@दिवाकर देशपांडे ब्रह्मपुत्रेवरील नव्या धरणामुळे भारतापुढे मोठ्या समस्या उभ्या राहणार असतील तर भारत काय करणार आहे, हा मोठा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय नद्यांसंबंधीचे जे काही कायदे आहेत, ते चीन पाळणार नाही हे उघड आहे. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा प्रश्न उपस्थित करून काहीही हाती लागणार नाही हे स्पष्ट आहे. हे धरण म्हणजे चीनच्या हातातले एक शस्त्र आहे, त्यामुळे ‘शस्त्राघाता शस्त्रच उत्तर’ या न्यायाने भारताने अरुणाचल प्रदेशातील सिआंग येथे ब्रह्मपुत्रेवर एक धरण बांधण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला आहे.
चीन 13 हजार 700 कोटी डॉलर खर्च करून ब्रह्मपुत्रा नदीवर जगातले सर्वात मोठे धरण बांधणार, ही बातमी आल्यानंतर भारतात मोठी खळबळ उडाली आहे. खरे तर ब्रह्मपुत्रा नदीवरचा हा चीनचा एकमेव किंवा पहिला प्रकल्प नाही. 2010 पासून चीन ब्रह्मपुत्रेवर छोटी छोटी धरणे बांधीत आहे व ती आता बांधून पूर्णही झाली आहेत; पण यारलुंग झांगबो (ब्रह्मपुत्रेचे तिबेटी नाव) या नावाने ओळखला जाणारा हा धरण प्रकल्प जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी नियंत्रित करण्याची म्हणजेच मोठ्या प्रमाणात अडविण्याची किंवा धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्याची क्षमता चीनला प्राप्त होणार आहे आणि ती भारत व बांगलादेशसाठी मोठी चिंतेची बाब आहे. भारत आणि चीन यांच्यात मोठा सीमाविवाद आहेच, शिवाय आशियात दोन्ही देशांत भूराजकीय स्पर्धा आहे. या दोन्ही प्रकरणांत चीन या धरणाचा शस्त्रासारखा वापर करू शकतो, ही भारतासाठी मोठी चिंतेची बाब आहे. ब्रह्मपुत्रेवरील हे नियोजित धरण भारताच्या अरुणाचल प्रदेशाच्या सीमेपासून केवळ 30 किलोमीटर अंतरावर आहे. चीन गेली अनेक वर्षे अरुणाचल प्रदेशवर दावा सांगत आहे. हा दावा खरा करण्यासाठी चीन ब्रह्मपुत्रा धरणाचा वापर करील काय, ही भारतासाठी खरी भीती आहे. तिबेटमधून उगम पावणार्या व भारतात प्रवेश करणार्या नद्यांच्या जलविसर्गाची माहिती देण्याचा औपचारिक समझोता भारत व चीनमध्ये आहे; पण चीन त्याचे नियमित पालन करीत नाही असा अनुभव आहे. दोन्ही देशांतील सामाईक नद्यांच्या पाणीवाटपाचा कोणताही करार दोन्ही देशांत नाही. त्यामुळे चीनने हे धरण बांधले व त्याचा वापर भारताविरुद्ध शस्त्रासारखा केला तर त्याला कसे उत्तर द्यायचे हे भारताला ठरवावे लागेल.
अलीकडेच भारताने पाकिस्तानशी असलेल्या सिंधू नदी पाणीवाटप कराराचा फेरआढावा घेण्याची मागणी केली आहे. भारताने ही मागणी लावून धरली अथवा या करारात एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न केला, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणावरून भारताची अडवणूक करू शकेल.
भारत व चीन यांच्यात अरुणाचल सीमेवर युद्ध पेटल्यास चीन या धरणातील पाण्याचा वापर करून भारतीय सैन्याच्या हालचालीत अडथळा निर्माण करू शकतो. एवढेच नाही तर चीनने सिलिगुडी कॉरिडॉर ताब्यात घेऊन भारताचा ईशान्य भाग अलग पाडण्यासाठी सैनिकी हालचाली सुरू करायचे ठरविले, तर त्याला ब्रह्मपुत्रा धरणाचा उपयोग होऊ शकतो.
हा झाला थेट युद्धातला वापर; पण शांतताकाळातही चीन भारताबरोबरच्या चर्चेत दबाव टाकण्यासाठी ब्रह्मपुत्रेतील जलनियंत्रण क्षमतेचा वापर करू शकतो. पावसाळ्यात हिमालयातील नद्या आधीच तुडुंब भरून वाहत असताना यारलुंग झांगबो धरणातून अधिक पाणी सोडून भारतीय प्रदेश जलमय करणे किंवा उन्हाळ्यात याच धरणातील पाणी अडवून भारताची कोंडी करणे चीनला शक्य होणार आहे. असे सांगितले जाते की, या धरणाची क्षमता 29 कोटी 50 लाख घनमीटर पाणी साठवण्याची आहे. एवढे पाणी चीन अडवू शकणार असेल, तर भारताच्या ब्रह्मपुत्रेच्या खोर्यात दुष्काळ पाडण्याची क्षमता चीनला प्राप्त होणार आहे आणि एवढ्या पाण्याचा अचानक विसर्ग चीनने केला, तर संपूर्ण आसाम जलमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या धरणातली काही पाणी चीनच्या उत्तर भागातील कमी पाण्याच्या प्रदेशात वळविण्याचीही चीनची योजना आहे. तसे झाले तर भारतात सध्या ब्रह्मपुत्रेचे जे पाणी नैसर्गिकरीत्या येते त्यात मोठ्या प्रमाणात घट होऊन भारताच्या अरुणाचल आणि आसामच्या पर्यावरणाला व पीकप्रणालीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या दोन्ही गोष्टींचे ईशान्य भारतातील समाजजीवनावर किती मोठे परिणाम होऊ शकतील याची कल्पनाच केलेली बरी.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे धरण नेमके तिबेट आणि भारत यांच्यातील एकमेकांशी संघर्ष करणार्या भूस्तरावर (tectonic plate) बांधण्यात येत आहे. हे क्षेत्र अत्यंत भूकंपप्रवण क्षेत्र मानण्यात येते. या भागात भूकंप झाला आणि धरणाची हानी झाली तर त्याचा सर्व भार हा भारतीय भूप्रदेशावर पडणार आहे.
ब्रह्मपुत्रेवरील या धरणामुळे भारतापुढे एवढ्या समस्या उभ्या राहणार असतील तर भारत काय करणार आहे, हा मोठा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय नद्यांसंबंधीचे जे काही कायदे आहेत, ते चीन पाळणार नाही हे उघड आहे. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा प्रश्न उपस्थित करून काहीही हाती लागणार नाही हे स्पष्ट आहे. हे धरण म्हणजे चीनच्या हातातले एक शस्त्र आहे, त्यामुळे ‘शस्त्राघाता शस्त्रच उत्तर’ या न्यायाने भारताने अरुणाचल प्रदेशातील सिआंग येथे ब्रह्मपुत्रेवर एक धरण बांधण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला आहे. या धरणामुळे चीनकडून येणार्या अतिरिक्त पाण्यावर भारताला नियंत्रण ठेवता येईल तसेच कमी पाण्याच्या काळात या धरणात आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करता येईल; पण एवढ्यावरच भागणार नाही. भारताला ब्रह्मपुत्रेच्या खोर्यात तलाव व ब्रह्मपुत्रेच्या उपनद्यांवर छोटी धरणे बांधून पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागेल. बांगलादेशमधील सध्याच्या घडामोडीनंतर भारत व बांगलादेशमधील अंतर वाढले आहे; पण चिनी धरणाचा मोठा फटका बांगलादेशालाही बसणार आहे, कारण ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश हा बांगलादेशात आहे, त्यामुळे चिनी धरणाच्या संकटाला तोंड देण्यासाठी बांगलादेशला भारताशी सहकार्य करावेच लागेल. या धरणाच्या परिपूर्णतेनंतर बांगलादेशचे भारतावरील अवलंबित्व खूप वाढणार आहे.
या धरणात किती साठा आहे व किती विसर्ग होऊ शकतो यावर नजर ठेवण्यासाठी भारताला उपग्रहांची अथवा ड्रोन्सची मदत घ्यावी लागेल. विशेषत: सीमेवरील तणावाच्या काळात आणि अधिक पाण्याच्या काळात या धरणातील पाणीसाठ्यावर नजर ठेवावीच लागेल.
अलीकडेच भारत व चीन सीमावादाबाबत स्थापन झालेल्या विशेष गटाच्या बैठकीत भारत व चीनचे प्रतिनिधी अनुक्रमे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व वांग यांग यांनी या धरणाबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येते; पण चीन अशा चर्चेत तोंडाला पाने पुसतो. त्यामुळे चर्चेतून काहीच निष्पन्न होणार नाही, हे गृहीतच धरावे लागते. त्यामुळे चीनकडे या धरणाच्या निमित्ताने एक नवे शस्त्र आले आहे, हे गृहीत धरूनच भारताला आपले एक वेगळे धोरण आखावे लागणार आहे.
चीनला या धरणाच्या निमित्ताने भारत व चीन सीमेच्या पूर्व विभागात बढत मिळणार आहे. ही बढत निष्प्रभ करायची असेल तर भारताला पश्चिम सीमेवर म्हणजे लडाख भागात चीनसाठी नवे आव्हान निर्माण करावे लागेल. चीन अरुणाचलवर दावा सांगत असला तरी त्याचा प्राण हा लडाख भागात गुंतलेला आहे. त्यामुळे भारताला लडाख भागात चीनसाठी नवे आव्हान निर्माण करावे लागेल. त्यासाठी लडाख भागातील पायाभूत सुविधांत झपाट्याने वाढ करावी लागेल. लडाख भागात भारताची आक्रमक शक्ती वाढली तर चीन व पाकिस्तान या दोघांच्या सहकार्यात एक मोठी पाचर घालणे शक्य होईल. लडाख भागात चीनचा तिबेट व झिंगझियांग मार्गही भारताच्या मार्यात येण्यासारखा आहे. त्यामुळे भारताला लडाख भागात कमी वेळेत मोठी लष्करी जमवाजमव करण्याची तयारी ठेवावी लागेल. काही तज्ज्ञांना हा चीनला भडकवण्याचा मार्ग वाटू शकतो; पण चीनला बळाची भाषा समजते. बळ दाखविल्याशिवाय चीन चर्चेला तयार होत नाही हा ताजा अनुभव आहे. त्यामुळे चीन सीमेवर डावपेचात्मक मोठ्या लष्करी हालचाली करण्याला पर्याय नाही. याशिवाय चीनच्या थ्री जॉर्जेस या धरणापर्यंत मारा करू शकणार्या क्षेपणास्त्रांच्या सतत चाचण्या कराव्या लागतील. ब्रह्मपुत्रा नदीवरचे धरण हे जर चीनचे शस्त्र असेल तर त्या शस्त्राला समर्थ उत्तर देऊ शकणार्या हालचाली करून भारताला या शस्त्राची धार बोथट करावी लागेल.
या लेखात फक्त या धरणाचा भारताच्या सुरक्षेवर होणार्या परिणामांची व त्यावरील संभाव्य उपायांची चर्चा केली आहे. धरणाची तांत्रिक माहिती चीनने फारशी उपलब्ध करून दिलेली नाही; पण थोडीबहुत माहिती समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे.