीची अनेक उदाहरणे आणि आठवणी - प्रसंगही दिले आहेत. यामुळे हे पुस्तक कोणत्याही टप्प्यावर कंटाळवाणे होत नाही. संपूर्ण पुस्तकात अतिशय साधी, सोपी व सुटसुटीत भाषा आहे. मुद्द्यांना व्यक्तिगत अनुभवांची जोड आहे. त्यामुळे एखाद्या विज्ञान-तंत्रज्ञान विषयाशी थेट संबंधित नसलेल्या वाचकालाही हा विषय समजून घेणे या पुस्तकामुळे अधिक सुलभ झाले आहे. या ’राइट टू रिपेअर’ संकल्पनेला प्रत्यक्षात आणत 'अॅस्पायर’ने ’ए-स्टोअर’ अर्थात अॅॅक्शन स्टोअरची सुरुवात केली. हे ए-स्टोअर सुरू करत असताना ते सर्वप्रथम शिक्षणसंस्थांमध्ये, जसे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी गृह येथील आवारात सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामागे या युवा-विद्यार्थ्यांशी थेट संपर्क होईल, हा डॉ. गांधींचा दृष्टिकोन होता. तसेच, मोबाइल रिपेअरिंगच्या असंघटित क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून ब्रँड निर्माण करण्याचीही दृष्टी यात होती. त्यातूनच ’ट्रिपल आर रिक्षा’ योजना, शॉप इन शॉप योजना, संजीवनी अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट या योजनाही यशस्वीरीत्या राबवण्यात आल्या. या योजनांतील कल्पकतेतून दिसणारा व्यावसायिक व सामाजिक दृष्टीचा संगम कोणत्याही वाचकाला आवडेल आणि विचारप्रवण करेल, असाच आहे.
पुस्तकाचे लेखक डॉ. गांधी यांनी अॅस्पायरसाठी केवळ उद्योजक म्हणून काम न करता सामाजिक दृष्टी ठेवून काम केले. त्यामुळे शासकीय-निमशासकीय संस्था, शिक्षणसंस्था, कौशल्य विकास क्षेत्रातील तसेच संशोधन क्षेत्रातील विविध संस्था या उपक्रमांशी जोडल्या गेल्या. या व्यापक सामाजिक संपर्क व दृष्टिकोनातून विकसित झालेली भूमिका या पुस्तकात प्रत्येक टप्प्यावर प्रतिबिंबित होते. अॅस्पायरने रोजगार क्षमता, उद्योजकता व शाश्वत विकास ही त्रिसूत्री निर्धारित केली आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही हीच त्रिसूत्री पाहायला मिळते ज्यातून लेखकाची या विषयांप्रति असलेली बांधिलकी स्पष्ट होते. समाजातील विविध क्षेत्रांतील अनेक तज्ज्ञ, मान्यवरांचे डॉ. गांधी यांच्या उपक्रमांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा व मार्गदर्शन लाभले आहे, ज्यामुळे अॅस्पायरची व्यवसायातून सामाजिक चळवळीच्या दिशेने वाटचाल होते आहे. पुस्तकात विविध मान्यवरांची छायाचित्रे आणि शुभेच्छा संदेश वाचल्यावर याची अवश्य प्रचीती येते. या लेखात सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक केवळ आत्मकथन राहिले नसून अभ्यास व अनुभवसिद्ध दस्तावेज बनला आहे जो भविष्यात युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या अत्यंत वाचनीय पुस्तकाबद्दल लेखक डॉ. संजय गांधी यांचे अभिनंदन व 'अॅस्पायर’च्या पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!